“हॅल्लो करण…”, करण मागे वळाला तसे इन्स्पेक्टर विक्रम पुन्हा एकदा म्हणाला
करणला काहीच सुधरत नव्हते, डोळ्यासमोर जे काही दिसत होते, तो त्याच्यासाठी प्रचंड धक्का होता
“शैला.. शैला मॅडम?”, फक्त ‘शैला’चं.. शैला मॅडम करत करण म्हणाला
“इन्जुरीज भरपूर आहेत, पण डोन्ट वरी, शी विल बी फाईन….”, विक्रम
मेंदूला असंख्य मुंग्या चावत असल्यासारखे करणचे डोके भणभणायला लागले होते. कुठल्याही क्षणी विक्रम इतक्यावेळ करण कुठे होता हे विचारेल आणि त्याला काय उत्तर द्यायचे हेच त्याला सुचत नव्हते. असे काही घडेल ह्याचा त्याने कधीच विचार केला नव्हता आणि तो आत्ताच्या परिस्थितीला अजिबातच तयार नव्हता.
विक्रमने एका हवालदाराला सांगून पाणी मागवले आणि तो ग्लास करणच्या हातात दिला..
“घे पाणी पी… माफ कर, इथे बस म्हणू शकत नाही.. फॉरेंसिकची टीम त्यांचं काम करतेय.. आपण बाहेर मोकळ्या हवेत थांबूया का? किंवा तुला हवं असेल तर माझ्या जीप मध्ये बस..”, विक्रम
करणने तो पाण्याचा ग्लास अधाश्यासारखा संपवला.
इतक्या लवकर तरी त्याला पोलिसांच्या जीप मध्ये बसायचे नव्हते..
“नको, मी ठीक आहे, आपण बाहेर व्हरांड्यात थांबू..”, पाण्याचा ग्लास खाली ठेवत तो म्हणाला
“मला माहिती आहे, आत्ता तुला पाण्याच्या ग्लास ऐवजी व्हिस्कीची गरज असेल.. मलाही आहे.. पण ड्युटी फर्स्ट..”
“ऑफकोर्स”, करण कसनुसं हसत म्हणाला
विक्रमला वरिष्ठांचा जीपमधील बिनतारी यंत्रणेवर फोन आल्याचा निरोप आला तसा “..आलोच दोन मिनिटांमध्ये” म्हणून तो आपल्या जीपपाशी गेला..
करण बाहेर गेल्यावर त्या हवालदाराने पाण्याचा तो ग्लास काळजीपूर्वक एका प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून फॉरेन्सिक टीमकडे सुपूर्त केला होता.
करण बाहेर व्हरांड्यात येऊन बसला. गार वाऱ्याच्या स्पर्शाने त्याचे डोके पुन्हा हळू हळू काम करू लागले. त्याने आजूबाजूला नजर टाकली. ठसे तज्ज्ञ, फोटोग्राफर्स, पंचनामा करणारे, मेडिकल्स, कॉन्स्टेबल्स आणि सब-इंस्पेक्टर्स.. जो तो आपल्या कामात मग्न होता. जिमी, रोशन, शैला ह्यापैकी कोणीच तिथे नव्हते ज्यांना विक्रम काही विचारू शकत होता. होता तो करण, सर्व प्रश्नांची उत्तर त्यालाच द्यावी लागणार होती..
आणि शेखर????
हाय व्होल्टेज विजेचा धक्का बसावा तसा करण ताडकन उठून उभा राहिला.. शेखरची बॉडी अजूनही आतमध्ये, त्या फ्रिजरमध्येच होती.. जर का ती विक्रमच्या हाताला लागली तर??
करण पटकन उठून आत जायला लागला तेवढ्यात विक्रम तिथे आला..
“करण.. कुठे निघालास..??”, करणला थांबवत विक्रम म्हणाला
“शेखर..”, नकळत करणच्या तोंडून शब्द बाहेर पडले..
“दॅट्स व्हेरी सॅड .. व्हॉट हॅपन्ड विथ शेखर.. तू सांगितले होतेस तेथेच आम्हाला शेखर मिळाले.. बर्फाने बॉडी पूर्ण गोठून गेली आहे.. लगेच ऍम्ब्युलन्स मधून हॉस्पिटलला बॉडी पाठवून दिली आहे..”
“तू सांगितले होतेस????????”, विक्रमचे ते शब्द करणला संभ्रमीत करून गेले? मी ह्याला शेखरबद्दल कधी सांगितले?
“येस आणि तू सांगितल्यावर लगेचच आम्ही नाकाबंदी केलीय, हुसेन फार लांब नाही जाऊ शकणार.. आम्ही लवकरच पकडू त्याला.. बट लाईक यु सेड.. दॅट बॉय इज डेड.. डेड ऑन द स्पॉट..”, विक्रम खेदाने मान हलवत म्हणाला
“पुन्हा तू सांगितल्याप्रमाणे? WHAT IS HAPPENING??”
क्षणभर आपण स्वप्नात तर नाहीना? म्हणून करणने स्वतःला चिमटा काढून पहिला.
तो पुढे काही बोलणार इतक्यात एक हवालदार टॅब घेऊन आला आणि त्याने तो विक्रमकडे दिला. विक्रमने काही क्षण तो टॅब बघितला आणि मग करणकडे देत म्हणाला.. “हा हुसेन.. पोलीस फाईलला असलेला त्याचा फोटो.. हाच होता ना तुझ्या बरोबर.. ज्याने त्या पंपावर जाऊन त्या पोराला मारले आणि कॅश घेऊन पळाला?”
म्हणजे? ह्याला पेट्रोल पंपाबद्दल पण माहिती आहे? आणि मी तिथे होतो हे सुध्दा????
करणने टॅबवरील तो फोटो बघितला.
बऱ्यापैकी जाड शरीरयष्टी, मेहेंदीने रंगवलेले लाल केस, जाड भुवयांमुळे अधिक उग्र भासणारा चेहरा…
करणने खरा हुसेन कधीच बघितला नव्हता, केवळ जिमीच्या बोलण्यातून त्याचे नाव ऐकलेले होते, परंतु त्याला नक्की काय चालले आहे कळेपर्यंत हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता..
“हो म्हणजे, हा जरा जुना फोटो वाटतो आहे, पण येस, हाच होता तो.. “
विक्रमने तो टॅब परत त्या हवालदाराकडे देऊन टाकला.
विक्रम फोनवर बोलायला त्याच्या जीपपाशी गेला होता त्या काही क्षणात करणने आपल्या विचाराची चक्रे वेगाने फिरवली होती. विक्रमने काही विचारायच्या आधीच त्याला नक्की काय माहित आहेत हे काढून घेणे गरजेचे होते.
त्यामुळे विक्रमने पुढे काही विचारायच्या आधीच करणने विचारले, “तुम्ही कधी पोहोचलात इथे?”
“आम्हाला अर्धा पाऊण तास झाला इथे येऊन. तू त्या हवालदाराला निरोप दिलासा ना त्या पेट्रोल पंपावर जे घडले त्याचा आणि इथे जे काय घडले आहे त्याचा कि लगेचच त्याने मला फोन केला.
तुला सांगतो, इथे काहीतरी संशयास्पद घडते आहे असा अंदाज मला त्याच दिवशी आला होता जेंव्हा मी शेखरना भेटायचे कारण काढून इथे आलो होतो. त्या कॅसिनो रॉबरीतले ते दोघे इथेच लपले असतील असा दाट संशय मला होता.
बट यु नो, शेखर मोठी असामी आहे.. आय मीन होती, सो मला वरुन परवानगी घेणे आवश्यक होते आणि आपले सरकारी कामकाज कसे आहे हे तर तूला ठाऊक आहेच.. नाहीतर तुझ्याकडून निरोप मिळायच्या आधीच आम्ही इथे पोहोचलो असतो”
“येस आलं होत माझ्या ते लक्षात, पण त्यावेळी हा जिमी माझ्या पाठीला त्याचा सुरा लावून उभा होता, सो काही बोलता नाही आले तेंव्हा.. “
“राईट, पण बघ ना, त्याच्या त्या सुऱ्यानेच त्याचा शेवट केला, मिसेस शेखर ने त्याच्याच सुऱ्याने त्याच्यावर वार केलेले दिसत आहेत. आय थिंक तू इथे नसताना ही ट्राईड टू अब्युज मिसेस शेखर आणि त्यांनी सेल्फ डिफेन्स मध्ये त्याला मारला.. “
“वाटलंच होतं मला तो असं काही करेल, जेंव्हा पासून तो इथे आला होता, तेंव्हापासूनच शैला मॅडमकडे तो वाकड्या नजरेनेच बघायचा.. “
“बाय द वे करण, त्या दिवशी मी इथून गेल्यावर माझे दोन हवालदार इथे पाळतीला ठेवले होते. पण इथे आल्यापासून दोघेही दिसत नाहीएत, एनी आयडिया?”
“ओह माय गॉड..”, करण कपाळ चोळत म्हणाला..
“काय झालं?”
“त्यातला एक हवालदार ठार झालाय.. जिमीनेच मारले त्याला आणि दुसरा.. त्याला बांधून ठेवलेय.. त्या पुलापासून पुढे जंगलात एक छोटी लाकडी केबिन आहे.. तिथेच असेल तो..”
“ही फार वाईट बातमी दिलीस तू मला करण, चल मला दाखवतोस ती केबिन कुठे आहे?”
“येस शुअर, चला…” असं म्हणुन करण विक्रमसोबत त्या केबिनकडे जायला निघाला..
“धिस इज अ बिग मेस, आत्तापासूनच ह्या केसवर प्रेशर यायला सुरुवात झालीय. दहा वेळा फोन येऊन गेलेत. मिडिया कुठल्याही क्षणी इथे पोहोचत असेल.. आय निड अन्सर्स करण, मला अजून माहिती हवीय.. आपण सावकाशीत उद्या बोलूच पण आत्ता थोडक्यात जे जे सांगता येईल ते मला हवंय. तुम्ही तिघे.. म्हणजे तू, शेखर आणि मिसेस शेखर इथे आल्यापासून ते आत्तापर्यंत.. सगळं.. “
करणला त्या गोठवणाऱ्या थंडीतही दरदरुन घाम फुटला. तो आत्ता जे काय सांगेल ते त्याचे एक प्रकारचे स्टेटमेंट असणार होते, पुढच्या तपासाला, त्याला ह्या केस मध्ये गुंतवायला किंवा निर्दोष ठरवायला त्याने सांगितलेला प्रत्येक अन प्रत्येक शब्द महत्वाची भूमिका ठरवणार होता. प्रत्येक वाक्य त्याला दहावेळा विचार करुन बोलावे लागणार होते, आणि त्यासाठी लागणार वेळच त्याच्याकडे नव्हता.
“मला पेपरमध्ये निनावी जाहिरात दिसली होती, बॉडीगार्ड पाहिजे म्हणून.. “, करणने बोलायला सुरुवात केली आणि अचानक त्याच्या डोक्यात कसल्याश्या लोखंडी वस्तूचा प्रहार झाला. करणने दोनही हातांनी आपले डोके दाबून धरले. हाताला गरम रक्ताचा एक ओघळ आलेला त्याला जाणवला. क्षणार्धात त्याच्या डोळ्यासमोर अंधेरी पसरली आणि तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला.
“बीप. बीप… बीप… बीप….”
करणला हळू हळू शुद्ध आली तेंव्हा आधी अगदी मंद आणि नंतर थोडासा जोरात कुठल्याश्या मशीनचा आवाज ऐकू येत होता. शरीर जड झाले होते आणि डोक्यात एकामागून एक ठोके घातल्यासारखे ठणकत होते.
त्याने सावकाश डोळे उघडले. कुठल्याश्या चारही बाजूने पडदे लावलेल्या जागी तो झोपलेला होता. काही क्षणातच त्याला ती जागा कुठलस हॉस्पिटल आहे हे लक्षात आले.
काही वेळ तो तसाच पडून राहिला. तोंडाला प्रचंड कोरड पडली होती. सर्व संवेदना जाग्या झाल्यावर मोठ्या कष्टाने तो उठून बेडच्या उशीला टेकून बसला.
विक्रमशी बोलत असताना कुणीतरी काहीतरी जोरात लोखंडी डोक्यात मारले आणि तो बेशुद्ध झाला हे त्याला आठवले तसे त्याने डोक्याला हात लावला. जिथे लागले होते, तिथे आता मलमपट्टी केलेली होती.
इतके पोलीस तिथे असताना, आपल्यावर कुणी आणि का हल्ला केला असावा ह्याचा अंदाज त्याला येईना.
सुकलेला घसा ओला करण्यासाठी त्याला पाणी हवे होते. बेडच्या शेजारीच लावलेली बेल त्याने वाजवली आणि एका मिनिटातच साधारण पन्नाशीतील एक सिस्टर येऊन ठेपली.
“व्हेरी गुड, फारच लवकर शुद्ध आली तुम्हाला.. “, बेडच्या कडेला लावलेल्या पॅड वरील कागदावर नोंदी करत ती म्हणाली
“सिस्टर काय झाले? मी इथे कसा आलो..?”
“काही फारसे नाही, डोक्याला मार बसला होता तुमच्या, खोप पडली होती.. छोटा मेंदू थोडक्यात बचावला नाहीतर आयसीयू मध्ये असता तुम्ही..”
“हो बरोबर.. पण नक्की काय लागलं डोक्याला आठवत नाहीए.. नाही म्हणजे माझा मेमरी लॉस वगैरे नाही झाला.. सगळं आठवतंय मला, पण नक्की लागलं काय होतं?”
“स्ट्रेचर.. दोन वार्ड बॉय एक बॉडी न्हेत होते ऍम्ब्युलन्स मध्ये, बॉडी ठेवून मागे न बघता एक जण अचानक मागे वळला आणि स्ट्रेचरचा तो लोखंडी दांडा तुमच्या डोक्यात बसला..”
“ओह म्हणजे अपघात होता तर.. “
“हो मग, तुम्हाला काय वाटले, मुद्दाम कुणी मारले कि काय?”, हसत हसत ती सिस्टर म्हणाली
असं नुसतं मागे वळल्याने इतक्या जोरात ते स्ट्रेचर लागले असेल हि गोष्ट मानायला करण तयार होईना.. म्हणजे अर्थात तिथे इतके पोलीस होते, सोबत विक्रम होता.. म्हणजे सिस्टर म्हणतेय त्या प्रमाणेच घडले असणार, फक्त ते स्ट्रेचर ‘अपघाताने’ लागले असेल हे काही करणला पटत नव्हते.
“अच्छा अच्छा, मला इथे येऊन किती वेळ झाला?”
“५-६ तास झाले असतील, काल साधारण रात्री ३ वाजता आणलं तुम्हाला इथे.. “
करणने भिंतीवरच्या घड्याळात नजर टाकली, सकाळचे ८.३० वाजून गेले होते.
“ओह.. बरं सिस्टर थोडं पाणी मिळेल, घसा कोरडा पडलाय..”
“हो आणते आणि डॉक्टरांना पण निरोप देते तुम्हाला शुद्ध आलीय, ते येतील राउंड ला..”
सिस्टर जायला निघाली तेंव्हा करणेचे लक्ष कडेला ठेवलेल्या फुलांच्या गुच्छाकडे गेले..
“सिस्टर, हे कोणी..?” फुलांकडे बोट दाखवत तो म्हणाला
“तुमचा मित्र आला होता भेटायला.. “
“माझा मित्र?”, करणला आश्चर्य वाटले. एक तर करणला फारसे कोणी मित्र नव्हते, असलेच तर असं आठवणीने फुल वगैरे आणून देणारेही नव्हते. शिवाय करण त्याच्या कामासाठी कुठे चालला आहे हे इशिता सोडलं तर कुणालाच माहित नव्हते. आणि ५ तासांत करण इथे, दवाखान्यात आहे हे कळून त्याला भेटायला येऊ शकेल असे नक्कीच कोणी नव्हते..
“हो.. दुसऱ्यांदा परत आला होता सकाळी ७ वाजता वगैरे, पण बहुदा बाहेर थांबलेल्या मामाला बघून घाबरून पळून गेला.. “, परत हसत हसत सिस्टर म्हणाली
“मामला? यु मिन बाहेर पोलीस उभा आहे? पण का?”
“आता ते मला कसं माहिती? त्यांनाही निरोप देते तुम्हाला शुद्ध आल्याची, ते इन्स्पेक्टर विक्रम काल जाताना सांगून गेलेत तुम्हाला शुद्ध आली की त्यांना कळवायला.. “
“सिस्टर.. प्लिज.. इतक्यात नाही सांगितलं तर चालेल का? माझं डोकं जाम ठणकतंय.. पाण्याबरोबर एखादी गोळी द्या त्यापेक्षा.. जरा पडतो आणि मग भेटेन.. ओके?
सिस्टरच्या चेहऱ्यावर जरा आश्चर्याचे भाव पसरले
“नाही.. पोलिसांना एका गुन्ह्याच्या तपासासाठी खरं तर मी मदतच करतोय.. पण त्यांना कळलं मी शुद्धीवर आलोय तर प्रश्नांचा भडीमार चालू करतील.. मला आत्ता काहीच सुचत नाहीए.. सो प्लिज.. “
“ओह शुअर शुअर.. हे पोलीस कुणाच्या बापाचे नसतात नाही का.. आणि पेशंटची काळजी घेणे हेच तर कर्तव्य आहे आमचे.. काळजी नका करु .. नाही सांगत.. पण मला डॉक्टरांना सांगावेच लागेल.. “
“हरकत नाही.. फक्त त्यांनाही सांगा, पोलिसांना इतक्यात न सांगण्याबद्दल.. “
“नक्कीच.. मी पाणी आणि औषध घेऊन येते..”
“सिस्टर, अजून एक प्रश्न..”
“जरूर, विचारा ना”
“अं.. शैला.. शैला शेखर, त्या कुठल्या वॉर्ड मध्ये ऍडमिट आहेत?”
“हे सरकारी हॉस्पिटल आहे.. त्या इथं नाहीयेत, त्यांना अपोलो मध्ये केले आहे ऍडमिट ..”
“ओह अच्छा.. “
“अजून काही.. “
“नाही.. थँक्स.. तेव्हढं ते पोलिसांना इतक्यात न सांगण्याबद्दलच तेवढं.. “
सिस्टर हसून निघून गेल्या
“जे घडते ते चांगल्यासाठीच म्हणायचे..”, करणच्या मनात विचार आला.. निदान त्याला जरा इन्स्पेटकर विक्रम पासून काही काळासाठी का होईना, सुटकारा मिळाला होता. ह्या मिळालेल्या वेळाचा तू पुढच्या प्लॅनिंगसाठी योग्य तो वापर करु शकणार होता.
करणंच लक्ष शेजारच्या त्या फुलांकडे गेले..
अजूनही करणला असा कोणताच मित्र आठवत नव्हता जो त्याला इथे फुलं पाठवेल
करणं सावकाश उठून बसला आणि त्याने तो फुलांचा गुच्छ काळजीपूर्वक तपासायला सुरुवात केली. सुकृतदर्शनी तरी त्यावर सदिच्छा विषयी किंवा कुणाकडून आले आहे वगैरे दर्शवणारे कार्ड नव्हते, परंतु त्याने सर्व फुल त्या बाबूंच्या परडीतून मोकळी केली तेंव्हा खाली एक चुरगलेला कागद त्याच्या दृष्टीस पडला
करणने सर्व फुलं व्यवस्थित पुन्हा जागेवर ठेवून दिली आणि त्याने त्या कागदातला मजकूर वाचायला सुरुवात केली.
अतिशय घाणेरड्या हस्ताक्षरात लिहिलेला तो मजकूर असा होता –
“मित्रा, सर्वप्रथम तुला इथे यावे लागले त्याबद्दल क्षमस्वः, पण तुला हॉस्पिटलमध्ये धाडण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तू इथे आलास तो अपघाताने नाही. हां आता तुला जरा जास्तीचा मार बसला, पण आजकाल प्रोफेशनली काम करणारी लोक मिळतात कुठे? जे आहेत त्यांच्याकडून कामं करवून घ्यायची म्हणजे जरा उन्नीस-बीस होणारंच.
असो, मला खात्री आहे, सर्व दृष्टीने विचार केल्यावर तू मला धन्यवादच देशील. आज तू इथे नसतास तर विक्रमच्या प्रश्नामध्ये कधी आणि कसा अडकला असतास आणि आतमध्ये हवा खायला कधी पोहोचला असतास ते तुझं तुलाच कळाले नसते.
सध्या तरी तू माझ्यामुळे हिरो आहेस. सगळंच इथे लिहिणं शक्य होणार नाही. टी.व्ही. लाव, ब्रेकिंग न्यूज तेच चालू आहे सगळीकडे, नीट ऐक आणि तशीच पोलिसांना उत्तर दे. आणि हो, महत्वाचे. तू ती पेट्रोल-पंपावरून उचललेली रोकड अजूनही त्याच सॅक मध्ये, तू फेकली होतीस तिथेच पडून आहे.
६-७ लाख काही कमी रक्कम नाहीए. इथून बाहेर पडलास कि सरळ ती बॅग उचल आणि इथून गायब हो. नव्याने सुरुवात करायला ते पैसे तुला उपयोगी पडतील.
– तुझा हितचिंतक”
करणने तो मजकूर दोनदा वाचला, मग तो सावकाश उठला, त्या कागदाचे बारीक बारीक तुकडे केले आणि बाथरुम मध्ये जाऊन फ्लश करुन टाकले.
कोण होता हा हितचिंतक?
करणने हळू आवाजात समोरचा टीव्ही चालू केला.
ब्रेकिंग-न्यूज मध्ये आदल्या रात्रीच्या त्या फार्म-हाऊस वरच्या क्लिप्स दाखवत होते.
पोलिसांच्या जीप्स, ऍम्ब्युलन्स, फॉरेन्सिक-टीमची लगबग, मीडिया रिपोर्टर्सची बाइट्स मिळवण्यासाठीची लगबग दिसत होती. अचानक गडबड उडाली आणि सर्व रिपोर्टर्स त्या दिशेने धावले.
करणने बघितले तेंव्हा टीव्ही वर तोच दिसत होता. जखमी अवस्थेत स्ट्रेचर वर बेशुद्ध करणला ऍम्ब्युलन्समध्ये न्हेत होते.
“तुम्ही आत्ताच बघितले, करण, जे शेखरची बॉडीगार्ड म्हणून त्यांच्याबरोबर इथे राहत होते त्यांना नुकताच एक छोटा अपघात झाल्याने दवाखान्यात न्हेण्यात येत आहे. सद्य स्थितीत इथे रात्री नक्की काय घडले ह्याची माहीती देऊ शकतील असे ते एकमेव होते. परंतु अपघातापूर्वी त्यांनी काही महत्वाची माहिती इन्स्पेक्टर विक्रम बरोबर शेअर केली होती.
आत्ता आपल्यासोबत आहेत सब-इन्स्पेक्टर जाधव, बघूया ते काय म्हणतात –
जाधव साहेब, सांगू शकाल नक्की काय झालं?”
“ओपन-अँड-शट केस आहे. इथे येण्यापूर्वी करण स्वतः पोलीस स्टेशनला आले होते. त्यांना बळजबरीने बाहेर जो पेट्रोल-पंप लुटीचा गुन्हा घडला त्यासाठी सोबतीला पाठवले हुते. त्या गुन्ह्याचा मुख्य गुन्हेगार, हुसेनच त्या मुलाचा खून केला आणि लुटीची रक्कम घेऊन इथे त्याची वाट पाहत थांबलेल्या जिमी आणि रोशनला डबल-क्रॉस करून पळून गेला.
रोशन आणि जिमी जे काल घडलेल्या कॅसिनो गुन्ह्यासंबंधी संशयीत होते ते गुन्हा करुन पळून जाताना इथे येऊन लपले. त्यांनी शेखर-शैला, ज्या शेखरच्या पत्नी आहेत आणि करण ह्यांना ओलीस ठेवले आणि लाईफ-लाईन इन्शोरन्स कडुन खंडणी मागितली.
हुसेन, ज्याच्या मागावर पोलीस होते, तो देश सोडून जाण्याच्या तयारीत होता. अधिक वाट बघणं त्याच्या दृष्टीने अवघड झाले होते. जिमी आणि रोशन इथेच लपून बसले असतील असा आम्हाला.. म्हणजे इन्स्पेक्टर विक्रमना संशय होताच आणि म्हणून ते एकदा इथे येऊनही गेले होते.. त्यामुळे हुसेन अधिकच बेचैन झाला आणि त्यांनी पेट्रोल पंप लुटीचा कट रचला.
हुसेनने आपल्याला डबल-क्रॉस केले आहे हे लक्षात येताच जिमी पिसाळला आणि त्याने शेखरचा खून केला, शैलावर अमानवी अत्याचार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला
परंतु, मिसेस शेखरने सेल्फ-डिफेन्स मध्ये प्रति-हल्ला करताना त्यात जिमी मारला गेला. आपण आता एकटेच राहिलो आणि सुटकेचा मार्ग नाही बघून रोशनने आपल्या पिस्तोल मधून गोळी झाडून आत्महत्या केली.
अर्थात करणने सांगितलेल्या माहितीच्या आधारे आम्ही केलेले परिस्थितिचे हे विश्लेषण आहे. करण किंवा शैला शुद्धीवर आल्यावर त्यांच्याशी बोलून ह्याची शहानिशा करता येईल..”
“धन्यवाद जाधव साहेब.. तुम्ही म्हणालात तसे पेट्रोल-पंप लुटीमध्ये करणचा सहभाग होता, तर त्याला अटक होऊ शकेल काय?”
“मला नाही वाटत तो त्या गुन्ह्यामध्ये स्वतःहून सहभागी झाला होता.. जेंव्हा गुन्हा घडला तेंव्हा हुसेन आतमध्ये होता आणि करण बाहेर गाडी घेऊन थांबला होता. म्हणजे तसे पाहायला गेले तर त्याचा त्या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नव्हता.
शिवाय, त्यांनी स्वतःहून ठाण्यात येऊन ही माहिती दिली नसती तर कदाचित आम्ही मिसेस शेखरना वाचवू शकलो नसतो..”
“जाधव साहेब.. शेखरचा खून अतीशय निर्घृण पद्धतीने झाला त्याबद्दल..”
“त्याबद्दल आत्ता अधिक बोलणे योग्य ठरणार नाही, पोस्टमार्टम चा रिपोर्ट आला कि प्रेस-कॉन्फरंस घेऊच.. “
त्या बातम्या बघून करणने सुटकेचा एक निश्वास सोडला. सध्या तर तो सेफ होता. हे सर्व कसे घडले आणि कोणी घडवले हे जरी अनुत्तरीत असले तरीही त्या कागदावर लिहिल्याप्रमाणे तो खरंच कोणीतरी करणचा हितचिंतकच होता.
निदान पोलिसांना काय उत्तर द्यायची हे त्या बातम्या बघून करणला आता ठरवता येणार होते.
सरकारी दवाखान्यातील त्या रंग उडालेल्या जुन्या भिंतीवरून एक छोटे पाखरू दिव्यांच्या उजेडाच्या दिशेने मजेने भिरभिरत निघाले होते. त्याला कुठे माहिती होते कि त्या प्रखर प्रकाशाच्या मागे, कोपऱ्यात एक मोठा कोळी जाळं विणुन भक्ष्याची वाट बघत बसलेला आहे…..
[ क्रमशः ]