Tag Archives: स्क्रिप्ट

तुझ्या विना (भाग-६)


भाग ५ पासून पुढे

प्रसंग – ८ स्थळ.. केतनचे घर..

आई : “सुशांत याला काय अर्थ आहे अरे… लग्न ६ दिवसांवर येऊन ठेपले आहे आणि आता तु ४ दिवस बॅंगलोरला निघालास?..”
सुशांत : (अनुकडे बघत आईशी ) “अगं आई.. मी काय स्वतःच्या मर्जीने चाललो आहे का? मी तरी काय करु? एक तर आधीच माझी अमेरीका व्हिजीट जवळ येउन ठेपली आहे.. त्यासाठीच काही ट्रेनींग चा भाग म्हणुन मला जावं लागत आहे.. नाही कसं म्हणणार..?”
आई : “ते ठिक आहे रे.. पण घरात कित्ती कामं पडली आहेत..अनु एकटी किती आणि काय काय करणार रे.. आणि तिला पण तिच्या घरची कामं आहेतंच की…”..

सुशांत : “अगं एकटी कश्याला? हा आहे ना केतन!! तो करेल की मदतं… काय रे? करशील ना?” (केतनकडे बघतो)

केतन अनुकडे एकदा बघतो. अनु चेहरा पाडुन उभी असते.

सुशांत : “अरे तिच्याकडे काय बघतो आहेस? ती काय नाही म्हणणार आहे का? मी शक्यतो लवकर येण्याचा प्रयत्न करीन..”

सुशांत अजुन कुणाच्या बोलण्याची वाट न बघता आतमध्ये निघुन जातो.
केतन कानाला वॉकमन लावुन बसतो. गाणी ऐकता ऐकता तो मोठ्मोठ्यांदा ‘ओम-शांती-ओम’ मधलं गाणं गुणगुणू लागतो…

“दिलं जुडे बिना ही टुट गये..
हथं मिले बिना ही छुट गये…
की लिखे ने लेख किस्मत ने..”

गाणं म्हणत असतानाच त्याचं लक्ष हसणार्‍या अनुकडे जात.

केतन : (इयर-प्लग काढत) “काय झालं?”
अनु : “ओ..देवदास.. ओम मखिजा.. अहो.. घरात लग्न आहे आपल्या.. कश्याला रडकी दुख्खी गाणी म्हणताय.. राहु द्या.. बंद करा ती गाणी..”

केतन इकडे तिकडे बघतो.. आजुबाजुला कोणीच नसते.

केतन : कोण मी?
अनु : हो मग? दुसरं कोणी आहे का इथं?
केतन : मला वाटलं तु माझ्याशी बोलत नाहीयेस..
अनु : ए.. आपण काय शाळेतली मुलं आहोत का असं भांडुन न बोलायला? ऍक्च्युअली नां, मी नंतर खुप विचार केला.. मला मान्य आहे तुझी त्यात काही चुक नाहीये यात. इनफॅक्ट तु मनातले बोलुन दाखवुन खुप मोठेपणा दाखवला आहेस.. खरं तर आय एम सॉरी..”
केतन : “अच्छा? मग मगाशी आपण असा चेहरा पाडुन का उभे होतात?”
अनु : “का काय? मी सुशांत वर चिडले आहे.. मला नाही पटत त्याचे वागणं.. कामापुढे त्याला प्रत्येक गोष्ट नगण्य आहे.. अगदी मी सुध्दा.. कधी कधी तरं मला वाटतं खरंच आम्ही दोघं मेड फॉर इच आदर आहोत का?”

केतन लगेच खुर्चीत ताठ होऊन बसतो.

केतन : “अगं पण त्याला जाण गरजेचं होतं ना?.. उगाच का गेला आहे तो?”
अनु : “पण मी म्हणते.. हे अमेरीकेला जायलाचं हवं का? सगळेजण इथे असताना आपण तिकडे एकटे दुर रहायचे म्हणजे..”

केतन : “अरेच्या.. पण काल तुच म्हणालीस ना.. असते एकेकाला क्रेझ अमेरीकेची..तुच त्याची बाजु घेउन बोलत होतीस ना? मग आज काय झालं असं अचानक”
अनु : “असं काही नाही.. आता तुच बघ ना.. इतकी वर्ष अमेरीकन मुलीशी लग्न करायचं म्हणुरंन ठाम होतास.. पण मला भेटल्यावर.. (एकदम आपण काय बोललो हे लक्षात येऊन ती ओशाळते आणि मग सारवा सारव करत…) आय मीन.. तुला कोणीतरी एक मुलगी भेटली..जी तुला आवडली आणि तु क्षणार्धात निर्णय बदललास ना..!! का तरीही तु तुझ्या निर्णयावर ठाम राहीलास?..”
केतन : “हम्म.. प्रेमापुढे सगळं निरर्थक आहे असं मानणाऱ्यातला मी आहे.. तिच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे.. अगदी अमेरीका सोडुन कायमचा भारतात यायला सुध्दा..”
अनु : .”कित्ती फरक आहे तुम्हा दोन भावंडात.!!!.”

केतन : मगं? बघ बदलते आहेस का विचार? कदाचीत तुला सुशांतदा बद्दल वाटते ते प्रेम नसेलही. तुम्ही दोघं एकमेकांना अनेक वर्षांपासुन ओळखता आहात.. तुम्ही चांगले मित्र असु शकता..कदाचीत”
अनु : चल चल.. थट्टा पुरे झाली.. बरं मला एक सांग केतन, तुला भारतीय मुलगी का नको, अमेरीकनच का हवी? तु सांगीतलस मला.. पण मला एक सांग.. प्रत्येक लग्नात तु म्हणतोस तस्सेच होते का? प्रत्येक मुलीचे आई-वडील लग्नानंतर मुलीच्या संसारात ढवळा ढवळ करतातच का? प्रत्येक सासुचे, प्रत्येक सुनेशी भांडण होतेच का असं?
होतात.. मान्य आहे होतात.. मी सत्य नाकारत नाही.. पण प्रत्येक घरात हे असेच होत असेल.. किंवा असेच होत.. असं मला नाही वाटत..
आणि समजा होत असेलच… तरी अमेरीकन लग्नाची कटु बाजु कशी तु नजरेआड करतोस? तेथील घटस्फोटांचे प्रमाण कित्ती आहे? कश्यावरुन तु तेथे केलेले लग्न आयुष्यभर टिकेल?
आणि कश्यावरुन भारतीय मुलींशी सगळे नवरे प्रामाणीक असतात?
केतन : बरोबर आहे तुझं.. बरं जाऊ देत.. हा प्रत्येकाच्या दृष्टीकोनाचा मुद्दा आहे. सोड.. तुला परवा काय गंमत झाली सांगतो.. माझा एक कलीग आहे, शेखर म्हणुन.. तो आणि त्याची बायको माझ्या समोरच्याच फ्लॅटमध्ये रहातात. शनिवारी रात्री मी त्यांच्याकडे जेवायला गेलो होतो तेंव्हा कोणाचा तरी फोन आला, शेखरने तो फोन घेतला.. बोलुन झाल्यावर तो त्याच्या बायकोला म्हणाला
“हनी.. उद्या सकाळी आई येतेय.. ४.३० ला फ्लाईट येईल..”
त्याची बायको : “काय कटकट आहे यार.. अरे आत्ताच ४ महीन्यांपुर्वी येऊन गेल्या ना आई? आणि उद्या रविवार.. सकाळी ५ ला उठुन बसायचे का? आणि ४.३० ला कोणती टॅक्सी मिळणार आहे एअरपोर्ट पिक-अप ला..??

शेखर : “हनी.. कुल डाऊन.. आई माझी नाही, तुझी येते आहे..”

तर त्याची बायको म्हणाली.. “ओह हाऊ वंडरफुल.. दोन महीने झाले आईला न भेटुन.. शेखु आपण जायचं सकाळी आईला पिक-अप करायला. खुप बरं वाटेल अरे तिला.. आणि आपलंही लॉंग ड्राईव्ह खुप दिवसांपासुन पेन्डींग आहे.. जाऊ यात ना प्लिज.. आणि येताना जेम्स कडे मस्त ब्रेकफास्ट पण करुन येऊ. बरं आहे आई रविवारीच येतेय.. मुलांना पण शाळा नसल्याने दिवसभर खेळता येईल तिच्याशी नै..”
केतन आणि अनु दोघंही हसायला लागतात.

अनु : ए.. पण असं सगळ्यांच्याच बाबतीत होतं अस् नाही हा.. कित्तेक मुली असतात चांगल्या.. ज्या घरात जातात त्याच घरातल्या होऊन रहातात. सासु-सासरे काय आणि आई-वडील काय दोघंही त्यांना सारखेच असतात.

केतन : हो.. माहीती आहे मला.. बघतोय ना मी माझ्या डोळ्यासमोर.. म्हणुनच तर म्हणलो.. माझं मत चुकीचं होतं…

दोघंही एकमेकांकडे बघत रहातात.

अनु लाजते.. इतक्या स्टेजवर पार्वती एका विंगेतुन येऊन दुसर्‍या विंगेत जाते. जाताना ती एकवार केतनकडे आणि एकदा अनुकडे बघते.
पार्वतीला बघुन अनुची आणि केतनची नजरानजर होते. जणु काही दोघांनाही केतनने कॉफी शॉपमध्ये सांगीतलेले पार्वती-सुशांतचे बोलणे आठवते. पार्वती निघुन गेल्यावर दोघंही पुन्हा जोर जोरात हसतात. मग..

अनु : बरं चल, बरीच कामं रेंगाळली आहेत… पळते मी..

अनु निघुन जाते….
काही क्षण शांतता आणि मग लपुन बसलेला सखाराम स्टेजवर डोकं खाजवत येतो. एकवार ज्या दिशेने अनु गेली तिकडे बघतो, आणि मग केतनच्या मागे जाऊन उभा रहातो.

केतन अनु ज्या दिशेने गेली तिकडे पहात उभा असतो. उजव्या तळहाताची मुठ करुन तो निराशेने डाव्या बाजुला छातीवर तिनदा मारतो आणि मग शेवटी दीर्घ श्वास घेउन एक उसासा घेत मागे वळतो..

केतन : (सखारामला असा अचानक आलेला पाहुन चपापतो) काय रे सख्या.. तु कधी आलास?

सखाराम नुसतंच केतनकडे बघुन मान हलवत बसतो आणि एका बोटानं सांगणार सांगणार अशी खुण करत रहातो.

तेव्हढ्यात पार्वती पुन्हा स्टेजवर येते. सखाराम ती जाईपर्यंत तिच्याकडे आ वासुन बघत रहतो. पहाता पाहता त्याची आणि केतनची नजरानजर होते.

केतन सखारामप्रमाणेच नुसती मान डोलावतो आणि एक बोट हलवत ’सांगणार.. सांगणार’ अशी खुण करतो.

स्टेजच्या दुसर्‍या कोपर्‍यातुन आई आणि तायडी सामानाने भरलेल्या पिशव्या घेउन येतात. त्यांना येताना बघुन सखाराम लगेच धावत धावत जातो आणि त्यांच्या पिशव्या घेऊन कोपर्‍यात ठेवुन देतो. दोघी हाश्श-हुश्श करत सोफ्यावर बसतात. केतन आतमध्ये निघुन जातो.

सखाराम दोघींना स्वयंपाकघरातुन पाणी आणुन देतो.

आई: तु काही म्हण, पण ती पैठणी मस्तच होती.. घ्यायला हवी होती तु…करवली आहेस शेवटी..
तायडी: अगं मी घेउन काय करु, तु मुलाची आई.. तु घ्यायला हवी. मी एव्हढी महागाची साडी घेउन उपयोग काय त्याचा..? नंतर नेसणं ही होत नाही.. पडुन रहाते मग.. त्यापेक्षा तुच घ्यायची होतीस..
आई : अगं पण.. (सखारामला तेथेच उभा पाहुन त्या विषय बदलतात).. काय रे सखाराम काही बोलायचे आहे का?

सखाराम काही वेळ तात्कळत उभा रहातो आणि मग जमीनीवर बसतो..

सखाराम : म्हंजी.. आता कसं सांगु तुम्हास्नी.. त्ये केतनदादांच डोस्क-बिस्क फिरलं हाय व्हयं?

दोघीही चमकुन सखारामकडे पाहु लागतात.

आई : का रे? काय झालं?
सखाराम : अवं, मगाशी ते अनु ताईंना सुशांतदादाशी लगीन करु नको असं सांगत होते..
आई आणि तायडी (एकदम) : चलं रे, काही तरी सांगु नको..
सखाराम : अवं.. म्या स्वतःच्या डोळ्यांनी ऐकलय?
आई : काय? अरे काय बोलतोयेस? डोळ्यांनी कधी कोणी ऐकतं का?
सखाराम : म्हंजी.. स्वतःच्या कानांनी पाहीलय.. ह्यो.. हिथं.. हिथं केतनदादा आणि अनुताई बसल्या व्हत्या.. आणि केतन दादा त्यास्नी म्हणत होत्ये..

तायडी : काय काय बोलतोय हा सखाराम?? डोळ्यांनी ऐकलय काय.. कानांनी पाहीलय काय?
आई : अरे तो मजेने म्हणत असेल.. इतकी वर्ष अमेरीकेत काढली आहेत त्याने.. थोडासा मोकळा स्वभाव आहे त्याचा.. तुझा उगाच गैरसमज झाला असेल..

सखाराम काही तरी बोलण्यासाठी तोंड उघडतो पण तेव्हढ्यात स्टेजच्या कोपर्‍यातुन बादली आणि केरसुणी घेउन पार्वती येते. सखाराम पुन्हा एकवार “आssss” वासुन तिच्याकडे पहात रहातो.
मागुन पुन्हा एकदा ते “नाक्का मुका.. नाक्का मुकक्का” चे संगीत पार्वती आतमध्ये जाईपर्यंत वाजत रहाते.

तायडी : बरं ते भजनीमंडळात आज रात्री आपल्या दोघींना केळवणाला बोलावले आहे.. काय करायचं आहे? जायचं आहे ना? फार दमायला झालं बाई आज..
आई : हो हो….जाऊ ना.. परत नंतर नाही जमणार.. असं ऐनवेळी नाही म्हणणं बरोबर नाही दिसणार.. आणि सकाळीच भेंडे बाईंना सांगीतले आहे रात्री आम्ही येणार आहोत म्हणुन..
तायडी : हो बाई.. असं नाही म्हणायचं म्हणजे जरा जिवावरच येते नाही.. नकोच ते.. जाऊ यात आपण.. पण केतनला सांगीतले आहेस का?
आई : अग्गोबाई.. विसरलेच की मी.. थांबा त्याला सांगुन येते… तु घे आवरायला..
तायडी : थांब तु.. मी सांगते.. तिकडेच चालले आहे

तायडीपण उठुन निघुन जाते.

आई : पार्वती.. हे बघ आम्ही दोघी बाहेर चाललो आहे.. रात्री केतनपुरता स्वयंपाक कर.. आणि हे बघ.. मुगाची डाळ कर, आवडते त्याला आणि दोन-चार पोळ्या जरा जास्तच कर, उद्या सकाळच्याला फोडणीची पोळी करु..

पार्वती मान डोलावते..

आई निघुन जातात.. पार्वती स्वयंपाकघरात कामात मग्न होते..

स्टेजवरचे दिवे मंद होत जातात…..

 

प्रसंग – ९ स्थळ.. केतनचे घर..

केतन सोफ्यावर पुस्तक वाचत बसलेला आहे. खरं तर नुसतच पुस्तक हातात आहे. तेवढ्यात अनु येते. अनुला बघुन केतन उठुन उभा रहातो.
(मागुन हृदयाच्या धडधडण्याचा आवाज येत रहातो.)

अनु : आई…..sssss
केतन : अनु? आई घरी नाहीये… बाहेर गेली आहे..
अनु : ओह.. कधी पर्यंत येतील? कालच्या त्या किचन रेसेपीज मधला एक पदार्थ बनवला होता मी..

केतन तिच्या हातातले भांड काढुन बाजुला ठेवतो, आणि तिचा हात हातात घेतो

केतन : आई आणि तायडी बाहेर केळवणाला गेल्यात.. यायला खुप उशीर होइल…
अनु : केतन प्लिज.. हात सोड.. मला जाऊ देत घरी…
केतन : अजुन किती दिवस स्वतःला माझ्यापासुन दुर ठेवणार आहेस तु अनु? किती दिवस मला आणि स्वतःला त्रास देणार आहेस असा?

अनु एक आवंढा गिळते…

अनु : तसं काही नाहीये केतन..
केतन : मग कसं आहे अनु? सांग मला, मग कसं आहे? तुला मला भेटावंसं नाही वाटत? माझ्याशी बोलावंस नाही वाटत? मी तुझ्या लेखी केवळ एक मित्र.. किंवा.. किंवा तुझा होणारा दीर इतकाच आहे का? तुझ्या डोळ्यातले भाव मला बघीतल्यावर का बदलतात? सुशांतबरोबर असतानाही तुझी नजर मला का शोधत असते? का अनु? का?
अनु : मला माहीत नाही केतन तु काय बोलतो आहेस? जाते मी..
केतन : थांब अनु.. तुला माझ्या प्रश्नांची उत्तर आज द्यावीच लागतील. तुला माझ्याशी लग्न नाही करायचं ना? हरकत नाही.. तुला सुशांतशी ठरलेले लग्न नाही मोडायचे? तरीही हरकत नाही, पण म्हणुन तुझं माझ्यावर प्रेम आहे हे सत्य तु नाकारु शकत नाहीस.. आज तुला मान्य करावंच लागेल अनु.. ’यु लव्ह मी…’ आय नो यु लव्ह मी….

अनु : लिव्ह मी केतन.. प्लिज लिव्ह मी………..
केतन अनुला घट्ट धरुन ठेवतो…

अनु : केतन.. आय सेड.. लिव्ह मी………..

केतन अनुला जवळ घेतो….
अनु डोळे बंद करुन माघारी वळते…
मागुन जोराने वारा सुटल्याचा आवाज.. केतन हळुवार हातांनी अनुला आपल्या मिठीमध्ये ओढुन घेतो. अनु डोळे बंद करुन त्याच्या मिठीमध्ये स्वतःला झोकुन देते.

अनुचा श्वासोच्छास वाढलेला आहे..
अनु : लव्ह मी केतन.. प्लिज.. लव्ह मी…
केतन : आय लव्ह यु अनु.. आय रिअली लव्ह यु……………….
(मागुन हृदयाच्या धडधडण्याचा आवाज येत रहातो.)

एखादे इंटेन्स.. बेधुंद करणारे रोमॅन्टीक गाणे… अनु-केतन दोघं एकमेकांच्या खुप जवळ येतात.
गाणं संपते. अनु आणि केतन अजुनही एकमेकांच्या मिठीमध्ये. अनुचे केस केतनच्या चेहर्‍याला वेढुन बसले आहेत.
काही काळाने परिस्थीतीची जाणीव झाल्यावर अनु झटकन केतनपासुन लांब होते आणि थोडी दुर जावुन केतनला पाठमोरी उभी रहाते..
काही क्षण शांतता…

केतन : गप्प का झालीस? बोल ना…
अनु : नको..
केतन : मला तर खुप बोलावेसे वाटते आहे. कंट्रोलच राहीला नाहीये काही. अजुन नाचावेसे वाटते आहे. बोल ना काही तरी, शांत नको राहुस..
अनु : शांत नाही झाले तर अवघड होईल केतन…नको.. प्लिज..
केतन : होऊ देत अवघड.. हे बघ अनु.. ह्या जगात काहीही अवघड नसते. नको कंट्रोल करुस.. बोल काय चाललं आहे तुझ्या मनात..
आज तुला इतक्या जवळ घेतल्यावर माहीतेय कसं वाटलं अनु? बेधुंद होऊन कोसळणार्‍या पावसात भिजल्यासारखं…
अनु : सुशांतचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतोय…केतन
केतन : (खाड्कन जागा झाल्यासारखा) काही गरज होती का अनु त्याचं नाव आत्ता घ्यायची..?
अनु : कमऑन केतन, सुशांत माझा होणारा नवरा आहे.

थोड्यावेळ परत शांतता
अनु : लेट्स स्टॉप केतन.. धिस इज ड्रायव्हिंग मी क्रेझी…
केतन : हे बघ अनु.. either u can listen to ur heart or u can listen to ur brain, दोन्ही होणं शक्य नाही.
अनु : Then lets listen to brain, सुशांत माझा होणारा नवरा आहे आणि काही दिवसांतच माझं त्याच्याशी लग्न होणार आहे हेच बरोबर आहे.
केतन : हार्ट-ब्रेन.. ब्रेन-हार्ट.. कोण बरोबर..कोण चुक कोण ठरवणार. मला खात्री आहे अनु इतके दिवस तु तुझ्या मनावर ताबा ठेवुन तुझ्या मेंदुचेच ऐकत आलीस.. मग आत्ता काय झालं.. गेलीसच ना वहावत? हे आज नाही तर उद्या होणारच.. किती दिवस स्वतःच्या मनाकडे दुर्लक्ष करशील??
अनु : (वैतागुन) मग काय करायचं केतन? काय म्हणणं आहे तुझं? मी सुशांतला जाऊन सांगु का की मला तु नाही तुझा भाऊ आवडतो? मी तुझ्या आईला सांगु का.. आई मी तुमचीच सुन होणार आहे पण सुशांतची बायको म्हणुन नाही तर केतनची बायको म्हणुन.. आणि माझ्या आई-बाबांना.. त्यांना कुठल्या तोंडाने सामोरे जाऊ मी?
(ढगांच्या गडगडण्याचा आवाज येतो…)

केतन : बाहेर बघ अनु.. कित्ती मस्त पाऊस पडतोय.. असं वाटतंय.. असं वाटतयं.. प्रत्येक पानं पान मदहोश होऊन नाचतं आहे, फक्त तु आणि मी.. बाकी निरव शांतता… कुणालाच काही बोलायची गरज नाही.. our eyes will do the talking.. our heart bits will dance on the rhythm of love…
अनु : ओह गॉड….धिस इज डॅम्न गुड.. हे असं रोमॅन्टीक सुशांत माझ्याशी कधीच बोलला नाही. मला काय बोलावं काहीच सुचत नाहीये केतन.. फक्त डोळे मिटुन.. सगळ्या जगाला विसरुन हे सगळं अनुभवावसं वाटतं आहे..
केतन आपण एखाद्या कॉन्सलर कडे जायचे का?
केतन : (आश्चर्याने..) कॉन्सलर कडे? कश्याला..
अनु : कदाचीत तोच आपल्याला ह्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग दाखवु शकेल. पेपरात नाही का लोकांचे असे विचीत्र प्रश्न असतात.. मी माझ्या बायकोच्या बहीणीच्या प्रेमात पडलो आहे.. किंवा मी चाळीतील एका विवाहीत पुरूषाच्या प्रेमात पडले आहे वगैरे वगैरे.. आणि मग कॉन्सलर त्यांना मार्ग सुचवतो.. तसंच काही..
केतन : वेडी आहेस तु अनु.. असं कॉन्सलर कडे जाऊन कधी काही होतं नसतं…
अनु : हो केतन.. आहे मी वेडी.. खरंच वेड लागलं आहे मला.. तु वेड केलं आहेस केतन.. तु वेडं केलं आहेस…

काही क्षण शांततेत जातात. बाहेर कोसळणार्‍या पावसाचा आवाज येत रहातो.

अनु : .. का आलास तु केतन? कित्ती आनंदी होते मी इकडे.. मनासारखं घरं मिळालं होतं.. माझा अनेक वर्षांचा मित्रच मला जिवनसाथी म्हणुन मिळाला होता.. सगळं सगळं सुरळीत चालले होते..

(काही क्षण शांतता..)

पण त्या दिवशी शांघाय एअरपोर्ट वर तुला भेटले आणि…. खरं तर त्याच दिवशी तुझी झाले.. मी पुर्णपणे स्वतःला विसरुन गेले होते.. सुशांत, माझे ठरलेले लग्न, घर.. सगळं.. तुझ्याशी बोलण्यात, तुझ्याबरोबर हसण्यात मी हरवुन गेले.. असं वाटलं आपली कित्तेक वर्षांची ओळख आहे..

आणि सुशांतला?? खरं सांगायचं तर सुशांतला मी अजुनही ओळखु शकले नाही.. तो कुठल्या गोष्टीवर कसा रिऍक्ट करेल मला सांगता येत नाही.. कित्तेकदा माझ्यापासुन दुर असुनही तो माझ्यात गुंतुन बसतो, दहा वेळा फोन करेन, एस.एम.एस. करेल तर माझ्याबरोबर असुनही कित्तेकदा तो माझा नसतो. असा.. असा.. परका वाटत रहातो.. त्याच्याबरोबर अश्या मनमोकळ्या गप्पा नाही माराव्याश्या वाटत मला.
मी मुंबईला आले.. आपल्या माणसात आले.. आणि मग तुला विसरायचे ठरवले.. तुझ्याबरोबरचे ते निखळं आनंदाचे क्षण मनाच्या एका कोपऱ्यात बंद करुन..

पण.. पण नशीब कसं असते ते बघ ना.. दुसऱ्याच दिवशी तुझी आणि माझी भेट झाली.. नंतर स्वतःला मी समजावले की.. मला तु आवडत असलास तरीही तुला मी आवडले असेन असे नाही..

परत तुझे ते अमेरीकन मुलगी.. ब्लॉंड.. पण तु मॉल मध्ये जे काही बोललास त्यानंतर खरं सांगायचे तर माझं मलाच कळत नव्हतं काय करावं..? एकीकडे सर्वांच्या दृष्टीने मी सुशांतची जवळ-जवळ झालेच होते.. लग्नाचे औपचारीक बंधनच राहीले होते.. आणि एकीकडे माझे मन तुझ्याकडे धावत होत… तु मला आवडलास केतन.. आवडतोस.. सुशांतपेक्षाही जास्त..

तुझं बरोबर आहे.. सुशांत चांगला आहे.. पण माझा एक मित्र म्हणुनच.. कदाचीत मी त्याला ओळखण्यात कमी पडले असेन.. पण एक जिवनसाथी म्हणुन तुला भेटल्यानंतर सुशांत बरोबर मी खरंच सुखी आहे का? हा प्रश्न मला राहुन राहुन पडतो केतन”
केतनचे चेहर्‍यावरचे भाव क्षणाक्षणाला बदलत जातात…. तो उठुन अनु कडे जाऊ लागतो..
(मागुन हृदयाच्या धडधडण्याचा आवाज येत रहातो.)

अनु : एक मिनीट केतन.. तेथेच थांब.. जवळ येऊ नकोस. इतके दिवस मी मोठ्या प्रयत्नांनी मनावर ताबा मिळवला आहे. परवा माझं लग्न आहे आणि तो पर्यंत मला मनावरचा ताबा सुटुन द्यायचा नाहीये केतन.. मला काय करावं काही कळत नाहीये..
एकदा वाटतं स्वतःला झोकुन द्यावं तुझ्याकडे.. कोण आई? कोण तायडी? कोण सुशांत? कुणा-कुणाशी घेणं नाही.. तु माझा आणि मी तुझी.. बस्स… तर दुसर्‍या क्षणी मन पुन्हा भानावर येतं.. ह्या गोष्टी बोलायला सोप्या आहेत.. पण त्यानंतर कुणाला तोंड देऊ शकु का आपण?

केतन : अनु अजुनही वेळ गेलेला नाही.. मी बोलतो सुशांतदाशी
अनु : वेडा आहेस का? आता काही उपयोग नाही केतन. आणि उगाच तु कुणाला काही बोलु नकोस.. दोन दिवसांवर लग्न आले आणि तु असे काही बोललास तर काय होईल? सगळी तयारी झाली आहे..लोकं काय म्हणतील? त्यानंतर आई-वडीलांच्या नजरेला आपण नजर देऊ शकु का?”
केतन : “अनु, मी आत्ता नाही बोललो तर तिघांची आयुष्य खराब होतील. तु, मी आणि सुशांतदा. करु शकशील तु सुखाने संसार सुशांतदाशी? तुझ्याशी एका वहिनीचे नाते निभाउ शकेन मी? सगळ्यांना अंधारात ठेवुन जगणं जमेल आपल्याला? अजुनही वेळ आहे अनु.. अजुनही वेळ आहे.. उद्या सकाळी सुशांत येईल विचार कर….”

अनु खुर्चीत पाय मुडपुन गुडघ्यात डोकं घालुन रडु लागते.. केतन हेल्पलेस होऊन तिच्याकडे पहात रहातो.
स्टेजवरचे दिवे मंद होत जातात…..

 

प्रसंग -१० शेवटचा स्थळ.. घराची गच्ची…

गच्चीवर खाण्या-पिण्यापासुन अगदी नाच-गाण्यापर्यंत जय्यत तयारी केली गेलेली आहे. केतन एका कोपर्‍यात उभा आहे, तर सुशांत आणि अनु एकत्रीतपणे आलेल्या पाहुण्यांना भेटत आहेत..

अनु चेहऱ्यावर उसने हसु आणुन सगळ्यांशी बोलते आहे. पण तिचं लक्ष सतत मान खाली घालुन उभ्या असलेल्या केतनकडे जाते आहे.
आजुबाजुच्या लोकांच अनुचं आणि सुशांतच कौतुक करणं चालु आहे.

आवाज १: ए सुशांत दा, मेहंदी बघ ना काय छान रंगली आहे अनु वहीनीची.. येना बघायला.. कित्ती छान दिसते आहे अनु वहीनीच्या हातावर..
आवाज २: सुशांतदा.. मेहंदीमध्ये तुझं नाव लिहीलं आहे बरं का.. बघ शोधुन सापडते आहे का.. असलं भारी लिहीलं आहे ना.. आय बेट्ट.. तुला सापडणारच नाही..
आवाज ३: ए अनु वहीनी.. ते जाऊ देत.. तु आता नाव घे..
अनु : एsss नाव काय घे? उग्गाच आपलं काहीही.. अजुन लग्न लागले नाहीये…. लग्नातच घेईन मी नाव..
आवाज ३: ए असं काय गं? घे की त्याला काय होतंय…
अनु : नाही.. नाही .. नाही….
आवाज ३: सुशांतदा.. बघ रे तुझी बायको आत्तापासुनच आमचं ऐकत नाहीये.. ये जरा इकडे…

तायडी : “ते काही नाही… अनु आज तुला उखाणा घ्यावाच लागेल.. मी आज्जीबात ऐकणार नाही ते.”

केतन अनुकडे बघतो.

अनु : अहो पण…
आई : अहो नाही आणि काहो नाही.. उखाणा घ्यायचा म्हणजे घ्यायचाच.
अनु : बरं… घेते.. (नाईलाजाने) “दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी,
दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी,
……..

अनु एकवार पुन्हा केतनकडे बघते.. केतन काही क्षण तिच्याकडे बघतो आणि परत दुसरीकडे बघु लागतो.

तायडी : अगं थांबलीस का.. विसरलीस का उखाणा? पाठ करुन ठेव बरं.ह्यापुढे तुला आता सारखा घ्यावा लागणार आहे.
अनु : नाही नाही.. विसरले नाही.. आहे ना लक्षात..
दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी,
सुशांतचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी
तायडी : व्वा.. अनु.. फारच छान.. सुशांत आता तुझा नंबर..
सुशांत : ए.. काय गं तायडे.. मला नाही असलं उखाणा बिखाणा येत..
तायडी : ते काही नाही.. तिने घेतला ना.. आता तुला घ्यावाच लागणार..

सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट होतो. केतनला हे सर्व असह्य होऊ लागते. तो मनाशी काही निर्णय घेतो आणि सगळ्यांच्या समोर येऊन उभा रहातो.

केतन : “सुशांत, आई, तायडे.. मला काही बोलायचे आहे..”

सर्वांच्या नजरा केतनकडे वळल्या..

केतन: सुशांत.. आठवतं..? मी आल्यावर काय म्हणालो होतो..? मला कोणी तरी एक मुलगी भेटली.. भारतीय.. आठवतं.. आणि तेंव्हाच मी माझा अमेरीकन मुलीचा विचार मनातुन काढुन टाकला…?
आई : “अरे वा वा.. छानच झालं की.. आणि काय रे.. आम्हाला आधी..”
केतन : (आईचे बोलणे मध्येच तोडत) “एक मिनीट आई.. प्लिज.. माझं बोलणं पुर्ण होऊ देत..

आई गप्प होऊन केतनचं बोलणं ऐकु लागतात.

केतन : (काही वेळ शांत राहुन मग) मला आज माझ्या मुर्खपणाची लाज वाटतेय आणि चिडही येते आहे. असो.. जे झाले ते झाले.. तर मी त्या मुलीच्या प्रेमात आकंठ बुडालो आहे.. आणि ति मुलगी सुध्दा माझ्यावर प्रेम करते..” (एकदा वळुन अनुकडे बघतो. अनु खाली मान घालुन उभी असते)
सुशांत : हो.. आठवते आहे मला.. पण त्यानंतर तु असंही म्हणला होतास की ते एक तात्पुर्ते आकर्षण होते आणि तुला अमेरीकन मुलीशीच लग्न करायचं आहे….

केतन वैतागुन सुशांतकडे बघतो.

सुशांत : बरं बरं बोल तु, नाही आम्ही मध्ये बोलत.. पण फक्त एक सांग, मग आता अडलेय कुठे? मी तर तुला तेंव्हाच फोन करं म्हणलं होतं
केतन : ‘..अडलं तर आहे सुशांतदा.. अडलं तर आहेच….आम्ही एकत्र असुनही एकत्र येऊ शकत नाही..
सुशांत : “अरे काय कोड्यात बोलतो आहेस.. निट सांग बरं..”
केतन : “..तेच सांगायला मी इथे उभा आहे..” (एक नजर अनुकडे टाकतो, ती अजुनही मान खाली घालुन उभी असते) “..ती मुलगी आज इथेच आपल्यात आहे..”

“कोण.. कोण??” सगळेजण इकडे तिकडे पाहु लागले..
केतन शांतपणे उभा असतो.

आई : अरे बोल ना केतन कोण मुलगी? असं कोड्यात नको बोलुस रे..
केतन: (एक दीर्घ श्वास घेउन) “अनु..!”

“काय?..” एकदमच सगळे ओरडतात. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह

सुशांत : (अतीशय चिडक्या स्वरात) “केतन तु काय बोलतो आहेस.. कळतेय का तुला?”
केतन : “हो सुशांतदा.. मला पुर्ण कळते आहे मी काय बोलतोय.. पण जेंव्हा अनु मला आवडली.. तेंव्हा मला खरंच माहीत नव्हते की हीच तुझी होणारी बायको आहे..

सुशांत : अरे पण..

केतन : (सुशांतचे बोलणं तोडत).. तसं असते ना सुशांतदा.. तर मी जराश्याही वाकड्या नजरेने तिच्याकडे पाहीले नसते.. पण जेंव्हा कळाले की तुझं अनुशीच लग्न होणार आहे, तेंव्हा खुप उशीर झाला होता.. मला माफ कर दा.. मला खरंच माफ करं.. माझं आणि अनुचं एकमेकांवर प्रेम आहे..”
सुशांत : अनु.. हे खरं आहे?

अनु काहीच बोलत नाही..
सगळ्यांच्या चेहर्यावर आश्चर्य, राग, चिंता पसरली होती.. केतन कुणाच्याच नजरेला नजर देउ शकत नव्हता.

केतन : (खाली बघुन) “सुशांतदा..पण मी तुझं लग्न मोडु इच्छीत नाही.. माझ्यापेक्षा जास्त अनुला तु ओळखतोस.. मला खात्री आहे.. तु अजुनही तितकेच अनुवर प्रेम करतोस.. आणि आयुष्यभर करत रहाशील..
पण.. पण त्याचवेळी आपल्यामध्ये कितीही प्रयत्न केला तरी संबंध पहील्यासारखे होणार नाहीत.. एकदा मनाच्या कोपऱयात अनुला प्रेमाचे स्थान दिल्यावर तिला कुठल्या हक्काने मी वहीनी म्हणु..?
…आणि म्हणुनच…. मी उद्याच अमेरीकेला परत जाण्याचा निर्णय घेतला आहे.. कायमचा… माफ कर मला, पण मी तुमच्या लग्नाला नाही थांबु शकत…

लोकांची कुजबुज ऐकु येत रहाते.

केतन : दा.. मी तुझा.. अनुचा.. अपराधी आहे.. आणि म्हणुनच तुझा जो काही निर्णय असेल.. तु जी काही मला शिक्षा देशील ती मला मान्य आहे..
सुशांत : शिक्षा? अरे अक्षम्य गुन्हा गेला आहेस तु केतन.. तुला मी कोण शिक्षा देणार?
केतन : मला मान्य आहे माझी चुक सुशांतदा.. मान्य आहे मला.. पण मी म्हणालो ना.. मला खरंच कल्पना नव्हती अनुच तुझी होणारी बायको आहे ते.. चुका माणसाच्याच हातुन होतात ना? आता तुझंच बघ ना.. नाही नाही म्हणतोस पण हिम्मत असेल तर सगळ्यांसमोर मान्य कर त्या पार्वतीबद्दल… तुझ्या मनात सॉफ्ट कॉर्न आहे ना तिच्याबद्दल???

अनु : (हेल काढत रडायला लागते… डोळे पुसत पुसत..) सुशांत? काय ऐकते आहे मी हे? खरं आहे हे? प्लिज सांग सुशांत हे खोटं आहे… तुझं,, तुझं फक्त माझ्यावरच प्रेम आहे.. हो ना?
तायडी : ए काय रे दादा.. वहीनीला रडवलस ना..
सुशांत : अगं मी रडवलं का? हा केतन काहीही बोलेल आणि तुम्ही ऐकणार का त्याचं लगेच? (अनुला समजवणीच्या स्वरात) अनु.. अगं.. नाही .. म्हणजे हो.. म्हणजे.. हा केतन म्हणतोय तसं काही नाहीये (आणि मग केतनकडे बघत रागाने) काय बोलतो आहेस तु केतन? अक्कल आहे का तुला?

केतन : हो दादा.. तु काहीही म्हण.. पण तुला हे मान्यच करावं लागेल. मी असेन लहान तुझ्यापेक्षा वयाने, पण म्हणुन तुझं आणि पार्वतीचं काय चाललं आहे हे काय मला कळत नाही? हा सखाराम पण सांगेल.. विचार त्याला… काय रे सख्या…

सगळे वळुन सखारामकडे बघतात. सखाराम काही बोलायला तोंड उघडतो, पण सुशांतचा चिडका चेहरा बघुन परत गप्प बसतो.

सुशांत : कानफाड फोडेन केतन… एकदा बोल्लास्स.. परत बोल्लास तर याद राख… मी फक्त अनुवरच प्रेम केले आहे आणि तिच्याशीच लग्न करणार आहे कळलं?

इतक्यात स्लिव्ह-लेस ब्लाऊज, एकदम पार्टीवेअर साडी, केस मोकळे सोडलेले, समोर येते.

पार्वती : काय? काय म्हणालास केतन?

केतन आधी तिच्याकडे बघतच रहातो. प्रथम तो तिला ओळखतच नाही. मग ओळख पटल्यावर..

केतन : तु?? तु अशी.. म्हणजे.. अशी कशी???
पार्वती : तु असं म्हणुच कसं शकतोस केतन? माझा भाऊ सरांच्या ऑफीसमध्ये काम करतो.. त्याने हे ऐकलं तर त्याला काय वाटेल? सरांनी मोठ्या मनाने मला इथं काम दिलं.. त्याची परतफेड मी अशी करेन असे तुला वाटलं का?

केतन खाली मान घालुन उभा असतो.

अरे, सरांच अनुवर किती प्रेम आहे मला विचार. सारखं तिच्याबद्दलच बोलत असतात. ऑफीसमध्ये पण कित्तीवेळा तिच्याशीच फोनवर असतात. काय हो सर.. बरोबर बोलतेय ना मी? भाऊ सांगतो मला सगळं संध्याकाळी.

एव्हाना केतनची नजर इतरांकडे जाते.. मगाशी चिडलेले संतापलेले आजुबाजुचे लोकं आडुन आडुन हसत आहेत असं त्याच्या लक्षात येतं..
सगळेजण एकत्र जमलेले असतात. कुणी एकमेकांशी काहीतरी बोलत असते, तर कोणी स्वतःचे हासु दाबायचे प्रयत्न करत, तर कुणी अजुनकाही.. आणि अनु? मगाशी मान खाली घालुन दुःखी चेहरा करुन उभी असलेली अनु चक्क हसत होती.. त्याला काहीच कळंत नव्हते..

केतन : (बावचळुन) “काय झालं? मी काही चुकीचे बोललो का?”
यावर मात्र सगळे जण जोरजोरात हसु लागतात..केतनला अजुनही काही कळत नाही.. सुशांत तर खाली पडुन गडाबडा लोळायचाच बाकी होता.. शेवटी तो केतन जवळ येतो आणि..

सुशांत : ..शांत हो मित्रा..गोंधळुन जावु नकोस.. सांगतो सगळे सांगतो.. आधी सगळ्यांना शांत तर होऊ देत.
(थोडा वेळ गेल्यावर…) केतन, तुझ्या त्या अमेरीका आणि ब्लॉड पुराणाला आम्ही सगळे इतके कंटाळलो होतो.. मग तुला ताळ्यावर आणण्यासाठी आम्हाला हे नाटकं खेळावं लागलं.
केतन : (अजुनही गोंधळलेल्या स्वरात) “नाटक? कसलं नाटक..?”
सुशांत : “तुला मुलींचे फोटो पाठवुन आम्ही कंटाळलो होतो..
अनुच्या लग्नाचे बघत आहे कळल्यावर आमच्या डोक्यात प्रकाश पढला..
अनु.. तुझ्यासाठी अगदी अनुरुप होती. तुझा फोटो आम्ही तिला दाखवला, तिला फोटो आवडला आणि तिनेही तुला भेटायची, तुला जाणुन घ्यायची तयारी दर्शवली.. म्हणुन मग आम्ही माझ्या लग्नाचे हे नाटकं स्थापले..
अनु शांघाय वरुन परत यायची आणि तुझी तारीख आम्ही एकत्रच साधली. ट्रॅव्हल एजंट आपल्या ओळखीचाच होता. मग तुझी फ्लाईट शांघाय मार्गे असलेली बुक केली आणि तुझी आणि अनुची भेट ‘घडवुन’ आणली… हो.. घडवुन आणली…
पुढे घटना एकामागोमाग एक घडत गेल्या.. काही घडवुन आणलेल्या तर तर काही योगायोगाने..”

केतन : म्हणजे तुझं लग्न?
सुशांत : माझं लग्न? माझं लग्न तर झालं.. हिच्याशी.. (असं म्हणुन सुशांत पार्वतीला पुढे ओढतो..)

कोपर्‍यात बसलेला सख्या एकदम ताडकन उठुन उभा रहातो.

केतन : क. क.. काय? एका मोलकरणीशी लग्न केलंस तु?
सख्या नकळत ’हो ना..’ म्हणुन केतनच्या म्हणण्याला दुजोरा देतो.

सुशांत : नाही रे बाबा.. ही मोलकरीण नाही.. माझ्याच ऑफीसमध्ये कामाला आहे.
केतन आणी सख्या : (एकदमच) काsssssssय?
केतन : पण.. तु .. तु असं करुच कसं शकलास सुशांतदा.??. मी तुझ्या लग्नाला नसताना.. तु..तु लग्न केलंस? अरे तुझं लग्न म्हणुन मी सुट्टी टाकुन आलो ना मी इतक्या लांब.. आणि..
सुशांत : अरे हो.. हो.. शांत हो.. आमचं लग्न झालं असलं तरी ते अगदी साधं.. आपल्या आपल्यात रजीस्टर पध्दतीने झालं आहे. उद्या सर्वांसमक्ष वैदीक पध्दतीने आम्ही विवाहबध्द होणार आहोत.

केतन अजुनही गोंधळलेला असतो.

सुशांत : हे बघ.. मला अमेरीकेला जायचे आहे ना.. ही पण येणार आहे माझ्याबरोबर. मग तिचा व्हिसा लागेल ना डिपेंडंट.. त्यासाठी मॅरीज सर्टीफिकेट लागते. म्हणुन आम्ही रजीस्टर पध्दतीने लग्न करुन घेतले म्हणजे तिला व्हिसासाठी अप्लाय करता आले ना… अर्थात हे तुमच्या-आमच्यात.. इतर लोकांच्या दृष्टीने अजुनही आमचं लग्न उद्याच आहे रे बाबा…
केतन (स्वतःला सावरत) : “अरे पण का? का असा छळ केलात माझा..? विचार करुन करुन वेड लागले असते मला..!”
सुशांत : “ते तुझ्या आईला आणि तायडीला विचार.. आणी त्यांना तुझ्यासाठी मुली शोधुन वेड लागायला आणले होतेस त्याचे काय अं? मग त्यांनी मला त्यांचा विचार सांगीतला आणि तो मी आणि अनुने मिळुन आखला आणि व्यवस्थीत पार पाडला..”

केतनने नाटक्या रागाने अनुकडे बघतो… अनु लांबुनच हात जोडते आणि कानं पकडुन माफी मागते…

सखाराम : (केतनकडे येतो) केतनदादा.. मला माफ करा.. मला काय बी ह्यातलं ठाऊक नव्हतं.. म्या उगाच तुम्हास्नी त्रास दिला..
केतन : अरे तुझ्या त्रासाचं काय घेऊन बसलास.. नशीबानेच अशी थट्टा माझी मांडली होती.. तु तरी काय करु शकणार होतास त्यात…
सखाराम वळुन पार्वतीकडे बघतो. ’अर्रा रा नाक्क मुक्का’ चे गाण खराब झालेल्या कॅसेटसारखं हळु संथ गतीने खर्र.. खुर्र.. करत अर्धवट वाजते आणि बंद पडते.

सुशांत पार्वतीच्या गळ्यात हात टाकुन तो केतनकडे जातो.

मागे आता नविन गाणे वाजु लागते.. “खुश रहे तु सदा ये दुवा है मेरी..”
सख्या गळ्यातल्या कापडानं डोळे टिपतो आणि निराशेने मान वळुन दुसरीकडे जाऊन उभा रहातो.

सुशांत : (केतनला) अरे शाळेत असताना चड्डीत शी झाली पासुन ते अगदी अमेरीकेतील न्युड बार मध्ये केलेल्या मस्तीपर्यंत प्रत्येक गोष्ट शेअर केलीस ना तु माझ्याशी? एक भाऊ म्हणुन.. एक मित्र म्हणुन.. आणि एवढी मोठ्ठी गोष्ट तु लपवुन ठेवलीस तु माझ्यापासुन
केतन : सॉरी सुशांतदा….
सुशांत : (अनुला) “ओ.. ‘दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी’.. आता काय तिकडेच उभ्या रहाणार आहात? का तुमच्या होणाऱ्या खऱ्या नवऱ्याचा राग दुर करणार आहात?”

अनु हसते आणि केतनकडे जायला निघते.

तायडी : (केतनला) “उतरले ना भुत अमेरीकेचे? का बघायची आहे अजुनही अमेरीकेचीच मुलगी??. नाही म्हणजे तुला अजुनही सोनेरी केसांचीच हवी असेल तर हिचेच केस आपण कलर करु.. पण ती अमेरीकन नको रे बाबा..”

केतन नुसताच हसुन मान हलवतो.

आई : “मगं अनु नक्की समजु ना लग्न?

अनु लाजुन मान हलवते.

आई : उद्या येतीलच ना तुझे आई-बाबा? मग सांगुन टाकते त्यांना मुलीला मुलगा आणि मुलाला मुलगी पसंत आहे.. लवकरात लवकर लग्नाची तारीख काढुन टाकु.. काय?”

केतन अजुनही चिडुन दुसरीकडे कुठेतरी बघत असतो. अनु त्याच्यासमोर जाऊन उभी रहाते. केतन आपली मान दुसरीकडे वळवतो. अनु पुन्हा त्याच्या समोर जाऊन उभी रहाते आणि दोन्ही हातांनी आपले कान पकडते..

अनु : चिडलास? स्वॉरी ना…

केतन अजुनच चिडतो…

अनु : नको ना चिडुस अजुन.. प्लिज.. हे बघ कान पकडले मी.. खरंच सॉरी… होतं रे असं कधी कधी…

केतन लक्षच देत नाही…

अनु : थांब तु तसा ऐकायचा नाहीस.. (असं म्हणुन त्याला घट्ट मिठी मारते)

केतन अनुच्या मिठीतुन सोडवुन घ्यायचा थोडाफार प्रयत्न करतो, पण ते त्याला शक्य होत नाही. तो थोड्यावेळ हात खालीच ठेवुन शांत उभा राहतो आणि मग शेवटी तिला घट्ट मिठी मारतो…
सगळा परीवार हसण्यात बुडुन जातो………………….

 

[पडदा पडतो…]
[समाप्त]

तुझ्या विना (भाग-५)


भाग ४ पासून पुढे>>

प्रसंग -६ स्थळ.. एखादं कॉफी शॉप

अनु आणि केतन कॉफी पित बसलेले आहेत.

अनु : केतन.. खरंच परत एकदा थॅन्क.. तु आलास म्हणुन.. नाही तर इतकी कामं होती.. एकट्याने फिरायला कंटाळा येतो.. आणि सुशांतला तर लग्न इतकी जवळ आलं आहे तरी कामातुन सवडच नाही. त्याचं ही बरोबर आहे म्हणा.. नेमका आजच व्हिसा इंटर्व्ह्यु आला त्याला तो काय करणार…??
केतन : हे.. कम ऑन.. थॅक्स काय त्यात.. आणि त्या बदल्यात मी कॉफी घेतली ना तुझ्याकडुन
अनु त्याच्याकडे बघुन हसते.

केतन तिच्या हसण्याकडे पहातच रहातो. (मागुन हृदयाच्या धडधडण्याचा आवाज येत रहातो.)

एखादं केतन-अनुवर गाणे जे केतनचा भास असते.

गाण संपता संपता स्टेजवर अंधार होतो. केतन खुर्चीत बसतो त्याच्यावरच स्पॉटलाईट आहे. केतन स्वतःशीच हसत अजुनही गाण्याच्या मंद होत चाललेल्या संगीतावर डोलतो आहे.

अंधारातुन अनुचा आवाज येतो..

अनु : केतन.. ए केतन.. अरे कुठं तंद्री लागली आहे?

स्टेजवर पुन्हा पुर्ववत प्रकाश पसरतो. अनु त्याच्या समोरच्याच खुर्चीत बसलेली आहे. केतनला तो भास असल्याचे लक्षात येते.

केतन : (भिंतीवरील साईन-बोर्ड वाचतो) एनीथींग कॅन हॅपन ओव्हर अ कॉफी.. मस्त कॅच लाईन आहे नाही..
अनु : हो..

केतन उगाचच इकडे तिकडे बघत बसतो…. थोड्यावेळाने..

केतन : अनु….
अनु : हम्म..
केतन : तुझं आणि सुशांतदाचं लव्ह मॅरेज ना?
अनु : अम्मं… म्हणजे हो पण आणि नाही पण..

केतन : म्हणजे?
अनु : म्हणजे.. तशी मी त्याला आवडत होते.. तो पण मला आवडायचा.. पण आमच्यापैकी कोणीच एकमेकांना प्रपोज वगैरे असं काही केलं नाही. आमच्या घरच्यांनीच आमच्या लग्नाचा प्रस्ताव पुढे केला आणि आम्ही दोघांनीही होकार दिला इतकंच..
केतन :.. हाऊ अनरोमॅंटीक.. मला वाटलं तुम्ही इतकी वर्ष एकमेकांना ओळखताय…
अनु : छे रे.. आणि तुझा सुशांतदादा तर भलताच अनरोमॅंटीक आहे..
केतन : बघं.. अजुनही लग्नाला चार दिवस आहेत.. फेरविचार करायचाय का?

अनु काही क्षण अविश्वासाने त्याच्याकडे बघत रहाते जणु त्या प्रश्नाचे उत्तर तिला माहीती आहे पण आणि नाही पण…

अनु : ए.. गप रे.. काही बोलतो… आणि सुशांतने ऐकले ना तर पहीलं तुलाच धरेल तो.. भाऊ ना त्याचा तु? मग?
केतन : तोच तर प्रॉब्लेम झालाय…
अनु : म्हणजे?
केतन : “अनु.. एक सांगु?”
अनु : नको… (मग हसत) अरे विचारतोस काय.. सांग ना..

केतन : “.. तु विचारत होतीस ना.. अमेरीकन मुलीचा विचार मनातुन का काढुन टाकला? दुसरी कोणी भेटली का?..”
अनु : “हम्म..”

केतन : “खरं तर भेटली होती एक.. तिला भेटल्यावर वाटलं.. कित्ती मुर्ख होतो मी.. नसत्याच्या मागे धावत होतो.. आणि ती मात्र माझ्या इतक्या जवळ होती.. मीच डोळे बंद करुन बसलो होतो..”

अनुने कॉफीवरचे आपले लक्ष काढुन घेते आणि ती केतनचे बोलणे ऐकायला लागते.

केतन : “.. तिला भेटल्यावर वाटलं.. बस्स.. हीच..”

अनु : “ओsssह.. लव्ह ऍट फर्स्ट साईट की काय?”
केतन “तसं म्हण हवं तर…”

अनु : “मगं? पुढे काय झालं? बात आगे बढी की नही?”

केतन : (हातातल्या कॉफी-कप बरोबर चाळा करत) “नाही ना.. इथे आल्यावर मला कळाले की तिचे लग्न ठरले आहे..”
अनु : “आई…गं.. सो बॅड.. पण मग संपलं सगळं?”

केतन : “काय करावं तेच कळंत नाही.. दुसरा कोणी असतं तर कदाचीत मी विचार सुध्दा नसता केला.. पण ज्याच्याशी तिचं लग्न ठरलं आहे.. तो… तो माझा भाऊच आहे म्हणल्यावर..”
अनु : ‘काय? कुणाबद्दल बोलतो आहेस तु केतन?’

केतन : ‘सुशांत.. मी सुशांत बद्दल बोलत आहे..’ केतन अनुकडे न बघताच म्हणाला
अनु : ‘अरे काय बोलतो आहेस तु केतन? कळतेय का तुला?’

केतन : ‘हो अनु? पण तु मला सांग ना माझी काय चुक आहे याच्यात? ती मुलगी मला भेटली तेंव्हा मला नव्हते ना माहीती की ही माझ्या होणाऱ्या भावाची बायको आहे. तिच्याबरोबर घालवलेल्या ४-६ तासांतच ती माझ्या मनात बसली. मग आता असे अचानक मला कळल्यावर कसं मी तिला मनातुन बाहेर काढुन टाकु? तुच सांग अनु!!’

अनु : (जागेवरुन उठत ) ‘माझ्याकडे उत्तर नाही केतन.. चल आपण जाऊ घरी.. मला उशीर होतो आहे..’

केतन : ‘माझं बोलणं तरी संपु देत.. अजुन थोडा वेळ नाही का बसु शकणार?’

अनु : ‘केतन………… उशीर होतो आहे….. चल लवकर’

केतन : ‘अनु.. माझी इच्छा आहे की त्या मुलीने मला माफ करावं..मी दोषी नाही आहे. मला पुर्ण कल्पना असुनही मी तिच्यावर प्रेम केले असते तर.. तर… मान्य आहे.. पण..’

अनु : ‘केतन.. तु येणार आहेस का मी जाऊ ऑटो ने घरी?’ (उठुन उभी रहाते..)

केतन : अनु प्लिज.. (उठुन उभ्या राहीलेला अनुला हाताला धरुन केतन खाली बसवतो) ट्राय टु अंडरस्टॅन्ड अनु..

अनु : व्हॉट ट्राय टु अंडरस्टॅन्ड केतन? ह्यात समजण्यासारखे काहीच नाहीये. तु जे बोलतो आहेस तो सर्व मुर्खपणा आहे. उगाच नसत्या गोष्टीवर बोलण्यात काय अर्थ आहे.. मला सांग..
केतन : बरोबर आहे अनु.. तु म्हणते आहेस ते पटते आहे मला… पण त्याचबरोबर हे सुध्दा खरंच आहे ना की मी तुझ्यावर प्रेम करतो…??

अनु : कमऑन केतन.. प्रेम हे असं इतक्या पट्कन होतं का? तु इतकी वर्ष अमेरीकेत राहीलास.. कदाचीत तिथं होत असतील प्रेम अशी.. पण अशी प्रकरणं मोडतातही तितक्याच लवकर हे तुलाही माहीती असेलच.. हो ना?
केतन : नाही अनु.. चुकती आहेस तु.. प्रेमाला कधी प्रांताचं, देश्याचं, जाती धर्माचं बंधन नसतं.. प्रेम हे प्रेमच असतं ना?
वारा कोणी पाहीलाय? देव कुणाला दिसलाय? पण म्हणुन काय कोणी त्याचे अस्तित्व नाकारते का? प्रेमाचे अगदी तस्संच आहे. प्रेमाचा अविष्कार तुम्हाला कधी, कुणाच्या रुपात, कुणाकडुन होईल हे कोणीच सांगु शकत नाही.

अनु : अरे हो.. पण आपल्यात तसं आहे का? मी प्रेमाचं अस्तीत्व नाकारत नाहीये.. पण त्या प्रेमात जे नातं येतेय मध्ये त्याचं काय? गॉड डॅम केतन.. मी तुझ्या सख्या भावाची होणारी बायको आहे.. कळतेय का तुला?
केतन : (अनुचा हात हातात धरतो..) मला काहीही कळत नाहीये अनु..मला फक्त एव्हढंच कळतं आहे की मी तुझ्यावर खुप खुप प्रेम करतो. मला कळत नाहीये तु माझ्यावर काय जादु केली आहेस.. पण मला तुझ्याशिवाय काहीच सुचत नाहीये अनु.. घरामध्येही सगळीकडे तुच
दिसतेस.. सुशांतदाशी नजर करायला भिती वाटते अनु.. वाटतं कधी त्याच्या जागी तुच दिसशील आणि मी काही तरी मुर्खासारखं बोलुन जाईन..

अनु : (केतनच्या हातातुन आपला हात सोडवुन घेते) कळतंय ना हे? भिती वाटतेय ना?.. हीच भिती तर संवेदना आहे, जाणीव आहे की तुझ्या मनात जो विचार आहे तो चुकीचा आहे. केतन हे केवळ एक आकर्षण आहे.. विसरुन जा सगळं.. विसरुन जा की आपण कधी शांघाय एअरपोर्टवर भेटलो होतो.. विसरुन जा की आपलं दीर-वहीनीचं नात बनायच्या आधी आपण एकमेकांचे मित्र बनलो होतो…
केतन : आकर्षण? नाही अनु.. माझ्या मनातल्या भावना मी न ओळखण्याइतपत लहान नाहीये. माझ्या हृदयाची स्पंदन मीच न समजण्याइतपत मी कुकुल बाळही नाहीये अनु.. माझ्या प्रेमाला आकर्षणाचं थिल्लर विषेशण नको लावुस. मी जगु नाही शकणार तुझ्याशिवाय अनु. तु नाही मिळालीस तर मी आत्महत्या करुन जिवन वगैरे संपवणार्‍यांसारखा भेकड नाही. पण तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला अर्थ सुध्दा उरणार नाही अनु..

अनु केतनकडे स्तंभीत होऊन पहात असते.

केतन : मी तुझं आणि सुशांतदाच लग्न झालेल नाही पाहु शकत अनु.. त्या पेक्षा मी आधीच अमेरीकेला निघुन जाईन. कुठल्या तोंडाने तुला वहीनी म्हणु मी? ज्या तोंडाने ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ म्हणलं त्या तोंडाने? नाही अनु.. हा धोका होईल मला आणि सुशांतदाला. मी असं कुणाला फसवु नाही शकत..

अनु काहीच बोलत नाही…ती विस्फारलेल्या नेत्रांनी केतनकडे पहात रहाते…

केतन : हे बघ.. कदाचीत… कदाचीत तुझं मन, तुझे विचार हे आत्तापर्यंत केवळ सुशांत ह्या एकाच व्यक्ती भोवती फिरत होते.. तु केवळ त्याचाच विचार करत होतीस.. कदाचीत तु माझ्याकडे कधी तसं पाहीलंच नाहीयेस.. हे बघ.. हे बघ.. मी म्हणत नाही की तु लगेच हो म्हण.. पण..पण निदान एकदा विचार तर करुन पहा.. निदान तुझ्या मनाला तरी विचारुन पहा ते काय म्हणतेय..

अनु पुन्हा उठुन जायला लागते…

केतन : अनु, तु ज्या सुशांतसाठी माझा विचार सुध्दा करायला तयार नाहीस तो सुशांतमात्र तुझ्या मागे मागे त्या पार्वतीबरोबर….
अनु : केतन?? अरे काय बोलतो आहेस तु कळतंय का तुला…
केतन : हो अनु.. मी माझ्या डोळ्यांनी पाहीलं आहे…
अनु : शट अप केतन.. वेड लागलं आहे तुला… माझा सुशांत तसा नाहीये… शक्यच नाही..
केतन : हो अनु, लागलंय मला वेड.. लिसन टु माय हार्ट अनु.. बघ ते केवळ तुझाच विचार करतंय.. (असं म्हणुन केतन अनुला जवळ ओढतो आणि घट्ट मिठी मारतो…)

अनु स्वतःला केतनच्या मिठीतुन सोडवण्याचा प्रयत्न करते.. पहील्यांदा ती त्याला आपल्यापासुन दुर ढकलु पहाते पण ते शक्य होत नाही. हळु हळु तिची धडपड कमी होत जाते.. तिच स्वतःला केतनपासुन दुर ढकलणं कमी होत जातं आणि ती काही क्षण का होईना स्वतःला केतनच्या मिठीमध्ये झोकुन देते…

(मागुन हृदयाच्या धडधडण्याचा आवाज येत रहातो.)

काही क्षणच आणि मग तिला वर्तमानकाळाची जाणीव होते. ती जोरात ढकलुन केतनला बाजुला करते, टेबलावरची आपली पर्स उचलते आणि बाहेर पडते.
केतन निराश मनाने खांदे उडवतो आणि तो सुध्दा अनुबरोबर बाहेर पडतो..

[पडदा पडतो..]


>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

मध्यांतर

<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<

 

[ पडदा उघडतो…]

प्रसंग – ७ स्थळ.. केतनचे घर..

स्टेजवर सुशांत आणि सखाराम बसले आहेत. केतन स्टेजवर येतो…

केतन : सुशांत दा.. हे बघ तुझ्यासाठी खास येताना आणले होते…

सुशांत वळुन केतनकडे बघतो. केतन हातातली वस्तु पुढे करतो.

सुशांत : ओह माय गॉड.. स्कॉच?? वंडरफुल.. थॅक्स यार.. सखाराम आज घरी कोणी नाहीये.. आपली ताई मावशी आहे ना, तिच्या नातवाचं बारसं आहे उद्या. सगळे आज तिकडे गेले आहेत.. एकदम उद्याच येतील. चल होऊन जाउ दे.. जा ग्लास घेऊन ये..

सखाराम उठुन जायला लागतो..

सुशांत : आणि हो.. येताना जरा कपाटातुन काही तरी शेव-चिवडा घेऊन ये…
सखाराम : (सुशांतच्या हातातील बाटलीकडे बघत) आयची आन.. ऐवज..(हाताने पिण्याची खुण करतो..) व्हय जी.. आन्तो की लगीच

सखाराम धावत धावत स्वयंपाक घरात जातो.

केतन : अर्रे.. आत्ता?
सुशांत : हो… त्याला काय होतंय.. तसंही घरी कोण नाहीये.. का काय झालं?
केतन : अरे… मुड नाहीये आत्ता… नंतर बसु ना कधी तरी…

सुशांत केतनला हात धरुन खाली बसवतो..

सुशांत : अरे मग तर आत्ताच घ्यायला हवी.. म्हणजे मुड येईल तुला.. बसं रे…

केतन सुशांत शेजारी बसतो.. सखाराम स्वयंपाक घरातुन साहीत्य घेउन येतो आणि समोरच्या टेबलावर मांडतो. सुशांत बाटली उघडुन पेग भरतो आणि केतन, सुशांत आणि सखाराम आपले आपले ग्लास घेतात.

सुशांत : (एक घोट घेतो).. आहा.. अह्हा आहाहा.. केतन शेठ.. मज्जा आणलीत.. व्वा.. झक्कास…

केतन एक घोट घेतो आणि नुसताच हसतो…सखाराम एक मोठ्ठा घोट घेतो आणि अतिव आनंदाने मस्त डोकं हलवतो आणि हसतो…

सुशांत : एअरपोर्टवर घेतलीस का रे?
केतन : हो.. ड्युटी-फ्री शॉप्स असतात तेथे घेतली…
सखाराम : (अजुन दोन तीन घोट घेतो आणि) चमायला… केतन दादा…त्ये अमेरीकेला म्हणे मुली छोट्या छोट्या चड्या घालुन रस्त्यावरुन फिरत्यात म्हणे..

केतन आणि सुशांत सखारामच्या ह्या अनपेक्षीत प्रश्नाने चमकुन त्याच्याकडे बघतात.

केतन : चड्या?? सखाराम अरे.. शॉर्ट्स म्हणतात त्याला शॉर्ट्स…
सखाराम : व्हयं. व्हयं… पन काय वो.. तुम्हास्नी त्रास नाय का व्हतं मग..?
सुशांत: त्रास? कसला त्रास..?? सख्या लेका पहीलाच पेग चढला काय तुला?
सखाराम : तसं नाय.. पण असं रस्त्यानं फिरायचा म्हंजी…
केतन : अरे अमेरीकेत भोगवादी संस्कृती आहे.. तेथे नग्नता अश्लील मानत नाहीत.. तो त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे… तेथील लोकं सेक्स बद्दल ओपनपणे बोलतात.. मुलांना त्यांच्या लहान वयातच शाळेत ह्या गोष्टी शिकवल्या जातात..
सखाराम : व्हय.. व्हय.. पन काय ओ केतनदादा.. त्ये इलेक्शनला कोणत्या चित्रापुढं बटन दाबला म्हणजे भोगवादी का कसली ती संस्क्रुतीला शपोर्ट देनारं शरकार येईल आपल्या हिथं?

केतन आणि सुशांत दोघंही डोक्यावर हात मारुन घेतात..

सखाराम : तुम्ही काय बी म्हणा केतनदादा.. पन त्या गोर्‍या गोर्‍या बाया बघायला मस्त मज्जा येत असेल नव्हं..
केतन : मज्जा.? अरे अश्या मस्त सेक्सी असतात ना तिथल्या पोरी…
सुशांत : ओ अमेरीका रिटर्न्ड.. शब्दावर जरा बंधन ठेवा.. तुम्ही भारतात आहात आणि ते पण आपल्या घरात. ह्या सख्याला काय कळत नाही.. उद्या नको तेंव्हा.. नको तेथे, नसते शब्द उच्चारेल आणि परत तुमच्याकडे बोट दाखवुन मोकळा होइल…

(सर्व जण ग्लासमधील घोट घेत काही वेळ शांत बसतात…)

सखाराम : केतनदादा.. माझं एक खात उघडुन द्या नव्ह.. त्या थोबाडपुस्तीकेवर… गण्या सांगत होता लै भारी भारी बायकांचे फोटू असत्यात म्हणे तिथं ’तुमची वाट बघत आहेत’ म्हणुन…
केतन : थोबाड्पुस्तीका? हा काय प्रकार?? ओ हो.. फेसबुक म्हणायचं आहे का तुला?
सखाराम : व्हयं व्हयं.. त्येच त्येच.. तिकडं द्या ना एक खातं बनवुन…
केतन : बरं बरं बनवु आपण उद्या हा…

सखाराम : केतन दादा…
केतन : आता काय?
सखाराम : तिकडं अमेरीकेला लय थंडी असती म्हणं?
केतन : नेहमी नसते.. त्यांच्या हिवाळ्यात असते. पण त्यांचा उन्हाळा गार असतो एवढंच..
सखाराम : असं.. असं.. आन म्हणं.. तिकुडं बरफ पन पडत्यो?
केतन : हो.. म्हणजे कोस्टल एरीयात नाही पडत पण इतर ठिकाणी थंडीच्या दिवसात पडतो..

सखाराम : असं.. परं म्या तर असं ऐकलय,… (दोन क्षण घुटमळतो..)
केतन : बोला.. आता काय ऐकलत आपण?

सखाराम : म्हंजी, तिकुडं इतकी थंडी असतीया की आपन बोललो नव्हं.. तर तोंडातुन बरफच पडत्यो नुस्ता.. शब्दांची बरफच बनतोया.. आपन बोलत राहत्यो अन समोर ह्यो मोठ्ठा बर्फाचा ढीग जमतोया, अन मग समोरच्यानं तो बरफ गोळा करायचा अन आगीत टाकायचा आन मग आपल्याला त्ये काय काय बोलला व्हंता त्ये ऐकु येताय.. खरं हाय व्हयं ह्ये??

केतन आणि सुशांत खो खो करुन हसायला लागतात.
सखाराम तोंड पाडुन पित बसतो.

(थोड्यावेळ शांतता)

सुशांत : अरे चिडु नको सख्या, बरं बोल, अजुन काही प्रश्न आहेत का तुझे.. केतन तु न हसता उत्तर दे रे त्याला.. (बोलता बोलता सुशांत स्वतःच हसु दाबण्याचा प्रयत्न करतो).

केतन : बोला सखाराम शेठ बोला.. आहेत का अजुन काही प्रश्न?
सखाराम : हायेत जी.. अमेरीकेत म्हणे आधी पोरं व्हतात आन मग लगीन..
केतन : हो.. तेथे लग्न आणि एकुणच समाजसंस्था महाग आहे. लग्न केल्यावर घटस्फोट झाला तर पोटगी दाखल खुप पैसे द्यावे लागतात. त्यामुळे एकुणच जोपर्यंत खात्री होत नाही की हीच्याशीच, किंवा ह्याच्याशीच लग्न करायचं, तोपर्यंत लग्न होत नाहीत..
सखाराम : ह्ये काय बराबर नाय बगा.. माझं सपष्ट मत हाय.. पुरुषांन बायकांस्नी समान समजला पायजेल सामान नाय….
केतन : (हसु आवरत..) बरोबर आहे तुझं सख्या.. पण प्रत्येक देशाची संस्कृती वेगळी असते.. कदाचीत त्यांच्या देश्याच्या दृष्टीने हे बरोबर असेल…
सखाराम : तुझ्यायला म्हणजे पोरं आपल्याच बापाच्या लग्नाच्या वरातीमंदी नाचत असतील ‘आज मेरे बाप की शादी है.. आज मेरे बाप की शादी है…’

सखाराम गाणं म्हणता म्हणता उठुन डोक्यावर ग्लास घेऊन नाचायला लागतो.

केतन : (सुशांतकडे बघत) ए पण खरंच तसंच असतं हा.. म्हणजे माझा बॉस जॅक्सन त्याच्या लग्नात त्याची दोन्ही पोरं होती..
सखाराम : (नाचता नाचता) आताशा मला कळतंय.. ह्यो इलायती लोकांची नावं अशी जॅक्सन, सॅम्सन का असत्यात..
केतन आणि सुशांत सखारामच्या नवीन फटकेबाजीकडे उत्सुक्तेने पाहु लागता.. : का?? का??
सखाराम : अवं का म्हंजी काय? आता तुमी म्हंता लगीन झाल्याबिगर बी पोरं व्हत्यात.. मग त्या आयांना कळाया नको कोण पोरगं कोनाचं त्ये.. म्हंजी.. जॅस्कन – जॅकचा सन जॅक्सन, आन सॅमचा सन सॅम्सन नव्हं?

केतन ह्यावेळेला मात्र गडाबडा लोळत हसत रहातो.

सखारामला एव्हाना चढु लागलेली असते. केतन आणि सुशांत एकमेकांशी बोलत असतात तेंव्हा स्टेजवर हातामध्ये हंटर घेउन पार्वती अवतरते. अर्थात तो केवळ सखारामचा एक भास असतो.. केतन आणि सुशांतला पार्वती दिसत नसते.

पार्वती हंटर घेउन सखारामसमोर येउन उभी रहाते. डर्टी पिक्चरमधले आरा..रा.. नाक्क.. मुका गाणं सुरु होतं पार्वती तसाच ओठ चावुन.. कमरेला झटके देत.. हंटरशी खेळत सखारामसमोर नाचत रहाते.. सखाराम आ.. वासुन तिच्याकडे पहात रहातो.

गाणं संपताच पार्वती निघुन जाते… सखाराम मात्र तसाच आ वासुन बसतो..

सुशांत : सख्या.. ए सख्या.. अरे कुठं तंद्री लागली आहे?
सखाराम : पारो… कुठे तरी बोट दाखवत म्हणतो…
सुशांत : पारो? कोण पारो?
सखाराम : पारो.. अवं म्हंजी.. पार्वती…
सुशांत: (चिडुन..ओरडतो) सखाराssssssssम…….

केतन आणि सखाराम आश्चर्याने सुशांतकडे बघतात.. सुशांत परत जागेवर बसतो.

सुशांत : अरे म्हणजे.. पार्वती नाव आहे ना तिचं.. एकदम पारो??
सखाराम : (लाजत लाजत) अवं म्या आपला लाडानं म्हणतो तिला…

केतन : अरे पण तुला काय एव्हढं चिडायला होतय मोलकरणीला तो बोलला तर…
सुशांत : अरे मी चिडलो बिडलो नाही.. मी आपलं… (मग विषय बदलत).. अरे तुझा ग्लास रिकामाच आहे.. घे ना..

केतन आपला ग्लास पुढं करतो. शंतनु दोघांचेही ग्लास भरुन देतो.

सुशांत : पण काय रे केतन.. तु पुढं त्या मुलीबद्दल काही बोललाच नाहीस..
केतन : मुलीबद्दल? कुठल्या मुलीबद्दल?
सुशांत : अरे? असं काय करतो आहेस? ती.. तुला शांघाय एअरपोर्टवर भेटलेली.. तु म्हणला तुला फक्त नावच माहिती आहे आणि ती मुंबईची आहे म्हणुन..
केतन : ओह.. ती.. सोड रे.. तिचं काय घेऊन बसला एव्हढं?

सुशांत : अरे!! पण तुला आवडली होती ना ती? ते काही नाही.. लाव, फोन लाव तिला…
केतन : सोड रे सुशांतदा… ते आपलं तात्पुर्त आकर्षण होतं.. मी काही माझा निर्णय-बिर्णय बदलला नाहीये.. मला आपली अमेरीकेचीच मुलगी हवी…
सुशांत : ए.. काय उल्लु समजतोस का तु मला? तुझ्या चेहर्‍यावरुन कळत होतं.. ते काही नाही.. चल नाव आणि नंबर दे.. तुला नसेल बोलायचं तर मला सांग मी बोलतो…
केतन : (वैतागुन) फx यु सुशांतदा.. तुला सांगुन कळत नाहीये का एकदा.. मला इंटरेस्ट नाहीये…? तुला मनासारखी मुलगी मिळाली, तुझं लग्न ठरलं म्हणजे इतरांचही व्हायला हवं का? आणि माझं लग्न ठरवायचा ठेका दिलाय का तुला? माझं मी बघण्यास समर्थ आहे कळलं????

सुशांत आणि सखाराम आचंबीत होऊन केतनकडे बघत बसतात..

केतन : सॉरी.. आय एम सॉरी.. मी ओव्हररीअक्ट झालो..

सुशांत अजुनही स्तब्ध होऊन केतनकडे बघत असतो. मग थोड्या वेळाने..

सुशांत : इट्स ओके… माझंच चुकलं.. तुला उगाच फोर्स करत बसलो..फक्त तुमच्या अमेरीकेतील शिव्यांना जरा आवर घाला.. कृपया इथे नको.. ओके?
केतन : हम्म.. (हातातला ग्लास रिकामा करतो)..
सुशांत : एनीवेज.. मला बास्स.. मी जातो झोपायला…
सखाराम : अवं खाऊन तर जा काही तरी..
केतन : नाही.. नको सख्या.. मला नकोय जेवायला.. तुमचं चालु द्या.. मी जातो..

केतन एकवार सुशांतकडे बघतो. दोघांची काही क्षण नजरानजर होते आणि मग सुशांत निघुन जातो.

सखाराम आणि केतन अजुन दोन चार पेग काही न बोलता रिचवतात. सखाराम काही तरी घ्यायला उठतो, पण त्याचा तोल जातो आणि तो खाली बसतो.
केतन त्याला सावरायला उठतो… सखारामला पडताना बघुन तो जोरजोरात हसतो.

सखाराम : (दारुच्या नशेत) हसा केतनदादा हसा.. पण एक लक्षात ठेवा.. तुमी ज्ये करताय ना.. त्ये बरोबर नाय बघा..
केतन : का रे बाबा? असं काय चुकीचं केलंय मी अं?
सखाराम : अहो कोणाला चुx बनवताय या सखाराम ला……..आ कोणाला …….. शिकवताय आ ??
केतन : अरे पण काय झालं ते तरी सांगशील का?
सखाराम : तुमास्नी काय वाटतंय, चढलीय मला? अहो असल्या देसीच्या छप्पन्न बाटल्या मी रिकाम्या केल्यात.. ही विदेसी काय चिज हाय? सखारामला सगल कलतया.. कुनाचं काय चाललय.. तुम्चं अन अनुताईंच…

केतन ताडकन उठतो आणि सखारामच्या कानाखाली वाजवतो…

सखाराम : (गाल चोळत) अहो तुम्ही दुसरे काय करणार? ……… जातो म्या पण एक गोष्ट ध्यानामंदी ठेवा ती तुमची होनारी वाहिनी हाय.. ह्ये मी कुठं बोल्लो तर अनुताईंच नाव पन खराब व्हाईल म्हनुन्शान मी गुमान बसलोय.. जातो म्या..

सखाराम निघुन जातो.. केतन फुल्ल टेन्शनमध्ये येतो.. हातातला ग्लास एका दमात रिकामा करतो आणि तो पण आतमध्ये निघुन जातो.

स्टेजवरचे दिवे मंद मंद होत जातात आणि अंधार पसरतो. 

[क्रमशः]

तुझ्या विना (भाग-४)


भाग ३ पासुन पुढे>>

प्रसंग -४ स्थळ तेच.. केतनचे घर..

स्टेजवर सखाराम बाजार-रहाटाच्या पिशव्या घेउन येतो…

सखाराम : गोमु संगतीनं.. माझ्या तु येशील काय.. गोमु संगतीने माझ्या तु येशील काय?
माझ्या पिरतीची.. राणी तु होशील काय…

तायडी हॉलमध्ये लॅपटॉप उघडुन काही तरी पहात बसली आहे. तायडीला एकटेच बघुन सखाराम पिशव्या पटकन स्वयंपाकघरात ठेवुन तिच्या जवळ येऊन थांबतो..

सखाराम : तुमास्नी म्हणुन सांगतो ताय.. मला काय केतन दादांच ते अमेरीकन बाईशी लगीन करायचं पटलं नाय बगा.. अवं आपल्या देश्यात काय कमी शुंदरी हाएत व्हय.??. अवं आपल्या सुशांत दादाने बघा कशी छान बायडी केली लग्नाला.. अनं.. ते केतन दादांच कायतरी भलतचं..
तायडी : अरे तो त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे..
सखाराम : अवं, कसला वैयकित प्रशन.. अहो.. त्या माय ला नसल काय ओ वाटत.. आपली बी अशीच शुन असावी.. ती अमेरीकन इथं घरात अशी उघडी नागडि फिरनार अनं..
तायडी : शी सख्या.. उघडी नागडी काय?…
सखाराम : तुम्ही काय बी म्हणा.. मला काय ते पटलं नाय बगा….

एव्हाना केतन आवरुन बाहेर येउन बसतो.

तायडी : हाय स्मार्टी…
केतन: हाय!! ..तायडे.. अगं इथं एखादं इलेक्ट्रॉनीक्सच दुकान आहे का गं? अग माझा लॅपटॉपचा चार्जर इथं चालत नाही.. त्याला पुढे एक अडाप्टर घ्यावा लागेल..
तायडी : अरे हे काय पुढं कॉर्नरला आहे ना..
केतन : अगं बघुन आलो मगाशी, आजुबाजुला इथं कुणाकडेच नाहीये…
तायडी : पुढं एक मॉल झालाय बघ.. बरीच दुकानं आहेत तिथ.. तिथं नक्की मिळेल…
केतन : पुढं कुठं?? चालत जाण्याच्या अंतरावर आहे का?
तायडी : नाही.. इतकं पण जवळ नाही.. रिक्शा करुन जा…
केतन : बरं.. येतो जाऊन मी…
तायडी : अरे नाही तर एक काम कर.. अनुला घेउन जा.. कश्याला हवी रिक्शा.. ति योग्य दुकानात घेऊन जाईल तुला…

अनुचं नाव काढताच केतनच्या चेहर्‍यावर आनंद पसरतो, तर सखाराम उठुन बसतो..

सखाराम : अवं अनु ताईस्नी कश्याला तरास देताय.. म्या घेऊन येतो, काय हवंय तुम्हाला..?
केतन : अरे.. सखाराम.. तुला नाही कळायचं मला काय हवंय ते.. चुकीचं आणशील काही तरी तु..
सखाराम : अवं दादा.. लिहुन द्या नव्हं.. आणतो की मी…
तायडी : अरे.. जाऊ देत ना त्याला.. तेवढंच फिरणं पण होईल बाहेर.. तुला लॅपटॉपचं नाही कळणार काही.. दादु..जा तु अनुला घेउन..
केतन : (आनंदाने) हो ना, सख्या तुला काय कळणार मला काय हवंय.. नको नको.. तु नको.. मीच जातो… (मग तायडीकडे बघत) काय ग तायडे, ते समोरचेच घर ना अनुचे?

सखाराम चिडुन पुन्हा आपल्या कामाला लागतो. केतन निघुन जातो..

सखाराम : तायडे.. हे असं केतन दादाने अनुताईंबरोबर जाणं.. मला नाय आवडलं.. सुशांत दादा चिडतील नव्ह का?
तायडी : सख्या.. अरे ती जशी सुशांतची बायको तशी केतनची वहीनी नाही का?
सखाराम : अवं पण होणारी ना.. केतनदादा म्हंजी विलायतीत राहीलेलं पोर….नाय म्हनला तरी तिकडुचं थोंड फार वारं घुसनार नव्हं अंगामंदी
तायडी : नाही रे सख्या.. तु काही म्हण, पण आपला केतन तसा नाही.. मला खात्री आहे…

थोड्यावेळाने स्टेजवर सुशांत आणि पार्वती खिदळत येतात.

तायडी दोघांना बघुन घसा साफ करते. तायडीला बघुन दोघेही शांत होतात. पार्वती मान खाली घालुन आत निघुन जाते.. सुशांत तायडीसमोर येउन बसतो.

सखाराम आsss वासुन पार्वतीकडे पहात असतो. मागे डर्टी पिक्चरमधील ’आरा रा नाक मुका नाक मुका नाक मुका.. आरा रा नाक मुका नाक मुका’ गाणे पार्वती जाई पर्यंत वाजत रहाते. पार्वती आपल्या कमरेला झटके देत आतमध्ये निघुन जाते.
पार्वती दिसेनाशी झाल्यावर सखाराम एक आवंढा गिळतो.

तायडी : काय रे सुशांता.. झालं का व्हिसाचं काम?

सुशांत : हम्म.. बहुतेक ३-४ दिवसांत मिळेल तारीख. (इकडे तिकडे बघत) केतन कुठे गेला? का झोपला परत?
तायडी : अरे त्याला ते काय ते लॅपटॉपचा चार्जर का काय ते घ्यायचे होते. अनुबरोबर गेलाय आणायला.
सुशांत : अनुबरोबर?
तायडी : हो अरे मीच म्हणलं त्याला.. अनुला घेऊन जा बरोबर.. ती बरोबर दुकाना घेऊन जाईल त्याला. तो उगाच कुठे शोधत फिरणार? येतीलच इतक्यात बराच वेळ झालाय जाऊन

सखाराम : बरं..मला थोडं सामान आनायचा व्हंता वाण्याकडुन.. म्या काय म्हंतो.. पार्वतीला घेऊन जाऊ काय बरोबर? नाय म्हंजी तिला पण कलेल ना आपन कुठुन काय घ्येतो.. पुढच्या येळेस ती पन जाऊन घेऊन येउ शकेल नव्हं..
सुशांत : (सखारामला) पार्वती कश्याला.. नको नको.. तुच जा एकटा आणि घेउन ये.
सखाराम : अवं पन..
सुशांत : सख्या.. नको म्हणलं ना.. नको!!
सखाराम : म्या बघतोया सुशांतदा, तुम्ही लई पार्शीलीटी करता… सगळी कामं मलाच सांगता तुमी.. आन तिला मात्र कामात मदत करता.. बघीतलाय मी..
सुशांत : (जोरात ओरडत) सख्या…………
सखाराम : वरडा.. किती बी ओरडा.. पन म्या खरं त्येच बोल्तोय…

इतक्यात केतन आणि अनु स्टेजवर येतात. अनु जोरजोरात हसत असते. केतन शांतपणे तिच्या मागोमाग येतो.

सुशांत : काय गं? काय झालं एव्हढं हसायला?
अनु : अरे हा केतन… (परत जोरजोरात हसायला लागते..)
सुशांत ; अगं जरा कळेल असं बोलशील का?
अनु : (हसु आवरण्याचा प्रयत्न करत) अरे.. आम्ही मॉल मध्ये गेलो होतो.. येताना हा.. हा केतन म्हणला मी चालवतो कार.. म्हणलं चालव.. म्हणुन त्याला किल्ली दिली..
तर.. (परत हसत बसते).. तर हा केतन किनई डाव्या सिटवर जाऊन बसला.. आणि हात हा असा.. असा… (कारचे स्टेअरींग व्हिल पकडण्याची अक्टींग करत..)

सुशांत सुध्दा हसायला लागतो..

तायडी : मग? त्यात हसण्यासारखं काय झालं?
अनु : अगं.. आपल्या इथे कारचे स्टेअरींग उजव्या बाजुला असते.. डाव्या बाजुला नाही..
तायडी : अगो बाई… (असं म्हणुन तायडी सुध्दा हसायला लागते..)
सखाराम : बघीतलं.. ह्यो आपला देश सोडुन दुसरीकडं राह्यल्याचा परीमाण.. ह्ये असं संस्क्रुती विसरत्याती लोकं..
केतन (चिडुन) : सख्या.. ड्रायव्हींगचा आणि संस्कृतीचा काय संबंध? (बाकीच्यांकडे बघत) एव्ह्ढ काही हसण्यासारखे नाहीये त्यात. मी आठ वर्ष तिकडे गाडी चालवत होतो.. तिकडे लेफ्ट हॅन्ड ड्राईव्ह आहे.. मला तिच सवय.. सवयीने चुकुन त्या बाजुला गेलो तर काय चुकलं माझं..??

पण सुशांत, अनु आणि तायडीच त्याच्या बोलण्याकडे लक्षच नसतं.. ते सर्व हसण्यात मग्न असतात.

एव्हढ्यात पार्वती बाहेर येते.. सुशांत आणि पार्वतीची नजरानजर होते आणि पार्वती आत निघुन जाते. केतनच्या नजरेतुन हे सुटत नाही. थोड्याच वेळात सुशांतसुध्दा उठुन आत निघुन जातो.

केतन काही तरी बोलण्यासाठी तोंड उघडतो तेवढ्यात..केतनची आई स्टेजवर येते…

आई : हुश्श… काय बाई हा उकाडा आणि काय ती रस्त्यावर गर्दी… छेछे..
तायडी : काय गं.. भेटले का गुरुजी?
आई : हो भेटले.. मोठ्ठी लिस्ट दिली आहे.. बर ते जाऊ देत.. सुशांत कुठे आहे.. हे बघ मी येताना काय घेऊन आले.
आई बॅगेतुन मुंडावळ्या काढतात. अनु, तायडी, आईंभोवती जमा होतात.
आई : सुशांत.. ए सुशांत..
सुशांत : (आतुन कुठुन तरी आवाज येतो..) आलो.. आलो आई एक दोन मिनीटं हा…
आई : काय बाई हा मुलगा.. काय सारखं आत मध्ये करत असतो कुणास ठाऊक.. (अनुकडे बघत).. अनु तु ये बघु इकडे..

अनु आईंच्या समोर जाऊन गुडघ्यावर बसते. आई तिच्या डोक्याला मुंडावळ्या बांधतात. आधीच सुंदर दिसणारी अनु अजुनच सुंदर दिसु लागते. केतन तिच्याकडे पहाण्यात हरखुन जातो.

तायडी : अग्गो बाई.. कित्ती गोड दिसते आहे अनु नै..

तायडी आणि आई दोघीही कौतुकाने अनुकडे बघत रहातात. अनु अचानक केतनकडे बघते. केतन अनुकडे बघण्यातच मग्न असतो. दोघांची नजरानजर होते. केतन पटकन दुसरीकडे बघतो.

आई : सुशांत.. ए सुशांत.. अरे येतो आहेस ना..
तायडी : अगं हा आपला हॅन्ड्सम आहे ना केतन इथं.. त्याला बघ लावुन.

आई अनुच्या मुंडावळ्या काढुन केतनकडे जाऊ लागतात. त्या मुंडावळ्या केतनला लावुन बघायचा त्यांचा विचार असतो. त्या केतनला मुंडावळ्या बांधणार एवढ्यात आतुन सुशांत येतो..

सुशांत : काय गं आई? कश्याला हाक मारत होतीस?

सुशांतला बघुन केतन चरफडतो.

आई : अरे हे बघ.. ये तुला लावुन बघु कसे दिसते आहे.

असं म्हणुन आई सुशांतला मुंडावळ्या बांधुन बघते. केतन मात्र रागाने सुशांतकडे बघत रहातो.

आई : हम्म.. आत्ता कसं लग्नाचा मुलगा वाटतो आहेस.. काय अनु? कसा दिसतोय सुशांत?
अनु : (चेहर्‍याची एक बाजु तळहाताने झाकत).. इश्श…..
आई : सुशांत… नशीबवान आहेस तु.. बघ.. बघ कश्शी लाजते आहे ते….
अनु : काय हो आई.. (असं म्हणुन अनु आईंना बिलगते..)
सखाराम : (नाचायला लागतो) मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी सदा खुश राहो ये दुआ है हमारी

सगळेजण हसत हसत सखारामकडे बघत असतात.

सखाराम नाचत नाचत तो केतनपाशी येतो, त्याचा हात धरुन त्याला उठवतो आणि त्याला पण नाचण्यात ओढतो. पण केतन चिडुन त्याचा हात बाजुला ढकलतो.

आई : अनु.. हे घे तुझ्यासाठी आणलं आहे (असं म्हणुन पिशवीतुन एक पुस्तक काढुन अनुकडे देतात)
अनु : काय आहे हे आई?
आई : अगं उखाण्यांच पुस्तक आहे. आत्तापासुनच पाठ करायला लाग, ऐन वेळेला आठवत नाही बघ.
अनु : अहो पण अवकाश आहे अजुन..
आई : अवकाश कसला.. विसरशील ऐन वेळेस. तुला सांगते, अगं माझ्या लग्नात किनई अस्संच झालं होतं. ऐन वेळेस मी उखाणाच विसरले बघ..
अनु : (डोळे मोठ्ठे करुन) अय्या होssss!! मग?
आई : मग काय? केला शब्द जुळवुन असाच तयार. त्यावेळेस आमचे हे इतके बारीक, हडकुळे होते ना, मग मी उखाणा घेतला..
चांदीच्या ताटात मटणाचे तुकडे…
चांदीच्या ताटात मटणाचे तुकडे…

घास भरवते मरतुकड्या तोंड कर इकडे..
सगळं खो खो खो करत हसायला लागतात. हसता हसता एक एक करत सगळे आतमध्ये निघुन जातात. अनु उरले-सुरले सामान गोळा करते, केतनकडे बघुन एकदा हसते आणि आतमध्ये निघुन जाते.

केतन अनु गेली त्या दिशेकडे बघत बसतो.
(मागुन हृदयाच्या धडधडण्याचा आवाज येत रहातो.)

तो इतका तल्लीन आणि स्वतःच्या विचारात गुंग होतो की त्याच्या मागे पार्वती येऊन उभी राहीली आहे हे सुध्दा त्याच्या लक्षात येत नाही.
पार्वती एकदा त्याच्याकडे आणि एकदा अनु गेली त्या दिशेकडे दोन-तिनदा पहाते. मग हसते आणि..

पार्वती : गेली ती…
केतन : (दचकुन) अं…
पार्वती : अनु कडे बघत होतास ना? गेली ती आतमध्ये…
केतन : हो.. नाही.. मी .. मी कुठं अनुकडे बघत होतो.. मी आपलं असंच.. (डोक्यावरुन हात फिरवत उठुन बसतो)
पार्वती : आत्ता आतमध्ये निघुन गेलीय.. काहीच केले नाहीस तर कायमचीच निघुन जाईल.. हातातुन…

केतन विचारात गढुन जातो… पार्वती स्वतःशीच हसत हसत आतमध्ये निघुन जाते…

स्टेजवरचे दिवे मंद मंद होत जातात आणि अंधार पसरतो.

 

प्रसंग -५ स्थळ तेच.. केतनचे घर..

अनु काहीतरी काम करण्यात मग्न आहे.. केतन जिन्यावरुन खाली येतो. अनुला बघुन काही वेळ विचार करतो (मागुन हृदयाच्या धडधडण्याचा आवाज येत रहातो.) आणि मग तिच्या शेजारच्या सोफ्यावर जाऊन बसतो..

अनु वळुन केतन कडे बघते. दोघंही एकमेकांकडे बघुन हसतात. केतन तेथेच चुळबुळ करत बसतो.

थोड्यावेळाने..

अनु : काय रे? काही बोलायचं आहे का?
केतन : नाही विशेष असं काही नाही. म्हणलं आठवड्यावर येऊन ठेपले लग्न.. कसं वाटतं आहे?

अनु केतनकडे बघुन हसते आणि परत कामात मग्न होते.

केतन : म्हणा तुला तसा फारसा फरक पडणार नाही.. तुझं घर इथंच समोरच आहे ना.. आणि तुला इथंही सवय आहे तशी.. म्हणजे मी बघतोय ना.. सगळ्यांना तुच हवी असतीस…
अनु : (हसते) हम्म.. पण शेवटी लग्न हा मुलींच्या आयुष्यातील एक वेगळा टप्पाच असतो रे.. शेवटी आपलं घर ते आपलं आणि नवर्‍याचे घर ते नवर्‍याचंच ना.. आणि आता सुशांतचे हे अमेरीकेचं चालु आहे.. आम्ही नाही म्हणलं तरी वर्ष दोन वर्ष तिकडं जाणार.. मग कुठले आई-वडील आणि कुठले सासु-सासरे..
केतन : तुला नाही जायचं अमेरीकेला? मग सांग तसं सुशांतदा ला.. सांग त्याला अमेरीकेचे खुळ काढुन टाक म्हणुन….
अनु : अरे.. असं कसं.. त्याचं स्वप्न आहे ते.. आणि तु सांग.. तु गेली आठ वर्ष आहेच ना अमेरीकेत.. तुला मी म्हणलं अमेरीका सोडुन इकडे ये रहायला.. येशील???
केतन : दुसर्‍या दिवशी येईन…

अनु चमकुन केतनकडे बघते

अनु : ऐ है.. म्हणे दुसर्‍या दिवशी.. आणि तुझं झालं आहे अमेरीकेत आठ वर्ष राहुन, म्हणुन कदाचीत तु म्हणत असशील.. सुशांतचे तसे नाहीये.. तो कधी गेला नाहीये अमेरीकेला.. त्याला क्रेझ असणारच ना.
असो.. ते जाऊ देत.. झाली का तुझी दुपारची झोप??

केतन : नाही गं.. झोपलो नव्हतो.. पिक्चर बघत होतो टी.व्ही. वर..
अनु : हो? कोणता रे?
केतन : डी.डी.एल.जे..
अनु : वॉव.. काय मस्त मुव्ही आहे नाही तो? कित्ती ही वेळा बघा.. कंटाळाच येत नाही.. शाहरुख आणि काजोल.. एव्हरग्रीन पर्फ्रोमंन्स नाही..
केतन : हो.. खरंच कित्ती वेळा पाहीलाय पिक्चर.. पण लागला की परत पहावासा वाटतोच..

अनु आपल्या कामात पुन्हा मग्न होते.. केतन पाय पसरुन.. सोफ्यावर डोकं टेकवुन विचार करत बसतो. मागुन दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे मधील तो प्रसंग ऐकु येत रहातो जणु तो प्रसंग केतनच्या मनात पुन्हा पुन्हा येतो आहे…

‘कौन है वो लडकी?’ अनुपम खेर
‘सिम्रन…!! कौन लडकी??” शाहरुख..
“वही.. जिसकी सुरत तुम चांद मै धुंडनेकी कोशीश कर रहे हो..” अनुपम खेर..”देखो बेटा मै तुम्हारा बाप हु..बताओ मुझे कौन है वो लडकी..”
“पॉप.. सिम्रन नाम है उसका”, शाहरुख
“प्यार करते हो उससे?”, अनुपम खेर
शाहरुख मान डोलावतो..
“और वो..”, अनुपम खेर
“पता नही.. और वैसे भी उसकी शादी तैर हुई है”, शाहरुख
“तैर हुई है ना.. अभी तक हुई तो नही? जावो.. बतादो उसे की तुम उसीसे प्यार करते हो..और ले आओ उसे इस घरकी दुल्हन बनाके.. बेटा एक याद रखना.. दुल्हन उसीकी होती है जो उसे डोली मै बिठा के घर ले आए..” अनुपम खेर..

अनु : ए पण काय रे.. तुला कशी मुलगी हवी? तु सांगीतलच नाहीस.

एव्हढ्यात तायडी स्टेजवर येते.

तायडी : अगं त्याला काय विचारते आहेस.. आम्हाला विचार ना. त्याला हवी असलेली मुलगी इथली नसणारच आहे.. तिकडची.. विलायतेतली.. ब्लॉड-फिंड हवीय त्याला..
अनु : हो.. सुशांत म्हणाला होता मला…
तायडी : मग काय.. एक-सो-एक स्थळ आली होती ह्याच्यासाठी. तसा गुणाचा आहे तो. वडील लहानपणीच सोडुन गेले. सुशांत होताच म्हणा पाठीशी.. पण तरीही स्वतःच्या पायावर स्वतः उभा राहीला, कंम्युटर शिकला.. साता-समुद्रापार अमेरीकेतील कंपनीत नोकरी काय मिळवली आणि आज एका मोठ्या हुद्यावर काम करतोय.. गम्मत नाही.

अनु आळीपाळीने एकदा तायडीकडे तर एकदा केतनकडे पहात रहाते.

तायडी : अनु, तुला म्हणुन सांगते, तुझं आणि सुशांतच जमलं होतं म्हणुन, नाही तर खरं केतनसाठीच तु आम्हाला पसंद होतीस.

(अनु आणि केतन दोघंही चमकुन तायडीकडे बघतात) पण ह्या साहेबांना काहीच पटत नव्हतं..
केतन : तायडे, पण तु मला हीचा कुठं फोटो दाखवलास..? दाखवला असतास तर कदाचीत…

तायडी : चल रे.. डॅंबीस कुठला.. आता बस हातावर हात चोळत….

तायडी आणि अनु दोघीही हसायला लागतात. आणि हसता हसताच आतमध्ये निघुन जातात.
दुसरीकडुन स्टेजवर सखाराम घाईगडबडीत येतो. सख्याला बघुन केतन त्याला थांबवतो..

केतन : अरे सख्या.. थांब ना..
सखाराम : नगा थांबवु दादा.. लै काम हाईत..
केतन : अरे होतील रे काम.. किती धावपळ करशील एकटा.. (मग थोडा विचार करुन) जरा त्या पार्वतीला पण सांगत जा की कामं.. ती तर कधीच कामं करताना दिसत नाही.. तुच एकटा धावपळ करत असतोस बिच्चारा…
सखाराम : (आनंदाने) व्हय ना.. तुमास्नी बी असंच वाटत्ये ना.. (मग हळुच केतनच्या जवळ जात हळु आवाजात) अवं पण सुशांतदादांची वार्नींग हाय.. पार्वतीला जास्ती कामं नाय सांगायची..
केतन : (आवाजात खोटं आश्चर्य आणत).. हो?? का रे? का असं का? ती पण कामवालीच आहे ना?
सखाराम : व्हयं जी.. काय म्हाईत नाय बा..
केतन : (अगदी हळु आवाजात) सख्या.. सुशांतदा आणि पार्वतीच काही…
सखाराम : (तोंडावर हात मारत) अव्वाव्वाव्वा… काय बोलताय दादा.. नाय वो.. तसं काय नाय.. पार्वती सुशांतदादांच्या हाफीसातील कुणाचीतरी बहीन हाय नव्ह… म्हनुन असेल.. चला जाऊ द्या मला.. लै कामं खोळंबली हाईत..

सख्या निघुन जातो.
केतन उठुन उभा रहातो आणि दोन्ही हात पसरुन जोरात म्हणतो…

केतन : (स्वगत) “…दुल्हन उसीकी होती है जो उसे डोली मै बिठा के घर ले आए………”

शेजारच्या टेबलावर ठेवलेली जत्रेत मिळतात तसली दिवे लागणारी शिंग उचलुन डोक्याला लावतो. हातामध्ये एखादे त्रिशुळ..

केतन : (स्वगत).. आय एम डेव्हील.. डर्टी डेव्हील.. ‘एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह ऍंन्ड वॉर’ असं सगळेच म्हणतात, मग आपण तरी कशाला मागे रहायचं. पुढे काय होईल ते होईल. पण निदान अनुला माहीती तरी करुन देण आवश्यक आहे की माझ्या मनात काय आहे ते.. हे असे जगु नाही शकत.. नाही जगु शकत मी…

स्टेजवरचे दिवे मंद मंद होत जातात आणि अंधार पसरतो.

 

[क्रमशः]

तुझ्या विना (भाग-३)


भाग-२ पासून पुढे >>

प्रसंग -३ केतनचे घर..

स्वयंपाक घरात केतनची आई कामात मग्न आहे.. तायडी हॉलमध्ये आवरा आवर करत आहे. केतन आळोखे-पिळोखे देत.. आळस देत हॉलमध्ये सोफ्यावर येऊन बसतो..

तायडी : अगो बाई.. उठले वाटतं भाऊराया.. आई.. हा उठला बघ गं!!
आई : “अरे.. उठलास केतु? झाली ना भरपुर झोप?

केतन डोळे चोळत चोळत मान डोलावतो आणि सोफ्यावर येऊन बसतो.

आई : चहा घे आता मस्त वाटेल. आलं टाकुन करते…. घेतोस ना चहाच? का कॉफी टाकु?”
केतन (सुस्तावलेला) : “नाही.. घेतो चहा.. चालेल.. त्या अमेरीकेतील स्टार-बक्सची कॉफी पिऊन पिऊन कंटाळा आलाय..
आई (गॅसवर चहा टाकत) : अगं पार्वती.. वरचं झाडुन झालं असेल तर केतनची खोली आवरुन घे गं.. उठलाय तो..
केतन : पार्वती? आता ही कोण नविन?
तायडी : अरे कामवाली आहे.
केतन : कामवाली? आणि मग सख्या काय् करतो?
आई : अरे सखाराम आहे रे.. पण तो बाहेरच्या कामातच जास्त बिझी.. पार्वतीची स्वयंपाकात पण खुप मदत होते. काय मस्त स्वयंपाक करते माहीते? खरं तर तिला कामं सांगवतच नाहीत रे. गोड आहे मुलगी.
केतन : आणि मग ही तायडी काय करते.. काय गं घोडे.. तु नाही का स्वयंपाकात मदत करत?
तायडी : चुप रे.. तुला काय करायचं आहे चोमडेपणा.. आणि माझं ऑफीसमधलं काम कोण करणार मग?
आई : अरे.. सुशांतच्या ऑफीसमधले ते कोण सपोर्ट-स्टाफ का कोण असतात त्यातील एकाची बहीण आहे पार्वती.. गरीब आहेत बिचारे.. तिला कामाची गरज होती म्हणुन ठेवलं सुशांतने तिला इथं कामाला..
केतन : बरं केलं सुशांतने.. तुला केंव्हापासुन सांगत होतो घरी एक कामाला बाई ठेव आता.. किती वर्ष कामं करशील घरातली.. स्वतःसाठी जरा काढ वेळ..
तायडी : आणि काय करेल ती वेळ काढुन? तु तर काही वहीनी आणत नाहीस. मग मोकळ्या वेळेत करायच काय तिनं?
केतन : ए गपे…. करण्यासारखं बरंच आहे गं.. तुला आपलं कारणच पाहीजे वहीनीचा विषय काढायला..
तायडी : हो मग? काय चुकीचे बोलतेय का मी?.. नाही.. सांग ना, काय चुकीचं बोलतेय मी..? नाही बोलणार मी पुढे.. शेवटी तु नाही लग्न केलंस तरी मी करणारच आहे.. आज ना उद्या मला जायचंच आहे हे घर सोडुन.. (उगाचच डोळे हाताच्या बोटांनी टिपल्याचे नाटक करते..)
केतन : झाली हिची नाटकं सुरु…

आई चहाचा कप आणुन देते….

केतन : पण आई, मी इथे असेपर्यंत स्वयंपाक तुच करायचास हा, मला नको पार्वतीच्या हातचा स्वयंपाक.
आई : बरं.. मीच करीन हो…
केतन : (चहाचा घोट घेत).”काय गं आई एवढी शांतता का आहे? कुणी दिसत नाही ते?”
आई: “अरे सगळे गेले आहेत देवी दर्शनाला. सुशांत-अनु चे लग्न आठवड्यावर येउन ठेपले ना.. म्हणुन एकदा जावुन यावं म्हणुन गेले आहेत. सकाळीच गेलेत सगळे ५.३० ला येतीलच एवढ्यात..
केतन : आणि ही तायडी नाही गेली ते?
आई : अरे तिला ऑफीसला जायचे आहे लवकर.. म्हणुन नाही गेली..
केतन : पण मला का नाही उठवलंस? मी पण गेलो असतो ना..
आई : आधी फक्त अनु आणि सुशांत दोघंच जाणार होते, पण मग अनुच म्हणाली सगळ्यांनाच घेउन जाऊ काय १००-१५० कि.मी. चा तर प्रवास, मग काकांनी गाडी काढली आणि सगळेच गेले बघ. फार गोड आहे रे ती पोरगी! सगळ्यांमध्ये मिळुन मिसळुन असते..”

केतन : (अनुचे नाव ऐकल्यावर केतन परत विचारात बुडुन जातो) : ”काय गं आई.. काय करते काय ही अनु? अं.. आय मिन अनुराधा..?”
आई : “अरे ते चायनीज भाषेचं काहीतरी करते बघ. महाराष्ट्र सरकारचे सांस्कृतीक खातं आहे ना, त्यातील चिन देशाशी संबंधीत संस्कृतीची देवाण-घेवाण करणं, आपल्या इथे चिनी भाषेबद्दल जागृकता निर्माण करणं, त्याचे क्लासेस असंच काहीतरी चालु असते. परवाच आली ती परत, एक महीना शांघायला गेली होती..”
केतन (स्वगत) : “हम्म. म्हणजे तीच ही आहे तर.. चुकुन माकुन एकसारख्या दिसणाऱ्या दोन व्यक्ती असु शकतात.. पण कसलं कायं? नशीबाने ऐन वेळेस धोका दिला..”

बाहेर गाडीचा थांबल्याचा आवाज आणि नंतर बर्‍याच लोकांचा गोंगाट ऐकु येतो. थोड्याच वेळात सगळी मंडळी स्टेजमध्ये घुसतात.
मागोमाग सुशांत आणि अनु पण आतमध्ये येतात.. क्षणभरासाठी अनुची आणि केतनची नजरानजर होते..

मागुन ह्रुदयाचा धडधडण्याचा आवाज ऐकु येत रहातो. अनु आणि केतन एकमेकांकडे पहात रहातात जणु सर्व जग स्तब्ध झाले आहे.
थोड्यावेळाने अनु आतमध्ये निघुन जाते.

ह्रुदयाच्या धडधडण्याचा आवाज जरा वेळ येत रहातो आणि मग बंद होतो. पांढरा-शुभ्र सलवार-कुर्ता घातलेला सुशांत केतन समोर येउन बसतो.

सुशांत : “काय राजे झाली का झोप? जमतंय ना भारतात? का अमेरीकेच्या मऊ-मऊ गाद्यांची सवय झाली आहे?”
केतन : (चेहऱावर उसनी हास्य आणुन) “अरे कसलं अमेरीका आणि कसलं भारतं..? आपलं घर म्हणल्यावर युगांडा असले तरी झोप छानच लागणार..”
तु बोलं.. कसं झालं देवदर्शन? देव दर्शन केलंस ना? का नुसतंच आपलं देवी.. अं?… अं???
सुशांत : खेचा.. खेचा आमची.. बोहल्यावर उभे राहीलो ना आम्ही..

इतक्यात स्टेजवर सखाराम पण येतो..

सखाराम : (केतनला बघुन) काय वं केतनदा.. झोप झ्याक झाली नव्हं…
केतन : फर्स्ट-क्लास.. पण तु कुठं गेला होता सकाळी सकाळी?
सखाराम : कुठं म्हंजी.. ह्ये सुशांतदा अन अनुताई ग्येले व्हते नव्हं का देवाला..म्या बी ग्येल्तो.. ह्ये दोघं अस्सा जोडा दिसत व्हता म्हनुन सांगु लक्ष्मी-नारायनाचा… आयसायब, काय बी म्हना, झ्याक शुन गावली तुमास्नी…

केतन सखारामचे बोलणे ऐकुन चरफडतो..

आई : मग? आहेच माझी सुन लाखात एक. (तेवढ्यात अनु पण बाहेर येते.. आईंच बोलणं ऐकुन लाजुन आईंना मिठी मारते). काय गं, पण तुला आवडला ना माझा मुलगा? नक्की पसंद आहे ना…
अनु : (लाजतच) हो आई… (खुप पसंत आहे आणि परत मान खाली घालते..)

केतन वैतागुन आत जायला उभा रहातो तेव्हढ्यात पार्वती स्टेजवर येते. तिला बघुन सुशांत सरळ होऊन बसतो. तिची आणि सुशांतची झालेली नजरानजर केतनच्या नजरेतुन सुटत नाही.

सुशांत : पार्वती, ये तुझी ओळख करुन देतो.. केतन.. ही पार्वती.. पार्वती.. हा केतन

पार्वती केतनकडे बघते, एकदा हसते आणि लगेच आत निघुन जाते.. थोड्यावेळाने तायडी बाहेर येते..

तायडी : ए दादीटल्या.. भेटलास पार्वतीला? कशी वाटली?
केतन : कशी वाटली म्हणजे? मला नाही माहीत.. कामवाली कशी वाटायला पाहीजे तश्शीच वाटली… आता काय हिच्याशी लग्न लावताय की काय माझं..

तायडी जोरजोरात हसत आतमध्ये पळते..

केतन : (सुशांतच्या पाठीवर हात मारत) च्यायला सुशांतदा.. तायडीसमोर बोललो नाही.. पण खरंच भारी कामवाली आहे राव.. (डोळे मिचकावतो..)

सुशांत कसनुसा हसतो.. मग थोड्यावेळ घुटमळुन लगोलग सुशांतही जायला उठतो..

सुशांत : बरं चल, तु करं आराम, मला जरा बाहेर जायचं आहे, जरा व्हिसाचं बघायचं आहे.. अजुन तारीख नाही मिळाली व्हिसा-इंटरव्ह्युची

केतन चहा संपवतो.. आणि पेपर चाळत बसतो. थोड्यावेळाने पार्वती पुन्हा स्टेजवर येते

पार्वती : आई, मी जरा बाहेर जाऊन येते…थोडी बाजारातली कामं उरकायची आहेत.. (मग एकदा सुशांतकडे बघते आणि बाहेर निघुन जाते)
पाठोपाठ सुशांतसुध्दा गडबडीत बाहेर जात..
सुशांत : आई.. मी जरा बाहेर जाऊन येतो.. व्हिसाचं काम आहे..

केतन आळीपाळीने आधी पार्वतीकडे आणि मग सुशांतकडे बघतो.. पण दोघंही त्याच्याकडे दुर्लक्ष करुन निघुन जातात
केतन आवरण्यासाठी उठतो.. आणि आपल्या खोलीकडे जायला लागतो तोच वरुन जिन्यावरुन अनु धावत धावत खाली येते.. दोघंही जणं इतके जवळ येतात की काही क्षण उशीर झाला असतात तर दोघंही जण एकमेकांवर आदळलेच असते.
दोघंही एकमेकांकडे बर्‍याच वेळ बघत उभे रहातात. मागुन हृदयाच्या धडधडण्याचा आवाज येत रहातो. मग शेवटी अनुच मान खाली घालुन निघुन जाते.
केतन बर्‍याच वेळ तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पहात रहातो. मग काही क्षणांनी भानावर येत…

केतन : (स्वगत) शिट्ट.. केतन.. अरे काय करतो आहेस हे??? तुझी होणारी वहीनी आहे ती… सुशांत दादाची बायको..
च्यायला पण हिला काही घर दार आहे की नाही..जेंव्हा बघावं तेंव्हा इथेच असते… जा ना म्हणावं आपल्या घरी, कश्याला इथे थांबुन मला त्रास…
मागुन केतनची आई येते..

आई : काय रे केतन.. बरा आहेस ना? स्वतःशीच काय बडबडतो आहेस?
केतन : अं.. नाही, काही नाही.. ………… आई.. सुशांत दादाचं आणि अनुचं… प्रेमविवाह आहे ना..??

आई : हम्म
केतन : कसं जमलं गं त्यांच? म्हणजे ओळख कुठे झाली दोघांची?
आई : “कुठे काय? अरे हे काय.. अनु समोरच तर रहाते आपल्या. १८-१९ वर्षांची होती जेंव्हा ती आणि तीचे आई-बाबा इथे रहायला आले. आणि तेंव्हा पासुन ती आपल्या घरचीच होऊन गेली. ती तिच्या घरी कमी आणि आपल्या घरीच जास्त असते.. सुशांतच्या लग्नाचे बघायला सुरुवात केली तेंव्हा आमच्या डोक्यात तिचेच नावं पहीले आले.. आणि ५-६ वर्ष झाली सुशांत-अनु एकमेकांना चांगले ओळखतात पण ना.. त्यामुळे लगेच जमुन गेले..”

केतन : आणि हिचे आई-बाबा?
आई : इथेच असतात. इंपोर्ट-एक्स्पोर्टचा बिझीनेस आहे त्यांचा.. तिची आई तिच्या बाबांना मदत करते व्यवसायात. मागच्याच आठवड्यात गल्फला गेलेत. येतील सुशांतच्या लग्नाला.

केतन ऐकता ऐकता आळसावर आळस देत असतो..

आई : अरे आत्ताच उठलास ना? झोप नाही झाली का अजुन? जा आंघोळ करुन घे.. फ्रेश वाटेल.. मी जरा गुरुजींना भेटुन येते.. गृहमकासाठी काय सामान लागेल त्याची यादी आणायची आहे… येतो आहेस का तु बरोबर?
केतन : ए आई.. आंघोळ दुपारी करेन गं मी.. जरा झोप काढतो… अगं जेट लॅग आहे.. अजुन सवय नाही झाली.. मी पडतो जरा इथंच.. तु ये जाऊन..

आई बरं म्हणुन निघुन जाते.. केतन तेथेच सोफ्यावर आडवा होतो.

स्टेजवरील दिवे मंद मंद होत जातात. स्टेजच्या दुसर्‍या कोपर्‍यात दिव्यांचा एक स्पॉटलाईट पडतो आणि त्यात सुशांत आणि अनु दोघंजणं एकमेकांच्या मिठी मध्ये विसावलेले असतात.

एखादं गाणं सुशांत आणि अनुंच…..

गाणं संपत.. सुशांत आणि अनु स्टेजवरुन निघुन जातात.. दिव्यांचा प्रकाश पुन्हा पुर्ववत होतो.

केतन सोफ्यावरुन ताडकन उठुन बसतो. पहीले काही क्षण संभ्रमावस्थेत तो इकडे तिकडे पहात रहातो. मग त्याला कळतं की सुशांत आणि अनुंच पडलेलं त्याला स्वप्न होतं.

तो बधीर होऊन सोफ्याला टेकुन बसतो. मग डोळे चोळत उठतो, टेबलावरील घड्याळात वेळ बघतो, मग चेहर्‍यावरुन हात फिरवत, केस, कपडे ठिकठाक करतो आणि टेबलावरील एक पुस्तक उचलुन वाचु लागतो. इतक्यात अनु स्टेजवर येते…

अनु : “आई…..ss”
केतन : (तिच्याकडे न बघताच.. काहीसं चिडुन) “आई नाही ये घरी.. बाहेर गेली आहे..”
अनु : “ओह..बर ठिक आहे, मी येते नंतर” (म्हणुन अनु परत जायला माघारी वळते. .. मग क्षणभर थांबुन) “बाय द वे, कसं झालं तुझ बॅंगलोरचे सेशन? आणि जेट लॅग गेला का नाही अजुन?”

केतन : (उडत-उडत उत्तर देत) “छान झाले सेशन.. जेट-लॅग नाही गेला अजुन.. सवय नाही ना प्रवासाची.. जाम झोप येतेय गं अजुन” .

अनु काही वेळ तिथेच ओढणीच्या टोक हातात धरुन उभी रहाते..

केतन : (स्वगत) ”तिला अजुन काही बोलायचे आहे का माझ्याशी? मी फारच उध्दटासारखा वागलो का? पण काय बोलणार? भिती वाटते की माझ्या मनातले विचार तिला कळाले तर? इतर कुणाला समजलं कि शांघायला भेटलेली हीच ‘ती’?.. शेवटी काही झालं तरी सुशांतदाची ती होणारी बायको आहे..
छ्या.. उगाच आलो आपण इकडे.. अमेरीकाच बरी.. असले इमोशनल ड्रामा तरी नसतात तिकडे.. ते काही नाही.. सुशांतचे लग्न झाले की पुढची सुट्टी रद्द करुन टाकु आणि काहीतरी कारण काढुन जाऊ परत तिकडेच..”

दोघंही एकमेकांकडे बर्‍याच वेळ बघत उभे रहातात. मागुन हृदयाच्या धडधडण्याचा आवाज येत रहातो.
बोलावे का नं बोलावे या विचारात केतन असतानाच…

अनु : सुशांत नेहमी तुझ्याबद्दल सांगायचा.. पण तुझ्याशी अशी शांघायमध्ये भेट होईल असे स्वप्नातसुध्दा वाटले नव्हते.
केतन : हो ना.. वर्ल्ड इज स्मॉल म्हणतात ते उगाच नाही… पण काय गं तु बोलली नाहीस मला तुझ लग्न ठरलं आहे ते..
अनु : काय संबंध? तुला कश्याला सांगु मी माझं लग्न ठरलं आहे ते..

केतन अनुच्या ह्या अनपेक्षीत उत्तराने चकीत होतो.

केतन : म्हणजे?
अनु : (खांदे उडवत) म्हणजे आपली इतकी काही ओळख नव्हती की मी तुला अगदी माझं लग्न वगैरे ठरले आहे सांगावे.
केतनला हेही उत्तर अनपेक्षीत असते. त्याला मनात कुठं तरी वाटत असते की त्याला अनुबद्दल जे काही वाटत होते एअरपोर्टवर तसेच कणभर का होईना अनुला सुध्दा वाटलं असेल.
केतन : (आवाजातील नैराश्य लपवण्याचा प्रयत्न करत) हो.. ते ही आहेच म्हणा. काय संबंध आपला…

काही वेळ शांतता..

अनु : ए.. बाय द वे… अरे हे ब्लॉंड चे प्रकरण काय आहे? सुशांत म्हणाला मला.. तुला म्हणे अमेरीकन मुलीशीच लग्न करायचे आहे म्हणुन?”

केतन नुसताच हसतो.

अनु : हसतो आहेस म्हणजे हो ना? ए सांग ना, आहे तुझी तिकडे गर्लफ्रेंड? एखादी जेनीफर, मिशेल, सुझान? हम्म?

केतन नकारार्थी मान हलवतो.

अनु : ए कमॉन.. खोटं नको बोलु.. इतकी वर्ष तिथे राहीलास, त्यात तुला तिकडच्या मुली आवडतात.. तु पण काही इतका वाईट नाहीस.. तुला गर्लफ्रेंड नाही?? पटत नाही…
केतन : “नाही गं.. म्हणजे हो.. माझा होता तसा विचार.. आधी वाटायचं भारतीय मुलींमध्ये काही अर्थ नाही. त्यांत्याच चाली-रीती, इमोशनल अत्याचार, तिच्या आई-बाबांची संसारात ढवळा-ढवळ, सासु-सुनांची भांडण, तीच टीपीकल मेंटालीटी. त्यातच आईच्या आग्रहाखातर तिने पाठवलेले खुप फोटो पाहीले पण, आवडुन घेण्याचा प्रयत्न पण केला, पण काय करु..कोणी आवडलीच नव्हती.
अनु (डोळे मिचकावत ): “आवडली नव्हती? म्हणजे आता आवडली की काय? कोणी भेटली-बिटली नाही ना तुला?”
केतन : (विषय बदलत), बरं ते सोड, तु चिन बद्दल सांग ना.. म्हणजे बघ ना.. चिन देश्याबद्दल अजुनही तसे एक गुढ वलय आहे. इतर देश्यांमध्ये कसं एक ओपन-नेस आहे.. चिनच्या बाबतीत तसं नाही. त्या ग्रेट चायना वॉलच्या आत.. त्या देशात काय चालतं एक मिस्ट्रीच आहे.. तेथील लोक.. तेथील संस्क्रुती.. सारं कसं.. गुढ…
अनु : ए.. तु आता विषय बदलतो आहेस हा…
केतन : नाही विषय नाही बदलत आहे.. पण खरंच.. सांग ना चिन बद्दल…
अनु : हो तु म्हणतो आहेस ते खरं आहे.. चिन कम्युनिस्ट देश असल्यामुळे सारं कसं दडपले गेलेलं.. इतर देश्यांशी व्यवहार करताना.. मोजकेच बोलणं.. आवश्यक तेवढीच माहीती पुरवणं अशी एक सवयचं लागली आहे त्या लोकांना..
ए,.. पण तुला माहीते.. एकदा का तुमची मैत्री जमली ना चिनी लोकांशी.. की ती लोकं खुप्पच वेगळी आहेत. बारीक बारीक गोष्टींमध्ये आनंद मानणं.. लोकसंस्ख्या इतकी वाढलेली असुनसुध्दा रहदारी, पब्लीक ट्रान्स्पोर्ट वापरतानाचा बाळगलेला संयम.. सारच कसं अविस्मरणीय…

अनु बोलत रहाते.. म्हणजे तिचं बोलणं.. आवाज येत नाही.. पण ती काही तरी केतनशी बोलते आहे असे प्रेक्षकांना दिसत रहाते. केतन उठुन उभा रहातो आणि सोफ्याच्या मागे जाउन.. सोफ्याच्या काठावर हात टेकवुन त्यावर आपली हनुवटी ठेवुन तो अनुकडे पहात रहातो. म्हणजे ते त्याचे मन असते थोडक्यात..

अनुच्या चेहऱ्यावरचे क्षणाक्षणाला बदलणारे भाव, तिच्या पापण्यांची होणारी उघडझाप, दर मिनीटाला केसांची बट कानामागे सरकवण्याची लकब बघण्यातच तो गुंग होऊन जातो.
मागुन हृदयाच्या धडधडण्याचा आवाज येत रहातो.

थोड्यावेळ बोलुन मग अनु निघुन जाते.

केतन (स्वगत) : अख्या जगात, सुशांतला हीच आवडायला हवी होती का? दुसरी नव्हती का कोणी? साला कितीही प्रयत्न केला तरी ही मनातुन जातच नाहीये. प्रत्येक वेळा तिल्या बघीतल्यावर माझी बैचैनी वाढतच जातेय. ‘तोंड दाबुन बुक्यांचा मार आहे हा’ इच्छा असुनही मी काहीच करु शकत नाही.

हताशपणे तो आपल्या खोलीत आवरायला निघुन जायला उठतो इतक्यात त्याला बाहेरुन कुणाच्या तरी हसण्या खिदळण्याचा आवाज येतो. केतन पटकन एका ठिकाणी लपुन बसतो.

बाहेरुन सुशांत आणि पार्वती येतात.
स्टेजवरील शांतता बघुन..

सुशांत : अरेच्चा.. गेले कुठं सगळे..? शांतता आहे!!

पार्वती आतमध्ये निघुन जायला लागते. सुशांत पुन्हा एकदा इकडे तिकडे बघतो आणि पार्वतीला जवळ ओढतो.

पार्वती : सर… काय करताय सर…
सुशांत : अगं घरी कोणी दिसत नाहीये.. चान्स पे डान्स???
पार्वती : सर.. आतमध्ये असेल कोण तरी.. सोडा सर…
सुशांत : ए.. सर काय सर..? सर ऑफीसमध्ये.. इथं तर मी सुशांतच आहे.. हो ना?

पार्वती हसते. सुशांत पार्वतीला सोडतो..

सुशांत : ए.. पण तु खुश आहेस ना? झाल् ना मनासारखं..
पार्वती : श्शुsssss..सर हळु बोला.. कोण तरी ऐकेल.. आणि कोणी तरी कश्याला, तुमच्या होणार्‍या बायकोने ऐकले तर??

दोघही हसतात…

सुशांत : सोड गं तिचं.. तु ये जवळ ये.. लाजु नको ये…

पार्वती सुशांतचा हात ढकलुन आतमध्ये पळते.. सुशांतसुध्दा तिच्या मागोमाग धावतो.

लपुन बसलेला केतन समोर येतो.

केतन : (स्वगत) च्यायला.. हा काय प्रकार आहे? सुशांतदा..चारो उमलीया घी मै और हात कढाई मै.? ह्या प्रकाराचा शोध लावलाच पाहीजे..

ज्या दिशेने सुशांत-पार्वती गेले त्या दिशेने आश्चर्याने डोकं खाजवत उभा रहातो आणि मग सावकाश आतमध्ये निघुन जातो.

 

[क्रमशः]

तुझ्या विना (भाग-२)


भाग १ पासुन पुढे>>

प्रसंग २ :

स्टेजवर अजुनही अंधारच आहे, पण स्पिकरवरुन होणार्‍या अनाऊन्समेंटचा आवाज ऐकु येतो आहे.

ईंडीयन एअरलाईन्स प्लाईट नंबर आय.ए. थ्री. सेवन नाइन इज डिलेड बाय थ्री आवर्स. फ्लाईट इज नाऊ स्केड्युल्ड टु डिपार्ट फ्रॉम गेट नं. ७ ऐट फ़ोर्टीन ट्वेंन्टी.

आय रिपीट… ईंडीयन एअरलाईन्स प्लाईट नंबर आय.ए. थ्री. सेवन नाइन इज डिलेड बाय थ्री आवर्स. फ्लाईट इज नाऊ स्केड्युल्ड टु डिपार्ट फ्रॉम गेट नं. ७ ऐट फ़ोर्टीन ट्वेंन्टी.

पुन्हा एकदा विमानाच्या टेक-ऑफचा आवाज येतो..

पुन्हा अनॉन्समेंन्ट, प्लाईट नं एस. नाईन्टी ऑफ सिंगापुर एअरलान्स इज नाऊ रेडी टु डिपार्ट इन थर्टी मिनीट्स, ऑल द पॅसेन्जर्स आर रिक्वेस्टेड टु प्रोसीड टु गेट नंबर एलेव्हन प्लिज..

चिनी भाषेतुन पुन्हा काही अनाऊन्समेंट्स आणि जाहीराती चालु रहातात.
थोड्यावेळाने स्टेजवर हळु हळु प्रकाश पसरतो.

समोर एअरपोर्टवरील असु शकतो असा एक कॅफे आहे. एक तरुणी, अर्थात पहील्या प्रसंगातील अनु, आपला लॅपटॉप उघडुन त्यावर काही काम करत बसली आहे. आजुबाजुचे टेबल्स भरलेले आहेत.

केतन पाठीला बॅग, हातात बॅग घेउन वैतागत जागा शोधत शोधत त्या तरुणीच्या टेबलापाशी येऊन बसतो. रिकामी खुर्ची बघुन केतन थबकतो.

केतन : एनीबडी सिटींग हीअर?

ती तरुणी वर न बघताच मानेनेच नाही म्हणते.

केतन : कॅन आय सिट हिअर?

ती तरुणी वैतागुन केतनकडे बघते.. मग मानेनेच हो म्हणते आणि पुन्हा लॅपटॉपवर काम करण्यात मग्न होऊन जाते.

केतन आपली बॅग कडेला ठेवतो आणि खुर्ची ओढुन बसतो. थोडावेळ शांततेत जातो. केतन दोन-तिनदा त्या तरुणीकडे बघतो परंतु ती तरुणी अजुनही लॅपटॉपवर काम करण्यात मग्न असते.

केतन (शेवटी न रहावुन) : धिस फ्लाईट डिलेज आर रिएली फ्रस्ट्रेटींग.. इझंट इट?
अनु (एकदा केतनकडे वरपासुन खालपर्यंत निरखुन पहात) : याह.. ट्र्यु

अनु पुन्हा कामात मग्न होऊन जाते.

केतन : देसी?.. अह.. आय मीन इंडीयन?
अनु : (वर न बघताच..) येस्स….

केतन काही क्षण तिच्याकडे रागाने बघत रहातो.

केतन (स्वगत) : च्यामारी बिस्कीट खारी, ही समजते कोण स्वतःला? च्यायला मी चेहर्‍यावरुनच घाटी कळुन येतोय की काय? ही नक्कीच दिल्लीची असावी..

इतक्यात अनुचा फोन वाजतो…

अनु (फोनवर) : हॅलो.. आई.. अगं नाही ना.. फ्लाईट डिले आहे दोन तास.. इथे एअरपोर्टवरच अडकुन पडले आहे.. (काही क्षण शांत) अगं हो ना.. आधी फोन करायला हवा होता.. असो दोनच तास आहे म्हणुन बरं.. (पुन्हा काही क्षण शांत).. हो.. हो हो.. हम्म.. बॅंगलोरला पोहोचले की करते फोन.

अनुला मराठीतुन बोलताना पाहुन केतन आश्चर्यचकीत होतो.

केतन काही बोलण्यासाठी तोंड उघडतो एवढ्यात…

अनु : (त्याचा पुढचा प्रश्न आधीच ओळखुन) हो.. मी महाराष्ट्रीयनच.. मुंबईची… मला मराठी येतं.. अजुन काही..???
केतन : मग तु आधी बोलली नाहीस तुला मराठी येत..
अनु : पण मी मराठी येत नाही, असं तरी कुठं म्हणाले?

केतन चिडतो आणि दुसरीकडे तोंड करुन बसतो.
अनु त्याच्याकडे.. चिडलेल्या केतनकडे बघुन स्वतःशीच हसते आणि मग लॅपटॉप बंद करुन बॅगेत ठेवुन देते.

अनु : तु मुंबईचाच का?

केतनचा चेहरा पुन्हा आनंदाने उजळतो आणि तो अनुकडे तोंड करुन बसतो..

केतन : हो मुंबईचाच.. म्हणजे मी गेली आठ वर्ष स्टेट्सला होतो, इन्फी मध्ये.. आता महीनाभराची सुट्टी घेऊन घरी चाललो आहे.. तु?
अनु : मी इथेच असते शांघायला.
केतन : आय.टी.?
अनु : परदेशात असलं म्हणजे आय.टी. मध्येच असायला हवं का? इतर क्षेत्रही आहेत ज्यामध्ये परदेशगमनाची संधी मिळते..
केतन : मग? काय करतेस तु?

अनु : मी गव्हर्मेंटच्या सांस्कृतीक खात्यात काम करते. चायनाशी सांस्कृतीक देवाण-घेवाण, इकडचे विद्यांर्थ्यांना तिकडे स्थाईक होण्यासाठी मदत, चिनी भाषेचा प्रसार वगैरे वगैरे.. जेंव्हा भारतात असते तेंव्हा चिनी भाषेचे क्लासेस घेते.. नेहमीपेक्षा थोडं हट के.. चालु असते..
केतन : व्वा.. छान की.. बरं आहे तुम्हाला आमच्या सारखी रिलिजेसची कटकट नाही.. त्यात गव्हरमेंट जॉब म्हणल्यावर तर काय आरामच…
अनु : असं काही नाही.. उलट खुप काम असतं कित्तेक लोकांना भेटावं लागतं.. देश्याचं प्रतिनिधीत्व करताना दडपण असतंच.. डिप्लोमसी जपावी लागते. उलट तुम्हा लोकांचच बरं असतं बंद काचेच्या चकाचक इमारतींमध्ये ए/सी लावुन आरामशीर तंगड्या टाकुन बसायचं, काही अडल तर गुगल असतंच…
केतन : अह्हा.. म्हणे गुगल असते.. करुन बघ एकदा काम म्हणजे कळेल..

अनु : असो.. हा विषय नको.. सो तु मुंबईचा तर बॅंगलोरला कश्याला?
केतन : अगं एक छोटे ट्रेनींग द्यायचे होते आमच्या बॅंगलोरमधील एका टिमला.. अनायसे मी भारतात येतच होतो तर ते काम माझ्याच गळ्यात टाकले.. सो उद्या संध्याकाळ पर्यंत बॅंगलोरला आणि संध्याकाळच्या फ्लाईटने मुंबई. तु?
अनु : मला मुंबईचे टिकीट्स नाही मिळाले.. मला आजच पोहोचणं महत्वाचे होते.. सो थोडा द्रवीडी प्राणायाम करायला लागतोय.. बट इट्स ओके.. घरी जाण्याची जी ओढ असते ना.. त्यामुळे थोडा त्रासदायक प्रवास असला तरीही काही वाटत नाही.
केतन : आस्क मी.. आठ वर्षांनी चाललो आहे घरी.. मला कोणी अजुन चार कनेक्टींग फ्लाईट्स पकडुन जायला सांगीतले ना तरी जाईन मी…मलाही टिकेट्स नव्हतीच मिळत.. शेवटी बिझीनेस क्लासचे घेतले..
अनु : अय्या.. मी पण बिझीनेस क्लासमध्येच आहे.. बघु नंबर..
केतन आणि अनु दोघंही बॅगेतुन टीकिट्स बाहेर काढुन एकमेकांचे नंबर बघतात..
अनु : शेजारीच आहेस तर.. 

केतन टेबलावर ठेवलेला अनुचा मोठ्ठा कॅमेरा उचलतो…

केतन : तुझा आहे?
अनु : नाही.. तो पलीकडे चिनी बसलाय ना.. त्याचा ढापलाय.. (थोड्यावेळ थांबत व मग हसुन,) ऑफकोर्स माझा आहे..
केतन : डी.एस.एल.आर. ना? वॉव निकॉन डी३ एस?? सॉल्लीड महाग आहे म्हणे.. कित्ती ४ लाख ना? आणि ही लेन्स.. ८०-८५ हजार…?
अनु : व्वा.. बरीच माहीती आहे की तुला…
केतन : हो.. माझ्या दोन-चार मित्रांना आहे शौक फोटोग्राफीचा… काय पैसा घालवतात वेड्यासारखा..
अनु : वेड्यासारखा काय.. छंदाला मोल नसते रे.. आणि तु फोटो क्वॉलीटी पाहीलीस का? हे बघ फ्लेमींगो चे फोटो मागच्याच आठवड्यात काढले होते.. बघ कसले शार्प आलेत..

अनु कॅमेरातले फोटो केतनला दाखवते..

केतन : कॅमेरामध्ये इतके पैसे घालवण्यापेक्षा मी त्याच पैश्यात घरी दोन-तिन फ्लेमींगो विकत घेउन ठेवेन.. जमलंच तर एखादा प्रशीक्षक पण ठेवेन त्या फ्लेमींगोंना ट्रेन करायला. मग माझ्या सवडीने माझ्या साध्या कॅमेरातुन पण असे घरबसल्या फोटो काढेन.. मान तिरकी केलेला फ्लेमींगो.. एक पाय उचललेला फ्लेमींगो.. कॅमेराकडे बघणारा फ्लेमींगो..

केतन उठुन उभा रहातो आणि स्वतःच फ्लेमींगो असल्याच्या अविर्भावात एक पाय वर करुन कधी इकडे बघ तर कधी चोचीने खाली किडे वेच असले उद्योग करतो आणि स्वतःशीच हसु लागतो.

अनु कॅमेरा बंद करुन परत ठेवुन देते..

अनु : व्हेरी फनी….

थोडावेळ शांतता…

केतन : यु नो व्हॉट… तु मगाशी म्हणालीस ना.. काही अंशी ते खरं आहे.. गुगल ने खुप मदत होते.. पण तुझं काम खरंच छान आहे. म्हणजे नविन लोकांना भेटायंच, त्यांच्या आयुष्याचा काही दिवसांकरीता का होइना भाग बनायचं.. नविन अनुभव, नविन ओळखी जोडायच्या.. नविन ठिकाणं पहायची.. हेच तर लाईफ आहे.. आणि तुला फोटोग्राफीची आवड आहे म्हणल्यावर तर काय, अश्या कित्तेक सुंदर आठवणी फोटोच्या रुपाने तुझ्याकडे संग्रही असतील.. नाही का?

अनु केतनकडे पाहुन हसते.

केतन : ह्या चायनीज काय.. किंवा जापनीज काय.. महाभयंकर भाषा आहेत बुवा.. नुसतीच चित्र चित्र. आणि त्याहुन ही माणसं सगळी एकसारखीच दिसतात.. एकदा माहीते काय गम्मत झाली? मी मॅक्डोनाल्ड मध्ये होतो तेथे एक असाच चिपचिप्या डोळ्यांचा, बुटका माणुस माझ्या पुढे होता. माझ्या मागच्या प्रोजेक्टचा क्लायंट जापनीज होता ना, त्यामुळे मला थोडंफार जॅपनीज येत म्हणलं दाखवावं आपलं शहाणपण म्हणुन मी त्याला म्हणलं.. “कोंन्बावा…” अर्थात “हॅलो.. ” तर त्याच्या चेहर्‍यावर काही भावच नाहीत…

अनु : मग?
केतन : मग काय, मी त्याला म्हणलो.. आर यु जॅपनीज.. तर हसला आणि म्हणाला.. आय अम सॉरी.. आय एम कोरीयन..

अनु खळखळुन हसते.. केतन तिच्याकडे पहात रहातो…

अनु : हो.. खरं आहे तुझं म्हणणं.. सगळेजण बरेचसे एकसारखेच दिसतात..

पुन्हा काही वेळ शांतता..

केतन : तुला एक कॉम्लिमेंट देऊ?
अनु : ओह.. शुअर.. गो अहेड..
केतन : तुझी स्माईल ना खुप गोड आहे.. किप स्मायलींग.. अलवेज…
अनु : थॅक्स.. नक्कीच.. मला हसायला खुप आवडते.. उगाच रुसुन, फुगुन बसायला, तोंड पाडुन फिरायला नाही जमतरे मला.. उद्याचा काय भरवसा? आजच आयुष्य मस्त जगायचं बघ..
केतन : ए तुला एक जोक सांगु? चिनी भाषेशीच संबंधीत आहे.. आवडेल तुला..
अनु : हो.. सांग ना.. पण चायनातील शाळेचे नाव काय असेल?.. उत्तर – “या शिका”.. किंवा ब्रुसलीची आवडती डिश कोणती – उत्तर : “इड-ली”.. असले काही पाचकळ पि.जे. असतील तर प्लिज नको सांगुस.. हजारदा ऐकलेत..

केतन रागाने अनुकडे बघतो आणि मग काही न बोलता गप्प बसतो.
थोडावेळ शांततेत जातो.

अनु : काय रे..? काय झालं..? चिडलास?
केतन : मी कश्याला चिडु.. मला नाही राग-बिग येत..
अनु : अस्सं.. मग हास ना रे एकदा.. ती बघ ती कोपर्‍यातली चिनी मुलगी तुला लाईन देते आहे..

केतन एकदा मागे बघतो आणि मग अनुकडे बघुन हसतो.

अनु : (हसणार्‍या केतनकडे बघुन हाताची बोटं बंदुकीसारखी करत).. स्टॅच्यु

केतन दोन क्षण स्तब्ध होऊन बसतो.. चेहर्‍यावरची स्माईल तशीच हसते..
अनु : स्टॅच्यु ओव्हर ऐन्ड यु अलसो..(थोड्यावेळ थांबुन) किप स्माईलींग..

केतन आणि अनु खुप वेळ एकमेकांकडे पहात रहातात.

अनु : बरं मला सांग किती दिवस आहेस मुंबईमध्ये…?
केतन : आहे.. एक महीना तरी आहे.. भेटूयात?

अनु : का रे..? तुला मुंबईवगैरे फिरायची आहे आणि म्हणुन तु मला रिक्वेस्ट वगैरे करणार आहेस की काय?
केतन : छे गं.. म्हणजे मान्य आहे.. कित्तेक वर्षात गेलो नाही मुंबईला.. पण शेवटी रक्तात मुंबईच आहे ना.
अनु : बरं.. भेटु आपण.. नक्कीच भेटु… आणि आता तु नाही म्हणालास ना.. तरीही मी भेटेन तुला…

इतक्यात अनॉन्समेंन्ट होते : ईंडीयन एअरलाईन्स प्लाईट नंबर आय.ए. थ्री. सेवन नाइन इज नाऊ रेडी टु डिपार्ट इन थर्टी मिनीट्स, ऑल द पॅसेन्जर्स आर रिक्वेस्टेड टु प्रोसीड टु गेट नंबर सेव्हन.. प्लिज..

आय रिपीट… ईंडीयन एअरलाईन्स प्लाईट नंबर आय.ए. थ्री. सेवन नाइन इज नाऊ रेडी टु डिपार्ट इन थर्टी मिनीट्स, ऑल द पॅसेन्जर्स आर रिक्वेस्टेड टु प्रोसीड टु गेट नंबर सेव्हन.. प्लिज..

अनु : निघुयात? चेक-इनला मोठ्ठा क्यु असणारे…
केतन : (खुर्चीतुन उठत) येस्स शुअर.. चलो मुंबई…..

अनु : ओह.. बाय द वे.. मी अनु.. (शेक हॅन्ड साठी हात पुढे करते)
केतन : (शेक हॅन्ड करत) मी केतन…

दोघेही उठतात, आपल्या बॅगा घेतात आणि स्टेजच्या बाहेर जातात.

 

[क्रमशः]

तुझ्या विना (भाग-१)


मंडळी, फार पुर्वी `लव्ह के लिए…’ नामक एक मराठी प्रेमकथा ब्लॉग वर लिहीली होती, नंतर त्याचे नाट्य-रुपांतर सुध्दा केले. ती कथा ब्लॉगच्या बॅक-अपमध्ये कुठेतरी हरवुन गेली, पण ते नाट्य-रुपांतर जे ब्लॉगवर प्रसिध्द झाले नव्हते ते माझ्याकडे आहे.

एक वेगळा प्रयत्न, एक छान कथा आहे, तुम्हाला वाचायला आवडेल म्हणून प्रकाशित करत आहे.

प्रसंग १: केतनचे घर..

पडदा उघडतो. स्टेजवर एक ४५ च्या आसपासची स्त्री स्वयंपाक घरातुन हॉल मध्ये येते, घड्याळाकडे बघते. चेहर्‍यावर निराशेचे भाव. तिच्यापाठोपाठ स्टेजवर एक २५-३० च्या आसपासची तरुणी येते.

आई : छे बाई.. कित्ती हा उशीर? वेळ जाता जात नाहीये. कधी यायचा हा?
तरुणी : येईल अगं इतक्यात. आणि आपला सख्या गेलाय नं त्याला आणायला? मग कश्याला काळजी करतेस?
आई : काळजी नाही गं तायडे.. पण एक एक क्षण एक एक युगासारखा वाटतो आहे. आता नाही बाई अजुन वाट बघवत.
तरुणी : आठ वर्ष वाट पाहीलीस ना? मग अजुन थोडाच वेळ.. येतच असतील. फोन लावुन बघायचा का?

आई : बघु अजुन ५ मिनीट वाट नाही तर लावु फोन. पण तायडे, तुला परत सांगते.. आता येईल ना तो.. तर जरा लग्नाचा विषय काढ त्याचा. काय चाललं आहे त्याच्या मनात काहीही थांग लागु देत नाही. तुच बोल बाई त्याच्याशी.. मी विषय काढला तर तो उडवुन लावतो.. तुझं ऐकेल तो…
तायडी : हो आई.. कित्ती वेळा तें-तेच सांगणार आहेस? आणि शेवटी तुला माहीते त्याला इथली बायको नकोय.. त्याला अमेरीकेचीच मुलगी हवीय बायको म्हणुन.. ओरडलं की म्हणतो कसा, तुच लहानपणी गाणं म्हणायचीस ना.. “गोरी गोरी पान, फुलासारखी छान, दादा मला एक वहीनी आण..” मग अशी वहीनी इथं कुठं मिळणार.. तिकडुनच आणावी लागेल…
असो.. आता येतो आहे ना.. चांगला घेऊ त्याला कोपच्यात.. सगळं व्यवस्थीत होईल..
आई : कोपच्यात?
तायडी : कोपच्यात.. कोपर्‍यात हात करत..
आई : श्शी तायडे कसली तुझी ही भाषा? अगं मुलीच्या जातीला शोभतं का असलं? ती अनु बघ…
तायडी : बास्स.. बास्स.. बास्स.. परत आता तु अनुचं पुराण नको चालु करुस.. अनु अशी आहे.. अनु तश्शी आहे…. आत्ता एवढं कौतुक चाललं आहे.. बघु सुन म्हणुन आल्यावर किती दिवस हे प्रेम टिकतेय ते..

आई अस्वस्थपणे येरझार्‍या घालत असतात इतक्यात दारावरची बेल वाजते.

आई : “अगं बाई.. आले वाटतं अमेरीकाकर.

आई दार उघडायला जातात.

थोड्यावेळाने दारातुन एक पंचवीशीचा तरुण, केतन, सामानांच्या बॅगा घेउन आतमध्ये येतो. पाठोपाठ घरगडी भासणारा सखाराम बाकीच्या बॅगा घेउन आत येतो.

बेलचा आवाज ऐकुन काही वेळात दारात केतनला भेटायला उत्सुक असणार्‍या सगळ्यांचा गोतावळा जमा होतो.

आई : ”आलं गं माझं सोनं ते.. केतु.. कसा झाला प्रवास?

आई आणि तायडी दोघीही एकदमच –

आई : “आणि काय रे.. कित्ती वाळला आहेस? खात नव्हतास का अमेरीकेत?”
तायडी : “काय रे दादुटल्या.. अमेरीका मानवलेली दिसतेय.. चांगलाच सुटला आहेस की..”

दोघीही एकमेकींकडे बघतात.. तायडी स्वतःच वाक्य बदलत हळु वेगाने

तायडी : “काय रे दादुटल्या.. अमेरीका मानवली नाही वाट्टत.. कित्ती वाळला आहेस…!!!”

एव्हाना बाकीची मंडळी सुध्दा बाहेर येतात.

केतन : (बॅगा खाली ठेवुन आईच्या पाया पडतो) “काय गं आई? वाळला काय? उलट चिझ, बटर खाऊन खाऊन जाडच झालोय.. आणी काय गं वेब-कॅमवर काय वेगळा दिसायचो का?”

तायडी : “अरे वेड्या आईची वेडी माया अशीच असते. तु अगदी गलेलठ्ठ… गुबगुबीत होऊन आला असतास ना, तरीही ती तस्सेच म्हणली असती बघ.”
आई : का रे बाबा एव्हढा वेळ लागला..?
केतन : अगं हा सख्या.. मला सापडलाच नाही.. कित्ती वेळ थांबलो होतो मी.. शेवटी निघालो होतो टॅक्सी करुन तेव्हड्यात हा समोर दिसला.. म्हणलं विचारावं हाच सखाराम का? तर हो म्हणला.. आणि समोरच उभा होता बरं का माझ्या..
आई : काय रे सख्या? तु ओळखलं नाहीस ह्याला?
सखाराम : अवं आई.. मला वाटला ह्ये अमेरीकेवरुन येणार म्हंजी एखादा बर्म्युडा घातलेला ढगळं रंगीत कापडं घातल्येला कोन तरी असेल.. त्यामुळं ह्यांच्याकडं म्या आधी बघीतलाच नाय ना…

आई डोक्यावर हात मारुन घ्येतात..

आई : (केतनकडे वळुन) “बसं रे बाबा.. दमला असशीला ना प्रवास करुन?”
केतन: (आईला हाताला धरुन खाली बसवत) “नाही गं आई..दमायला काय होतंय? दोन-चार तासाचा तर प्रवास.. अगं मी बॅंगलोर वरुन आलो आहे आत्ता!! अमेरीकेवरुन कालच तर आलो होतो ना मी बॅगलोरला.

अगं आज तिथल्या आमच्या शाखेत एक KT सेशन होते.. मी येतंच होतो इकडे तर माझ्याच गळ्यात टाकलं ते कामं. आज दुपारी ते संपल, मग एक डुलकी काढुन इकडे आलो..”

एव्हाना सखाराम त्याच्या हातातल्या आणि केतनकडच्या बॅगा कोपर्‍यात ठेवुन येतो. केतनच्या डोक्यावरील टोपीकडे बघत –

सखाराम : (अग्निपथमधील अमिताभच्या आवाजातला डायलॉग) हवा बहोत तेज चलताय दिनकरराव, टोपी संभालो.. उड जायेगी…

केतन संभ्रमावस्थेत सखारामकडे बघत रहातो..

सखाराम : अवं म्हजी, टुपी काढुन ठेवा नव्ह..

केतन खांदे उडवतो आणि टोपी काढुन खुर्चीवर ठेवतो.

तायडी : “ए दाद्या, आता आला आहेस ना चार-दोन आठवड्यांसाठी? का जायचे आहे लगेच?”
केतन (खुर्चीवर आरामात बसत) : “नाही.. आहे आता.. पुढच्या आठवड्यात सुशांत दादाचे लग्न उरकले, धावपळ संपली की मग १-२ आठवडे मस्त आराम करणार, (आईचा हात हातात घेत) आईच्या हातचा स्वयंपाक हादडणार आहे..”..

आई केतनच्या चेहर्‍यावरुन हात फिरवुन डोक्यावर बोटं मोडत कौतुकाने त्याच्याकडे बघत..

आई : हो रे बाबा!!.. तु नाही.. निदान तुझ्या भावाने तरी नंबर लावला लग्नाचा.. तुझा रस्ता मोकळा झाला बघ.. आता तरी घे जरा मनावर….
केतन : ए काय ग आई…. झालं का तुझं चालु परत..??.
आई : (मिश्कील हसत) बरं.. केतु.. तु फ्रेश हो.. तुझ्या आवडीचा सगळ्ळा स्वयंपाक तय्यार आहे. मस्त गरमा गरम जेऊन घे आणि मग बसु गप्पा मारत काय…
केतन : हो आई.. पण आधी सुशांत दादाला भेटतो.. कुठे आहे कुठे तो? घरी आहे? का गेला आपल्या होणार्‍या बायकोबरोबर फिरायला…

एवढ्यात जिन्यावरुन सुशांत आणि केतनचे भाउ-बंधु धावत-पळत केतनला भेटायला येतात. सगळेजण केतनभोवती कोंडाळ करुन त्याची चौकशी करु लागतात.

सुशांत : अहो महत्वाचे पाहुणे येणार आणि आम्ही घरी नसणार असे कधी होईल का?

दोघं जणं एकमेकांना कडकडुन मिठी मारतात.

केतन (सुशांतच्या पाठीवर थाप मारत) : “काय नवरदेव? झाली का तय्यारी लग्नाची..?? आणि लग्नाची म्हणण्यापेक्षा आधी मनाची?”
सुशांत : “हो.. म्हणजे आता झालीच म्हणायची.. अरे वेळच नाही मिळाला ना तयारीला. लग्न ठरवतोय म्हणतोय आणि तोच आम्हालाही अमेरीकन गोऱ्याचे आग्रहाचे आमंत्रण आले आहे एक वर्षासाठी त्यामुळे मग गडबडीतच लग्न ठरवावे लागले..”
आतुन दोन चार लोकं शहनाईचा आवाज काढत (टॅटॅ टा ट टॅ ट टा.. ट टा ट टॅ ट..) म्हणत सुशांत आणि केतन भोवती दोन-चार चकरा मारतात आणि परत आत पळुन जातात.
केतन : कुठे वेस्ट कोस्टला जाणार म्हणलास ना?
सुशांत : हो.. सध्यातरी तोच प्लॅन आहे…
आई : केतन तु आलास.. घर बघ कसं भरल्या भरल्या सारखं वाटतंय.. आत्ता तुझे बाबा असते तर…

आई पदर डोळ्याला लावतात…

सखाराम : असु ध्या हो आई देवाने आपल्याला काय बी कमी पडू दिले नाही.. आज केतनदादा घरी आलेत. आऩ आपले छोटे मालकच नव्हं ते..

वातावरण थोडं भावनीक होतं..

केतन (सुशांतकडे बघुन डोळे मिचकावत): बरं ते जाऊ देत, यार फोटो तर दाखवं ना वहिनीचा, आणि मला कळत नाही, तुला फोटो ई-मेल करायला काय प्रॉब्लेम होता?

सुशांत : ‘अरे फोटोच काय घेऊन बसला आहेस, प्रत्यक्षात तिचीच ओळख करुन देतो ना.. इथेच आहे बघ ती.. मेंदी लावण्याचा कार्यक्रम चालु आहे वरती.. (असे म्हणुन सुशांत हाक मारतो)..’अनु.. एss अनु.. खाली ये जरा’

केतन : (चाचपुन) ‘अनु??’
सुशांत: ‘अरे म्हणजे.. अनुराधा रे.. तिच आहे… तिच आहे… जिचे पत्रिकेवर नाव होते.. घाबरु नको.. बदलली नाहीये..”
(पुन्हा जिन्याकडे बघत)” ..ए. अनु खाली ये ना..”

(मग केतनकडे वळुन) ”बरं..!! आमचं झालं !! .. तुमचं काय? कधी करताय लग्न??? मिळाली का नाही तुमच्या मनासारखी ब्लॉंड तुम्हाला?
सखाराम : आ तुझ्या मायला..
सुशांत : काय झालं रे सख्या…
सखाराम : न्हाय जी.. काय नाय..
सुशांत : काय नाय काय काय नाय?.. बोल काय झालं..
सखाराम : काय नाय ओ दादा… असंच.. काय केतनदादा अमेरीकेला जाऊन आला न्हव्हं.. असेल बा तिथें असलं फ्याड.. टकुली बायांशी लगीन करण्याचं..

सुशांत : टकुली बाय? अरे काय बोलतोय सख्या..
सखाराम : “आता तुम्हीच म्हणलात न्हवं का बाल्ड बाय.??… सुशांतदादा अवं थोडं फार मला पण येत्य की वंग्लीश.. बाल्ड मंजी टकुली न्हवं?”
सुशांत : ‘अरे बाल्ड नाही, ब्लॉंन्ड.. ब्लॉंन्ड!!! ब्लॉंन्ड म्हणजे किनई, अशी सोनेरी केसांची, निळ्या डोळ्यांची, गोरी-गोरी पान परीच हवी आहे आपल्या केतनला.. साहेबांना भारतीय नारी नको आहे ना बायको म्हणुन..!! त्यांना अमेरीकन ब्लॉंड्शीच लग्न करायचे आहे.. काय करणार?? इतकी चांगली स्थळ सांगुन आली होती.. पण साहेब बधतील तर काय?’

सखाराम :.. असं असं.. अवं काय त्या ब्लांड बायंच घ्येउन बसल्यात अवं आपल्या हिथ बाया काय कमी हायेत व्हयं.. अवं तुमी फक्त हो म्हणा.. अशी रांग लावु आपन हिथ..
केतन : रांग?
सखाराम : व्हय जी.. रांग…
केतन : इथं..
सखाराम : हा मंग.. हिथंच की…
केतन : आणि कोण लावनार रांग?
सखाराम : कोन म्हंजी.. म्याच की.. लयी म्हंजी लयी व्हलकी हाईत हिथं…
सुशांत : अरं मग चांगलं आहे ना.. आहे का कोणी तुझ्या पहाण्यात?
सखाराम : येक? अहो छप्पन्न हाईत.. म्हंजी बघा.. संगी.. मंगी.. पुष्पा.. ती पुष्पा तर लई हुशार हाय हा.. अवं हाठवी पास हाय.. पन तुक्या.. तिचा बाप.. साला दारु मंदी पैशी घालत्यो अन तिच्या शालेला नाय म्हणला पैका.. म्हणुन नाय तर धावी तर नक्कीच झाली असती…

सुशांत आणि केतन एकमेकांकडे बघतात..

सखाराम : तुम्ही हादी बोल्ला हस्तानं तर येक चांगला कट्टा व्हता म्हायतीत..
सुशांत आणि केतन : (एकदम) कट्टा…
सखाराम : अवं म्हंजी.. बदाम.. बदाम..
सुशांत आणि केतन : (पुन्हा एकदमच) बदाम?
सखाराम : अवं कसलं तुमी शिकलेलं येव्हढं येक अमेरीकेला जाऊन आलं,. दुसरं जानार.. आन ह्ये शब्द तुमास्नी म्हाईत न्हायं? अवं बदाम म्हंजी येक चांगली पोरगी व्हं.. कमळा नाव त्यीचं..
केतन : अस्स्.. अस्सं.. मग काय झालं तिचं…
सखाराम : ठरलं न्हवं लगीन तिचं…

केतन आणि सुशांत स्वतःच हासु दाबत, हातावर हात आपटत.. डॅम इट.. चांगली संधी गेली सख्या…न्हायतर कमळाशी जमलंच असतं बघ..

सखाराम : व्हय जी..पन तुम्ही म्हणत असाल तर पुष्पी ला घेऊन येऊ हिकडं..?
केतन : नको.. नको.. इतक्यात नको.. आधी सुशांतदाच्या लग्नाची गडबड संपु देत, मग बघु… जा तु.. बॅगा न्हेऊन ठेव आतमध्ये…
सखाराम : व्हयं जी.. ठ्येवत्यो.. (असं म्हणुन तिथेच घुटमळत उभा रहातो)

केतन आणि सुशांत बोलण्यासाठी एकमेकांकडे वळतात, पण सखाराम तेथेच थांबल्याचे लक्षात येताच पुन्हा मागे वळतात..

सुशांत : आता काय?
सखाराम : सुशांतदादा.. आता केतन दादा भी आले हाईत.. मंग..
सुशांत : हो.. मग?
सखाराम : म्हंजी.. आता ती लगीनाआधी कसलीशी पार्टी असतीय नव्हं का.. बैंच पार्टी..
केतन ; यु मीन.. बॅचलर पार्टी…
सखाराम : व्हयं.. व्हयं.. त्येच.. ती करणार असाल न्हव्हं.. तर म्या काय म्हंतो..
सुशांत : बोला.. काय म्हणताय..
सखाराम : म्हंजी.. हिथं बाई मानुसं असनारच. त्या पेक्षा आपनं सगलं पोरं हिथं गेलो तर? (असं म्हणुन खिश्यातुन एक चुरगळलेला पेपर काढतो आणि त्यातील एका जाहीरातीकडे बोट दाखवत सुशांतकडे देतो.)

सुशांत : तो पेपर सरळ करुन त्यातील जाहीरात अडखळत वाचु लागतो. “मदभर्‍या नजरबंदीने लावणी रसिकांना जायबंदी करुन टाकणारी, लावणी नृत्याची जास्वंदी.. लावणी नृत्याचा सदाबहार कार्यक्रम.. (परत पेपर सखारामकडे देतो…) बघु आपण नंतर हा.. ठरवु नंतर जा तु बॅगा घेउन..
सखाराम : अवं सुशांत दा असं काय करताय.. म्हाराष्ट्राचं लोकनृत्य हाय न्हवं त्ये.. अवं केतनदादा पण खुश होतील न्हवं..
सुशांत : (शक्य तेव्हढा कंट्रोल ठेवत, समजावणीच्या सुरात), बरोबर आहे तुझं.. आज नको.. आजच केतन आलाय ना, दमला असेल तो.. वेळ आहे लग्नाला आजुन.. ठरवु आपण.. जा तु आता बॅगा घेउन आत…

सखाराम दोन क्षण तेथेच घुटमळतो आणि शेवटी निराश होऊन बॅगा उचलायला जातो.

सखाराम (सगळ्या बॅगा एकदम उचलत) : जिसमै है दम तो फक्त बाजीराव सिंघम..

सखाराम बॅगा घेउन आत जातो… स्टेजवर फक्त केतन आणि सुशांतच उरतात.

केतन : आता माझी सटकली रे……..

केतन आणि सुशांत हसत हसत एकमेकांना टाळ्या देतात.

सुशांत : बरं ते जाऊ देत.. चेष्टा पुरे.. पण खरं सांग ना.. कुणी भेटली की नाही तुझ्या मनासारखी..
केतन (वैतागुन) : ‘काय रे..? कश्याला माझ्या लग्नाचा विषय काढताय? माझं ठरलं की मी सांगीनच ना तुम्हाला. आणि खरं सांगु का? ते ब्लॉंड, अमेरीकन वगैरे जाऊ देत, विसरुन जा ते सगळं’..
सुशांत (भुवया उडवत आणि कोपरखळ्या मारत) : “का रे बाबा? प्रेम-भंग वगैरे केला का कुठल्या अमेरीकन मुलीने तुझा? का कुठली भारतीय आवडली? का अचानक असा अध्यात्मीक साक्षात्कार होतात तसंलं काही झालं?”
केतन : (लाजत आणि इकडे-तिकडे बघत हळु आवाजात) : “.. म्हणजे.. अगदीच तसे काही नाही.. पण एक भारतीय आवडली खरी…”
सुशांत: (आश्चर्याने) “काय?? अरे काय बोलतोयेस काय? अरे कधी? कुठे? केंव्हा? आणि हे तु आत्ता सांगतो आहेस..??

(जोरात ओरडत) अरे ऐका ऐका..ss चमत्कार चमत्कार….’

केतन पटकन सुशांतच्या तोंडावर हात ठेवुन त्याचा आवाज बंद करतो.

केतन : “अरे गप्प ना..अजुन कश्यात काही नाही.. कश्याला गाव-जेवण घालतो आहेस? मला फक्त तिचं नाव आणि ती आपल्याच गावची- मुंबईची आहे.. एवढेच माहीती आहे..”,
सुशांत : (केतनच्या तावडीतुन सोडवुन घेत) “बरं.. कशी आहे ती.. ते तर सांग..” (खुर्चीवर बसत)

केतन : काय सांगु तुला कशी आहे ती??? ती बघ ती तिथे उभी आहे..

सुशांत केतनने दाखवलेल्या दिशेकडे पहात रहातो.. पण तेथे कोणीच दिसत नाही.

( केतनचा भास ….)

केतन : (वैतागुन) अरे असे काय करतो आहेस.. ते बघ ना तिकडे.. (परत आपल्या तंद्रीत जात) ते बघ तिकडे दुरवर.. ते हिरवे गार गवत कसं झुलतं आहे. इतके दिवस उन्हानं रापलेल पिवळधम्मक गवत पावसाच्या आगमनाने हिरव्याकंच शालुत लपेटलं गेलं आहे. ति फुलं दिसत आहेत तुला? पिवळ्या, गुलाबी रंगाची फुलं त्या गवताआडुन डोकावुन डोकावुन आपलं अस्तीत्व सिध्द करत आहे, वार्‍याच्या झोक्याबरोबर झाडांच्या फांद्या बेधुंद होऊन झुलत आहेत..

वातावरणात बदल होतो. वार्‍याचा झोत रंगमंचावरील वस्तु हलवु लागतात. प्रखर दिवे मंद होतात.

पांढरा सफेद चुडीदार घातलेली अनु स्वतःभोवती गिरक्या घेत रंगमंचावर अवतरते.
सुशांत अजुनही तिला शोधण्याचा प्रयत्न करतो आहे.. पण ती फक्त केतनलाच दिसते आहे.

केतन : त्या डोंगराच्या काठावर बघ दोन्ही हात पसरवुन ती डोळे मिटुन आकाशाकडे पाहात दुरवर उभी आहे..

पावसाला सुरुवात होते. पावसाचा, मेघगर्जनेचा आवाज येऊ लागतो.

केतन : (उठुन उभा रहातो) . ते पहातो आहेस? तिच्या चेहर्‍यावर जमा झालेले पावसाचे रुपेरी, टपोरे थेंब? मला इतका हेवा वाटतो आहे ना अरे त्या पावसाचा!.. तिच्या अंगाला बघ ना कसा घट्ट बिलगुन बसला आहे तो!

तिच्या चेहर्‍यावरील साठलेले पावसाचे थेंब सुध्दा तिच्या गालावरुन उतरायला तयार नाहीयेत., स्वतःच्या आगमनाने इतरांना अडकवुन ठेवणारा तो मेघराज, इथे मात्र तिच्या काळ्याभोर केसांमध्ये कसा अडकुन बसला आहे.

मोठमोठ्या झाडांना हेलावुन सोडणारा तो सोसाट्याचा वारा इथे मात्र तिच्या केसांमध्ये मंद मंद रुंजी घालत आहे.. पाहतो आहेस ना तु?

सुशांत डोकं खाजवत इकडे तिकडे पहात रहातो.
केतन : तिच्या पापण्यांची होणारी नाजुक हालचाल मनाला कावरं-बावरं करत करत आहे रे. तिच्या श्वाच्छोश्वासांचा आवाज ढगांच्या गडगडाटातही स्पष्ट ऐकु येतो आहे मला.

वार्‍याचा एक जोराचा झोका येतो. अनुचे केस विस्कटुन तिच्या चेहर्‍यावर येउन विसावतात. अनु ते केस बाजुला घेण्याचा कोणताही प्रयत्न करत नाही.

केतन : वाटतं, वाटतं.. तिच्या जवळ जावं, तिच्या चेहर्‍यावरुन ओघळणारे पाण्याचे थेंब ओंजळीत भरुन घ्यावेत..पावसाच्या शिडकाव्याने हवेत पसरलेल्या भिजलेल्या मातीच्या सुखंदापेक्षाही जास्त सुखद, जास्त मादक, मनावर आनंदाचे तरंग निर्माण करणारा तिच्या केसांमधला तो तजेलदार सुगंध श्वासामध्ये भरुन घ्यावा. तिच्या शरीराची उब, थंडगार पडलेल्या माझ्या शरीरावर ओढुन घ्यावी.

जणुकाही तिला आपल्या मिठीत घेतले आहे अश्या अविर्भावात केतन हाताची घट्ट मिठी मारुन डोळे मिटुन उभा रहातो.
पावसाचा वेग वाढलेला असतो. मेघगर्जना, वार्‍याचा, पावसाच्या थेंबांचा आवाज वाढत जातो.

केतन डोळे उघडतो तेंव्हा अनु त्याच्या समोर उभी असते. केतन दचकतो. बोलण्यासाठी तोंड उघडतो पण तोंडातुन शब्दच बाहेर पडत नाहीत.

अनु खुदकन हसते, त्याचा हात हातात धरते आणि त्याला घेउन रंगमंच्याच्या दुसर्‍या बाजुला जाउ लागते. केतन हिप्नॉटाईझ झाल्यासारखा तिच्या मागोमाग चालत जातो.

केतन : अरे.. मी वेडा झालोय, बेभान झालोय.. हे बघ.. हे बघ.. जमीनीवरील हिरवीगार गवताची पाती पावसाच्या आगमनाने जितके प्रफुल्लीत झाली नसतील तितकी तिच्या ओढणीच्या स्पर्शाने ती पाती कशी मोहरुन जात आहेत.. गुलाबी फुलं तिच्या गालावर पसरलेल्या लालीशी बरोबरी करण्याचा वेडा प्रयत्न करत आहेत. जमीनीवर साठलेल्या तांबुस-चॉकलेटी पाण्याला झालेला तिच्या पावलांचा स्पर्श त्याला बेभान करुन टाकत आहेत.

मी कुठे वहावत चाललो आहे? माझं मलाच ठाऊक नाही. पण मला सांग ना.. डोंगरावरुन सुरु झालेल्या पावसाच्या धारेला तरी कुठं माहीत असतं ते कुठे जाणार आहे ते.. ते नुसत वहावत जातं.. वसुंधरेच्या गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने.. बेफाम होत, हिंदकळत, ठेचाळत… माझंही तस्संच झालं आहे मित्रा…

ते बघ ते समोर धुक्यात हरवलेलं माझं गाव आहे… पावसांच्या सरीत भिजलेले रस्ते,, नखशिखांत नटलेले डोंगर…

अनु केतनला घेउन एखाद्या बसक्या आसनावर बसते. केतन त्याची मान अनुच्या खांद्यावर टेकवतो.

ह्रुदयाचा धडधडण्याचा आवाज ऐकु येतो. पहील्यांदा वेगाने आणि मग हळु हळु कमी कमी होत नेहमीच्या वेगाने धडधडण्याच्या…

केतन डोळे उघडुन अनुकडे बघतो. दोघेही एकमेकांकडे पाहत रहातात. केतन आपल्या हात अनुच्या गालावरुन फिरवतो. अनु आवेगाने त्याला घट्ट मिठी मारते.

काही क्षण तसेच शांततेत जातात.

अनु सावकाशपणे त्याच्या मिठीतुन बाजुला होते आणि रंगमंचावरुन निघुन जाते.

बर्‍याचवेळ शांतता.. रंगमंचावरील दिवे पुर्ववत होतात.

सुशांत : .तुमचं दिवा स्वप्न संपलं असेल तर.. जरा निट कळेल अश्या शब्दात सांगणार का?

केतन आपल्या स्वप्नातुन बाहेर येतो. थोडा सावरायला वेळ गेल्यावर. एक दीर्घ श्वास घेतो.

केतन : सांगतो.. सगळं सांगतो.. पण कुठे पचकु नकोस.. (थोड्यावेळ शांतता आणि मग..) इथं येईपर्यंत माझा निर्णय अगदी ठाम होता. मला माहीते इथं तुझ लग्न.. सगळा मस्त माहोल बनलेला, त्यात इतक्या वर्षांनी आईला प्रत्यक्ष भेटणार म्हणजे माझ्या लग्नाचा विचार निघणारच. आणि म्हणुनच मी स्वतःशीच माझं म्हणणं मांडायला लागणारे मुद्दे पक्के करुन आलो होतो. लग्न करीन तर एखाद्या अमेरीकन मुलीशीच..
तुला सांगतो दा.. इतक्या हॉट असतात ना तिथल्या मुली.. आणि वागायला एकदम बिंधास्त.. कुणाच्या बा ची भिती नाही. उगाचच फालतु गोष्टींवरुन लाजणं बुजणं नाही. मला एक आवडली पण होती..खुप गोड होती आणि तितकीच हॉट.. मी तिचा फोटो सुध्दा आणलाय दाखवायला..
पण काल ती भेटली आणि…

सुशांत : ती???
केतन : हम्म.. अरे कालच ओळख झाली माझी तिच्याशी.. काल मी अमेरीकेवरुन परतत होतो.. सॅन-फ्रांन्सीस्को ते शांघाय आणि शांघायवरुन बॅंगलोरला माझी कनेक्टींग फ्लाईट होती.. तर मी शांघाय एअरपोर्टवर आलो.. नेमकी माझी फ्लाईट दोन तास डिले होती तर काय झालं…

(केतनचे बोलणे वरुन जिन्यावरुन येणार्‍या कुणाच्या तरी आवाजाने खुंटते…)

आवाज : “काय रे सुशांत कश्याला मगाच-पासुन हाका मारतो आहेस..?”
सुशांत : (केतनला थांबवत) अगं वरुन काय बोलते आहेस.. खाली ये ना.. हे बघं कोण आलय…
आवाज : आले आले….

सुशांत आणि केतन मागे वळुन बघतात. केतनची नजर जागच्या जागी खिळली जाते.. त्याच्या समोर एक सुंदर तरुणी उभी असते. दोघांची नजरानजर होते. काही क्षण दोघंही स्तब्ध होतात. कुणाला काय बोलावे, काय करावे काहीच सुचत नाही.. काही क्षण शांततेत जातात.
थोड्यावेळाने केतन काही बोलणार एवढ्यात ….

सुशांत : “ये अनु.. अगं तुझी ओळखं करुन द्यायची होती.. हा… केतन.. अमेरीकेवरुन आजच आलाय.. आणि केतन, ही अनु.. (स्वतःच्या डोक्यावर हात मारत) आय मीन अनुराधा.. तुझी वहिनी. आणि.. (लाजत, मान खाली घालत आणि इकडे तिकडे डुलत) माझी होणारी बायको…“

अनु आपले मेंदी लावलेले हात अधांतरी हवेत धरुन केतनकडे पहात असते.

केतनची स्तब्ध नजर अनुने नुकत्याच हाताला लावलेल्या ओल्या मेहंदीवर खिळुन रहाते.. शुन्यात नजर असल्यासारखी……..

मागुन फ्लाईट टेक-ऑफचा आवाज येतो. पाठोपाठ अनाऊन्समेंट्स –
“वेलकम टु शांघाय एअरपोर्ट…पॅसैंजर्स आर रिक्वेस्टेड टु स्ट्रिक्टली फॉलो आवर चेंज्ड सेक्युरीटी पॉलीसीज. इफ़ यु निड अनी असीस्टंन्स, प्लिज टॉक टु आवर हेल्प-डेस्क.. थॅंक्यु..

वेलकम टु शांघाय एअरपोर्ट……. पुन्हा फ्लाईट्सचा आवाज……

दिव्यांचा प्रकाश मंद होत जातो स्टेजवर अंधार होत असतानाच विमानांचा टेक ऑफचा आणि पाठोपाठ अनांउन्समेंट्सचा आवाज येत रहातो.

 

[क्रमशः]