
बघता बघता “डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा”च्या वाचकांची संख्या १ लाखाच्या वर पोहोचली सुध्दा. हा ब्लॉग सुरु केला २० मार्च २००९ रोजी. म्हणजे फक्त १० महिने आणि १८६ पोस्टमध्येच हा लाख भर वाचकांचा टप्पा ह्या भुंग्याने पार केला.
सकाळी वाचकांची संख्या ९९,३०० च्या आसपास पाहुन ‘तो’ दिवस आजचा असणार का? अशी एक अनामीक हुरहुर मनामध्ये होती. आधी ६०० मग ४००, ३००, १०७, ८५, ३८ वाचक राहीले होते. दुपारपासुन माझ लक्ष सारखं ‘स्टॅट्स’ वरच लागुन होते. शेवटी संध्याकाळपर्यंत ८०० हुन अधीक वाचकांनी ब्लॉगला भेट देऊन हा ‘एक लाख’ वाचकांच्या मैलाचा दगड पार करवुन दिला.
ब्लॉग सुरु करण्याचा एकमेव उद्देश होता आणि तो म्हणजे मनाचे जे स्वःगत चालु असते ते कुठे तरी उतरवणे. डायरी लिहीणे हा प्रकार कालबाह्य झाला आणि त्यात लिहीण्याचा आळस. त्यामुळे उगाचच कागद-पेन खर्ची न घालता ते संगणकाच्या सहाय्याने उतरवण्याचा एक प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग होता. सुरुवातीला वाटले होते की दैनंदिन घडामोडींवर भाष्य करणारा आपला ब्लॉग असेल. पण तो वाटलं त्यापेक्षा अधीक कठीण निघालं. महेंद्र, कसं काय जमतं बुवा तुम्हाला?
दुसरा पर्याय होता तो म्हणजे सुचत असलेल्या कथा उतरवणे. फार पुर्वीपासुन इच्छा आहे हो, आपलं एखादं तरी पुस्तक छापायचेच. पण मेला कोणी प्रकाशकच भेटत नाही. मग म्हणलं ह्या (फडतुस) गोष्टींना आपल्या ब्लॉगवरच स्थान द्यावे आणि अनपेक्षीतपणे थोडंफार जमु लागलं.
ब्लॉगच्या ह्या यशाचे सर्वच्या सर्व श्रेय जाते ते वाचकांना आणि त्यांच्या प्रतिसादांना. पोस्टला मिळालेली प्रत्येक कमेंट ही माझ्या दृष्टीने लाख मोलाची होती, आहे. त्यामुळेच माझा उत्साह वाढत गेला. मनापासुन सांगतो, मला माझा ब्लॉग कध्धीच आवडला नाही. ह्यातील कुठलीही पोस्ट ‘पब्लीश’ केल्यानंतर मी पुन्हा वाचली नाही, वाचणार नाही. परंतु हा ब्लॉग वाचकांच्या पसंतीस उतरला ह्याचा मला फार आनंद वाटतो.
दोन चार दिवसांपुर्वीच ‘रुचीता’ नामक एका वाचकाने एका रात्रीत माझा ब्लॉग बराचसा वाचुन काढला. प्रत्येक कमेंटमध्ये ‘आता रात्रीचे २ वाजले आहेत’, ‘आता ३’ तर ‘आता सकाळचे ४ वाजले आहेत’ असा उल्लेख होता. मी इतका खुश झालो होतो, त्या कमेंट मी सर्व मित्रांना दाखवत होतो. रात्रीच्या वेळी ब्लॉग वाचुनही झोप आली नाही म्हणजे ब्लॉग नक्कीच बरा असणार, नाही का? अश्या प्रतिक्रियांनीच खरं तर लिहीण्याचे बळ दिले.
गेल्या वर्षी ‘स्टार माझा’ने आयोजलेल्या मराठी ब्लॉगस्च्या स्पर्धेत ‘डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा’ने बाजी मारली हा प्रकार माझ्या दृष्टीने अजुनही अविश्वसनीय आहे. माझे आई,वडील काय किंवा बायको, बहीण, भाऊ काय, कोणीही अजुन ह्या ब्लॉगवर फिरकले देखील नाही ये 😦
आज, खरं सांगायचे तर मी थोडासा भावनाविवश जरुर झालो आहे. इतरांचे असते तसे माझेही ह्या ब्लॉगशी एक घट्ट, जिव्हाळ्याचे नाते आहे. प्रत्येक दिवशी कुठल्या ना कुठल्या कारणाने हा ब्लॉग माझ्या मनात राहीलेला आहे. फावल्या वेळी ब्लॉग्स वरील प्रतिक्रियांचा, नविन लिहावयाच्या पोस्टचा विचार सतत मनामध्ये चालु असायचा. आपले लिखाण आधीकाधीक कसे चांगले करता येईल हा विचार मनामध्ये रुंजी घालत रहायचा.
मराठीब्लॉग्स.नेट चे सहकार्यही ह्यामध्ये खुप आहे. त्यांच्यामुळेच माझ्या ब्लॉगला इतका वाचकवर्ग लाभु शकला. त्याबद्दल त्यांचे खुप आभार.
“डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा”च्या वाचकांचे पुन्हा एकदा मनःपुर्वक आभार. त्यांच्या ब्लॉगवरील प्रेमामुळे, लोभामुळे, प्रोत्साहनामुळेच ही उंची गाठणे शक्य झाले. यापुढेही तुमचे ह्या ब्लॉगवरील नाते अस्सेच कायम राहील अशी आशा करतो.
शेवटची एक पुणेरी सुचना 🙂 ब्लॉगचे एक लाख वाचक झाले म्हणुन लगेच ब्लॉगच्या चालकांकडे पार्टीची (ओली किंवा सुकी) मागणी करु नये. ब्लॉगचे चालक हे उभरते लेखक आहे, कुठल्या खानावळीचे मालक नाहीत.
Like this:
Like Loading...