Tag Archives: रॉबरी

रॉबरी- [भाग ६-शेवटचा]


भाग ५ पासुन पुढे…

“थांब डॉली.. कश्यालाही हात लावु नकोस..”.. खाली कोसळलेल्या रफिककडे बघत पंकी म्हणाला.. “मला वाटते आहे ह्या कॅश वर काहीतरी विषारी पदार्थ किंवा वायु फवारलेला असावा.. आपल्याला काळजी घ्यायला हवी. तु एक काम कर, बेंजो कडुन याबद्दलची माहीती काढुन घे.. आणि तस्सेच काही असेल तर ही कॅश क्लिन कशी करायची याचीही माहीती मिळव आणि मला लग्गेच कळव.. तोपर्यंत ही कॅश हाताळणे आपल्या दृष्टीने धोक्याचे आहे.”

डॉलीने मान हालवली आणी ती तेथुन निघुन गेली.

घारीसारखी नजर ठेवुन असलेल्या थॉमसला ही बातमी कळताचे त्याने गुंजाळला फोन लावला..
“विषबाधा..?? .. हम्म.. ” .. गुंजाळच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.. “रेड आय सेक्यु्रीटीच्या माणसांना त्यांचे काम चांगले समजते तर.. ”

***************************

डॉलीने बेंजोकडुन दोन-चार दिवसांतच सर्व माहीती गोळा केली आणि पंकीला कळवली. त्यासाठी लागणारे रसायन आणि बाकीची साहीत्य पंकीने गोळा केली आणि तो कामाला लागला. प्रत्येक बंडल, प्रत्येक नोट साफ करायला..

*****************************
“.. थॉमस.. वेळ आली आहे.. प्रथम त्या बार्बी डॉल ला उडव.. पण मरण्यापुर्वी तिला जाणिव करुन दे तिच्या स्त्रित्वाची, तुझ्या पौरुष्याची. तिला कळु देत गुंजाळच्या पैश्याला हात लावुन तिने काय गुन्हा केला आहे.. हाल हाल करुन मार तिला..”..गुंजाळचा थंड आवाज थॉमसच्या कानात बोचऱ्या वाऱ्यासारखा घुसत होता..
*****************************

डॉली आपल्या अलिशान बेडवर झोपली होती. रात्रीचे २.३० वाजले असतील अचानक तिला जाग आली. डॉलीला आपल्या इंन्टींक्ट्स वर पुर्ण भरवसा होता. अशी अचानक जाग आली याचा अर्थ काहीतरी नक्कीच धोका आहे. काही क्षण ती बेडवरच पडुन आवाजाचा अंदाज घेत राहीली. मग शांतपणे ती उठली, शेजारच्या ड्रॉवर मधुन तिने .३२ ऍटोमॅटीक काढले. आजपर्यंत फार कमी वेळा तीने याचा वापर केला होता. पण कधीही .३२ने तिला धोका दिला नव्हता. “आज पुन्हा एकदा वेळ आली आहे..” तिने विचार केला. अंधारात आवाजाचा अंदाज घेत ती भिंतीला लागुन दरवाज्याच्या दिशेने सरकली. खिडकीतुन तिने हळुच खाली वाकुन पाहीले.

अंधारलेल्या रस्त्यावर थांबलेल्या गाडीतुन तिने एक काळी आडदांड आकृती उतरताना पाहीली. त्या आकृतीने एकवार डॉलीच्या खिडकीकडे नजर टाकली आणि मग चित्याच्या चतुराइने ती व्यक्ती इमारतीमध्ये शिरली.

डॉलीने सायलेंन्सर लोड केला, मॅगझीनमधील गोळ्या बघीतल्या आणि ती हळुच दार उघडुन बाहेर आली. आपल्या मागे तिने दार लावुन घेतले आणि बाजुच्या जिन्यामध्ये ती लपुन बसली.

जिन्यामधुन येणारा जड पावलांचा आवाज जवळ-जवळ येत चालला होता. डॉलीच्या दारापाशी तो आवाज थांबला. डॉली लपुन त्या काळ्या आकृतीवर लक्ष ठेवुन होती. त्या आकृतीने.. थॉमसने खिश्यातुन एक हत्यार बाहेर काढले. सफाईने त्याने ते दरवाज्याच्या कुलपात घालुन ते कुलुप हळुवारपणे उघडले आणि अंधारात प्रवेश केला. डॉलीच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब जमा झाले होते. ति जागेवरुन उठली, एक बोट ट्रिगरवर घट्ट पकडलेले होते. हळुवारपणे तिने त्या आकृतीच्या मागोमाग प्रवेश केला. ती आकृती अंधारात चाचपडत अंदाज घेत पुढे सरकत होती. डॉलीने विजेच्या चपळाईने त्या आकृतीच्या अंगावर उडी मारली. अचानक झालेल्या हल्याने ती आकृती बेडवर कोसळली.

डॉलीने त्याला आपल्या हातांनी घट्ट पकडले आणि आपले नाजुक ओठ त्या आकृतीच्या ओठांवर टेकवुन एक दीर्घ चुंबन दिले..

“ओह थॉमस..आय मिस्स्ड यु सो मच..” डॉली थॉमसला म्हणाली..

“डॉली.. आता अजुन जास्ती वेळ घालवण्यात अर्थ नाही. गुंजाळने आजच मला तुला खलास करायला सांगीतले होते.. उद्या जर त्याला तु जिवंत आहेस असं कळलं तर तो मला या आयुष्यातुन उठवेल.” डॉलीला बाजुला सरकवत थॉमस म्हणाला.. ” पंकीचे काम कुठपर्यंत आले आहे..मला वाटतं आजच त्याला आपण खलास करु आणि इथुन पळुन जाऊ. कुठलीही गोष्ट गुंजाळपासुन फार काळ लपुन रहात नाही.. मला खात्री आहे. माझ्यावर लक्ष ठेवायला गुंजाळने अजुन एखादा माणुस माझ्या मागे लावला असणारच.. आज ना उद्या त्याला कळेलच की मी ही या कटात सामील आहे…”

“.. नाही थॉमस तु नाही, मी संपवणार पंकीला. त्याने मला अजुन निट ओळखले नाही. या सर्व कामात त्याने माझा वापर करुन घेतला आणि त्याचे सगळे थर्ड क्लास, आळशी, भित्रट मित्र आराम करत होते. त्या पैश्यावर माझा हक्क आहे आणि मी त्याच्या समोरुन ते पैसे घेउन येणार..” तु तुझे सामान घेउन सकाळी डॉक पाशी ये. मी सर्व पैसे घेउन तिकडे पोहोचतेच..”

“ठिक आहे.. पण डॉली.. डोन्ट ट्राय टु डबल-क्रॉस मी..” उद्या १०.३० पर्यंत तु डॉक-पाशी नाही आलीस तर मी सरळ पोलीस-स्टेशनला जाऊन गुन्हा कबुल करीन आणि पोलीसांना किंवा गुंजाळला तुझ्यापर्यंत पोहोचायला फारसा वेळ लागणार नाही. तु नाही आलीस तर माझ्यापाशी दुसरा पर्यायही राहात नाही कारण मी गुंजाळपाशी परत जाऊ शकणार नाही.. आज नाही तर उद्या त्याला सत्य कळेलच…” थॉमसला गुंजाळच्या विचारांनीही घाम फुटला होता.

“येस डीअर.. डोंन्ट वरी.. मि पोहोचते..” डॉली..

दोघांनीही एकमेकांना अलिंगन दिले आणि मग थॉमस बाहेर पडला. डॉलीने आपली रिव्हॉल्व्हर पुर्ण लोड केली आणि ती पण थॉमसच्या मागोमाग बाहेर पडली.
*************************

शेडमध्ये दिवा अजुनही जळत होता.. ५ दिवस-रात्र काम केल्यानंतर तो पुर्ण थकुन गेला होता. सर्व कॅश त्याने रसायनचा वापर करुन निर्जंतुक, बिनविषारी केली होती. त्याने एकवार घड्याळात नजर टाकली..”काम झाले आहे पुर्ण म्हणुन डॉलीला फोन करावा का? का झोपली असेल ती अजुन..” तो स्वतःशीच विचार करत होता. अचानक त्याला दरवाज्यात कुणाच्यातरी असण्याची जाणीव झाली. त्याने जवळच पडलेले आपले रिव्हॉल्व्हर उचलले आणि तो मागे वळला. दारात डॉलीला बघुन त्याला आश्चर्य वाटले..

“बरं झालं तु आलीस.. मी तुला आत्ता फोनच करणार होतो. सर्व काम पुर्ण झाले आहे. वु आर ऑल क्लिअर..” जवळच पडलेल्या नोटांच्या बंडलांकडे बोट दाखवत तो म्हणाला.

“.. ग्रेट..” डॉली त्याच्या जवळ जात म्हणाली.. “पंकी आज आपण आपल्या कामात फत्ते झालो.. उद्या आपण दोघंही वेगवेगळ्या रस्त्याला असु.. पण त्याआधी मला काही गोष्टी तुला जाणवुन द्यायच्या आहेत. हा सर्व प्लॅन मी नसते तर पुर्ण झालाच नसता. तुझ्या एकाही मित्राची धड मदत झाली नाही, उलट झालाच तर त्रासच झाला. तिघंही जण आप-आपल्या चुकांनीच मेले. असो.. आता आपण दोघंच उरलो आहोत आणि मला नाही वाटत ह्या पैश्यात आपली ५०%-५०% भागीदारी होऊ शकते. तु जे काम केले आहेस ते एकुण कामाच्या १०% सुध्दा नाही.. आणि खरं सांगायचं तर मला तेवढे सुध्दा तुला द्यायची इच्छा नाही.. सो.. गुडबाय पंकी.. आपला मार्ग इथेच वेगळा होतो..” डॉलिने तिच्या हॅडबॅगमधुन रिव्हॉल्व्हर काढुन पंकीवर रोखली.. पंकीचे डोळे मोठ्ठे झाले.. भितीची एक लहर त्याच्या अंगातुन सळसळत गेली. त्याचे लक्ष त्याने जवळच ठेवलेल्या त्याच्या रिव्हॉल्व्हर कडे गेले.. पण त्याने काही करायच्या आधीच डॉलिने .३२ चा दोनदा ट्रिगर दाबला होता.

पंकी क्षणार्धात खाली कोसळला.

डॉलीने बाहेरुन कार मधुन दोन मोठ्या बॅगा आणल्या आणि एक-एक करत सर्व कॅश त्यात भरली. मोठ्या कष्टाने तिने त्या बॅगा गाडीत आणुन ठेवल्या. सकाळ व्हायला काहीच वेळ बाकी होता. तिने आपल्या गाडिला वेग दिला. उद्या संध्याकाळी आपण थॉमसबरोबर ह्या देश्याच्या बाहेर असु ह्या विचारांनीच ति सुखावली होती. वाटेत तिने हॅडबॅगमधुन आणलेले दोन सॅंन्डविचेस काढले आणि खायला सुरुवात केली. पहीले सॅडविच खाल्ले आणि तिला अचानक गरगरायला लागले. तिने गाडी कडेला घेतली. थोड्याच वेळात तिच अंग प्रचंड गरम झाले.. तोंडातुन फेस आला आणि काही कळायच्या आतच ती जागेवरच गतप्राण झाली.

तिने जर पंकीला व्यवस्थीत ओळखले असते तर तिने सर्व कॅश हाताळायची चुक केली नसती. पंकीने सर्व बंडल्स रसायनाने निर्जंतुक केले होते, पण एक मात्र त्याने मुद्दाम तस्सेच ठेवले होते. “जर डॉलीने फसवायचा प्रयत्न केला तर ती सुध्दा ह्या पैश्याचा उपभोग घेउ शकणार नाही. कधीना कधी ती ह्या बंडलाला हात लावेल आणि त्यावरील विष तिचा क्षणार्धात जिव घेईल..” पंकी ने विचार केला होता.

सकाळी थॉमस डॉक वर डॉलीची वाट बघत होता. डॉलीला उशिर व्ह्यायला लागला तसं तसं त्याच्यावर दडपण वाढु लागले. थॉमसने काल रात्रीपासुन गुंजाळला फोन सुध्दा केला नव्हता. डॉलिच्या कामाचे काय झाले याबद्दल सुध्दा काहीच अपडेट दिले नव्हते. गुंजाळ काही एवढा मुर्ख नव्हता न समजायला.

डॉलिला फोन लावुन लावुन थॉमस थकला होता.. “बिच्च..हरामी साली.. फसवला मला पण.. पण अजुनही उशीर झाला नाही.. मला फसवुन फार लांब गेली नसेल.. मी नाही तर तु सुध्दा नाही.. गुंजाळच्या हातुन मरण्यापेक्षा पोलीसांकडे जाणे योग्य.. निदान काही वर्ष तुरुंगात काढल्यावर जिवंत तरी बाहेर निघेन.. पुढचे पुढे.. ”

त्याने आपला मोबाईलवर १०० नंबर फिरवला.. “हॅलो पोलीस स्टेशन??.. माझ्याकडे ब्ल्यु-नाईल रॉबरी केस बद्दल आणि त्या अनुशंगाने झालेल्या ३ खुनांबद्दल महत्वाची बातमी आहे..”

[समाप्त]

रॉबरी- [भाग ५]


भाग ४ पासुन पुढे..

गुंजाळ, ब्ल्यु-नाईल क्लबचा मालक, एके काळचा कु-प्रसिध्द गुंड आणि सध्याचा एक बिझिनेसमॅन. अर्थात इतरांसाठी त्याचे काळे धंदे बंद झाले असले तरी आजही समाजाच्या दृष्टीआड त्याचे उद्योग चालुच होते. त्याच्याच क्लबची कॅश पळवली गेल्याने तो कमालीचा अस्वस्थ झाला होता.

“सर.. थॉमस आला आहे..”, सेक्रेटरीने इंटरकॉमवर गुंजाळला निरोप दिला.. पुढच्या मिनीटाला गुंजाळच्या केबीनमध्ये थॉमस उभा होता. थॉमस गुंजाळच्या भरवश्याच्या अनेक माणसांपैकीच एक होता.

“थॉमस, फक्त ३ आठवडे, मला त्याच्या आत माझी पुर्ण कॅश मला परत हवी आहे. आणि ज्या लोकांनी ही हिम्मत केली आहे, त्यांचे काय करायचे हे तु उत्तमपणे जाणतोसच..”.. गुंजाळ गंभीर स्वरात म्हणाला.

गुंजाळच्या डोळ्यावर नेहमी एक काळा गॉगल चढवलेला असे, परंतु तरीही त्याची भेदक नजर आपल्यावर रोखलेली आहे हे थॉमस जाणुन होता. आपल्या बॉसशी गद्दारी करणाऱयाची, त्याच्या धंद्यात आड येणाऱ्याचि काय गत होते हे तो चांगले जाणुन होता.

“एस बॉस.. तुम्ही डोंट वरी, मी फाईंड करीनच..” थॉमस म्हणाला..
“मला अपयश, हार मान्य नाही थॉमस, तु जाणतोस.. काम पुर्ण झाले नाही तर मी कुणाचीही गय करत नाही.. तुला वेगळे सांगायची गरज नाही..जाऊ शकतोस तु..” गुंजाळ

पुढच्या दहा मिनीटांत थॉमसने त्याच्या माणसांना कामाला लावले होते. त्याचा प्रत्येक माणुस तपास करायला काना-कोपऱ्यात पसरला होता.

************************************

बंटीच्या जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला होता. असं काही होईल याचा कुणीच विचार केला नव्हता. बंटीच्या अचानक नाहीश्या होण्याने तिघांसमोर मोठ्ठा प्रश्न उभा ठाकला होता. बंटी तेथील कामाचा सुपरव्हायझरच होता. तेथील कामगारांना काय सांगायचे? समोरच्या पोलीस चौकीतील पोलीसांचे काय? रोज या ना त्या कारणाने भेटणारा बंटी अचानक दिसेनासा झाल्यावर कुणीतरी काहीतरी विचारणारच ना. शेवटी ‘पगारवाढ’ नाकारल्याने बंटी नोकरी सोडुन गेला असे सांगायचे ठरले.

क्रिशची तब्येत खालावतच होती. कामात तर त्याचा काहीच उपयोग होतं नव्हता. एका कोपऱ्यात तो पडुन राही. डॉलीचे तेथे येणे योग्य नव्हते. अश्या मजुरीच्या ठिकाणी तिच्यासारख्या एका मुलीचे काय काम? एक दिवस फक्त डॉली त्याला भेटुन गेली.
क्रिशने पाहीलेली, त्याला भावलेली ही डॉली नक्कीच नव्हती. तिच्या डोळ्यात त्याला दिसणारी स्वतःबद्दलची जवळीक निघुन गेली होती, राहीली होती फक्त औपचारीकता आणि कोरडेपणा.

पंकी, क्रिश आणि रफिक समोर मोठ्ठ प्रश्न होता डिसुझा आणि बंटीच्या बॉडीचे काय करायचे? रॉबरीची बातमी काहीतासातच सर्वत्र थडकली होती. अपेक्षेप्रमाणेच पोलीसांनी नाकाबंदी केली होती. गावात येणाऱ्या आणि गावाबाहेर जाणाऱ्या प्रत्येक वहानांची कसुन तपासणी होतं होती. एक-दोन दिवस पंकीने वाट पाहीली परंतु नाकाबंदी उठण्याची शक्यता कमीच होती. बॉडी सडण्याचा, दुर्गंधी सुटण्याचा धोका होता. त्याच्या आतच काही-तरी पावलं उचलणं आवश्यक होते पण काय???

पंकीच्या डोक्यात एक कल्पना आली, पण त्यासाठी त्याला डॉलीची मदत आवश्यक होती. अर्थात डॉलीने प्रथम त्याला नकार दिला..

“हे बघ पंकी, मला दिलेले काम मी पुर्ण केलेले आहे. प्रत्येक वेळी धोक्याची काम माझ्याच वाट्याला का येतात? तु रफिकची मदत का नाही घेत? तसेही त्याच्या वाट्याला ह्या शेड मध्ये लपुन बसुन रहाण्याखेरीज काहीच काम नाही..” डॉली..

“डॉली.. सद्यपरीस्थीतीमध्ये आपल्याला लगेच हालचाल करणे महत्वाचे आहे. थोडीशी चुक आणि आपण सगळे पकडले जाऊ.. प्लिज हेल्प कर..” पंकी..

डॉलीकडे दुसरा पर्याय नव्हता.
******************************

रविवारची दुपार, नाकाबंदी असल्याने वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. नाक्यावरुन वाहनं मुंग्यांच्या गतीने पुढे सरकत होती. नाक्यापासुन काही वाहनं पुढे एक काळ्या रंगाची मर्सिडीज उभी होती. पुढचे वाहनं पुढे गेले तरी ती मर्सिडीज जागची हालली नाही म्हणल्यावर मागच्या वाहनांनी हॉर्न वाजवुन गोंधळ सुरु केला.

ड्युटीवरील पोलीसाचे लक्ष तिकडे गेले. तो तावातावाने त्या मर्सिडिजपाशी गेला. ड्रायव्हिंग व्हिलपाशी एक २५तील तरूणी स्टेअरींगला डोके टेकवुन बसली होती..

“ओss मॅडम झोप लागली काय? चला की पुडं..” हवालदार ओरडुन म्हणाला

ती तरूणी एकदम खडबडुन जागी झाली..”माफ करा हं साहेब.. थोडा शुगरचा त्रास आहे, चक्कर आल्यासारखे झाले..”

“.. घ्या कडेला घ्या जरा गाडी बाकीच्यांना जाऊ देत पुढे..”.. हवालदार..
तो पर्यंत बाकीचे एक-दोन पोलिसही तिथे आले होते.. “काय झालं रं..”
गाडी कडेला लावुन बाहेर येणाऱ्या त्या तरूणीला बघुन सर्व पोलीस घायाळ झाले होते. स्ट्रॉबेरी रंगाचा तिचा फिटींगचा ड्रेस तिचे सौदर्य अधीकच खुलवत होता..

त्या तरूणीने पर्स मधुन एक-दोन गोळ्या काढुन घेतल्या, पाणि पिले आणि ती पोलीसांपाशी आली.. “माफ करा हं.. माझ्यामुळे उगाचच खोळंबा झाला तुमचा..” मग तिने पर्स मधुन काही कागदपत्रे काढुन पोलीसांसमोर धरली.. “मी डॉली.. डॉली कुमार..” इथुनच पुढे एकाठिकाणी माझ्या कंपनीचे एक वर्कशॉप आहे तेथे चालले होते. ही माझी कागद पत्रं. माझं फक्त १० मिनीटांचेच काम आहे आणि परत जाणार आहे. पण झालं काय, सकाळपासुन काही खाल्लं नव्हता ना.. त्यामुळे थोडि चक्कर आल्यासारखं झालं. आता बघा नं नेमका माझा ड्रायव्हर आज सुट्टीवर होता आणि माझं इथे येउन जाणं महत्वाचं होतं म्हणुन स्वतःच गाडी घेउन आले आणि हा घोळ झाला..”

“काही हरकत नाही मॅडम.. आम्ही फक्त दोनच मिनीटं घेतो तुमची.. ए.. तुक्या जा जरा एकदा गाडी चेक करुन घे आणि मॅडमना जाउ दे कडेने..” ऑफीसरने हवालदाराला हुकुम सोडला.

आपल्या सर्वांगावरुन फिरणाऱ्या ऑफिसरच्या नजरेची डॉलिला पुर्ण जाणिव होती.. पण शेवटी हीच ती गोष्ट होती ज्यामुळे डॉली आज इतक्या संपत्तीची धनी होती. हवालदार गाडि चेक करुन आला आणि त्यांनी डॉलीला जाउ दिले.. शहरात आल्यावर डॉलि वेगाने त्या शेड कडे आली. बोलायला आणि इतर कश्यालाही फार वेळ नव्हता. गाडी शेडच्या मागच्या बाजुला लावल्यावर पंकी आणि रफिकने पटापट डिसुझा आणि बंटीच्या बॉडीज गाडिच्या डीक्कीत भरल्या. डॉलिच्या आवाजाने क्रिश उठुन बसला होता, पण काही वेळातच गाडीच्या जाण्याचा आवाज आला आणि त्याच्या पदरी निराशाच पडली.

साधारण अर्ध्या तासाच्या अंतराने डॉलिची गाडी परत चेकनाक्यावर आली. डॉलीला प्रचंड भिती वाटत होती.. जरका परत गाडीचे चेकींग झाले तर सगळा खेळ खल्लास. नाका जवळ येताच तिने स्वतःवर नियंत्रण मिळवले. नाक्यापाशी ती स्वतःहुन खाली उतरली.

” चला ऑफीसर..झालं माझं काम.. मगाशी तुम्ही होतात म्हणुन.. या उन्हामध्ये दिवसभर उभं राहुन काम करणं सोप्प काम नाही. मला खरंच कौतुक वाटतं तुमचं. तुमच्या सारख्या लोकांमुळे आज आम्ही समाजात निर्भयपणे वावरु शकतोय नाही का..??” डॉलिच्या चेहऱ्यावर तेच नेहमीचे फ्रेंडली हास्य होते..

“धन्यवाद मॅडम.. अहो आमच्या कामाची कदर आहे कुणाला इथं सालं आपलं २४ तास ड्युटी घरदार नाही, सणवार नाही.. बरं तुम्ही जा आता. आणि सावकाश जा.. पुढं एक चांगले रिसॉर्ट आहे तेथे जेवण चांगलं मिळतं बघा.. खाऊन घ्या तिथे. चला.. जाउद्या”.. ऑफीसर..

“अहो पण गाडिचे चेकिंग..” डॉलि चेहऱ्यावर उसने हास्य आणुन म्हणाली..
“का लाजवताय मॅडम.. अहो चोर कधी तुमच्या सारख्या सुंदर स्त्रिच्या वेश्यात मर्सिडीजमधुन फिरतात का? अहो उद्या लोकांनी म्हणायला नको पोलिस चोर सोडुन संन्याश्याला फाशी देतात म्हणुन..जा तुम्ही..” ऑफिसर..

डॉलिचा जिव भांड्यत पडला.. तिने अधीक न बोलता गाडि बाहेर काढली.. गावाबाहेर गेल्यावर पंकी आणि बंटीने रात्रिच्या वेळी गाडीतिल प्रेतांची विल्हेवाट लावुन टाकली होती.

***********

पहीले काही दिवस, १-२ आठवडे आज पेटी उघडेल, उद्या उघडेल या आशेवर क्रिश तग धरुन होता. परंतु ते पोलाद वाटते त्यापेक्षाही फारच कठीण निघाले. डॉली परत क्रिशला भेटायला कध्धीच आली नाही.. तिने फोनही त्याला कध्धीच केला नाही. क्रिशने सर्व आश्या सोडुन दिल्या होत्या आणि एक दिवस झोपेतच त्याने जीवही सोडुन दिला.

डॉली, बेंजोच्या संपर्कात होती. रॉबरीबद्दल मिळणारी बारीक-सारीक माहीती, तपासातली प्रगती ती पंकी आणि रफिकला कळवत होती. आत्तापर्यंत रॉबरी कशी झाली असावी याबद्दलची प्राथमीक माहीती तपासात पुढे आली होती. एक खोटा अपघात घडवुन कॅश-व्हॅन अडवली. ती घेउन पुढच्या टोल नंतर ती एका ट्रकमधुन कुठेतरी न्हेण्यात आली आणि नंतर परत खाली उतरवुन अमुक-अमुक ठिकाणी सोडुन देण्यात आली. मोठ्ठ्या ट्रकचा उल्लेख होताच पंकीने शेडवर येणारे मोठठे ट्रक बंद केले होते त्याऐवजी टेंपोंमधुनच अधुन-मधुन माल येत होता.. जात राहीला..

शेवटी तिन आठवडे प्रयत्न केल्यानंतर त्यांना ती पेटी फोडण्यात यश येऊ लागले आणि एक-एक करत त्याचे थर महीनाभराच्या अंतरात गळुन पडले. शेवटचे झाकण उघडायच्या वेळी पंकी, रफिक आणि डॉली पेटी भोवती उभे होते. झाकण उघडले आणि तिघांचे डोळे समोर खचाखच भरलेली कॅश बघुन सताड उघडेच पडले. शिवाय त्या पेटी मध्ये काही मौल्यवान दागीनेसुध्दा होते. बहुदा जुगारात हारलेले तरीही जिंकण्याची आश्या असलेल्या लोकांनी आपल्याजवळील दागीने गहाण टाकले होते. इतक्या दिवसांनंतर प्रथमच तिघांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. रफिक तर वेडाच झाला होता. दागीने, कॅश तो वेड्यासारखी हातात धरुन बघत होता, त्याचे चुंबन घेत होता. स्वतःच्याच अंगावर उधळत होता आणि अचानक तो स्तब्ध झाला.. हातातले दागीने गळुन पडले. त्याचा तोल जाऊ लागला तसा त्याने भिंतीचा आधार घेतला. रफिकला काय होते आहे हे कुणालाच कळेना. त्याच्या तोंडातुन फेस आला आणि तो खाली कोसळला…

************************

गुंजाळच्या टेबलावरचा फोन खणखणला.. “बॉस, थॉमस..पत्ता लागलाय.. पाच लोकं आहेत. त्यातील दोघं आधीच टपकले आहेत आणि एक आज टपकला.. कॅश पेटी उघडण्यात आली आहे…” आणि मग त्याने आत्तापर्यंत झालेला तपास आणि बाकीची माहीती गुंजाळला सांगीतली..

गुंजाळच्या चेहऱ्यावर एक विषारी हास्य उमटले.. “..शाब्बास थॉमस.. तु अजुन काही ऍक्शन घेउ नकोस.. पण जवळुन लक्ष ठेव आणि प्रत्येक बारीकसारीक डिटेल्स मला पाहीजेत.. मरण्यापुर्वी त्यांना कळले पाहिजे की हाता-तोंडाशी आलेला घास पळवणं म्हणजे काय आणि गुंजाळच्या पैश्याशी खेळले की काय होते..”

रॉबरीच्या कॅश भोवती म्रुत्यु घोटाळत होता. गद्दार कोण होते.. पंकी की डॉली? कॅश घेउन पळुन जाण्यात कोण यशस्वी होणार? गुंजाळचा डाव काय आहे? रफिकचा मृत्यु नक्की कश्यामुळे झाला??

सर्व काही पुढच्या- शेवटच्या भागात.. वाचत रहा.. रॉबरी..

[क्रमशः]

पुढचा भाग>>

रॉबरी- [भाग ४]


भाग ३ पासुन पुढे…

“क्या बात है, आप भी आ रहे हो हमारे साथ??”, गाडीत डिसुझाला चढताना पाहुन ड्रायव्हरला आश्चर्य वाटले.

“मै भी नही, सिर्फ मै आ रहा हु.. सिक्युरीटी गार्डस नही आयेंगे.. और वैसेभी हम है तो क्या गम है… चल घुमा चाबी..” डिसुझाने हातातली बंदुक ड्रायव्हरपुढे नाचवत म्हणले..

ड्रायव्हरने व्हॅन गेअर मध्ये टाकली आणि ‘ए़क्झीट टु ए़क्स्प्रेस वे’ च्या दिशेने गाडी वळवली. गाडी ए़क्स्प्रेस-वे वर आली तसे डिसुझा रिलॅक्स होऊन बसला. अर्धे काम पारपडले होते. क्षुल्लक घटना वगळता ब्ल्यु-नाईलमध्ये काही अघटीत घडले नव्हते. आता फक्त कॅश मुंबईला पोहोचवायची आणि पुढचा एक आठवडा टाकलेली सुट्टी ऍन्जॉय करायची. ड्रायव्हरने अल्ताफ राजाची कॅसेट टाकली होती.. “तुम तो ठहरे परदेसीssss साथ क्या निभाओ गे…sss” अल्ताफ त्याच्या नेहमीच्या पट्टीत गात होता. डिसुझाची तंद्री भंगली ते कुणाच्या तरी सतत हॉर्न वाजवण्याने.

“कौन है बे.. इसकी माss की.. साले.. जगहं मत दे उसको.. बिलकुल ओव्हरटेक मत करने देना..” डिसुझा संतापुन बोलला.

ड्रायव्हरही महा बिलंदर त्याने मागुन वेगाने येणाऱ्या स्कॉर्पियोचे ओव्हरटेकींगचे सगळे प्रयत्न हाणुन पाडले.

मागे स्कॉर्पियो मध्ये क्रिश आता बैचीन होऊ लागला होता. त्याला शक्य तितक्या लवकर व्हॅनला ओव्हरटेक करुन पुढे निघुन जायचे होते आणि ठरलेल्या ठिकाणी गाडीचा अपघात घडवुन आणायचा होता. पण बरेच प्रयत्न करुनही त्याल यश मिळत नव्हते. घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत होता. ठरलेले ठिकाण जवळ-जवळ येत चालले होते. डॉली मात्र शांत होती. शेवटी क्रिशने एका ठिकाणी अतीशय चपळाईने गाडी पुढे घातली…

“ओ.. तेरी.. निकल गया आगे..” ड्रायव्हर निराश होऊन म्हणाला..

डिसुझाच्या डोळ्यांनी स्कॉर्पियोच्या खिडकीत घाबरुन बसलेली डॉली बरोबर टिपली होती..”ओय.. वो छोड.. वो लौंडीया दखी क्या.. फटाका थी एकदम.. साला.. लेकीन क्या डरी हुई थी..ये पंटर आज मरवाएगा शायद उसको..”

ओव्हरटेकींग होताच क्रिशने गाडिला अजुन वेग दिला. ताशी १४० कि.मी. च्या वेगाने गाडी पळत होती. त्याने आरश्यात बघीतले कॅश व्हॅन आता दिसेनाशी झाली होती. मागे वाहतुकही नव्हती. बस्स अजुन ५ मिनीटं आणि अप-साईड डाऊन.. काही क्षणातच त्याला ते वळण दिसु लागले. त्याने डॉलीकडे बघीतले..डॉलीने त्याच्याकडे..

“क्रिश.. आय ट्रस्ट यु.. तु निट करशील याची मला खात्री आहे आणि आपण यातुन नक्की सुखरुप बाहेर पडु”.. डॉलीने आपला हात क्रिशच्या घामटलेल्या हातावर ठेवला.. दोघांनीही सिट-बेल्ट्स टाईट केले. “डॉली, काही काळासाठी आपण वेगळे होणार आहोत आपण, पण परत आपण लवकरच भेटु.. आणि ते मात्र कायमचेच..होल्ड टाईट”.. क्रिश म्हणाला..

“१०…९…८…७…६…५…४…३…२…१…हीअर वु..गोssss” असे म्हणुन त्याने त्या शार्प वळणावर वेगाने गाडी वळवली आणि नायट्रोजन सिलेंडरचे बटन दाबले. क्षणातच नायट्रोजन वेगाने पिस्टॉन्मध्ये शिरला, समोरील मिटरवर नायट्रोजनचे प्रेशर वाढत गेले आणि तो पिस्टन फोडुन बाहेर पडला. डॉली आणि क्रिशच्या शरीराला एक जोराचा झटका बसला आणि गाडीने जोराने पल्टी घेतली. दोन-तीन पल्ट्या खाउन गाडी रस्त्याच्या मध्ये आडवी पडली. डॉलीला थोडेफार खरचटले होते पण क्रिश.. तो खुप जखमी झाला होता. नायट्रोजन गॅस ए़क्स्प्लोड चे बटन बसवण्यासाठी जे पॅनल त्याने बसवले होते त्याचा पत्रा त्याच्या पोटात घुसला होता. क्रिशच्या चेहऱ्यावरील वेदनेचे भाव बघुन डॉलीच्या लक्षात आले काहीतरी झाले आहे..”यु ओके?” तिने क्रिशला विचारले.. आणि तिचे लक्ष क्रिशच्या पोटाकडे गेले..त्याच्या पोटातुन रक्त वहात होते.. क्रिशने आपली जखम हाताने दाबुन धरली आणि तो म्हणाला.. “मी ठिक आहे.. उतर खाली पटकन, व्हॅन येतच असेल.”

दोघंही धडपडत खाली उतरले. रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला टनेल असल्याने त्याबाजुकडुन कुणाला अपघात झाल्याचे दिसण्याचा प्रश्नच नव्हता. दोघही गाडीपासुन काही फुट पुढे जाउन रस्त्यावर पालथे पडले. सिमेंटचा रस्ता उन्हाने चांगलाच तापला होता. डॉलीच्या नाजुक हातांना, पायाला, मांड्यांना चांगलेच चटके बसत होते पण कश्याचीही पर्वा न करता ती निपचीत पडुन होती. क्रिशची परिस्थीती डॉलीपेक्षा बिकट होती. आधीच पोटाला झालेली जखम वेदना देत होती आणि त्यातच रस्त्याचे चटके जखमेवर बसत होते.

थोड्याच वेळात मागुन कॅश व्हॅन आली. ड्रायव्हरने दुरुनच रस्त्यात आडवी पडलेली स्कॉर्पियो पाहीले. “साबजी सही बोला था आपने..” डोळे मिटुन बसलेल्या डिसुझाला ड्रायव्हर म्हणाला..

“क्यु? क्या हुआ?”, डिसुझा..
“वो देखो ना. आपने बोला था ना.. वो बंदा लौंडीया को मरवायेगा.. देखो तो.. लगताहै लुडक गये.”

डिसुझा सतर्क झाला होता. त्याचे मन अलर्ट झाले होते. तो ड्रायव्हरला म्हणाला.. “गाडी रोकना मत, अगर बाजुसे निकलती है तो निकालके आगे चलो..”

“जी साबजी..” म्हणुन ड्रायव्हरने गाडीचा वेग हळु केला आणि कडेने गाडी न्हेऊ लागला.

डिसुझा चे लक्ष क्रिश आणि डॉलीकडे गेले. दोघेही निपचीत पडले होते. क्रिशच्या पोटातुन रक्ताची एक बारीक धार आली होती. त्याने परत डॉलीकडे बघीतले. त्या अवस्थेतही ती आकर्षक दिसत होती. तिचे गोरे पाय, मांड्यांपर्यंत सरकलेला तिचा फ्रॉक, चेहऱ्यावर एका निरागस मुलीचे भाव.. “ड्रायव्हर.. गाडी रोको.. देखते है जिंदा भी है की सच मै लुडक गये..”

ड्रायव्हरने गाडी थोडी स्कॉर्पियोच्या पुढे न्हेउन उभी केली. डिसुझा खाली उतरला, त्याचे पुर्ण लक्ष डॉलीकडेच होते, तरीही त्याचा एक नकळत खिश्यात गेला. हाताला थंडगार कोल्ट .४४ रिव्हॉल्व्हरचा स्पर्श झाल्यावर तो निश्चींत झाला. त्याने ड्रायव्हरला गाडीतच थांबायला सांगीतले आणि तो खाली उतरुन पुढे जाऊ लागला. सर्वात प्रथम तो क्रिश कडे जाऊ लागला. एक हात त्याचा अजुनही खिश्यावर होता. क्रिशच्या जवळ जावुन त्याने पायाने हलवुन बघीतले. काहीच हालचाल नव्हती. तो मागे वळला आणि डॉलीकडे जाऊ लागला. काही पावलं पुढे गेला आणि त्याच्या पाठीला बंदुकीच्या नळीचा स्पर्श झाला..

“जीव प्रिय असेल तर बंदुक खाली टाक, मी परत सांगणार नाही.” मागुन आवाज आला. पण त्या आवाजात जरब नव्हती. त्याने खाली बघीतले.. समोर वाकुन उभ्या असलेल्या, एका हातात बंदुक तर दुसऱ्या हाताने पोटावर दाब दिलेल्या एका माणसाची सावली दिसत होती. त्याने सावकाश खिश्यातुन बंदुक काढली आणि खाली टाकली. मागच्या माणसाने ती बंदुक उचलली आहे हे त्याला सावलीत दिसले.

“डॉली, उठ.. चल लवकर..” मागुन आवाज आला..
डॉली अजुनही निपचीत पडली होती..
“डॉली.. आर यु ओके?.. उठ लवकर..” परत मागुन तो वेदनेने आणि चिंतेने भरलेला आवाज.

डिसुझाने तिरक्या नजरेने सावलीतल्या माणसाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. साधारण २५-३० वयाचा कृश शरीरयष्टीचा माणुस मागे उभा होता. त्याच्या हातात बंदुक नसती तर डिसुझाने त्याला काही क्षणात लोळवला असता.

“डॉली.. वेक अप..”.. मागच्या माणसाचे लक्ष आता नक्कीच विचलीत झाले होते.. त्याला डिसुझा पेक्षा नक्कीच त्या समोर पडलेल्या मुलीची चिंता होती. एक क्षण, फक्त एक क्षण, आणि काही कळायच्या आत डिसुझा चित्त्याच्या चपळाईने मागे वळला आणि त्याने आपला पोलादी हात त्या माणसाच्या पोटातील जखमेवर मारला. अतिव वेदनेने तो माणुस कळवळला, त्याच्या हातातील बंदुक गळुन पडली. पोटातील जखमेतुन रक्ताची मोठी धार वाहु लागली..

“डॉली..”.. धाड.. दुसरा हात त्या माणसाच्या तोंडावर पडला.

डिसुझाला सावजाला तडपावुन मारण्यात मजा यायची. तो पुढे झाला.. त्या माणसाच्या पोटात मारण्यासाठी त्याने पाय उचलला एवढ्यात “धाड.. धाड” गोळ्यांचे दोन आवाज आले.. त्याने मागे वळुन बघीतले.. मगाचची ती मुलगी उठुन उभी होती, हातामध्ये .३२ ऍटोमॅटीक. डिसुझाने तिच्या हातातल्या बंदुकीच्या दिशेने बघीतले. समोर कॅश व्हॅनचा ड्रायव्हर कोसळला होता. डिसुझाला का वेळ लागला हे बघायला तो गाडीतुन उतरुन मागे येत होता. डॉलीने त्याला त्याची बंदुक काढायलाही वेळ दिला नव्हता. डॉलीने बंदुक डिसुझा कडे वळवली.. “स्टॉप.. ऑर आय विल शुट यु..” थंडपणाने डिसुझाला म्हणाली.

गाडीतुन उतरुन मागे येणाऱ्या ड्रायव्हरला तिने पाहीले होते. त्याच्याकडे असलेल्या बंदुकीची डॉलीला कल्पना होती आणि म्हणुनच ती तो जवळ येईपर्यंत निपचीत पडुन होती.

या मरतुकड्या माणसापेक्षा ही मुलगी जास्त घातक आहे, डिसुझाच्या चाणाक्ष नजरेने हेरले. एकाला आधीच कसलाही विचार न करता मारले आहे, आपल्यावरही गोळी चालवायला ती कमी करणार नाही डिसुझाने विचार केला.

“काय पाहीजे तुम्हाला? कॅश? ती तर तुम्ही न्हेणारच आहात. पण मला मारलेत तर नुकसान तुमचेच आहे. त्या कॅश पेटीचा नंबर मला माहीत आहे. मी ती तुम्हाला उघडुन देऊ शकतो. नाही तर तुम्हाला महीना गेला तरी ती पेटी उघडण्यात यश येणार नाही..” डिसुझा बोलला.

डॉली आणि क्रिशची नजरनजर झाली. दोघांनी ही एकमेकांकडे बघुन मान हालवली. क्रिश अजुनही वेदनेने तळमळत होता. त्याने खाली पडलेली बंदुक उचलली आणि डिसुझाला पुढे चालण्याची खुण केली. डिसुझा गाडिच्या जवळ जाताच त्याने बंदुकीचा दांडा त्याच्या मानेवर मारुन त्याला बेशुध्द केले.

तेवढ्यात बाजुच्या झाडीतुन बंटी बाहेर पडला..
“च्यायला तुझ्या.. कुठे होता तु??” क्रिशने विचारले…”का मुद्दाम लपुन बसला होतास माझी मरायची वाट बघत, म्हणजे तेवढाच एक हिस्सा कमी झाला..”
“अबे..भुतनीके.. सकाळपासुन इथे झाडीत लपुन आहे. दोन मिनीटांसाठी झाडामागे गेलो आणि इथे सगळा झोल झाला.. स्वॉरी यार..” बंटी म्हणाला..
मग त्याने आणि बंटीने डिसुझाला गाडीत ढकलले. बंटी ड्रायव्हरच्या जागी बसला आणि त्याने कॅश व्हॅन चालु केली. इकडे डॉलीने त्या ड्रायव्हरला स्कॉर्पियोच्या मागे ढकलले आणि ती अन-कॉन्शियस असल्याचे भासवत रस्त्यावर बसुन राहीली.
*************************

पंकी ट्रक मध्ये बसुन अस्वस्थपणे कॅश व्हॅनची वाट बघत होता. घड्याळात पुढे पुढे जाणारा काटा त्याची बैचैनी वाढवत होता.

क्रिश मोठ्या मुश्कीलीने टोल नाका पार् होई पर्यंत चेहऱ्यावर उसने आवसान आणुन बसला होता. क्षणाक्षणाला त्याला गाडित बसणे अशक्य होत होते.. जखमेतुन बरेच रक्त वाहील्याने त्याला प्रचंड अशक्तपणा आला होता. पंकीचा ट्रक दिसताच त्याच्या जिवात जिव आला. पंकीने आरश्यातच मागुन येणारी कॅश व्हॅन पाहीली होती, त्याने पटकन ट्रकचे मागचे दार उघडुन ठेवले. बंटीने सरळ गाडी आतमध्ये घातली. दार मागोमाग बंद झाले होते.

पंकी पुढच्या दारातुन आत मध्ये आला. क्रिशला बघताच त्याला शॉक बसला. क्रिश किमान १० वर्षांनी म्हातारा वाटत होता.

“काय झालं??..” त्याने क्रिशच्या जखमेकडे बघत विचारले..आणि त्याचे लक्ष व्हॅन मध्ये बेशुध्द पडलेल्या डिसुझा कडे गेले..”आणि हा कोण? ह्याला कश्याला आणले उचलुन??”

क्रिशने त्याला घडलेले थोडक्यात सांगीतले..”पंकी बोलण्यात वेळ घालवु नकोस, मला औषधाची जरुरत आहे. अतीशय अशक्तपणा आला आहे. तु ट्रक डॉक वर घे. मी सांभाळतो याला.

“क्रिश, तुला आणि बंटीला कॅश ची पेटी ओढुन घेता येईल?” पंकीने विचारले.
क्रिशला अर्थातच हे शक्यच नव्हते. शेवटी धोका पत्करुन पंकीने आणि बंटीनेच ती पेटी ओढुन खाली ट्रक मध्ये घेतली. वाटले होते त्यापेक्षाही जास्ती जड आणि जास्त वेळ घेणारे हे काम ठरले. पंकीची धाकधुक वाढत होती. ट्रक एकाच जागी थांबलेला असल्याने जिपीएस वर टेंपोचे लोकेशन फिक्स दिसणार होते. पण पर्याय नव्हता. पंकीला ट्रक चालवायचा म्हणले असते तर बंटीला एकट्याला ती पेटी ओढणे शक्य नव्हते. एकदा पेटी निघाल्यावर बंटीने लगेचच कॅश व्हॅन बाहेर काढली आणि तो टोलच्या दिशेने निघुन गेला.

पंकीने ट्रक चालु केला. क्रिश तेथेच टेकुन एका ठिकाणी खाली बसला. छोट्याश्या हादऱ्यानेही त्याला मरणप्राय यातना होत होत्या. एका हाताने तो जखमेवर हात ठेवुन होता तर दुसरा हातात बंदुक धरुन ती त्याने डिसुझावर धरली होती.

बंटीने पुढचा टोलनाका पार केला आणि ठरलेल्या ए़क्झीटला लपवुन ठेवलेली बाईक काढुन तो डॉक-कडे आला. पंकीनेही पुढची ए़क्झीट घेउन ट्रक डॉकच्या दिशेने वळवला. अतीशय सावधानतेने तो ट्रक चालवत होता. कुठेही स्पिड-लिमीट क्रॉस केली किंवा लेन कटींग मुळे त्याला पोलीसांची झंजट मागे लावुन घ्यायची नव्हती.

ट्रकमध्ये थोड्या वेळाने डिसुझाला शुध्द आली. प्रथम त्याला कळेना आपण कुठे आहे. त्याची कॅश-व्हॅन गायब होती, तर कॅशची ती मोठ्ठी बोजड पेटी शेजारीच ठेवलेली होती. समोरच क्रिश हातात बंदुक धरुन बसला होता. त्यामुळे डिसुझा जागचा हालला नाही

क्रिशचा चेहरा पांढराफटक पडला होता. अशक्तपणामुळे त्याच्या डोळ्यावर पेंग येत होती. डिसुझा क्रिशच्या बेशुध्द होण्याचीच वाट बघत होता.. अगदी तश्शीच जसे एखादे गिधाड समोर मरायला टेकलेल्या प्राण्याकडे वाट बघत असते.. पेशंटली.. ‘Vulture is really a patient bird’ ….. कुठल्याही क्षणी झडप घालण्याच्या तयारीत.

क्रिशने स्वतःला जागे ठेवण्याचा खुप प्रयत्न केला आणि शेवटी त्याची शुध्द हरपली आणि तो खाली कोसळला. त्याच बरोबर डिसुझाने चपळाईने त्याची बंदुक काढुन घेतली. एक क्षण त्याने क्रिशला गोळी घालण्याचा विचार केला.. “पण नाही.. हा तसाही मरणार आहे.. उगाच गोळीच्या आवाजाने बाहेरची लोकं सावध होतील..” म्हणुन तो विचार त्याने काढुन टाकला.

ट्रक बऱ्याच वेळाने एखाद्या गावात आला होता. बाहेरुन गाड्यांचे, लोकांचे आवाज ऐकु येत होते. थोड्यावेळाने ट्रक कुठेतरी येउन थांबला आणि मग उलट्या दिशेने एखाद्या गॅरेज किंवा मोठ्या शेडमध्ये गेला. बाहेरुन येणारा प्रकाश कमी झाला यावरुन डिसुझाने हा अंदाज बांधला. डिसुझा आता सावध झाला होता. त्याने क्रिशचे खिसे तपासले आणि एका खिश्यातुन सायलेंन्सरची नळी बाहेर काढली आणि हातातल्या रिव्हॉल्व्हर वर चढवली.

थोड्यावेळाने मागचे दार उघडले गेले. डिसुझा अंधारात लपुन बसला होता. दारात बंटी होता. त्याने बॅटरीचा प्रकाश आत मध्ये टाकला. प्रकाशात त्याला कोपऱ्यात कोसळलेला क्रिश दिसला. बंटी लगेच सावध झाला, त्याने पटकन आपला हात खिश्याकडे न्हेला, परंतु डिसुझा विजेच्या चपळाईने पुढे झाला आणि त्याने हातातल्या बंदुकीने गोळी झाडली ती थेट बंटीच्या डोक्यात घुसली. बंटी खाली कोसळला. डिसुझाच्या गोळीने नेम साधला होता, पण त्याचा हा आनंद त्याला साजरा करायला वेळच मिळाला नाही, कारण बंटीच्या मागेच सावध असलेल्या पंकीच्या गोळीने डिसुझाच्या काळजाचा वेध घेतला होता.

बॉलीवुडचा अभिनेता ‘बोमन इराणी’ सारखा दिसणारा डिसुझा त्या अंधारलेल्या शेडमध्ये कोसळला होता.. कायमचा….

[क्रमशः]

पुढचा भाग>>

रॉबरी- [भाग ३]


भाग २ पासुन पुढे चालु..

क्रिश आणि डॉली, प्रेमी युगुल ‘ब्ल्यु-नाईल क्लब’ ला वारंवार भेट देऊ लागले. पब्लीक प्लेस मध्ये डॉली कायम क्रिश ला बिलगुन असायची, तिच्या वागण्यावरुन क्रिशला सुध्दा आपण हिला गेले कित्तेक वर्ष ओळखतो आणि ती खरंच आपली प्रेयसी आहे असे वाटे. परंतु एकांतामध्ये डॉली त्याला काही क्षणातच अपरीचीत करुन टाके.

बंटी आणि रफिकने डॉक वरील उभारलेल्या मोठ्ठ्या शेड मध्ये आपले काम चालु केले होते. मधुनच कधी एखादा मोठा ट्रक येई तर कधी छोट्या-मोठ्या टेंपो मधुन सामान येत असे. आजुबाजुलाच रहाणाऱ्या ८-१० कामगारांना कंत्राटी पध्दतीने कामाला लावले होते. दिवसभर ठोका-ठोकीचे आवाज, वेल्डींगच्या दिव्यांचा झगमगाट, गाड्यांची ये-जा मुळे परीसर गजबजुन गेला होता. पोलीसांची रफिकला फार भिती वाटे त्यामुळे चौकीत हळुहळु ओळख काढण्याचे काम बंटीच करत असे.

एके-दिवशी शेड मध्ये सहजच आलेल्या हवालदाराला पाहुन रफिकची घाबरगुंडी उडाली होती. त्याचा तो पांढरा-फटक पडलेला चेहरा पाहुन बंटीने त्याला नंतर चांगलेच फैलावर घेतले होते.. “फट्टु साला..ss अजुन चोरी केली नाही तर तुझी ही अवस्था.. नंतर काय करशील? साला त्या हवालदाराला डाऊट आला असताना.. भेंxxx”

पंकीने आपला प्लॅन पुन्हा-पुन्हा तपासुन पाहीला होता. त्याच्या साथीदारांबरोबर चर्चा केली होती.. ” एक बारीकशी चुक.. आणि आपण कायद्याच्या जाळ्यात अलगद सापडु..” तो म्हणाला होता.. लागणाऱ्या हत्यारांची जमवाजमव त्याने करुन ठेवली होती. डॉली या प्लॅनची ‘कि’ होती. ब्ल्यु-नाईल मधल्या हालचाली, तेथे घडणाऱ्या घटना क्रिशपेक्षा अधीक अचुकतेने ती टिपत होती. बेंजोशी संपर्क ठेवुन तेथील माहीतीघेणे चालुच होते. ऐन रॉबरीच्या वेळी सुध्दा तिचा रोल अतीशय महत्वाचा होता. इतर सर्वांपेक्षा तो डॉलीवर जास्त निर्भर होता. परंतु तीची ती करडी नजर त्याला अस्वस्थ करत असे. “पैसा हातात मिळाल्यावर ही कुणाला धोका तर नाही ना देणार?” त्याच्या मनात विचार चमकुन गेला.

पण तिच का? इतर तिघं जणं. आपण त्यांना गेली कित्तेक वर्ष ओळखतो, पण पैसा माणसाला काय काय करायला भाग पाडेल कुणाला सांगता येईल. रफिक? कदाचीत कमी धोकादायक. भित्रा प्रवृत्तीचा.. पण तरीही ‘खाल मुंडी पाताळ धुंडी’ त्याच्या मनात काय विचार चालु असतील कुणास ठाउक!, बंटी.. सांगता येत नाही. क्रिश? चेहऱ्यावरुन भोळा दिसत असला तरी पैश्यासठी तो काय वाट्टेल ते करु शकतो. या सर्वांपासुन जपुन राहुनच आपण आपले “डाव” आखले पाहीजेत

दिवसांमागुन दिवस जात होते. तारीख जवळ-जवळ येत होती. ‘ब्ल्यु-नाईल’ अतीथींच्या स्वागतासाठी सज्ज झाला होता. हळु-हळु मिडीयाचे ही लक्ष वेधले गेले होते आणि तुरळक प्रमाणात का होईना ब्ल्यु-नाईल त्यांच्या ब्रेकींग-न्युज चा एक भाग बनला होता.

पंकीला हे फार खटकत होते. इथे होणारा इव्हेंट, इथला पैसा याला जितकी प्रसिध्दी मिळेल तितके त्याच्या दृष्टीने धोक्याचे होते. जास्त प्रसिध्दी, जास्त सुरक्षा, जास्त धोका..

******************

आज क्रिश खुप खुश होता. डॉली सकाळपासुन त्याच्याशी व्यवस्थीत वागत होती. दोघांनीही एकत्रपणे ब्ल्यु-नाईल मधील स्विमींग-पुल मध्ये स्विमींग केले होते. टु-पिस बिकीनीमधील डॉलीला बघुन क्रिश स्तब्ध झाला होता. लॉंग बॅक, स्लिम लेग्स, पाठीवर रुळणारे बरगंडी रंगाने हायलाईट केलेले केस आणि फार मुश्कीलीने दिसणारे तिचे मादक हास्य पाहुन क्रिश घायाळ झाला होता.

स्विमींग नंतर तेथील खुच्यांवर उन्हात बसलेल्या क्रिश जवळ डॉली येउन बसली होती.

“सो.. काय करणार या पैश्याचे?” तिने क्रिशला विचारले.

“काही विशेष नाही.. पण या फिल्म लाईन मधुन बाहेर पडणार.. या ऍक्टर लोकांचे डमी बनुन जिवावर बेतलेले स्टंट्स करायचे आणि प्रसिध्दी मात्र ही लोक मिळवणार.. तु? तु काय करणार?”

“वर्ल्ड टुर… हे जग खुप सुंदर आहे क्रिश मला हे सगळं बघायचं आहे. प्रत्येक देश फिरायचा आहे. लांब अथांग पसरलेल्या निळ्याशार समुद्रा स्वतःची हॅच घेउन कित्तेक दिवस प्रवास करायचा आहे..” मग अचानक तिने क्रिशच्या डोळ्यात डोळे घालुन विचारले.. “तु येशील क्रिश माझ्या बरोबर? आपण दोघंही जावु. मला आवडेल तुझ्याबरोबर जग फिरायला..”

तिच्या अनपेक्षीत प्रश्नाने क्रिश गोंधळुन गेला..”..पण. हे सगळं आपल्या वाट्याल येणाऱ्या पैश्यात शक्य आहे डॉली?”

“हम्म.. तेही आहेच म्हणा..” डॉलीच्या चेहऱ्यावर निराशा पसरली.. “खरं तर ना यामध्ये आपल्या दोघांना जास्त वाटा मिळायला हवा होता. मुख्य आणि धोकादायक काम तर आपणच करणार आहोत. विचार कर गाडी उलटवण्याचा अंदाज चुकला आणि गाडी दुसऱ्या बाजुला जाउन पडली, एखाद्या वेगवान ट्रक किंवा बसने उडवल्या जाण्याचा धोका नाकारता येत नाही क्रिश. सेक्युरीटी गार्ड बंदुक बघुन बधला नाही, त्याने काही वेडे-वाकडे केले तर ?? बाकीच्या लोकांची कामं एवढी जोखमीची नाहीत.. तुला काय वाटतं ?? ५ करोड, कमी रक्कम नाही ही. ही रक्कम आपल्या दोघांनाच मिळाली तर? विचार कर क्रिश, आपण फक्त दोघंच आणि फिरायला सगळे जग मोकळं.. कित्ती मज्जा येइल ना.. ५ करोड क्रिश.. ५ करोड..” डॉली बोलत होती.. क्रिश मात्र ऐकत नव्हता.. त्याला डोळ्यासमोर दिसत होतं तो आणि डॉली स्विझर्लंडमधे बर्फाळ प्रदेशात, कुडकुडणाऱ्या थंडीत एकमेकांच्या मिठीत समावलेले, मॉरीशस च्या प्रचंड तप्त उन्हाळ्यात एका प्रायव्हेट बोटीवर फक्त तो आणि डॉली.. आणि सोबतीला पसरलेला निळाशार समुद्र..

*****************

रॉबरी डे मायनस २… दोन दिवस राहीले होते. रेंट-अ-कार मधुन क्रिशने स्कॉर्पिओ भाड्याने घेतली होती. त्याच रात्री त्याने नायट्रोजन किट बसवुन टाकला. पिस्टन फिटींग, गॅस प्रेशर, बटन सगळे काम मनासारखे झाल्याचे पाहुन मग त्याने उसासा सोडला.

त्याचे काम होईपर्यंत डॉली त्याच्याबरोबर गॅरेजमध्येच होती. काम झाल्यावर त्याने डॉलीकडे एकदा बघुन मान हलवली..

******************************************

हॉर्स रेस डर्बीचे मोठ्या थाटात उदघाटन झाले. अनेक धनीक आपल्या उंची जातीच्या घोड्यांना घेउन शहरात दाखल झाले होते. शहरातील पंचतारांकीत हॉटेल्स, मॉल्स, क्लब्स गजबजले होते. पण सगळ्यात जास्त गजबजला होता तो ब्ल्यु-नाइल क्लब. सकाळचा उद्घाटन सोहळा संपला आणि जस-जसा दिवस मावळतीकडे झुकायला लागला तसं-तसा खऱ्या अर्थाने या क्लब मध्ये रंग चढु लागला होता.

संस्कृती, शिष्टाचाराच्याखाली सुरु झालेली नाच-गाणी मावळत्या सुर्याबरोबर अश्लिलतेकडे झुकु लागली होती. कॅसीओ मध्ये पैशाच्या राशीच्या राशी येऊन पडत होत्या. विवीध प्रकारचे, देशांचे खाद्य, उंची मद्य यांची रेलचेल होती. क्रिश आणि डॉली या गर्दीचाच एक भाग होऊन तेथे होणारी पैश्याची उधळण डोळे विस्फारुन बघत होते. सर्व काही सुरळीत पार पडले तर ह्याच नोटांच्या गड्या काही दिवसात आपल्या हातात असतील या विचारांनी दोघंही जण सुखावले होते. पण त्याचबरोबर.. तो दिवस, तो क्षण काही तासांवर येऊन ठेपला आहे ह्या विचारांनी धास्तावले सुध्दा होते.
******************************************

१ मार्च – दी (रॉबरी) डे..

फट्टु रफिकने शेडमध्येच थांबायचे ठरवले. बंटीने ए़क्स्प्रेस-वे वरील त्या वळणावर आपली पोझीशन हेरुन ठेवली होती.

पंकी काही क्षणातच तो मोठ्ठा ट्रक घेउन ए़क्स्प्रेस वे ‘हिट’ करणार होता.

क्रिश ने गाडीची पुन्हा-पुन्हा तपासणी केली. सर्व मिटर्स, गॉज व्यवस्थीत चालु आहेत ना याची खात्री केली. सिल्की, डार्क काळ्या, गुड्घ्यापर्यंतच्या फ्रॉक मध्ये डॉली अधीकच आकर्षक दिसत होती.

“अजुन १५ मिनीटं आणि करोडोंची कॅश घेउन ती व्हॅन ‘ब्ल्यु-नाईल क्लब’ मधुन निघेल..” क्रिशने घड्याळात बघत विचार केला.

“ऑल सेट?” डॉलीने विचारले…
“येस.. ऑल सेट फॉर द डे…” क्रिश म्हणाला…

[क्रमशः]

पुढचा भाग>>

रॉबरी- [भाग २]


भाग १ पासुन पुढे..

“ब्ल्यु नाईल क्लब” मध्ये जय्यत तयारी चालु होती. इंटेरीयरची फेरजुळणी, अधीक आरामदायी सुविधा यांचबरोबर सेक्युरीटीच्या दृष्टीने सि.सि.टीव्ही मध्ये अधीक नविन तंत्रज्ञानाची जोड देउन शक्तीशाली यंत्रणा लावली जात होती. डिसुझा, ‘रेड-आय सेक्युरीटीजचा’ सेक्युरीटी-प्रमुख सर्व गोष्टींमध्ये जातीने लक्ष देऊन होता. त्या दिवशी होणाऱ्या इव्हेंटची आणि कॅश ट्रॅन्स्फरची पुर्ण जबाबदारी त्याची होती. ऐन वेळेस प्लॅन मध्ये बदल करण्याची त्याची खासीयत होती.

‘त्या दिवशी सेक्युरीटी व्हॅन बरोबर दोन साध्या बंदुकधारींऐवजी .४४ कोल्ट, ऍटोमॅटीक असलेला एक उंचापुरा, आडदांड डिसुझा असेल’, मनातल्या मनात तो विचार करत होता.

“हाय डिसुझा.. संध्याकाळी काय करतो आहेस?” डिसुझा ची तंद्री भंगली ती ब्ल्यु-नाईलमधल्या बार-गर्ल, जेनी च्या आवाजाने. ‘स्त्रि’, डिसुझाचा फार मोठ्ठा विक-पॉईंट होता. तुम्ही त्याला कसलाही विचार न करता ‘स्त्री-लंपट’ ही संज्ञा खुश्शाल बहाल करु शकता.

“नथींग जेनी.. तुझ्यासाठी मी सदैव मोकळाच आहे,” चेहऱ्यावर अर्थपुर्ण हास्य आणत डिसुझा म्हणाला..

************************

ठरलेल्या वेळी पंकी, क्रिश, रफिक, बंटी आणि डॉली एकत्र जमले होते. क्रिशची नजर डॉलीच्या सर्वांगावरुन फिरत होती, पण तिच्या डोळ्यातील तो करडा थंडपणा त्याला त्याच्या विचारांपासुन दुर सारत होता.

“टाईम फॉर मोर डिटेल्स..”, पंकी सांगु लागला, “डॉक नाकाच्या थोडे पुढे पोलीस चौकीच्या समोर एक रिकामी जागा आहे. ति जागा आपण जहाज मोडणीच्या कामासाठी भाड्याने घेतलेली आहे. उद्यापासुन तिथे जहाजाचे सुट्टे भाग यायला सुरुवात होईल.”

रफिकने काही बोलण्यासाठी तोंड उघडले पण त्या आधीच पंकीने त्याला थांबवले..”डर मत रफीक, पोलीस चौकी समोर असली तरी आपल्याला त्याचा फारसा धोका असणार नाही. उलट झाला तर फायदाच होईल. चोरलेली कॅश आपल्या समोरच आहे असा विचार कुठलाही पोलीस वाला करणार नाही. एक महीना आधीपासुन चालु असलेले जहाजाच्या कामात कश्याला कोण लक्ष घालायला येईल? दुसरी गोष्ट, समजा काही वाईट घडलेच आणि व्हॅन चोरीची बातमी पोलीसांना लागली तर ताबडतोब नाकाबंदी करण्यात येईल. अश्यावेळेस कॅश पेटी घेऊन बाहेर जाणे आपल्याला अवघड होईल. त्यापेक्षा इथे आपल्याला जास्ती सुरक्षीत वातावरण आहे..

तर रफिक तु आणि बंटी उद्यापासुन तिकडे जायचे. जोपर्यंत मी सांगत नाही तो पर्यंत इकडे यायचे नाही किंवा मला फोन सुध्दा करायचा नाही. काही कंत्राटी कामगार सोबत घेउन कामाला सुरुवात करायची. पण त्याचबरोबर शेड मध्ये एखादा कोपरा असा ठेवायचा जिथे इतर कामगारांना यायला बंदी असेल. जिथे आपले कॅश पेटी फोडण्याचे काम आपण बिनबोभाट करु शकु. अधुन मधुन समोरच असलेल्या पोलीस चौकीतील पोलीसांना तुम्ही दिसाल याची काळजी घ्यायची. शक्य झालेच तर एक-दोन हवालदाराशी ओळख सुध्दा काढायची. अगदी त्यांना मुद्दामहुन आपल्या शेडमध्ये सहजच चहापाण्याला बोलावुन त्यांना खरंच काम चालु आहे हे नकळत दाखवुन द्यायचे.

चिकना क्रिश, तु आणि डॉली, तुम्ही दोघं उद्यापासुन अधुन मधुन ‘ब्ल्यु नाईल क्लब’ ला भेट द्यायची. तुम्ही दोघं ‘एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले कपल’ आहात याची जाणीव तेथील स्टाफ ला करुन द्यायची. तेथे जुगार खेळा, मौज मजा करा पण त्याचवेळेला तेथे घडणाऱ्या बारीक-सारीक घटनांची नोंद ठेवायची आणि प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचली पाहीजे.. मेक नो मिस्टेक अबाऊट इट.. मग ती कितीही क्षुल्लक असो.

डॉली तु.. बेंजोच्या संपर्कात रहायचे आणि तेथील बातम्या गोळा करायच्या.

आता डिटेल्ड प्लॅन. सद्य माहीतीनुसार १ मार्चला ९.३० वाजता ‘रेड-आय सेक्युरीटीजच्या’ व्हॅन मधुन ती मोठ्ठी कॅश बॉक्स मुंबईकडे रवाना होईल. बरोब्बर १०:०५ ला क्रिश तु आणि डॉली गाडीने त्यांच्या मागे निघायचे. कोरेगाव-पार्क मधील रेंन्ट-अ-कार मधुन एक बऱ्यापैकी बोजड गाडी २ दिवसांसाठी भाड्याने घेउन ठेवायची. उदा. तवेरा, स्कॉर्पीयो, इनोव्हा.

क्रिश इथे तुझा अनुभव आपल्याला लागणार आहे. तुम्ही शक्य तितक्या वेगाने त्या व्हॅनच्या मागुन जायचे. व्हॅन ला ओव्हरटेक करायच्या आधी तुम्ही अतीशय घाईमध्ये आहात हे त्या ड्रायव्हरच्या नजरेत आणुन द्यायचे. सारखा लाईट मारणे किंवा हॉर्न ब्लो करणे वगैरे. ओव्हरटेक करताना डॉली तु क्रिशच्या ड्रायव्हींगला खुप घाबरली आहेस असे चेहऱ्यावर भाव ठेवायचे. त्या गाडीतील ड्रायव्हर किंवा सेक्युरीटी गार्डस ना तुझा चेहरा, तुझ्या चेहऱ्यावरील भयभीत भाव व्यवस्थीत दिसले पाहीजेत.. क्रिश ओव्हरटेक केल्यानंतर ताशी १२०च्या वेगाने तुम्ही पुढे निघुन जा. या ठिकाणी एक़्स्प्रेस-वे थोडासा अरुंद आणि वळणाचा आहे तेथे तुम्हाला तुमची गाडी पलटवायची आहे.. जेणेकरुन अपघात झाला असा भास होईल..” पंकी ने ए़क्स्प्रेस-वेचा नकाशा काढुन त्यावरील एका ठिकाणावर बोट ठेवले..

‘काय? तुला वेड लागले आहे का? ए़क्स्प्रेस वे वर वेगवान गाडी अशी पलटवणे तुला गम्मत वाटली काय? साला…ss मी नाही तयार.. मरायचे आहे काय?’ क्रिश ने मध्येच आपला विचार मांडला..

“क्रिश..मान्य आहे थोडी रिस्क आहे.. पण अशक्य नाहीये. असे कित्तेक स्टंट्स तु सिनेमात केले आहेस, करवले आहेस.”, पंकी

“अरे सिनेमातली गोष्ट वेगळी, तेथे सेक्युरीटी मेझर्स असतात, व्यवस्थीत काळजी घेतलेली असते..” क्रिश बोलत होता..

“मी तयार आहे.. पैसे मिळवायचे असतील तर रिस्क घ्यावीच लागले..कुणाचा बाप पैसे घरी आणुन देणार नाही..” डॉलीने क्रिशच्या डोळ्यात डोळे घालत आपला विचार मांडला..

सर्वांच्या नजरा क्रिश वर होत्या..

“ठिक आहे.. पण मला एक दिवस आधी गाडी लागेल. थोडी तयारी करावी लागेल. गाडीच्या खाली मला एक नायट्रोजन सिलींडर लावावा लागेल. स्टीयरींग व्हिलपाशी एक छोटे बटन करुन घेईन. योग्य वळण येताच मी ते बटण दाबीन. बटण दाबताच व्हॉल्व उघडला जाईल.
नायट्रोजन त्या सिलेंडर मधुन उच्च-दाबाने बाहेर पडेल आणि पिस्टॉन मध्ये घुसेल. पिस्टनला एक ४mm जाडीचे घट्ट झाकण असेल जे नायट्रोजन गॅस अडवुन ठेवेल आणि त्यामुळे पिस्टोन मधील दाब वाढत जाईल. काही क्षणातच ते झाकण तुटेल आणि गॅस अती उच्च दाबाने बाहेर फेकला जाईल आणि कार फ्लिप होईल आणि एक-दोन पलट्या घेउन थांबेल.”

“फॅन्टास्टिक..आत्ता कसं..” पंकी म्हणाला..

“माझा असा समज आहे की तुम्ही काय करत आहात याची तुम्हाला जाणीव आहे आणि यामध्ये असलेला धोका तुम्हाला समजतो आहे मिस्स.. डॉली..” आपल्या भुवया उंचावुन क्रिशने डॉलीला विचारले.

“पंकी..पुढे..” डॉलीने जवळ-जवळ क्रिशला दुर्लक्षीत केले..

“हम्म.. गाडी उलटि झाली की तुम्ही दोघंही हातामध्ये रिव्हॉल्व्हर घेउन बाहेर येऊन पडुन रहाल. काही मिनीटांतच कॅश-व्हॅन तुमच्या इथे पोहोचेल. ड्रायव्हर किंवा सेक्युरीटी गार्डस तुमची गाडी ओळखतील. डॉली तुला अश्या पध्दतीने खाली पडावे लागेल की कोणताही माणुस तुला रस्त्यावर टाकुन जावु शकणार नाही.. लक्षात आले ना मी काय म्हणतो आहे?” पंकी..
“हम्म..” डॉली..

“गाडीतुन कोणीतरी खाली उतरेल.. तो तुमच्या जवळ आला की एकाने रिव्हॉल्हर त्याच्यावर रोखायची. त्याचवेळेस बाजुलाच लपुन बसलेल्या रफिक किंवा बंटी पैकी कोणीतरी एक व्हॅन मध्ये घुसेल आणी ड्रायव्हर आणि सेक्युरीटी गार्डला बंदुकीच्या धाकाने गप्प करेल. शक्य झालेच तर डोक्याच्या मागे बंदुक मारुन काही वेळासाठी त्यांना बेशुध्द करेल. डॉली तु तेथेच बेशुध्द झाल्याचे सोंग घेउन पडुन रहाशील. क्रिश जो उतरला असेल त्याला रिव्हॉल्व्हर लावुन.. मात्र आपण जखमी आहोत आणि त्याचा आधार घेउन व्हॅन मध्ये येत आहे असे दाखवत व्हॅन मध्ये येईल ज्यामुळे आजुबाजुच्या गाड्यांना संशय येणार नाही.

तो आणि रफिक किंवा बंटी जो कोणी असेल तो मिळुन ती व्हॅन घेउन पुढे निघुन येतील. त्यानंतर तु उठुन बस. तु अजुनही अन-कॉन्शीयस असशील. मागुन येणाऱ्या गाड्या आधीच रस्ता अरुंद त्यात तुमची गाडी मध्येच पडली असल्याने वेग हळु करतील. तु उठुन उभी रहाशील.. आणि तिथे अपघात कसा झाला वगैरे सांगायला सुरुवात करशील. तुला शक्य तेवढी सगळी नाटकं शक्य तितक्या जास्ती वेळ तिथे करायची आहेत, जेणेकरुन व्हॅनच्या मागे लगेच कुठल्या गाड्या येणार नाहीत.

व्हॅन मध्ये रफिक / बंटी आधीच सेक्युरीटीचा ड्रेस घालुन असेल. क्रिश तुला गाडीत बसल्यावर पटकन कपडे बदलावे लागतील. मग तुम्ही पुढचा टोल नाका पार कराल. नंतर ५ मिनीटांच्या अंतरावर मी मोठ्ठा ट्रक घेउन थांबलो असेन. तुम्ही व्हॅन सरळ आत आणायची. आत मध्ये मी, क्रिश आणि रफिक/बंटी ती पेटी बाहेर काढु. त्यानंतर ट्रक घेउन पुढच्या ए़क्झिटला मी बाहेर पडेन. तुम्ही पुढचा टोल नाका पार झाल्यावर व्हॅन सोडुन गायब व्हायचे. डॉली तु कुणाचीतरी लिफ्ट घेउन पुढे निघ आणि मग मध्येच काहीतरी कारण काढुन उतर आणि गायब हो.. एकदा कॅश पेटी इथे पोहोचली की मग फक्त प्रश्न उरतो तो ती पेटी कधी फुटणार याचाच आणि मग आपण सगळे करोडपती..

काय कसा वाटला प्लॅन?”

सर्वजण विचारात मग्न होते.. ती व्यक्ती मनातल्या मनात हसत होती. एकदा पेटी उघडली की सगळा पैसा माझाच. तुम्हाला कळणारही नाही एक-एक करत तुम्हाला मृत्युनी कधी कवटाळले ते..

[क्रमशः]

पुढचा भाग>>

रॉबरी- [भाग १]


लोणावळ्याजवळील एका अंधाऱ्या, कुंद वातावरण असलेल्या बार मध्ये रफीक, बंटी, क्रिश अर्थात किशन आणि पंकी अर्थात पंकज पत्ते खेळत बसले होते. १०.३०-११ वाजता बार रिकामा होऊ लागला तसे त्यांनी पत्ते खेळणे थांबवले.

किशन..सर्वांमध्ये दिसायला देखणा, तरणा-बांड.. बॉलीवुडपटात सटर-फटर कामं, स्टंट्समन. ह्रितीक चा क्रिश पाहुन.. त्याचेही नाव क्रिश पडले होते. रफिक २२-२३ वर्षाचा तरणाबांड पोरगा.. पण सदैव नकारात्मक विचार करणारा.. पंकी.. ग्रुपचा न ठरवताही लिडर.. बाकीचे तिघे नेहमी त्याचेच ऐकायचा.. त्याचा सल्ला.. त्याचे बोलणे.. त्याच्या इच्छा नेहमी ‘सराओखोंपर” तर बंटी सर्वसामान्य.. गर्दीत कुठेही खपुन जाईल असा.

“पंकी, बोल यार काय प्लॅन आहे.. साल्या तु दारु पण पेऊन देत नाय..!”, बंटी वैतागला होता.

पंकी ने एक दीर्घ श्वास घेतला. एकवार त्याने सगळ्यांकडे नजर फिरवली. आजुबाजुची टेबलं मोकळी झाली होती. त्याने खिश्यातुन ५५५ चे एक पाकीट काढले, त्यातील सिगारेट पेटवली, एक दीर्घ कश घेतला आणि म्हणाला..

“प्लॅन!!,, म्हणलं तर मोठ्ठा प्लॅन.. म्हणलं तर आयुष्याचा एक जुगार.. काही दिवसांत आपल्याला करोडपती करुन टाकेल..”

“करोडपती?.. काय बोलतो राव.. निट सांग ना..” क्रिश म्हणाला..

“सांगतो.. ब्ल्यु नाईल क्लब..लोणावळ्याच्या उत्तरेला असलेला हा श्रीमंतांचा क्लब. दररोज लाखोंची उलाढाल होते इथे. इथे जमा होणारा पैसा.. ए़क्स्प्रेस-वे मार्गे मुंबईमधील नरीमन पॉईंटच्या एका बॅकेत जमा केला जातो.. दर शुक्रवारी..”

“हो.. ते माहीती आहे.. पण तो पैसा चोरायचा म्हणत असशील तर..विसरुन जा. एकतर तो पैसा जास्तीत जास्ती आपल्याला लखपती करु शकेल एवढाच असतो. आणि दुसरे म्हणजे तो चोरणे केवळ अशक्य आहे. रेड-आय सेक्युरीटीज ची एक व्हॅन तो पैसा इथुन बॅकेत नेण्याची सोय करते. त्याच्या व्हॅनला जि.पी.एस सुविधा आहे. व्हॅन बॅकेत पोहोचेपर्यंत त्याच्या मार्गावर कंपनीचे अधीकारी लक्ष ठेवुन असतात. त्यामुळे ती व्हॅन कुठेही निर्धारीत वेळे पेक्षा जास्ती वेळ थांबलेली दिसली की लगेच संशय येईल. प्रत्येक टोल-पोस्ट वर त्या व्हॅनची नोंद ठेवली जाते. ठरावीक वेळेत व्हॅन नेक्ट पोस्ट्ला नाही पोहोचली तर आधीच्या आणि पुढच्या पोस्ट वरुन तैनात पोलीस पहाणी करायला त्या मार्गावर येतात. असे असताना…” रफिकने आपली शंका उपस्थीत केली.

“.. मला बोलुन देशील?”, पंकीने त्याचे बोलणे मध्येच तोडले..”..या सर्व गोष्टींचा मी विचार केला नाही असे वाटते का तुला? हा १००% फुल-प्रुफ प्लॅन आहे असे मी म्हणणार नाही. पण आपण सावधगीरी बाळगली आणि ठरल्याप्रमाणे गोष्टी घडुन आल्या तर आपला प्लॅन नक्की यशस्वी होईल..”

“.. म्हणजे.. प्लॅन यशस्वी होईल याची तुला खात्री नाही? धोका किती आहे त्यामध्ये?”.. एका हाताने कपाळावरचा घाम पुसत, तर दुसऱ्या हाताची नखं खात रफीकने विचारले.

“हे बघा.. धोका तर असणारच.. मला आधी बोलु द्या.. मग तुमचे प्रश्न..” पंकी पुढे बोलु लागला..” तर रफिक म्हणतो तसे दर शुक्रवारी पैश्याची वाहतुक होते.. ती फार-तर फार लाखाच्या घरात असते. प्ण १ मार्चला होणारी वाहतुक की करोडोची असेल..२९ फेब्रुवारीला एक मोठ्ठा इव्हेंट तिथे आयोजीत केलेला आहे. मार्च मध्ये होणाऱ्या घोड्याच्या डर्बीसाठी जमा झालेले अनेक धनाढ्य त्या रात्री एकत्र येणार आहे. डर्बीचे उत्घाटन हा तर एक औपचारीकतेचा भाग आहे.. त्या रात्री कॅसीओ, जुगारा मध्ये देशभरातुन आलेले हे धनाढ्य लोकं आपली श्रीमंती दाखवायला पाण्यासारखा पैसा उधळणार यात शंका नाही. खात्रीलायक मिळालेल्या माहीतीनुसार त्यादिवशी जमा होणारा पैसा हा नक्की कोटीच्या घरात असेल.. कमीत-कमी ५ कोटी तरी. तसे झाले तर आपल्याला प्रत्येकी एक-एक कोटी सहज मिळतील..”

“एक मिनीट.. आपण चार जण आहोत.. मग एक कोटी नाही.. तर त्यापेक्षाही जास्ती मिळतील..” क्रिशने आपले ७वि पर्यंतचे शिक्षण दाखवुन दिले..

“नाही.. आपण चार नाही, पाच आहोत. पाचव्या व्यक्तीची मी तुम्हाला लवकरच ओळख करुन देईल..” पंकी म्हणाला..”या प्लॅन वर मी आणि ह्या पाचव्या व्यक्तीने आधीच कामाला सुरुवात केलेली आहे. आपले प्रत्येकाचे काम जितके जोखमीचे आणि महत्वाचे आहे.. तितकेच त्या व्यक्तीचे..”

पंकी बोलत असतानाच क्लबचा दरवाजा उघडुन एक तरूणी आत मध्ये आली. तिला येताना पाहुन सर्वाच्या नजरा खिळुन राहील्या.. भरीव बांधा, गोरा रंग, पाठीपर्यंत रुळणारे केस, चेहऱ्यावर मग्रुरीचे भाव. कुठल्याही फॅशन-शो मध्ये एक मॉडेल म्हणुन खपुन जाईल अशी.. क्रिशला तिचे डोळे..डोळ्यातले ते करडे भाव आज्जीबात आवडले नाहीत..’बिच!.’ तो स्वतःशीच पुटपुटला..

कमरेला नाजुक झटके देत ती.. चौघांच्या टेबलापाशी येऊन बसली..
“वन ब्लॅक लेबल.. ऑन द रॉक्स..”, तिने वेटरला ऑर्डर दिली..

तिघांनीही..पंकी कडे बघीतले.. आजवर ऑर्डर देण्याचे काम केवळ पंकी करायचा.. पण आत्ता त्याचा चेहरा निर्वीकार होता.

पंकीने तीची ओळख करुन दिली.. “हि डॉली..आपल्या प्लॅंन मधील ५वा सदस्य.. प्लॅन साठी लागणारी अधीक माहीती आत्ता पर्यंत तिनेच आपल्याला मिळवुन दिली आहे. ज्या बॅकेत ही कॅश जमा होते,.. होणार आहे त्या बॅकेच्या आधीकारी.. मिसेस बेंजो.. ५०शीला आलेल्या महीला.. आयुष्यात भरपुर पैसा आणि तितकाच एकटेपणा त्यांच्या नशीबी आला. एक महीन्यांपुर्वी त्यांची ओळख शिक्षणासाठी कर्ज घ्यायला आलेल्या एका गरीब, सुशील मुलीशी.. डॉलीशी झाली.. (आम्ही ती घडवुन आणली) डॉलीने त्यांच्याशी जवळीक वाढवली. इतकी की डॉलीमध्ये त्या आपल्या मुलीला पाहु लागल्या. गोड बोलुन डॉलीने बरीच माहीती त्यांच्याकडुन काढली..” डॉलीने मागवलेला पेग टॉप-टु-बॉटम संपवला आणी तिने अजुन एक पेग ऑर्डर केला..

“.. तर प्लॅन असा आहे..”.. पंकी पुढे सांगु लागला..”२९ तारखेला जमा झालेली रक्कम एका मोठ्ठ्या टेंपो मधुन १ मार्चला सकाळी ९.३० वाजता मुंबईकडे रवाना होईल. ह्या टेंपोवर दोन बंदुकधारी शिपाई बरोबर असतील, शिवाय ‘रेड-आय’ सेक्युरीटीज चा ड्रायव्हर हा एके काळचा कुप्रसिध्द गुंड होता.. तो स्वतःची .३२ बोअर ची रिव्हॉल्वर जवळ बाळगतो. कॅश एका मोठ्ठ्या लोखंडी पेटीत बंदीस्त आहे, आणी त्या पेटीच्या वर ४ मोठे अतीशय मजबुत पोलादाचे थर देण्यात आलेले आहेत. आधीच करोडो रुपयांची कॅश त्यात इतक्या जड पोलादाचे वजन त्यामुळे ही पेटी एकट्याने हलवणे केवळ अशक्य आहे…”

“एक मिनीट.. पंकी..” रफिकने आपली शंका पुन्हा उपस्थीत केली.. “म्हणजे तुला असे म्हणायचे आहे.. आपण ही व्हॅन ज्यामध्ये ३-३ बंदुकधारी लोकं आहेत.. समजा कसेही करुन आपण रोखले तरीही रस्त्याच्या मधोमध दिवसा ढवळ्या आपण ही पेटी उतरवुन घेणार? आणि आपल्या गाडीत ठेवणार? असे म्हणायचे आहे तुला?..”

पंकीच्या कपाळावर आठ्या उमटल्या.. दोन क्षण तो डोळे मिटुन बसला आणि परत बोलायला लागला.. “… टेंपोने टोल नाका पार केला की आपण त्या टेंपोचा ताबा मिळवायचा.. कसा ते नंतर सांगतो.. त्यावर ताबा मिळवला की आपल्यातलाच एक जण मागुन एक मोठ्ठा दुचाकी वाहनांची वाहतुक करणारा ट्रक घेउन येत असेल. हा टेंपो आतमध्ये चढवायचा. ट्रक पुढे पुढे जात राहील अर्थात त्यामुळे तो टेंपोही.. त्यामुळे जि.पी.एस सिस्टीम वर त्याचे लोकेशन हालते दिसेल.. कुणाला संशय येणार नाही. दुसरा टोल नाका साधारण तीस मिनीटांच्या अंतरावर आहे. त्याच्या आत आपल्याला टेंपोमधील कॅश पेटी काढुन त्या ट्रक मध्ये ठेवायची आणि टेंपो परत खाली रस्त्यावर आणायचा. आपल्यातीलच दोघं जण कपडे बदलुन तो टेंपो चालवतील. दुसरा टोल नाकाही पार झाला की आपला कॅश-पेटी असलेला ट्रक ए़क्स्प्रेस वे वरुन एक्झीट घेईल आणि ठरलेल्या ठिकाणी पोहोचेल.

टेंपो पुढील टोल नाका पार झाल्यावर एका बाजुला सोडुन देऊन आपले साथीदार ठरलेल्या ठिकाणी परत येतील. जो पर्यंत सेक्युरीटीज ना कळेल टेंपो एकाच जागी थांबलेला आहे, त्यांना संशय येऊन पोलीस शोध घ्यायला येतील तो पर्यंत आपण सगळे जण तेथुन केंव्हाच पसार झालेले असु. अर्थात यात अजुनही बारीक बारीक गोष्टी आहेत.. त्या तुम्हाला सांगीनच.. पण वर-वर असा प्लॅन आहे.

चोरलेली पेटी असलेला ट्रक घेउन आपण डॉक पाशी यायचे. तेथे एक जागा आपण भाड्याने घेतलेली असेल. आपले काम असेल मोडकळीस आलेले एका जहाजाचे काही भाग सुट्टे करण्याचे. जहाजाचे काही अवशेष घेउन आधीच एक-दोन मोठ्ठे ट्रक तिथे आलेले असतील त्यामुळे कुणाला संशय येणार नाही. जहाजाची मोडणी चालु असतानाच एका बाजुला त्या हत्यारांच्या सहाय्याने आपण ही कॅशची पेटी तोडु शकु. कदाचीत एका आठवड्यात, कदाचीत एका महीन्यात. जहाज तोडफोडीचे आवाज चालुच असल्याने त्यातच हा आवाजही खपुन जाईल. कॅश मिळाली की ती आपल्यात वाटप करुन आपण सगळे आपल्या मार्गाने गायब..

काय कसा वाटला प्लॅन???”.. पंकी ने सगळ्यांच्या नजरेला नजर देत विचारले.

प्रत्येक जण अंतर्मुख झाला होता. त्यातील एका व्यक्तीच्या मनात विचार चालु होता, “हे पैसे मिळाल्यावर.. बाकीच्या चारही जणांना.. एक एक करुन या जगातुन जावे लागेल.. ह्या पैश्यावर फक्त माझा हक्क राहील.. फक्त माझा.. ”

[क्रमशः]

पुढचा भाग>>