पुण्यातील वाहतुक दुचाकींची मक्तेदारी


पुण्यातील ओसंडुन वाहणाऱ्या वाहतुकीत काल अजुन एक बळी गेला. दुचाकीवरुन जाणाऱ्या एका तरूणीला टेंपोची धडक बसली आणि ती तरूणी जागच्या जागी टेंपोच्या मागच्या चाकाखाली चिरडुन मरण पावली. अर्थात टेंपोचालकाला अटक झालेली आहे.

ह्या आणि अश्या अनेक बातम्या पुण्यातील वर्तमानपत्रात रोज वाचायला मिळतात. ह्या वेळी नक्की काय घडले? दोष कुणाचा हे मला तरी ठाऊक नाही. पण बातमी वाचल्यावर एक गोष्ट मनामध्ये येते, सिग्नलला थांबलेल्या टेंपोच्या ‘मागे’ ती तरूणी दुचाकीवर होती. सिग्नल सुटल्यावर टेंपो जेंव्हा पुढे जाऊ लागला तेंव्हा त्याची धडक म्हणे त्या दुचाकीला बसली. यात त्या टेंपोचालकाचा कसा काय दोष बुवा? म्हणजे त्याला कसे काय दिसणार की टेंपोच्या मागे इतके खेटुन कोण आहे? टेंपो पुढे जात होता, रिव्हर्स मध्ये मागे नाही.

पुण्यातील वाहतुकीचा विचार केल्यावर काही मुद्दे समोर येतात –

  • वाहतुकीचे सिग्नल मोडणाऱ्यांमध्ये दुचाकींची संख्या लक्षणीय आहे.
  • एकेरी मार्गातुन विरुध्द दिशेने सर्वाधीक वाहनं दुचाकीच येतात. पुण्यात ज्या ज्या ठिकाणी एकेरी मार्ग आहेत ते इतके अरुंद आहेत की उलट दिशेने चार-चाकी वाहनं येणं फारच कठीण
  • बहुतांश रस्ते हे वाहतुकीने ओसंडुन वाहत असतात. अश्यावेळी गाड्यांचा वेग नोंदवायचा झाल्यास दुचाकी वाहनं ही चारचाकींपेक्षा अधीक वेगवान असतात.
  • लेन (?) कटींग, वाकडे तिकडे जिथुन मिळेल तेथुन घुसणे, शक्य तेंव्हा सायकल मार्गाचा वापर ह्या सर्वच बाबतीत दुचाकीच आघाडीवर आहेत
  • मालवाहु ट्रक, बसेस, टेंपोची धडक बसुन झालेल्या अपघातांत सरसकट मोठ्या गाडीच्या चालकालाच दोषी धरणे चुकीचे आहे. कित्तेक वेळेला दुचाकी दोन मोठ्या गाड्यांच्या अतीशय अरुंद अश्या फटीतुन जिवावर उदार होऊन गाड्या न्हेत असतात. सिग्नलच्या वेळेला मोठ्या गाड्यांना खेटुन उभ्या असलेल्या दुचाकी, चालकाच्या लक्षात येण्याची शक्यता खुपच कमी असते
  • पादचाऱ्यांच्या चुकीमुळे झालेले कित्तेक अपघात डोळ्यासमोर आहेत. त्यांच्यावर कधी काही कारवाई झाल्याचे ऐकीवात नाही.

हजारो आजुबाजुला चिकटलेल्या दुचाकींना कधी ना कधी कुठल्या नं कुठल्या तरी मोठ्या गाडीचा धक्का लागणारच. शेवटी ती सुध्दा माणसंच आहेत, रोबोट नव्हे हे समजुन घेणे आवश्यक आहे.

एका हातात मोबाईल धरुन दुसऱ्या हाताने वाहन चालवणारे ‘बिझी’ चालक, अरुंद रस्त्यावरुनही सुसाट वेगाने झिग-झॅग बाईक्स पळवणारे ‘रोड साईड रोमीओज’, पुढे मुलाला उभे करुन, गाडीच्या हॅन्डलला पिशव्यांचे ओझे लावलेले, दुपट्टा रस्त्यावर, चाकावर वाहत चाललेला, कान, डोळे, तोंड झाकलेल्या अवस्थेतील अनेक महिला सदस्य, स्वतःशीच तार स्वरात बोलत चाललेले, एम-८०, ल्युना सारख्या ऍन्टीक वाहनांवर स्वार झालेले आजोबा असे अनेक प्रकार आजुबाजुला पुण्यातील वाहतुकींमध्ये पहावयास मिळतात.

एक चारचाकी चालक म्हणुन मी जेंव्हा वाहन चालवतो तेंव्हा दुचाकी चालक म्हणुन मी करत असलेल्या चुका मला जाणवतात.

फुटपाथ एक तर उखडलेला किंवा फेरीवाले, भाजीवाल्यांनी अडवलेला त्यामुळे पादचारी रस्त्यावर, सायकल ट्रॅक्स असुन नसल्यासारखे त्यामुळे सायकलवाले रस्त्यावर, पार्कींग साठी फार कमी ठिकाणी वेगळी सुविधा असल्याने ‘पि१, पि२’ रस्त्यावर. तुटलेले सिग्नल्स, खणलेले किंवा कित्तेक महीन्यांपासुन काम चालु असलेले रस्ते, पावती फाडण्यात मग्न असलेले मामा, लग्नाच्या मिरवणुका, जाहीर कार्यक्रमांचे मंडप रस्त्यावरच, गाई-म्हशी, भटकी कुत्र्यांचा मोकाट वावर, ‘सायक्लोमॅटीक रीडंड्न्सी’ सारखे चक्राकार मार्ग यामुळे वाहतुकीची अक्षरशः दुर्दशा झालेली आहे.

आमच्या कार्यालयात एक अमेरीकेहुन गृहस्थ आले होते, त्यांना विचारले ‘कसा वाटला भारत?’ किंबहुना ‘कसे वाटले पुणे?’

दोन क्षण विचार करुन त्यांनी मिश्कीलपणे उत्तर दिले –

‘ऍन ऑर्गनाईझ्ड मेस….’