Tag Archives: सायकल

सायकल[सायकल आणि त्याच्या पार्ट्सबद्दलची माहीती]

बाजारामध्ये अनेक प्रकारच्या सायकल उपलब्ध आहेत. पण सायकल खरेदी करताना आपली गरज काय आहे आणि किती पैसे खर्च करायची तयारी आहे हे दोन मुख्य मुद्दे आहेत. आता तुम्ही म्हणाल, पहीला समजला पण दुसरा? सायकल काय महाग आहेत काय? तर त्याचे उत्तर आहे.. हो आहेत..नक्कीच आहेत. आपल्याला आठवते ती शालेय जिवनात घेतलेली ८०० रु ची BSA SLR किंवा १०००-१२०० ची हरक्युलस. पण सध्याच्या काळी सायकल ज्याला आपण काळा-घोडा म्हणतो बहुतेक करुन दुधवाले-पेपरवाले यांच्याकडे ही सायकल आढळते त्याचीच किंमत आहे ३,८०० रु.फक्त :-). अर्थात किंमतीचे आपण नंतर बोलुच, पण त्या आधी बघु सायकलींचे प्रकार.

सायकलींचे लोकप्रिय दोन प्रकार आहेत. रोड बाईक्स आणि माऊंटन बाईक्स. रोड बाईक्स म्हणजे त्या उलट्या हॅंडल्स असलेल्या बारीक टायरच्या रेस मध्ये वापरतात त्या सायकल्स. वजनाने अतीशय हलकी, लांब पल्यासाठी योग्य आणि वेगवान या प्रकारात या सायक्ल्स मोडतात. तुम्ही सायकल वरुन लांब प्रवास करणार असाल तर या सायकल्स योग्य. या प्रकारातील विदाऊट गेअर्स च्या सायकल्स सर्वसाधारणपणे ३,३००/- रु पासुन सुरु होतात. पण शक्यतो विदाऊट गेअर्स घेउ नयेत कारण चढावर त्याचा अतीशय त्रास होतो. तसेच उंची कमी असणाऱ्या लोकांना, पाठीचा त्रास असणाऱ्यांना ही सायकल योग्य नाही.

माउंटन बाईक्स. (MTB Mountain Terrain Bike or ATB- All terrain Bike) थोडेसे जाड टायर असेलेली, नेहमीच्या वापराला या सायकल्स योग्य आहेत. नेहमीच्या रस्त्यांबरोबरच डोंगरावर, खाचखळग्यांचा रस्ता या ठिकाणी वापरायला आणि टिकायलाही या सायकल्स चांगल्या आहेत. साधारणपणे या २६ इंच फ्रेम साईझ मध्ये येतात.

सस्पेंशन्स: फुल्ल सस्पेंशन्स सायकल, ऐकायला मस्त वाटते, पण ही टर्म थोडीशी फसवी आहे. ह्यामध्ये पुढच्या चाकाच्या बाजुला एक आणि सिटाच्या खाली पॅडलच्या बाजुला दुसरे असे दोन सस्पेंशन्स येतात. हे दुसरे सस्पेंशन खरं तर त्रासदायकच ठरते. तुमचे वजन ६०-७० किंवा त्याच्यावर असेल तर सायकल या सस्पेंशनमुळे दबली जाते, त्यामुळे सायकल वेग पकडत नाही, प्रचंड दमछाक होते.

तसेच हे सस्पेंशन कालांतराने खराब होतात किंवा तुटतात आणि सायकल खर्च काढते. अर्थात त्यामुळेच फुल्ल सस्पेंशनच्या सायकलींची किंमत कमी असते साधारण ५,०००/- पासुन ७,०००/- पर्यंत. सायकल घेताना शक्यतो एकच सस्पेंशन असलेली आणि शक्य तितके भाग अल्युमीनीयचे असलेली घ्यावी. अल्युमीनीयम बॉडी, अलॉय व्हिल्स अतीउत्तम.

गेअर्स – दोन प्रकारचे गेअर्स असतात. पुढचे आणि मागचे. साधारणपणे पुढचे ३ आणि मागचे ७ असे मिळुन २१ गेअर्स कॉम्बिनेशन्स असलेली सायकल असते.. २१ गेअर्स नाही. बहुतांश वेळेला आपण मागचेच गेअर्स वापरतो, अतीशय कठीण चढालाच पुढचे गेअर्स लागतात. ‘शिमानो’ कंपनीचे गेअर्स बहुतांश सायकल्स मध्ये वापरलेले असतात आणि तेच योग्य आहेत.

गेअर्स क्नॉब/खटक्या सारखे किंवा ऍक्सिलेटर सारखे असतात. खटक्यासारखे गेअर्स दिसायला आकर्षक दिसतात, पण टिकावुपणाच्या दृष्टीने असे गेअर्स टाळलेलेच बरे.

डिस्क ब्रेक्सचाही फारसा वापर होतं नाही, उलट ते सायकल्सचे वजनच वाढवतात. अर्थात तुम्हाला बॅक-व्हिली किंवा तत्सम प्रकार करायचे असतील तर मात्र डिस्क ब्रेक्स उत्तम 🙂

किंमती.. रोजच वापरणार असाल आणि थोडे पैसे घालवायची तयारी असेल तर साधारण ९,०००/- पासुन १२,०००/- पर्यंत उत्तम सायकल उपलब्ध आहेत. आधी साधी सायकल घेउन नंतर पश्चाताप करुन घेण्यापेक्षा किंवा सायकलमधील उत्साह घालवण्यापेक्षा आधीच चांगली सायकल घेतलेली बरी. सायकलचे शौकीन असाल, पैसे भरपुर असतील आणि Only the best च हवे असेल तर फायरफॉक्स (Firefox) ट्रेक (Trek) किंवा मेरीडा (Merida) झक्कास आहेत. किंमती १५,०००/- पासुन ४०,०००/- पर्यंत आहेत.

ऍक्सेसरीज – हेल्मेट (३०० – २०००) पर्यंत, सायक्लोकंम्पुटर / स्पिडोमीटर (४५०), हॅंडग्लोज (२००-५००), सन-ग्लासेस, सायकलींग टाईट्स, दिवा, एल.ए.डी. रिफ्लेटर्स, पंक्स्चर रिमोव्हल आणि इतर टुल-किट्स

कुठुन घ्यावी? पुण्यात फडके हौद येथे (शनीवार-वाडा, लाल-महाल लेन) मध्ये अनेक सायकलची दुकान आहेत. तेथीलच ‘साई-बाबा सायकल्स’ नावाजलेला आणि भरवश्याचा आहे. विशेषतः इंपोर्टेड घेणार असाल तर त्याच्याकडे(च) भरपुर व्हरायटी आहे.

मी सध्या ल्युमाला (श्रीलंका ब्रॅड) सायकल वापरतो आहे.. मस्त सायकल आहे एकदम. साई-बाबा वाला टेस्ट राईड सुध्दा देतो, चालवुन बघा. साधारण ९,०००/- किंमत आहे.

इंडीयन ब्रॅंड मध्ये हिरो-ऑक्टेन हि सुध्दा त्यातल्या त्यात एक चांगली सायकल आहे किंमत ६,५००/- पण फुल्ल सस्पेंशनवाली आहे. हर्क्युलस ACT सिरीजच्या सायकल्स पण चांगल्या वाटल्या, अर्थात ए़स्क्ट्रीम कंडीशन्सला मी त्या चालवुन बघीतल्या नाहीयेत

माझ्यासाठी योग्य सायकल कोणती?

Determining Your Road Bike Frame Size
Height Inseam Length Bike Frame Size
4’10" – 5’1" 25.5” – 27” 46 – 48 cm
5’0" – 5’3" 26.5" – 28" 48 – 50 cm
5’2" – 5’5" 27.5" – 29" 50 – 52 cm
5’4" – 5’7" 28.5" – 30" 52 – 54 cm
5’6" – 5’9" 29.5" – 31" 54 – 56 cm
5’8" – 5’11" 30.5" – 32" 56 – 58 cm
5’10" – 6’1" 31.5" – 33" 58 – 60 cm
6’0" – 6’3" 32.5" – 34" 60 – 62 cm
6’2" – 6’5" 34.5" – 36" 62 – 64 cm

सायकल घेताना दोन प्रमुख गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

१. उंची:
रोड बाईक प्रकारच्या सायकलवर सिटवरुन उतरुन मधील ट्युबच्या वर उभे राहील्यावर फ्रेम आणि तुमच्या शरीराच्या मध्ये १-२ इंच मोकळी राहीली पाहीजेत. माऊंटन बाईक्स साठी हे अंतर अजुन जास्ती असेल.

२. सीट हाईट:
सायकलच्या सीटवर बसल्यावर आणि पाय खाली सोडल्यावर पाय सरळ ताठ ठेवता आले पाहीजेत. जेंव्हा तुम्ही पाय पॅडल वर ठेवाल तेंव्हा पाय गुड्घ्यापाशी थोडास्साच वाकला पाहीजे. बऱ्याच लोकांचा असा समज असतो की सीटवर बसल्यावर तुमचे पायाचे तळवे जमीनीला टेकायला हवेत. पण हा समज अगदी चुकीचा आहे. सीटवर बसल्यावर पायाच्या बोटांचा रस्त्याला किंचीत स्पर्शवगळता अधीक पाय जमीनीला टेकत असेल तर तुमचे सीट खुपच खाली आहे. सीट योग्य उंचीवर नसेल तर चालवताना फार श्रम पडतात.

३. सायकल कश्यासाठी वापरायची आहे?
तुम्ही व्यायामासाठी सायकल वापरणार असाल तरीही फार जड किंवा स्वस्तातील सायकल घेउन पदरी निराशा पाडण्यापेक्षा एखादी चांगली सायकल घेणेच योग्य. व्यायामाच्या वेळी सायकलचे गेअर्स थोडे ‘हाय’ ठेवल्यास सायकल चालवायला पडणारा जोर व्यायामाची कमतरता भरुन काढतो. पण त्याचबरोबर ही सायकल नेहमीच्या गेअर्सवर रोजच्या वापरालाही चांगली पडते.

तुम्हाला सायकलबद्दल काही शंका असल्यास किंवा अधीक माहीती हवी असल्यास ती देण्यास मला आनंदच होईल.

Its Not LIFECYCLE, its LIFE is CYCLE

माले, मुळशी सायकलींग राईड (फोटो)


रविवारची साखरझोप मोडुन सकाळी ५ वाजताच घरातुन बाहेर पडलो ते एक अविस्मरणीय अनुभवाचा साक्षीदार होण्यासाठी. मुळशी मधील ‘माले’ या एका छोट्याश्या गावापर्यंत सायकलींग राईड पुण्यातील काही हौशी सायकलवाल्यांनी आयोजीत केली होती. घरापासुन-ते-घरापर्यंत जाऊन येऊन एकुण किलोमीटर झाले फक्त ९० कि.मी.

दोन घाट आणि बाकीचा चढ उताराचा रस्त्याने फुल्ल वाट लावली. घरी आलो तेंव्हा पायाचे अक्षरशः तुकडे पडले होते. परंतु तो पर्यंत मुसळधार कोसळणाऱ्या पावसात, धुक्यात, वाऱ्याच्या विरुध्द दिशेने सायकल हाकण्यात जो आनंद अनुभवला तो स्वर्गीय होता. ‘माले’ येथे ग्रुप मधील एकाचे फार्म हाउस होते. त्यांनी ‘उपमा, खजुर, बाकरवडी, चहा, बिस्कीट’ असा चविष्ट ब्रेकफास्ट पुरवला. तेथे गेल्यावर फुल्ल तुटुन पडलो आम्ही त्याच्यावर.

येतनाही सुरुवातील जबरदस्त पाऊस होता, पण नंतर मात्र कडक उन पडले आणि आमच्या घामाच्या धारा वाहु लागल्या. एक मात्र मजेची बाब होती. आम्ही परत असताना अनेक जण पावसात भिजायच्या विचाराने मुळशीच्या बाजुला चालले होते. पण उन बघुन त्यांचे चेहरे पडलेले तर आम्ही मात्र, “आम्ही भिजलो बाबा मस्त पावसात..’ अश्या चेहऱयाने परतत होतो.

एकुण कॉलेज मध्ये जाणाऱ्या पासुन निवृत्त झालेल्या ५०-५५ वया पर्यंतच्या साधारण ७६ तरूण-तरूणींचा गृप होता. अर्थात या राईड बद्दल लिहीन तेवढे कमीच, पण सध्या तरी फक्त फोटोच टाकत आहे.


[पहिला घाट]


[आम्हाला नको बुवा पेट्रोल]


[घाट चढल्यानंतर उताराचे काय सुख असते ते सायकलवालाच जाणे]


[हिरवा निसर्ग हा भोवतीने]


[मित्र-मित्र]


[चला, मारा पॅंडल]


[निसर्गाच्या सानीध्यात]


[आलो बाबा एकदाचे]


[नभ उतरूनी आले]


[मुळशी धरणाची भिंत]


[खाऊ]


[खिडकी]


[खाणे चालुच]


[लव्हली लेडीज]


[लव्हली लेडीज]


[धडपडलेली लोकं]


[व्हि.. फॉर व्हिक्टरी]


[परतीचा प्रवास.. बाप रे अजुन ३५ कि.मी.!!]


[जरा विसावु या वळणावर]