“शिंदे, त्या हत्याराबाबत अधीक काही माहीती हाती लागली का?” पवार डॉक्टरांनी शवविच्छेदनानंतर दिलेल्या अहवालावरुन खुनासाठी वापरण्यात आलेल्या सुर्याचे एक अंदाजपंचे चित्र रेखाटण्यात आले होते त्याकडे पाहात म्हणाले. ९ इंच लांब, एका बाजुने खाचा असलेला, सुर्याच्या एका बाजुला नक्षीकाम तर दुसऱ्या बाजुला दोन सिंहांचे चित्र कोरलेला आणि सुर्याच्या टोकाच्या थोड्या अलीकडे एक छोटासा बाक असलेला असा विचीत्र आकाराचा तो सुरा होता.
“म्हणजे शिंदे असं बघा!! अश्या प्रकारचा सुरा कोणाकडे असु शकतो? खाटीक, चिकनवाला, भंगारवाला, हॉटेलवाला??? कोण अश्याप्रकारचा विचीत्र चाकु बाळगत असेल? बरं ते जाऊ देत, गावात त्या रात्रीनंतर कोण कोण नविन आलं आहे तपासलेत का तुम्ही?”
“हो साहेब. म्हणजे गावाकडच्या जमीनीबद्दल काही चर्चा करायला नानासाहेबांकडे ४-५ लोकं येऊन गेली, भैय्यासाहेबांकडे तर लोकांचे येणे जाणे असतेच बाकी इतर किरकोळ वगळता तसं कोण आलं नाही साहेब..” डोकं खाजवत शिंदे म्हणाले.. “हाsss ते डिटेक्टीव्ह जॉन आले बघा अनिताताईंचा खुन व्हायच्या अगोदर..” अचानक सुचलं तसं शिंदेंनी आधीच्या वाक्यात हे वाक्य मिसळलं.
“डिटेक्टीव्ह जॉन!!, मला काय तो माणुस बरोबर वाटला नाही. च्यायला कुठुन अचानक येतो काय? खुनाबद्दलची माहीती मागतो काय?.. “, पवार विचार करत म्हणाले.
“पण साहेब, त्यांचे पेपर सगळे बघीतले ना तुम्ही? गव्हर्मेंटचेच आहेत ना?” शिंदे
“अहो शिंदे, असले छप्पन्न पेपर बाहेर बनवुन मिळतात. कश्यावरुन ते खरे आहेत? शिंदे एक काम करा, घेउन या त्याला उद्या इकडे, जरा निट चौकशी करायला हवी त्याची”, पवार जागेवरुन उठत म्हणाले.
*************
जॉन बाल्कनीमध्ये मावळत्या सुर्याकडे बघत बसला होता. खिश्यातुन सिगारेटचे एक पाकीट काढुन त्याने आतमध्ये नजर टाकली. शेवटची चार सिगारेट्स उरली होती त्याने एक दीर्घ उसासा घेतला आणि पाकीट परत बंद करुन खिश्यात ठेवुन दिले. मग तो शांतपणे उठला आणि खोलीमध्ये गेला. त्याने स्वतःसाठी एक कॉफी बनवुन घेतली आणि परत बाल्कनीमध्ये येऊन बसला. कॉफीचे दोन कडक घोट घश्याखाली जाउनही त्याची सिगारेटची तल्लफ जाईना, शेवटी त्याने एक सिगारेट शिलगावली आणि एक मोठ्ठा झुरका मारुन तो खुर्चीत रेलुन बसला.
दिवसांगणीक ह्या खुनांची माहीती दुरवर पसरत होती. बर्याच दिवसांत चर्चायला काही नविन घडामोडी नसल्याने मिडीयाने तशी फालतु असुनही ही केस उचलुन धरली होती.
’तरवडे गांव मै सन्नाटा’
’तरवडे गांव मै मौत का दरींदा’
’तरवडे गांव हुआ पागल खुनीका शिकार’
ह्या आणी अश्या अनेक ’ब्रेकींग न्युज’ झळकत होत्या आणि तरवडे गावाचे नाव शहरो शहरी पसरवत होत्या.
’ह्या केसला अशीच प्रसिध्दी मिळो..’ जॉन स्वतःशीच विचार करत होता.. ’.. त्यासाठी अजुन एक-दोन खुन पडले तरीही हरकत नाही..’ ह्या केसच्या प्रसिध्दीच्या लाटेवर स्वार होऊन आपल्या पदरी थोडी प्रसिध्दी मिळाली तर पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करता येईल..’
सिगारेटच्या धुराची वलय आकाश्यात सोडत तो बुडणाऱ्या दिनकराकडे बघत होता. इन्स्पेक्टर पवारांकडुन अधीक माहीती मिळाल्याखेरीज कामात प्रगती फारशी होणार नाही हे तो जाणुन होता.
त्यांच्याकडुन माहीती काढायची म्हणजे त्याला आधी गाजर दाखवायल हवे. आपले सहकार्य उपयुक्त आहे ह्याची त्याला जाणीव झाली तर कदाचीत तो माहीती देऊ करेल असा एक पुसटसा विचार त्याच्या मनामध्ये चमकुन गेला.
विचार करता करता जॉनचे मन भुतकाळात शिरले..
जॉन डॉलीच्या एअर-कंडीशन्ड बेडरुममध्ये छताकडे तोंड करुन पहुडला होता. त्याच्या हातावर डोके ठेवुन डॉली शेजारी झोपली होती. तिच्या गोऱ्यापान उघड्या पाठीवरुन तिचे लांबसडक काळेभोर केस ओघळत होते. हाताला रग लागली तशी झोपेतच जॉनने हळुवारपणे आपला हात तिच्या डोक्याखालुन काढुन घेतला.
जॉनच्या हालचालीने डॉलीने अर्धवट डोळे उघडले. जॉनबरोबर बिछान्यात घालवलेले गेले दोन तास तिच्यासाठी सुखाचा परमोच्च बिंदु होता. तिने कौतुकाने एकवार जॉनकडे बघीतले. जॉन गाढ झोपेत होता. जॉनला जागे करुन पुन्हा एकदा त्या सुखाच्या हिंदोळ्यावर झुलण्याची एक तिव्र इच्छा डॉलीच्या मनामध्ये चमकुन गेली. परंतु कष्टाने तिने तो विचार बाजुला सारला. पांघरुण बाजुला सारुन ती वॉर्डरोबच्या मोठ्या आरश्यासमोर स्वतःचे रुप पहात उभी राहीली. तिच्या ह्या कमनीय बांध्यावर, तिच्या मोहक हास्यावर, गालावरील खळीवर, चेहऱ्यावरील निरागसतेवर, लांबसडक केसांवर अनेक जण भाळलेले होते. परंतु डॉलीला भावले होते ते जॉनचे रांगडे रुप. खुरटी वाढलेली दाढी, राट केस, मजबुत मनगट आणि आत्मविश्वासी चेहरा.
दुपारच्या त्या टळटळीत उन्हात बाहेर पडण्यापेक्षा घरीच मस्त पिझ्झा मागवुन बिअरचे पेग रिचवत जॉनला बिलगुन एखादा सिनेमा बघण्याचा डॉलीचा विचार होता.
डॉलीने फिक्कट गुलाबी रंगाच्या रिबीनने आपले केस बांधले, खोलीमध्ये इतस्ततः पसरलेले आपले कपडे तिने उचलले आणि गरम पाण्याच्या शॉवरखाली आंघोळीसाठी ती बाथरुममध्ये पळाली.
तासाभराने ती बाहेर आली तेंव्हा कपडे करणार्या जॉनला पाहुन तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या.
“कुठे चाललास जॉन?”
“येतो मी एक-दोन तासांत जाऊन. मिसेस पारकरांचा फोन आला होता. त्यांना त्यांच्या कामाचे रिपोर्ट्स हवे आहेत आत्ताच.”
“पण जॉन…!”
“डॉली.. तुला माहीती आहे ना ती म्हातारी किती कटकटी आहे! आधीच एक तर क्लायंट्स कमी माझे, आहेत त्यांना तरी सांभाळायला हवे ना!”
“पण जॉन!! तु हे सर्व सोडुन देऊन एखादे ऑफीस का नाही जॉईन करत? आय रीअली लव्ह यु जॉन, ऍन्ड आय वॉट टु गेट मॅरीड विथ यु!”
“डॉली.. प्लिज.. आत्ता नको…”
“जॉन.. मला माहीती आहे डिटेक्टीव्ह जॉब्स तुला आवडतात. पण मग तु थॉमसन एजन्सी जॉईन कर ना. त्यांचा क्लायंट बेस सुध्दा मोठ्ठा आहे. रेग्युलर पैसे तरी मिळतील..”
“कोण? तो खत्रुड थॉमसन? डॉली प्लिज. तुझ्या ह्या फालतु कल्पना तुझ्याकडेच ठेव. माझ्या प्रोफेशनल लाईफ मध्ये कृपया मध्ये-मध्ये करु नकोस”
“जॉन?? तुझे लाईफ?? तुझे लाईफ ते माझे लाईफ़ नाही?”
“मला तसे नव्हते म्हणायचे डॉली..”
“जॉन.. मला वाटते आपले ह्याच विषयावरुन खुप वेळा भांडणं झाली आहेत, आणि ह्यापुढेही होत रहातील. जॉन तुला एक काही तरी निवडावे लागेल..”
“डॉली.. प्लिज आत्ता नको, मला कामं आहेत, संध्याकाळी बोलु.”
“नाही जॉन, संध्याकाळी नाही. आत्ताच..”
“ठिक आहे तर डॉली.. मी माझे प्रोफेशन कुणासाठीही सोडु नाही शकत..” एक दीर्घ उसासा घेउन जॉन म्हणाला आणि स्तब्ध उभ्या असलेल्या डॉलीला ओलांडुन तो घराबाहेर पडला.
हताशपणे डॉली मागे फिरली आणि आवरण्यासाठी वार्डरोबसमोरील आरश्यासमोर उभी राहीली. परंतु डबडबलेल्या डोळ्यांमुळे तिला आपले आरश्यातील प्रतिबिंब सुध्दा धुसर दिसत होते. गालांवरुन ओघळणाऱ्या गरम स्पर्शाच्या आश्रुंना थांबवण्याचा आज्जीब्बात प्रयत्न नं करता डॉलीने स्वतःला सोफ्यामध्ये झोकुन दिले….
…. हातातल्या संपत आलेल्या सिगारेटचा हाताला चटका बसला तसा जॉन भानावर आला… “डॉली.. येस्स!!, डॉली ह्या कामात आपल्याला मदत करु शकेल..” हातातले सिगारेट फेकुन देऊन
जॉन जागेवरुन उठला..
*******
“पवारसाहेब तुमचे हे फॅक्स मशीन जरा वापरु का? नाही म्हणजे ह्या सुर्याबद्दलची अधीक माहीती मिळवण्यासाठीच करतो आहे.”, पवारांच्या उत्तराची फारशी वाट न बघता जॉन ने ते हातातले सुर्याचे चित्र फॅक्स मशीनमध्ये सरकवले. चित्राच्या एका बाजुला ‘अधिक माहीती हवी आहे’ असे शेजारच्या अर्धवट तुटलेल्या पेन्सीलने रखडले आणि त्याने तो कागद डॉलीला फॅक्स केला.
गावची पंचायत, तुरळक पत्रकार, काही नविन बातमी नसल्याने जुने मुडदे खोदुन ‘ब्रेकींग न्युज’ करणाऱ्या चॅनल्सचे काही दिवटे ह्यांच्या प्रश्नांनी इ.पवार वैतागुन गेले होते. नविन माहीतीचा काहीच स्त्रोत हाती लागत नव्हता आणि त्याच वेळेस जॉनने त्यांची भेट घेऊन त्याला सापडलेल्या काही पुराव्यांची माहीती दिली होती. त्यांना तो त्या ठिकाणी घेऊन गेला होता आणि शेतात उमटलेले टायरचे निशाण आणि त्यावरुन बांधलेला तर्क सांगीतला होता.
अर्थात ती माहीती फार उपयुक्त होती अश्यातला भाग नाही, आणि ह्यावरुन फार काही सुगावा लागतही नव्हता, परंतु निदान ह्या इतर मंडळींना तात्पुर्ते का होईना द्यायला पवारांना खाद्य मिळाले होते. तात्पुर्ते त्यांची तोंड बंद झाली होती. आणि त्यामुळे पवारांनीही त्यांच्याकडील काही माहीती जॉनला दिली होती.
खुनाच्या झालेल्या जखमांवरुन तंत्रज्ञांनी एका सुर्याचे चित्र बनवले होते आणि काही माहीतींपैकीच एक म्हणुन पवारांनी ते चित्र जॉनला दाखवले होते.
गेल्या ३ महिन्यांपासुन डॉली जॉनबरोबर नव्हती. पण हा फॅक्स तिला मिळताच ती आपल्याला नक्की मदत करेल हा ठाम विश्वास जॉनला होता.
ह्या चित्राच्या सहाय्याने डॉली इंटरनेटवरुन ह्या सुर्याबद्दलची अधीक माहीती मिळवु शकेल असे त्याला वाटत होते. आणि त्यामुळेच फारसा विचारं नं करता त्याने तो कागद डॉलीला पाठवला होता.
***********
डॉली आपल्या कार्यालयात कामात मग्न होती त्या वेळेस शेजारील फॅक्स मशीन वर ‘इनकमींग फॅक्स’ ची अक्षर उमटली. डॉली ने शेजारील ‘ऍक्सेप्ट’ लिहीलेले हिरवे बटन दाबले आणि फॅक्स चा पेपर रोल फिरु लागला. त्या फॅक्स पेपरवर उमटणारे ते विचीत्र चित्र बघुन डॉलीच्या कपाळावर आठ्या उमटल्या. तिने तो पेपर उलटसुलट करुन पाहीला आणि मग तिचे लक्ष कोपऱ्या फिक्कट अक्षरात उमटलेल्या जॉनच्या अक्षरांकडे गेले.
डॉलीने तो कागद टेबलाच्या कडेला ठेवुन दिला आणि ती आपल्या कामात पुन्हा मग्न झाली.
संध्याकाळी घरी निघायच्या वेळेस टेबलवरील पेपर आवरताना तिचे लक्ष पुन्हा एकदा त्या फॅक्सकडे गेले. तिने तो कागद पुन्हा एकदा निरखुन पाहीला.
“कश्याला हवी असेल ही माहीती जॉनला? इतक्या दिवसांनंतर जॉनला पुन्हा एखादी केस मिळाली की काय?”, डॉलीच्या मनामध्ये प्रश्नांचे तरंग उमटत होते. तिने त्या कागदावरील उमटलेले ‘फॅक्स कुठुन आला?’ हे दर्शवणारा फोन नंबर पाहीला. मग शेजारी ठेवलेली टेलीफोन डिरेक्टरी उघडली आणि जिल्हा-तालुकाच्या यादींमध्ये तिने तो नंबर शोधायला सुरुवात केली.
“तरवडे..” शोधता शोधता तिला एका ठिकाणी त्या गावाचा कोड मिळाला. काही क्षणातच तिला काही दिवसांपुर्वी पेपरमधुन झळकलेल्या आणि टि.व्ही.वरील बातम्यांमध्ये ब्रेकींग न्युजच्या नावाखाली चघळल्या जाणार्या त्या दोन खुनांच्या बातम्या आठवल्या.
शेवटी तिने एक दीर्घ उसासा घेतला आणि हातातले काम बाजुला सरकवुन तिने गुगलची साईट उघडली आणि सुर्यांबद्दल अधीक माहीती देणाऱ्या वेब-साईट्स पडतायळला तिने सुरुवात केली.
बऱ्याच वेळ शोधाशोध केल्यावर तिला हवे असलेले चित्र एका वेब-साईटवर सापडले. तिच नक्षी, तेच चिन्ह, तोच आकार…
डॉलीने कडेचा एक कोरा कागद ओढला, चेहऱ्यावर कोसळणारे आपले काळे-भोर केस एका हाताने मागे सारले आणि पेन्सीलीने त्या कागदावर वेबसाईटवरील माहीती उतरवुन घ्यायला सुरुवात केली.
**********
डॉलीच्या मनातुन जॉन कधीच गेला नव्हता आणि आता जॉनला आपली गरज आहे असे राहुन राहुन डॉलीला वाटतं होते आणि म्हणुनच तिने ‘तरवडे’ गावाला जायचा निर्णय घेतला होता. काम आटोपताच ती घरी गेली चार-दोन दिवसांचे कपडे, थोडे पैसे आणि इतर साहीत्य घेउन तिने ‘तरवडे’ गावाकडे कुच केले. जॉनला फोन करुन ‘मी येत आहे’ असे सांगण्याचा मोह तिने टाळला होता.
असे अचानक जाऊन त्याला सरप्राईझ द्यायचे आणि त्या दिवशीबद्दल त्याची माफी मागुन त्याच्या बाहुपाशात शिरायचे ह्या सुखद विचारांनी ती आपली गाडी पळवत होती.
तारापुर एक्झीट घेउन शेवटचा घाट चढेस्तोवर रात्रीचे ९.३० वाजुन गेले होते. घाट म्हणल्यावरच डॉलीच्या पोटात गोळा आला. तिला घाटाचा नेहमीच त्रास व्हायचा आणि ह्या वेळेसही तस्सेच झाले होते. अगदीच सहन होईना तसे तिने गाडी एका कडेला उभी केली. गाडीतुन बाहेर येउन उभे राहील्यावर डोंगरावरच्या गार वार्याने तिला जरा मोकळे वाटले. गाडीच्या डिकीत ठेवलेल्या बॅटरीच्या
रेफ्रिजिएटर मधुन तिने मोसंबी ज्युसची एक बाटली बाहेर काढली. दोन घोट पोटात गेल्यावर आलेली उलटीची उमळ दुर झाली.
केसांना बांधलेली रिबिन काढुन तिने केस मोकळे सोडले. वार्याचा झोका तिच्या सर्वांगाला लपेटुन घेत होता. सुखाने तिने दोन क्षण डोळे मिटुन घेतले.
स्त्रियांना ‘सिक्स्थ सेन्स’ असतो असं म्हणतात. कसल्याश्या संवेदनेने डॉलिने अचानक डोळे उघडले. एक अनामीक भिती तिच्या अंर्तमनाला स्पर्शुन गेली. कोणीतरी नक्कीच आहे.. किंवा होते इथे!
एक क्षण पटकन गाडीत बसुन निघुन जावं असं तिचं मन तिला सांगत होतं, पण त्याच वेळेला जे जाणवलं ते खरं होतं का तो एक भास हे जाणुन घेण्यासाठी तिचे मन तिला पुढे ढकलत होते. शेवटी ती सावधपणे गाडीपासुन बाजुला झाली. दृष्टीपथात असलेल्या रस्त्यावर तरी कोणतीच हालचाल नव्हती. डॉली दबकत दबकत पुढं सरकली. चंद्राचा प्रकाश अगदीच अंधुक नसला तरीही पुरेसा नव्हता.
तिने समोरची झाडी हाताने बाजुला सरकवुन काही दिसते आहे का बघण्याचा प्रयत्न केला. पण झाडीमध्ये दाट अंधार होता. बाहेरुन आतले काहीच दिसत नव्हते. पण आत मधुन, कोणी असेलच तर त्याला डॉली स्पष्ट दिसु शकत होती. भितीची एक संवेदना डॉलीच्या शरीरातुन वाहत गेली. डॉली पटकन बाजुला झाली.
थोडी फार शोधाशोध करुनही काही सापडले नाही तसे डॉली माघारी परतली. गाडीचे दार उघडुन आतमध्ये बसणार इतक्यात तिची नजर एका ठिकाणी गेली. गाडीच्या थोडे पुढे एक शेणाचा ढिग पडला होता आणि त्याच्या एका बाजुला.. हो नक्कीच.. कुणाच्या तरी.. मानवी पायाचा ठसा होता..
‘मगाचपासुन हे असेच आहे? की आत्ता..’ डॉलीने खुप आठवण्याचा प्रयत्न केला पण तिला काहीच आठवेना..
‘कुठल्या गावकऱ्याचा असण्याची शक्यता कमी, कारणं तो बुटाचा ठसा होता आणि गावातले कोणी बुट घालत असेल ह्याबद्दल डॉलीचे दुमत होईना.’
इथे अधीक काळ थांबण्यात अर्थ नाही हे जाणुन तिने पटकन गाडी सुरु केली आणि सरळ तरवडे गाव गाठले.
अडीच-तिन हजार लोकवस्तीचे ते छोटेसे गाव डोंगराच्या कुशीत विसावले होते. डॉलीला जॉनचा पत्ता शोधायला फारसे प्रयास पडले नाहीत.
जॉन रहात असलेले हॉटेल यथातथाच होते. मंद दिव्यात धुवुन निघालेला पॅसेज, पोपडे उडालेल्या भिंती, जवळ जवळ काळोखच म्हणावा अशी लॉबी आणि फाटलेले- कापुस बाहेर आलेले सोफे!!
काऊंटरवरच्या मालकाने डॉलिला एकदा आपादमस्तक न्हाहाळले आणि जॉन खोलीत नसल्याची माहीती दिली.
थोड्याश्या त्रासीक चेहऱ्यानेच डॉली तेथील एका खुर्चीत रेलुन बसली. आजुबाजुला काहीच नसल्याने शेवटी तेथे पडलेले जुने पेपर तिने उचलले आणि गावात घडलेल्या त्या दोन खुनांबद्दलच्या बातम्या ती वाचु लागली. साधारणं एक तास गेला असेल. दाराचा आवाज ऐकुन तिने वर बघीतले.
डॉलीला पाहुन आश्चर्यचकीत झालेला जॉन दारातच उभा होता. जॉनला पाहुन तिने हातातला पेपर फेकुन दिला आणि धावत जाऊन जॉनला मिठी मारली..
“सरप्राईज…” जवळ जवळ किंचाळतच ती म्हणाली.. पण तिचा आनंद फार काळ टिकला नाही.. “श्शी.. किती घाण वास येतोय तुझ्या अंगाला, आंघोळ करत नाहीस की काय? चल आधी रुम वर आणि आंघोळ कर, मग बोलु” असं म्हणत तिने आपले सामान उचलले आणि ती जॉनच्या मागोमाग चालु लागली.
*******
जॉन आवरुन आला तेंव्हा डॉली सिल्की नाईटी घालुन बिछान्यावर पहुडली होती. जॉनला पहाताच ती उठुन जॉनपाशी गेली आणि त्याच्या मानेभोवती आपले कोमल हात लपेटुन तिने जॉनचे एक दीर्घ चुंबन घेतले..
“मिस्ड यु डीअर.. ऍन्ड आय एम सो..सॉरी…” लाडात येत डॉली म्हणाली..
“नो.. आय एम सॉरी डॉली.. ऍन्ड लेट मी अल्सो कन्फेस इट..” असं म्हणत जॉनने डॉलीला आपल्या बाहुपाशात ओढले आणि तिचे एक दीर्घ चुंबन घेतले.
“.. पण तु इथे कशी?? आणि तुला कसे कळले मी इकडे आहे ते??” जॉनने विचारले..
“मग.. डीटेक्टीव्हची गर्लफ्रेंड आहे म्हणलं.. थोडेफार गुण माझ्यात पण नकोत?”.. प्रश्नार्थक मुद्रेने डॉली उत्तरली.. “ए.. पण काय रे.. कुठले हे घाणेरडे हॉटेल शोधलेस? चांगली हॉटेल्स नाहीत का इथे?”
“..हम्म.. असो..” असे म्हणुन जॉनने आत्तापर्यंतचा प्रवास आणि तपास डॉलीला सांगीतला.. “तर असं आहे बघ सगळं.. ह्या केसला किती प्रसिध्दी मिळते आहे हे तु जाणतेसच..उद्या जर तपासात पोलीसांपेक्षा जास्त प्रगती करु शकलो तर ह्या केसबरोबर मलाही तितकीच प्रसिध्दी मिळेल.. मग भले केस सॉल्व्ह हो., वा न होओ… खुनी पकडला जाओ किंवा न जाओ.. एकदा का माझं नाव झालं की शहरात जाऊन पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करता येईल..”
“ते ठिक आहे रे.. पण पोलीस काही झोपा काढत नाहीत.. तुला फार कष्ट घ्यावे लागतील पोलीसांना मागे टाकायला..”.. डॉली कपाळावरचे केस सरळ करत म्हणाली.. “ए… किंवा तु असं का नाही करत? तुच अजुन एक दोन खुन कर ना! आणि तुच काहीतरी सलग्नीत पुरावे गोळा करुन पोलीसांना दे.. त्या स्पायडरमॅनसारखे..”
“स्पायडरमॅन??” जॉन.
“हो.. म्हणजे बघ ना.. तोच ’पिटर पार्कर’ द फोटोग्राफर असतो आणि तोच स्पाय-डी. स्वतःच स्वतःचे फोटो काढुन पैसे कमवत असतो.. तस्संच..” असं म्हणुन डॉली खिदळु लागली..
जॉन मात्र काहीच न बोलता खिडकीबाहेर बघत होता..
“ए.. मी मजा केली हं नाही तर खरंच करशील खुन-बिन.. चल आता झोपायला, मला जाम झोप आली आहे..” असं म्हणुन डॉलीने दिवे मालवुन टाकले..
.. रात्री काही केल्या डॉलीला झोप लागेना. सतत कुशीवर कुशी बदलुनही झोप लागली नाही तसे वैतागुन डॉली उठुन बसली. जॉन शेजारीच गाढ झोपलेला होता.
“कश्यामुळे झोप लागत नसावी?”, डॉलीने स्वतःशीच विचार केला. “कदाचीत, बदलेली जागा, कदाचीत ऐशारामी, मलमली बेड ऐवजी हा कडक गादीचा बिछाना.. नाही、कारणं काही तरी वेगळेच होते.. काहीतरी.. वैतागवाणे.. कसलातरी वास सुटला होता खोलीभर.. कसला?.. कदाचीत शेणाचा???”
डॉली ताडकनं उठली..”शेणाचा वास!!, त्या घाटात, तिथे, कोणी तरी होते नक्की, तेथील शेणात कुणाचीतरी पावलं उमटलेली पाहीली होती..”
डॉली बिछान्यातुन खाली उतरली. सावधपणे ती दरवाज्यापाशी गेली. तो वास उग्र होत गेला होता. डॉलीने हळुवारपणे जॉनचे बुट उचलले. तिचा संशय खरा होता, जॉनच्या एका बुटाच्या तळव्याला शेण चिकटलेले होते.
“जॉन? तिथे जॉन होता? नाही, शक्य नाही. तो तेथे असता तर मला पाहुन लपला कश्याला असता? त्याला तर आणि माहीत पण नव्हते की मी येणार आहे? मग हा फक्त योगायोग होता? की..!!”
*******
दुसरा पुर्ण दिवस जॉन आणि डॉलीने एकत्रच घालवला. तिन महीन्यांची कसर दोघांनी एका दिवसातच भरुन काढली. जॉन डॉलीला घेउन गावाबाहेरच्या निसर्गरम्य परीसरात फिरुन आला.
हिरव्या रंगाचा पुल-ओव्हर आणि काळ्या रंगाची स्लॅक घातलेली डॉली पाहुन गावकर्यांचे डोळे विस्फारले होते. अर्थात डॉलीला अश्या सेकंडलुक ची सवय होतीच. शहरातील तरूण सुध्दा डॉलीला पाहुन वळुन बघत तिथे हे तर बिच्चारे गावकरी होते. डॉली स्वतःशीच हसली आणि जॉनला घट्ट पकडुन चालु लागली.
संध्याकाळी जॉन आणि डॉली दोघंही पोलिस चौकीवर गेले. जॉनने डॉलीने सुर्याबद्दल काढुन आणलेल्या माहीतीचा कागद पवारांना दाखवला.
“ह्या कोण?”, हातातल्या कागदाकडे बघतच इ. पवार म्हणाले
“ही डॉली!, माझी असिस्टंट. हिनेच ह्या सुर्याबद्दलची अधिक माहीती काढुन आणली आहे.” जॉन म्हणाला
“१८३६? ह्या काळातला हा सुरा आहे असं म्हणणं आहे का तुमचं?” इ. पवार अजुनही तो कागदावरचा मजकुर वाचत होते.
“होय पवार साहेब. त्या सुर्यावरील चित्रं, खाचा, त्याच्या मुठीची ठेवण, लांबी रुंदी सर्व काही तंतोतंत जुळते आहे. १८३६ साली जयपुरचे महाराज जसवंतसिंग ह्यांनी त्यांचा विश्वासु नोकर नाईक ह्यांना एक असल्या सुर्यांचा सेट भेट दिल्याची नोंद आहे. परंतु त्यानंतर तो कुणाकडुन कुठुन कसा फिरत ह्या गावात आला ह्याबद्दलचे तपशिल मिळवणे थोडे कठीण आहे.” जॉन
“हम्म.. परंतु तुम्ही जसे सांगताय, त्यावरुन हा सुरा खानदानी लोकांच्याकडेच असण्याची शक्यता जास्ती. त्याला ऐतीहासिक महत्व असल्याने सर्वसामान्यांकडे तो सापडणं शक्य वाटत नाही. आणि हे जर खरं असेल तर तरवडे गावातील एकमेव खानदानी कुटुंब म्हणजे..”
“भैय्यासाहेब!!??” इ.पवार आणि जॉन एकदमच म्हणाले.
“म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की हे खुन जे कोण भैय्यासाहेब आहेत त्यांनी केले?” डॉलीने विचारले
“नाही!.. निदान तसे आत्ताच काही म्हणणे योग्य ठरणार नाही. कारण भैय्यासाहेब ह्या गावातील एक प्रतिष्ठीत व्यक्ती आहेत. कदाचीत असेही असु शकेल की त्यांच्या नोकरांपैकीच कुणी हे कृत्य केलेले असेल! , कदाचीत त्यांना ह्या सुर्याबद्दल अधीक माहीती असेल. कदाचीत अधीक धागेदोरे तेथे मिळु शकतील..” इ. पवार खुर्चीवरुन उठत म्हणाले.., “सावंत, गाडी काढा, आपल्याला आत्ताच भैय्यासाहेबांकडे जायला हवे”
“पण साहेब, आत्ता? अंधार पडुन गेला आहे. निदान एक फोन करुन त्यांची परवानगी तरी..” सावंत
“सावंत, काम महत्वाचे आहे, चला तुम्ही”, आपली टोपी उचलुन पवार बाहेर पडले सुध्दा. मागोमाग जॉन आणि डॉली सुध्दा गाडीत जाऊन बसले.
*******
भैय्यासाहेबांची दगडी हवेली सि.एफ.एल आणि ट्युबलाईटच्या पांढर्या प्रकाशात बुडालेली होती. गेटपाशी २-४ गाड्या, रखवालदारांचा राबता, आजुबाजुला बागा भैय्यासाहेबांचे ऐश्वर्य दर्शवत होता.
“भैय्यासाहेबांना भेटायचं आहे, आहेत घरात?” पवारांनी दरवाज्यावरच रखवालदाराला विचारले.
“जी.. ते आत्ताच बाहेर गेल्येत, शेतामंदी, फेरफटका माराया!”, रखवालदार उत्तरला
“सावंत, तुम्ही इथेच थांबा, मी बघुन येतो” असं म्हणुन इ.पवार शेताकडे गेले, मागोमाग जॉन आणि डॉली सुध्दा गेले.
भैय्यासाहेबांची कित्तेक एकरांची शेती हवेलीला लागुन कित्तेक मैल दुर पसरली होती. नुकत्याच झालेल्या पावसाळ्याने पिकं जोमानं वाढली होती. आकाशात काळे ढग पुन्हा डोकावु लागले होते.
जोराचा वारा सुटला होता आणि त्यामुळे पिकांची होणारी सळसळ आणि तो भयाण आवाज अंगावर काटे आणत होता. चंद्राच्या अंधुक प्रकाशात जवळपास तरी कुठे मानवी आकृती नजरेस पडत नव्हती.
“भैय्यासाहेबsss”, इ.पवारांनी एक हाक मारली
बराच काळ शांततेत गेला. कुणाचाच आवाज नाही.
“भैय्यासाहेबsss”, इ.पवारांनी पुन्हा एक हाक मारली.. परंतु काहीच प्रत्युत्तर आले नाही.
“जॉन.. आपण तिघंही वेग वेगळ्या दिशेने जाऊ आणि भैय्यासाहेबांचा शोध घेऊ. दहा मिनीटांनी पुन्हा इथेच भेटु”, असं म्हणुन इ.पवार शेतात शिरले
“डॉली, तु इथेच थांब, तु नको शेतात शिरुस. मी बघुन येतो. काही वाटलंच तर सरळ हवेलीकडे परत जा”, असं म्हणुन जॉन सुध्दा शेतात घुसला.
त्या काळ्याकुट्ट अंधारात डॉली एकटीच उभी होती. तिचे डोळे काळोखाचा वेध घेण्याचा प्रयत्न करत होते. तिचे कान कसलाही नाजुकसा आवाज टिपण्यास उद्दीप्पीत झाले होते. पाच मिनीटं होऊन गेली परंतु कसलीच हालचाल नव्हती. आणि त्याच वेळी जवळपास कोणीतरी असल्याची भयाण जाणीव डॉलीला झाली. तिच्या खांद्याचे आणि पाठीचे स्नायु कडक झाले. मानेवरचे केस ताठ उभे राहीले.
डॉली कसलीही हालचाल करायला घाबरत होती. न जाणो आपण हालचाल करावी आणि ते जे कोणी आहे त्याला आपण दृष्टीस पडु, म्हणुन डॉली स्तब्ध उभी होती.
तिच्या पाठीमागुन कोणाच्यातरी खुरडत चालण्याचा आवाज येऊ लागला होता. आवाज जवळ जवळ येत चालला होता आणि अगदी जवळ, डॉलीच्या पाठीमागे येउन थांबला.
डॉलीचा श्वासोच्छ्वास जोराने चालु होता. घश्याला कोरड पडली होती. तो आवाज थांबला होता. कोणी आलेच असेल तर ते डॉलीच्या अगदी मागे उभे होते. डॉली सावकाश मागे वळली.
[क्रमशः]
[भाग ६]