Tag Archives: स्टार माझा

ब्लॉग माझा – ३


स्टार-माझा चे अ‍ॅन्कर आणि ’ब्लॉग-माझा’ स्पर्धेचे आयोजक/सह-निर्माते श्री प्रसन्न जोशी ह्याच्याकडुन स्पर्धेच्या तिसर्‍या वर्षाबद्दल माहीती देणारी ई-मेल मिळाली. इतरांना त्याचा लाभ व्हावा म्हणुन ती मेल इथे जोडत आहे.

सर्वांनी जरुर सहभाग घ्यावा. सर्व स्पर्धकांना माझ्या मनःपुर्वक शुभेच्छा. May the best blog win!

~ अनिकेत समुद्र
स्टार-माझा, ब्लॉग माझा – २ (२००९-२०१०) विजेता 🙂


नमस्कार मंडळी! ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेच्या आयोजनाचं हे तिसरं वर्ष. पहिली ‘ब्लॉग माझा’ स्पर्धा घेतल्यानंतरच्या काळात मराठी ब्लॉगॉस्फिअरमध्ये खूप गोष्टी घडल्यायत. मराठी ब्लॉगर्सच्या पुण्या-मुंबईत गाठी-भेटी झाल्या, पुण्यातल्या साहित्य संमेलनापूर्वी आयोजित ‘संमेलनपूर्व संमेलन’ या कार्यक्रमात मराठी ब्लॉग, ब्लॉगर्सबाबत गंभीर चर्चा झाली, मराठी ब्लॉगर्स मंडळी इंटरनेटवर एकत्र आली, वृत्तपत्रांनी, नियतकालिकांनी मराठी ब्लॉगॉस्फिअरची ठळक दखल घेतली. एकूणच मराठी ब्लॉगॉस्फिअर देशातल्या प्रादेशिक ब्लॉगॉस्फिअरमध्ये दखल घेण्यायोग्य ठरलंय. हीच मराठी ब्लॉगरशिप सेलिब्रेट करतोय ‘स्टार माझा’; ‘ब्लॉग माझा’ सिझन-३च्या रूपानं.
विशेष म्हणजे यावेळी आपले परिक्षकही खास आहेत. ज्यात आहेत लीना मेहेंदळे ज्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तर आहेतच, पण संवेदनशील लेखिका आणि मराठी ब्लॉगरही आहेत. मराठीतल्या ‘साधना’ या प्रतिष्ठित साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ आपले संपादकीय कौशल्य पणाला लावून तुमचे ब्लॉग तपासतील. तसंच, आयटी तज्ज्ञ माधव शिरवळकर हेही परिक्षक मंडळात आहेत.
तेव्हा, मंडळी तुमच्यात दडलेल्या लेखक / लेखिकेला केवळ डायरी, फेसबुक, ऑर्कुट किंवा ट्विटर पुरताच ठेवू नका. या स्पर्धेत भाग घ्या. ब्लॉगवर ताजं लिहिलं असेल तर ठिकच नाही तर ब्लॉग अपडेट करा. ब्लॉग नसेल तर या स्पर्धेच्या निमित्तानं सुरू करा.
काय म्हणालात? बक्षिसाचं काय? अहो, बक्षीसे आहेतच की! पहिल्या तीन जणांना आणि उर्वरीत दहा जणांना उत्तेजनार्थ. आता काय बक्षीसं आहेत ते गुपित राहू द्या की! शिवाय, तुमच्या निवडलेल्या ब्लॉगला ‘स्टार माझा’च्या वेबसाईटवर प्रसिद्धी आणि बक्षीस वितरण समारंभ थेट ‘स्टार माझा’वर!
मराठी माझी, ब्लॉग माझा, स्टार माझा……………..शुभेच्छा!

स्पर्धेचे स्वरूप-

१. ब्लॉग मराठीतच लिहिलेला हवा (देवनागरी)

२. अठरा वर्षांपुढील कुणीही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतं.

३. सर्वोत्तम ब्लॉग निवडण्याचे अधिकार पूर्णत: परिक्षक आणि स्पर्धा संयोजकांकडे असतील. त्याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण देण्यास परिक्षक, संयोजक, स्टार माझा बांधिल नसतील. तुमच्या एन्ट्रीज या तुम्हाला अटी मान्य असल्याच्या निदर्शक असतील.

४. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी blogmajha3@gmail.com या ई-मेल अँड्रेसवर ई-मेल करावा. ज्यात, तुमचे नाव, पत्ता, व्यवसाय, दूरध्वनी क्र, मोबाईल क्र, व ई-मेल द्यावा. ई-मेल अँड्रेस देणं अनिवार्य आहे. याशिवाय, तुमच्या ब्लॉगची लिंक द्यावी.

५. या स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही.

६. एकावेळी एका स्पर्धकाला फक्त एकच ब्लॉग पाठवता येईल.

७. ब्लॉग पाठवण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०१०. स्पर्धेचे निकाल ऑक्टोबर २०१०च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होतील. तसेच, संबंधित विजेत्यांना पत्र अथवा ई-मेलद्वारे निकाल कळवला जाईल.

८. यानंतर ‘स्टार माझा’च्या खास एपिसोडमध्ये विजेत्यांचा सत्कार करण्यात येईल व पुरस्कार वितरण होईल.

९. स्पर्धेचे आयोजन, नियमावली, अटी, बक्षीसे यासंदर्भात कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय बदल करण्याचे अधिकार स्टार माझाकडे असतील.

११.ब्लॉगमधला कंटेंट स्वत:चाच असावा. जर अन्य स्त्रोतांकडून माहिती घेतली असेल, तर त्यांचा नाममिर्देश करावा. ब्लॉग या माध्यमाचे महत्व जपावे. ब्लॉग व त्यातील मजकूर आपलाच असल्याचे सिद्ध करणे, ही स्पर्धकाची जबाबदारी आहे.

ता. क. एन्ट्रीज blogmajha3@gmail.com वरच पाठवा.

लाईट्स, कॅमेरा, ऍक्शन


गेल्या वर्षी ‘स्टार-माझा’ तर्फे ब्लॉगला पुरस्कार जाहीर झाला होता त्याचा वितरण समारंभ रविवारी मुंबई येथील ‘स्टार-माझ्या’च्या स्टुडीओमध्ये आयोजीत होणार असल्याचे इ-मेल द्वारे सुचीत करण्यात आले. पुण्याहुन जाणारे फक्त मी आणि भुंगा दोघंच होतो. मुंबईला आमचे जाणे येणे म्हणजे फक्त व्हिसा कॉन्सोलेट आणि इंटरनॅशनल एअर-पोर्ट इतकेच मर्यादीत होते. बाकीची माहीती काहीच नाही आणि ‘लोकलने प्रवास’ ह्या गोष्टीचा विचार सुध्दा न करु शकणारे आम्ही. त्यामुळे मग तवेराच बुक केली. विक्रांत देशमुख सुध्दा बरोबर यायला तयार झाला. पंकज घरगुती कारणामुळे येऊ शकणार नव्हता, तर प्रभासचे येणे ऐन वेळी रद्द झाल्याने आम्ही तिघच मुंबईकडे निघालो.

समोरासमोर तसे आम्ही तिसऱ्यांदाच भेटत होतो, परंतु गाडीमध्ये गप्पा इतक्या रंगात आल्या होत्या जसे काही आम्ही एकमेकांना गेली अनेक वर्ष ओळखत होतो. आधी भुंगा आणि मग मी आमचा जिवनपट उलगडला.

महेंद्रंना भेटण्याचे इ-मेलद्वारे नक्की केले होते, त्यानुसार चेंबुरला, त्यांच्या कार्यालयापाशी पोहोचल्यावर त्यांना फोन करुन बोलावुन घेतले आणि एका हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट चरता चरता पुन्हा गप्पा सुरु झाल्या. व्हर्चुअल जगातल्या गप्पा प्रत्यक्षात मारताना अधीकच मज्जा आली. सर्वांनाच घाई असल्याने ह्यावेळेस तरी गप्पा आवरत्या घेतल्या आणि आम्ही पुढे प्रयाण केले.

दुरचित्रवाणी आणि वृत्तपत्रांमध्येच पाहीलेला वरळी-सी लिंक प्रत्यक्ष पहाताना आणि अनुभवताना मज्जा आली. आत्तापर्यंत केवळ सॅन-फ्रॅन्सीस्को आणि ब्रुकलीन सारख्या ठिकाणी पाहीलेले ब्रिज आता आपल्या मुंबईमध्ये बघुन छान वाटले. गाडी थांबवता येत नसल्याने धावत्या गाडीतुनच चित्र काढावी लागली. जवळुन जाणाऱ्या गाड्यांमधील लोकांच्या दृष्टीने कदाचीत आम्ही ‘गावाकडुन जिवाची मुंबई करायला आलेले’ असु, पण कुणाचीही पर्वा न करता आम्ही फोटो टिपत होतो.

बरोब्बर बारा वाजता आम्ही ‘स्टार माझाच्या’ कार्यालयात पोहोचलो. बहुतांश मंडळी आधीच येऊन थांबलेली होती. समोरच बातम्यांचे शुट चालु होते. मोठ्ठे कॅमेरे, लाईट्स, भराभर सरकणाऱ्या बातम्या आणि त्या वाचुन दाखवत बातम्या सांगणारी वृत्तनिवेदीका. आयुष्यात हे सर्व पहिल्यांदाच बघत होतो. हे सर्व घडत असतानाच इतर मंडळींशीही ओळख-पाळख झाली.

मग थोड्यावेळाने आम्ही सर्व कॅन्टीनमध्ये गेलो. ‘अच्युत गोडबोलेंशी’ समोरासमोर बऱ्याचवेळ गप्पा झडल्या. ह्या बहुआयामी व्यक्तीमत्वाला प्रत्यक्षात बघायची ओढ होतीच ती सुध्दा पुर्ण झाली. कधी संपुच नयेत अश्या चाललेल्या गप्पांमध्ये भंग पडला तो खाण्या-पिण्याने. ते उरकते आहे तो वर खाली स्टुडीओ मोकळा झालेला सांगण्यात आले. मग आम्ही सर्व खाली पळालो. आळी पाळीने आम्हाला ‘टच-अप’ करण्यासाठी मेक-अप रुम मध्ये न्हेण्यात आले. तेथुन आम्ही प्रोग्रमींग रुम मध्ये गेलो. बाहेरचा ‘ऑन एअर’ चा लुकलुकणारा लाव दिवा अंगावर शहारे आणुन गेला.

आतमध्ये असणारे असंख्य टि.व्ही. त्यावर विवीध कोनातुन दिसणारी वेगवेगळी दृष्ये चालु होती. मग टप्या टप्याने एकेकांना शुटींग रुम मध्ये न्हेण्यात आले. गम्मत म्हणजे शुट-रुम मध्ये सर्व खोली हिरव्या रंगाच्या कापडाने झाकलेली होती मात्र प्रोग्रॅमींग रुम मधील टिव्ही वर मात्र ते चित्र ग्राफिक्स मिक्स करुन दिसत होते ज्यामुळे आतमधील व्यक्ती एखाद्या मोठ्या कि-बोर्डवर उभी आहे आणि मागे संगणकाची मोठ्ठी स्क्रीन आहे वगैरे प्रकार दिसत होते.

उल्लेखनीय ब्लॉगर्सच्या पारीतोषीक वितरणाने सुरुवात झाली. ह्या रुममधुन प्रसन्न माईकवरुन कार्यक्रमाचा होस्ट अश्विनला वाक्य अधुन मधुन ‘प्रॉम्ट’ करत होता आणि अक्षरशः सेकंदात अश्वीन ती वाक्य उच्च मराठीत सुंदर शब्दात परावर्तीत करत होता. आत मध्ये गेल्यावर काय करायचे, कुठे उभे रहायचे, कुठे बघायचे, काय बोलायचे हे सांगण चालु होतं.

जसं जसा नंबर जवळ यायला लागला तसं तसं धाकधुक वाढु लागली. हात-पाय गार पडले, एअर-कंडीशनर चालु असुनही घाम फुटला. शाळेत कधी गॅदरींगमध्येही काम केले नव्हते, इथे माणसांपेक्षाही उंच आणि अवाढव्य कॅमेरे आणि प्रखर दिव्यांसमोर बोलायचे म्हणजे… मनामध्ये ठरवलेली वाक्य ही विसरु लागलो होतो. आधी पहिल्या तिन विजेत्यांना तिन मिनीटं बोलायला दिले जाईल असे सांगण्यात आले होते, त्यामुळे भिती आणि दडपण अधीक होते. शेवटी प्रसन्नशी बोलुन असले प्रकार नको म्हणुनच सांगुन टाकले.

एक एक नंबर चालु होते, प्रत्येकाचे ब्लॉगचे वैशिष्ट्य, त्यांच्या ब्लॉगची चित्र, आणि त्यांना ह्या स्पर्धेत देण्यात आलेल्या गुणांचे विश्लेषण चालु होते. सर्वात शेवटी माझा नंबर होता. दोन नंबर आधी मला छोटा माईक, कसलेसे यंत्र लावुन सजवण्यात आले. आणि तो क्षण आला.

‘अच्युत सरांच्या’ जवळ उभे रहा, पाच नंबरचा कॅमेरा तुमच्यासाठी आहे, बोलताना त्या कॅमेराकडे बघुन बोला वगैरे सांगुन झाले. एक मोठ्ठ श्वास घेउन तयार झालो. अश्वीनचा फ्रेंडली आवाजाने मनावरचे दडपण कमी झाले आणि पटकन जे बोलायचे होते ते बोलुन टाकले. अच्युत सरांनी सर्टीफिकेट आणि गिफ्ट दिले आणि पटकन पळुन आलो. अश्याप्रकारे मुख्य कार्यक्रम पार पडला.

सर्व ब्लॉगर्सना कसलीशी घाई असल्याने सगळे अचानकच गायब झाले. पण आम्ही पुणेरी दिडशहाणे तिथेच टंगळ-मंगळ करत उभे होतो. मग कार्यक्रमाचा होस्ट, अश्विन तेथे आला. त्याने आम्हाला ‘स्टार माझा’ चा सर्व स्टुडीओ दाखवला. बातम्या कश्या सांगीतल्या जातात, जाहीरातींचे प्रक्षेपण कुठुन आणि कसे होते, फिड्स कुठे आणि कश्या गोळा केल्या जातात. कार्यक्रमांचे स्केड्युलींग कुठुन आणि कसे होते. तेथील माणसांशी ओळखी करुन दिल्या. हा सर्व प्रकार बघुन टि.व्ही वर जितके साधे आणि सोपे दिसते त्याच्या मागे कित्ती मेहनत आहे हे सर्व पाहुन आम्ही अचंबीत झालो. मग जरावेळ गप्पा टप्पा करुन आम्ही बाहेर पडलो.

जवळच असलेला ‘फेमस स्टुडीओ’ जेथे ‘सारेगमप’ चे शुटींग होते, तो आतुन पहाण्याची इच्छा होती पण रविवार असल्याने तो पुर्ण पणे बंद होता. मग तेथुन आम्ही प्रयाण केले ‘गेट-वे-ऑफ इंडीया’ कडे. मुंबईच्या इतक्या जवळ रहात असुनही ‘गेट-वे-ऑफ इंडीया’ कधी पाहीले नव्हते. ह्या निमीत्ताने मिळालेली संधी सोडायची नव्हती त्यामुळे कितीही उशीर झाला तरी तो पाहुन जायचाच अशी एक खुणगाठ मनाशी बांधलेली होती. मग सि.एस.टी, पोलीस मुख्यालय वगैरे पहात तेथे पोहोचलो खरं, पण नेमका तेथे कुठल्यातरी कार्यक्रमाचे शुटींग सुरु होते. प्रचंड गर्दी होती. गाडी लावणे सोडाच, उतरुन चालायला सुध्दा जागा नव्हती. त्यामुळे खाली उतरुन निट पहाता नाही आले. मग गाडीतुनच काही चित्र टिपली आणि मरीन-ड्राईव्ह कडे प्रयाण केले.

सुदैवाने तेथे फार गर्दी नव्हती. येऊ घातलेल्या २६ जानेवारीच्या पार्श्वभुमीवर अनुचीत प्रकार टाळण्यासाठी सर्वत्र कडक बंदोबस्त होता.

 

मग गाडी लावुन खाली उतरुन खुप सारी चित्र टिपली. हवेमध्ये नेहमीचा मुंबईचा दमटपणा नव्हता त्यामुळे प्रसन्न वाटत होते.

तशी मुंबई मला फारशी आवडत नाही, तेथील गर्दी, गोंगाट, लोकांनी भरभरुन वहाणाऱ्या लोकल गाड्या, पुण्यात वाढलेल्या माझ्यासारख्याला जरा जास्तच होतं. परंतु मरीन ड्राईव्हसारखा सुंदर भाग बघुन वाटुन गेलं, आपल्या पुण्यात का नाही राव अस एखादं ठिकाणं? मुंबईची स्कायलाईनचे फोटो काढायची बऱ्याच दिवसांपासुन इच्छा होती ती पुर्ण झाली. मग जरावेळ टंगळमंगळ करुन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. एकुणच पुर्ण दिवस फारच छान किंवा आजच्या भाषेत हॅपनींग गेला. सकाळी महेंद्रंशी गाठ पडली, मग अच्युत गोडबोले त्यानंतर पुर्ण स्टुडीओ आणि त्याअंतर्गत असलेल्या अनेक गोष्टींची माहीती मिळाली, टि.व्ही वर येण्याचे स्वप्न पुर्ण झाले आणि मुख्य म्हणजे दिपक (भुंगा) आणि विक्रमशी असलेली दोस्ती आणखी घट्ट झाली. गाडीमध्ये तर इतक्या गप्पा मारल्या आणि इतके हसलो आहोत की गाल दुखायला लागले आहेत. एखाद्या दिवसाकडुन अजुन काय अपेक्षा हव्यात?

अधीक फोटोंसाठी इथे टिचकी मारा.