‘सेक्सी’


तुम्ही जर ५०+ वयोगटातले असाल तर कदाचीत तुमच्या भुवया उंचावल्या असतील! मराठीला वाहीलेल्या ह्या साईटवर असले अचरट, आंबट शब्द वाचुन ‘हा काय चावटपणा?’ असं नक्कीच मनोमन पुटपुटला असाल.

तुम्ही ४० ते ५० वयोगटातले असाल तर ह्या पोस्ट मध्ये ‘तसलं’ काहीतरी असण्याची शक्यता समजुन एक तर ही पोस्ट टाळण्याचा प्रयत्न केला असाल किंवा चिडुन ह्या पोस्टवर काहीतरी खवचट प्रतिसाद द्यायच्या उद्देशाने ही पोस्ट उघडली असेल.

पण तुम्ही तिशीतले किंबहुना विशीतले असाल तर ‘सेक्सी’ ह्या शब्दाचे प्रचलीत असलेले ‘अनेक’ अर्थ तुम्ही जाणुन असाल आणि अगदी साफ मनाने तुम्ही हे पान उघडले असेल, नाही का?

आजच्या युगात ‘सेक्सी’ ह्या शब्दाने अनेक अर्थ अंगीकारले आहेत. पुर्वीच्या काळी ‘सेक्सी’ हा शब्द केवळ ‘कामुक’ गोष्टींशी निगडीत बोलतानाच वापरला जायचा. नगनत्व, कामक्रिडा, यौन किंवा लैगीक विषय हे ‘सेक्सी’ असायचे. पण आजच्या बोलीभाषेत ‘सेक्सी’ शब्दाचे परीमाणच बदलले आहे. आजच्या युगात कोणतीही आकर्षक गोष्ट ही ‘सेक्सी’ असते. रस्त्यावरुन धावणाऱ्या गाड्या सेक्सी असतात, घड्याळं, कपडे, चपला/बुट सेक्सी असतात, निसर्ग सौदर्य सेक्सी असते, ‘कुछ कुछ होता है’ मधली दादी सेक्सी असते, मोबाईल,लॅपटॉप्स, आयपॉड्स आणि इतर गॅडेज्ट्स सेक्सी असतात, अहो इतकच काय पदार्थांची चव सुध्दा सेक्सी असते… आता बोला!!

हा शब्द इतका प्रचलीत झाला आहे की कोणताही युवक किंवा युवती कसलाही विचार न करता अगदी मोकळेपणाने ‘सेक्सी’ म्हणुन मोकळे होतात.

भाषेत नवे शब्द निर्माण होणे हे भाषेच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. प्रत्येक नविन पिढी नविन शब्द प्रचलित करत असते. भाषा नेहमीच बदलत होती आणि बदलत आहे. ‘सही’ हा असाच कधी तरी उगवलेला शब्द. कुठलीही सुंदर असलेली गोष्ट ‘सही’ ह्या शब्दाने गौरवली जायची. पण आजच्या काळात ‘सेक्सी’ ह्या शब्दाने ‘सही’ ह्या शब्दाची जागा घेतल्याचेच दिसुन येते.

असे आहेत अजुन काही नविन शब्द जे तुम्ही इथे प्रतिसादात देऊन लेखकाच्या आणि वाचकांच्या ज्ञानात भर घालु शकाल?

हो, पण तुम्ही सुचवत असलेला शब्द तस्साच ‘सेक्सी’ असला पाहीजे बरं का!!