Tag Archives: marathi kathamarathi storythriller story

डबल-क्रॉस (भाग १४)


भाग १३ पासून पुढे>>

भन्नाट वेगाने जिमी आपली खटारा कावासाकी पळवत होता. आजूबाजूचे कशाचेच भान त्याला नव्हते. कॅसिनो लुटण्याचा त्याचा प्लॅन पूर्णपणे फसला होता. पैसे तर नाहीच मिळाले आणि आता नाहक पोलिसांचा ससेमिरा कायमचा मागे लागणार म्हणून त्याचा संताप संताप झाला होता.

“जिमी यार, आपलं ठरलं होतं ना? तू.. तू का खून केलेस तिथे आणि ते पण एक-दोन नाही तर तीन?”

जिमीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो आपली बाईक वेगाने पळवण्यात मग्न झाला

“जिमी, तुझ्याशी बोलतोय मी साल्या.. शांततेत सगळं झालं असतं, कश्याला तापलेलं असतं डोकं तुझं? तू तर लटकशीलच, मला पण नाहक त्या मर्डर मध्ये ओढलंस तू.. ”

जिमिनी चेहऱ्यावर आलेले आपले केस मागे सारले..

“जिमी.. कळतंय का तुला आपण काय करून बसलोय.. साला ते पोलीस एव्हाना आपल्या मागावर निघाले असतील.. तुला.. ”
“ए… फट्टू, गपतो का आता? केव्हापासून तुझं तुणतुणं चालूच आहे.. एव्हढी फाटतीय तर उतर गाडीवरुन आणि जा तुझा तू..”
“साल्या माझ्यावरच खेकस, स्वतः चुका कर, आम्ही बसलोय सावरायला.. ”

“आता काय करायचं? घरी जायचंय का?”, काही वेळ शांततेत गेल्यावर रोशन म्हणाला
“हो मग? अजून कुठे जाणार? घरी जाऊ, बॅग घेऊ अन काही दिवस सुमडीत गायब होऊ कुठे तरी.. ”
“वाटलंच मला.. जरा डोकं लाव जिमी.. आपण कॅसिनोपासून निघालो ह्या रस्त्याने.. सरळ रस्ता आहे, कुठे चौक नाही कि एखादे वळण नाही.. १० किलोमीटरवर पुढे कुर्डुवाडीची हद्द सुरु होतीय.. पोलिसांना एव्हाना कळाले असेलच आपण ह्या रस्त्याने गेलोय.. एव्हाना पुढे नाकाबंदी लागली असेल.. आपण सहज त्यांच्या जाळ्यात अडकू..”,

रोशनच म्हणणं बरोबर होतं आणि जिमीलाही ते पटलं तसा त्याने गाडीचा वेग कमी केला

“मग आता? आता मागे तर जाऊ शकत नाही, पोलिसांची जीप ह्या दिशेने केंव्हाच निघाली असेल.. ”

दोघे पुन्हा विचारात गुंग झाले ..

“एक मिनिट… ” अचानक काहीतरी सुचल्यासारखं जिमी म्हणाला

“तो मागे ५ मिनिटांपूर्वी एक छोटा वॉटरफॉल दिसला होता आठवतंय?”, जिमी
“वॉटरफॉल ? नाही.. माझं लक्ष नव्हते..”
“अरे तो नाही का, आपल्याला तिथे एक डेम दिसली होती, रेड-व्हाईट कलरची पजेरो होती… ”
“ओह येस.. आठवलं, त्याच काय?”

“सांगतो थांब..”, असं म्हणून जिमीने गाडी मागे वळवली
“चुत्या झाला का रे, मागे कुठे चाललास?”, वैतागून रोशन म्हणाला

पण जिमी नवीन उमीदेने मागे चालला होता.. त्या वॉटरफॉल च्या काही अंतर आधी त्याने गाडीचा वेग हळू केला. तो बारकाईने रस्त्यावर काहीतरी शोधात होता. थोडे अंतर गेल्यावर त्याला हवं होते ते सापडलं.

“हे बघ.. ” रस्त्यावरच्या फिक्कट झालेल्या चिखलाच्या टायरच्या खुणांकडे बोट दाखवत जिमी म्हणाला..

रस्त्यावरुन वळून ते चिखलाच्या टायरचे ठसे उजवीकडे झाडीत जात होते

जिमीने आपली गाडी त्या टायरमार्क्सवरून पुढे न्हेली आणि त्याला आतमध्ये जाणारा एक छोटासा रस्ता नजरेस पडला.

“मला म्हणतोस ना डोकं चालव.. बघ भाड्या.. माझं डोकं..”

जिमीने सावकाश त्या कच्या रस्त्यावरून बाईक आतमध्ये न्हेली आणि काही अंतरावरच त्याला चिखलात रुतलेली पजेरो नजरेस पडली.

जिमीने आपला एक हात हवेत उंच केला आणि रोशनने त्याला आनंदाने टाळी दिली.

कच्या रस्त्याचा अंदाज घेत जिमीने सावकाश आपली बाईक पुढे पुढे न्हेली आणि शेवटी त्यांना ते शेखरचे फार्महाउस नजरेस पडले.

जिमीने बाईक बंद केली आणि दोघेजण बाईकवरून खाली उतरले. जिमीने आपली बाईक हाताने ढकलत बाजूच्या झुडपात न्हेली, सहज कुणाला दिसणार नाही अशी आडवी करुन ठेवली आणि तो परत त्या कच्या रस्त्यावर आला

“काय बोलतोस? घुसायचं?”, आपला रक्ताळलेले सुरा बाहेर काढत जिमी म्हणाला
“काय माहीत कोण असेल आतमध्ये..”, रोशन काहीसा चिंतीत होऊन म्हणाला
“कोण नसेल, मी सांगतो.. ती डेम, आणि तिच्याबरोबर तो जो कोण होता.. दोघेच असणार आत.. ”
“कश्यावरुन?”
“बघ ना.. इथं आडवळणाला कश्याला कोण राहत असेल? हि सगळी श्रीमंत लोकांची थेर आहेत.. आपल्या नवरा / बायकोला फसवून आपल्या ठोक्याला घेऊन येतात इथे दोन दिवस राहतात, मजा करतात आणि परत आपल्या लाईफ मध्ये रिटर्न.. त्या दिवशी तो तिच्याबरोबर होता… तिचा नवरा वाटत तरी होता का? ती कसली क्लासी कपड्यांमध्ये होती.. आणि तो साधा.. ”
“हो, असेल साधा, पण अंगाने मजबूत होता… ”
“हो मग, असणारच, म्हणून तर त्याला घेऊन आली असेल इथे, मजा मारायला..”, डोळे मिचकावत जिमी म्हणाला
“नाही तसं नाही, म्हणजे आपल्याला भारी नको पडायला..”
“छट्ट.. हा सुरा हातात असताना? तसाही दुसरा मार्ग नाहीए कुठला.. २-३ दिवस इथेच लपून राहू.. पुढचं पुढं.. चल..”, अस म्हणून जिमी झाडांच्या आडोशाने पुढे निघाला सुद्धा .. रोशनला दुसरा कुठला मार्ग नव्हता, तो जिमीच्या मागोमाग दबकत दबकत निघाला

घराच्या जवळ गेल्यावर जिमी थांबला आणि तो परिस्थितीचा अंदाज घेऊ लागला. सर्वत्र सामसूम होती, घरातून कुठलाही आवाज येत नव्हता, दिवे बंद होते, दारं लावलेली होती

“मला वाटत एक तर बाहेर गेले असावेत, किंवा गाडी बंद पडली म्हणून ती इथेच सोडून दुसऱ्या गाडीने निघून गेले असावेत. सध्या तरी घरात कोणी असेल असे वाटत नाही.. “, जिमी पुन्हा हळू हळू वाकत पुढे सरकत म्हणाला

शेवटी दोघंहीजण घराच्या पॅसेज मध्ये येऊन पोहोचले. दाराला बाहेरुन कडी होती.

जिमीने रोशनला खूण केली आणि डावीकडून घराच्या मागे जाऊन बघून यायला सांगितले आणि तो उजव्या बाजूने कसलाही आवाज न करता घराच्या मागे पोहोचला. परंतु कुणाचीही चाहूल लागत नव्हती. सर्वत्र शांतताच होती.

दोघेजण पुन्हा मुख्य दारापाशी आले. जिमीने हळूच कडी काढली आणि दार ढकलले. दार सहज उघडले गेले तसे दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य पसरले. दोघेजण आतमध्ये शिरले आणि त्यांनी दार लोटून घेतले.

आतमध्ये एक खुर्ची आणि टेबल अस्ताव्यस्त पडले होते.. फ्लॉवरपॉट फुटून पडला होता..टेलीफोनची वायर कापलेली होती

“काय झालंय काय इथे?”, रोशन
“जोरदार प्रेम रंगलेलं दिसतंय जोडप्याचं..”, हसत हसत जिमी म्हणाला.. “एक काम कर, आतमध्ये बघ काय काय आहे?, कपड्यांचं कपाट बघ, त्यावरून कळेल कोण कोण राहतंय इथे…”,

रोशनने मान डोलावली आणि तो आतल्या, शैलाच्या, बेडरुममध्ये गेला..
कपाट विविध-प्रकारचे कपडे, सिल्की नाइटी, महागड्या अंतःवस्त्रांनी भरलेले होते..
“मॅडमची बेडरुम आहे हि..”, बाहेर येत रोशन म्हणाला आणि दुसऱ्या, करणच्या खोलीत शिरला ..
एका छोट्या कपाटात काही साधेच शर्ट-पँट्स लटकवलेले होते ..
“हि त्या पंटरची खोली दिसतीय.. ” असं म्हणून रोशन शेखरच्या खोलीत शिरला..
कपाटात उंची कपडे होते, त्यातला एक टी-शर्ट घेऊन तो बाहेर आला

“हा एव्हढा मोठ्ठा टीशर्ट त्या पंटरचा वाटत नाही रे, म्हणजे अजुन कोणतरी राहातंय इथे, तिघांचे कपडे आहेत.. “, रोशन जिमीला म्हणाला

रोशन बोलत होता, जिमी मात्र जमिनीवर बसून नखाने जमीन खरवडून बघत होता..

“काय झालं जिमी..?”, रोशनने विचारले
“काही तरी नक्की झालंय इथे.. हे बघ..”, आपलं बोट रोशनच्या नाकाजवळ न्हेत जिमी म्हणाला.. “वाळलेले रक्त आहे हे.. “, असं म्हणून त्याने जमिनीवरच्या एका गडद डागाकडे बोट दाखवले
“भेंडी, आपण एका लफड्यातून निघून दुसऱ्या लफड्यात तर नाही ना अडकलो..? जिमी लेका, चल निघू इथून बाहेर..”, जिमीला ओढत रोशन म्हणाला

जिमीने काळजीपूर्वक इतरत्र नजर फिरवली आणि एका कोपऱ्यात त्याला एक छोटी मेटलची वस्तू सापडली

“हे बघ काय आहे..”, रोशनपुढे ती वस्तू नाचवत जिमी म्हणाला
“तिजायला, पुंगळी ना ही?”, रोशन
“एस, बंदुकीची गोळी ए .. ”
“जिमी चल यार इथुन .. मरायची लक्षण आहेत ही .. ”

“अबे थांब तर.. बाहेर जाऊन काय करणारे.. सगळे मामु लोक शोधत असतील आपल्याला.. एक काम करू.. थोडं थांबू इथेच.. कदाचित इथली लोक निघून पण गेली असतील.. बस.. “, खुर्चीकडे बोट दाखवत जिमी म्हणाला

“ठीके, पण मग आधी काहीतरी खायला, प्यायला आहे का बघतो, आतमध्ये एक मोठ्ठा फ्रिज आहे, काही असेल तर घेऊन येतो”, असं म्हणून रोशन पुन्हा आतमध्ये, शेखरच्या रुममध्ये गेला

जिमीने आपला सुरा टेबलावर ठेवला आणि खुर्चीवर बसतच होता तोच रोशनने त्याला जोरात हाक मारली

जिमी तडफडत उठला आणि आतल्या खोलीत गेला.. समोर रोशन फ्रिज उघडून उभा होता.. भीतीने त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता.
जिमी रोशनच्या जवळ गेला आणि त्याने फ्रिजमध्ये वाकून पहिले.. आतमध्ये बर्फाचे कण साठलेली शेखरची बॉडी पडली होती
रोशनने धाडकन फ्रीजचा दरवाजा बंद करुन टाकला

“मला वाटतं हा बाबाजी त्या हिरोईनचा नवरा असणार.. इथे अचानक टपकला असणार, त्या दोघांना रंगेहाथ पकडले असणार आणि त्याच वादावादीत मला वाटतंय त्या दोघांनी ह्याचा खून केला.. “, जिमी आपला अंदाज वर्तवत होता

रोशनमात्र पायातले त्राण गेल्याने त्या बेडवर फतकल मारुन बसला

“ही बाबाजींची बॉडी इथे अशीच सोडून ते निघून जाणार नाहीत, इथेच कुठेतरी गेले असणार, कदाचित ह्या बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी काहीतरी आणायला जवळपासच गेले असतील.. आपल्याला बेसावध राहून चालणार नाही, चल.. उठ..”, रोशनला उठवत जिमी म्हणाला

“एक लक्षात ठेव, काही झालं तरी आपण एकमेकांना नावाने हाक मारायची नाही.. कळलं ?”, जिमी रोशनला टिप्स देत होता त्याच्या काही मिनिटं आधीच काही अंतरावरच करण आणि शैला मोहीतला शोधण्यात व्यस्त होते.

 

मोहीतला शोधत शैला आणि करण काहीश्या घनदाट झाडीत शिरले होते. परंतु मोहीतचा काहीच ठावठिकाणा लागत नव्हता. नक्की कुठल्या रस्त्याने गेलाय ह्याचाही काही पत्ता नव्हता.

आधीच मोहीत गायब होता, इशिता वॉज नो मोअर, शेखरची बॉडी घरातच फ्रिजमध्ये पडली होती, एक ना दोन, अनेक संकट आ वासुन समोर उभी होती.. पण त्याही परिस्थितीत करणची नजर पुन्हा पुन्हा शैलाकडे जात होती. त्या घनदाट झाडीत, प्रचंड शांततेत आणि एकांतवासात शैलाबद्दल करणच्या मनात नाही नाही ते विचार येत होते. केबिनमधील शैलाचा तो नग्न देह पुन्हा पुन्हा त्याच्या नजरेसमोर येत होता.

“करण… आवाज ऐकलास..” अचानक सावध होत शैलाने विचारलं

शैलाच्या आवाजाने करण भानावर आला

“आवाज? कसला?”

“अरे एखाद्या गाडीचा आवाज होता.. एखादी मोटारसायकल .. ”
“छ्या, रस्ता दूर आहे इथून, तिथल्या गाड्यांचा आवाज कुठला येतोय इथे..”
“अरे खरंच .. मी ऐकला .. काही क्षणच आला आणि लगेच बंद झाला”
“शैला, कमॉन, इथे कश्याला कोण येणार आहे बाईकवरून?”
“तेच मला म्हणायचंय.. चल बघून येऊ.. मोहित काही सापडायचा नाही.. आणि घराचं दार पण उघडच आहे..”

करणने कुठलाही आवाज ऐकला नव्हता, पण धोका पत्करून उपयोग नव्हता, शैला म्हणते त्याप्रमाणे खरंच कोणी मोटारसायकल वरुन आलं असेल तर त्यांना घरात जाण्यापासून रोखणं गरजेचं होत. तसंही इतकावेळ शोधाशोध करुन मोहीतचा काहीच सुगावा लागला नव्हता

करण आणि शैला त्या दाट झाडीतुन घराकडे जायला माघारी वळाले.

कच्या रस्त्यावर आल्यावर त्यांनी फार्म-हाऊसकडे नजर टाकली. सर्व काही जैसे-थेच होते. आजूबाजूलाही कुठलीही बाईक किंवा इतर गाडी दिसत नव्हती.

“बघ.. कोणी नाहीए इथे, भास झाला असेल तुला.. “, करण
“ठीके, पण तरी एकदा बघून येऊ”, शैला

करण आणि शैला आवाज न करता शांतपणे फार्म-हाऊसजवळ गेले आणि दोघांनाही मोठ्ठा धक्का बसला.

दाराची कडी काढलेली होती

“शैला, तुला नक्की आठवतेय तू दाराला कडी लावली होतीस?”, दबक्या आवाजत करण म्हणाला
“ऑफकोर्स, मला नक्की आठवतंय”

करणने खिश्यातुन शैलाची ऍटोमॅटिक रिव्हॉल्व्हर काढली आणि त्याने सावकाश दार उघडले

बाहेरच्या उजेडातून आल्यामुळे आतमध्ये प्रथम करणला काहीच दिसत नव्हते, सर्वत्र अंधार होता.
काही क्षण अंदाज घेऊन करण सावकाश आतमध्ये शिरला.. एक सेकंदाचा कित्तेकांवा अंश.. त्याला जाणवले दाराच्या मागे कोणतरी नक्की आहे, पण वेळेपर्यंत उशीर झाला होता. दाराच्या मागे जे कोण होते त्याने जोराचा धक्का करणला मारला होता.

करण हेलपांडत आतमध्ये शिरला.

दारामागे लपलेल्या त्या व्यक्तीने, रोशनने करणच्या पोटात एक जोरात लाथ घातली तशी करणची बंदुकीवरची पकड काहीशी ढिली झाली..
रोशनने पटकन त्याच्या हातातून बंदूक काढून घेतली

काय होतेय कळताच शैला रोशनच्या अंगावर धावून गेली, पण काही क्षणच, दुसऱ्या एका व्यक्तीने मागून तिचे केस जोरात खेसले.. वेदनेची एक तीव्र कळ शैलाच्या डोक्यात उमटली. शैला प्रतिकार करायला मागे वळाली तशी त्या दुसऱ्या व्यक्तीने, जिमीने एक तडाखेबाज कानफडाट शैलाच्या लगावून दिली.

शैलाच्या डोळ्यासमोर तारे चमकले

“लैला मजनु, तुमची लटकी मारामारी झाली असेल तर समोर सोफ्यावर गुमान बसा, नाहीतर तो फ्रिजमध्ये बाबा झोपलाय ना, त्याच्याशेजारी तुमची सोया करेन..”

जिमीचा धमकीने भरलेला आवाज आणि त्यापेक्षा त्यांनी शेखरची बॉडी पाहीली आहे हे ऐकून दोघांचेही अवसान गळाले. आतमध्ये अंधार असल्याने त्या दोन व्यक्ती कोण आहेत? कश्या आहेत? त्यांच्याकडे काही शस्त्र आहेत का? कशाचाच पत्ता लागत नव्हता.

दोघेजण गपचूपपणे सोफ्यावर जाऊन बसले

रोशनने दार लावून घेतले आणि दिव्याची बटण दाबली.

खोली प्रकाशाने उजळली आणि रोशन आणि जिमी, करण आणि शैलाच्या नजरेस पडले.
रोशनने शैलाची पिस्तुल दोघांवर रोखलेली होती, तर एखादी गदा खांद्यावर ठेवावी तसा तो मोठ्ठा सूर खांद्यावर ठेवून जिमी उभा होता.

शैला संतापाने बेभान झाली होती, रागाने तिच्या नागपुड्या फुरफुरत होत्या, तिचा गोरा गोमटा, नाजूक गाल, जिमीची थप्पड खाऊन लाल झाला होता. करण मात्र शांत होता. शक्य तितक्या कमी वेळात तो त्या दोघांचा अंदाज घेत होता.

रोशनकडे बंदूक असली तरी रोशन त्याला तितकासा धोकादायक वाटत नव्हता.. अगदीच वेळ आली तरी तो बंदूक चालवेल की नाही ह्याची खात्री नव्हती. पण तो दुसरा, जिमी मात्र नक्कीच धोकादायक होता.

“कोण आहात तुम्ही? आणि आमच्या घरात काय करताय?”, करणने विचारले
“ते तितकंसं महत्वाचं नाही”, जिमी
“वुई डोन्ट एन्टरटेन स्ट्रेंजर्स, गेट आऊट”, शैला चवताळून म्हणाली
“एंटर काय? स्ट्रेंज? बाबाव, काय इंग्लिश बोलतीय…”, हसत हसत जिमी म्हणाला

“तुमचं काय काम आहे ते बोला आणि निघा इथून..”, करण म्हणाला
“निघतो कि.. २-३ दिवस इथला पाहुणचार घेतो आणि निघतो..”, जिमी
“का? पोलिसांपासून लपताय का?”, करण
“तसं समज.. आणि अजून एक गोष्ट समजून घे, इथून पुढे प्रश्न आम्ही विचारू.. तुम्ही फक्त उत्तर दयायची”, अचानक गंभीर होत जिमी म्हणाला

त्याने आपला सुरा खुर्चीशेजारील टेबलावर ठेवला आणि तो खुर्चीत रेलुन बसला. रोशन अजूनही ती बंदूक दोघांवर रोखून उभा होता

“कौन बनेगा करोडपती, एक हजार रुपये के लिये, ये रहा पहिला सवाल..”, आपले लांब केस बांधत जिमी म्हणाला.. “तो फ्रिज मधला बाबाजी कोण? आणि इथं नक्की काय झालंय?”

“गेट लॉस्ट यु जंक-हेड..”, संतापुन शैला म्हणाली

“लय इंग्लिश बोलती राव ही…”, जिमीने खिश्यातुन आपला बाजा काढला आणि कुठलीशी शांत पण अतिशय दुःखद अशी ट्यून वाजवायला त्याने सुरवात केली. डोळे बंद करून त्या विचित्र, मधूनच हाय-पिच ला जाणाऱ्या दळभद्री ट्युनचा तो आनंद घेत होता

थोड्यावेळाने त्याने डोळे उघडले आणि म्हणाला, “शेवटचं विचारतोय.. इथं काय झालाय? तो फ्रिजमधला बाबा कोण?”
“आय सेड गेट लॉस्ट.. “.. पण शैलाच वाक्य अर्धवटच राहिलं

क्षणार्धात जिमी खर्चीतुन उठला आणि शैलाच्या केसाला धरून तिला जमिनीवर फेकले आणि निर्दयीपणे बुटाची एक लाथ तिच्या पोटात घातली

शैलाच क्षणभर श्वासच कोंडला, सगळं जग आपल्याभोवती गोल फिरतंय कि काय असच तिला वाटलं
“मला वाटत आता तुला नीट कळलं असेल मी काय म्हणतोय?”, जिमी परत खुर्चीवर बसत म्हणाला

सगळं खरं सांगावं? का काहीतरी काल्पनिक गोष्ट बनवून सांगावी ह्या द्विधा मनस्थितीमध्ये करण अडकला होता.

एकतर इतक्या कमी वेळात काल्पनिक सांगण्यासारखं त्याला काही सुचत नव्हतं आणि दुसरा विचार त्याच्या मनात आला कि कदाचीत .. कदाचीत ह्या सगळ्या प्रकरणात गुंतलेले पैसे कळले तर न जाणो कदाचीत ह्या दोघांची मदतही होईल. दोनाचे चार हिस्से होतील, पण ह्या घडीला ह्यातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग करणला दिसत नव्हता.

करणने एकदा शैलाकडे वळुन बघितले, कदाचित तिच्या मनातही तोच विचार चालू होता जो करणच्या होता.

करण सोफ्यावर आरामात टेकुन बसला आणि त्याने पहिल्यापासून सर्व सांगायला सुरुवात केली.

 

“इंटरेस्टिंग.. व्हेरी इंटरेस्टिंग…”.. शैलाकडे बघत जिमी म्हणाला

ही समोर बसलेली बेबी-डॉल दोन-दोन खून करु शकते हे ऐकून तो खरं तर शैलावर फुल्ल फिदा झाला होता.

“तर तुला म्हणायचंय, जर का हे प्रकरण आपण नीट हाताळलं, तर आपल्याला ७५ करोड रुपये मिळतील.. रोशन ७५ चे चार हिस्से किती रे?”, जिमी
“नाही.. ७५चे चार हिस्से होणार नाहीत.. पण ह्यात तुमची मदत झाली तर तुम्हा दोघांना आम्ही ५-५ करोड देऊ..”
“आणि नाही मान्य केलं तर?”, जिमी आपला सुरा हवेत उंचावत म्हणाला

“आम्हाला मारुन तुला काहीच मिळणार नाहीए, घरातलं सगळं किमती सामान, शैलाचे दागिने मिळून १५-२० लाख सुद्धा होणार नाहीत.. शिवाय.. पैश्याची तुम्हाला सुद्धा गरज आहे.. पोलीस कुत्र्यासारखे शोधत असतील तुम्हाला..”, आपला मोबाईल जिमीसमोर धरत करण म्हणाला

मगाशी घराबाहेर होतो तेंव्हा मोबाईलमध्ये रेंज येऊन गेली असेल.. हि बघ.. न्यूज-फीड मध्ये तुमची बातमी झळकतीय.. “कॅनबेरा कॅसिनो ..” बरोबर ना?

मोबाईलवर ती बातमी बघताच जिमी जरा नरमला

“आत्ता ह्या घडीला आपण चौघंही ह्या घरात अडकले आहोत.. इथून पळून जाण ना तुम्हाला शक्य आहे ना आम्हाला.. तर एकमेकांच्या विरोधात नाही तर एकमेकांच्या साथीने आपण ह्या प्रकरणातून बाहेर पडू… पुढे भरपूर पैसा आपली वाट बघतोय..”, करण शेवटचं वाक्य प्रत्येक शब्दावर जोर देत सावकाश पणे म्हणाला

जिमीने रोशनकडे बघितले

रोशनला तसाही हाणामारी करण्यात फारसा उत्साह नव्हता, सगळं प्रकरण प्रेमाने निवळत असेल शिवाय करण म्हणतोय त्याप्रमाणे पैसेही मिळणार असतील तर का नाही? जिमीवरचा त्याचा विश्वास उडाला होता. त्याच्या धसमुसळी वृत्तीने ते रॉबरीचे प्रकरण चांगलेच अंगाशी आले होते. त्यामानाने करण बऱ्यापैकी विश्वासू वाटत होता.

रोशनने होकारार्थी मन डोलावली.

“ठीक आहे, आम्ही तयार आहोत.. पण काही शहाणपणा करायचा प्रयत्न केलास तर लक्षात ठेव.. आधीच ३ खून करून आलोय इथे, अजून दोन करायला मला फारसा विचार करावा लागणार नाही.. ” जिमी

“मला वाटत शहाणपणा करणं आपल्यापैकी कुणालाच परवडणार नाहीए.. नाही का? सो आता मुख्य मुद्याचं बोलूयात?”, करण
…..

“गुड.. सो बाकीचा प्लॅन नंतर, आत्ता आपल्यापुढे दोन मोठ्ठे प्रश्न आहेत.. पहिला .. जर मोहीत इथून सरळ पोलिसांकडे गेला.. झाला प्रकार त्याने पोलिसांना सांगितला तर कुठल्याही क्षणी इथे पोलीस पोहोचत असतील.. “, करणने बोलता बोलता जिमी आणि रोशनकडे पहिले

जिमी निर्विकार होता, पण पोलिसांचं नाव ऐकताच रोशनचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला होता.

“अर्थात मला वाटत नाही कि मोहीत असं काही करेल, शेवटी त्यानेही ब्लॅकमेलींग करायचा प्रयत्न केला होता.. आपल्याला अडकवायचा प्रयत्न केला तर तो पण अडकेल.. त्यापेक्षा हा सगळा प्रकार अक्कलखाती लिहून तो गायब होयचं बघेल.. ”

“मलाही तसंच वाटतंय.. “, जिमी

“दुसरा प्रश्न म्हणजे, काल संदीपने स्पष्ट सांगितले होते कि त्याला शेखरशी बोलायचे आहे, त्याशिवाय तो ब्लॅकमेलचे पैसे देणार नाहीए.. आज जर त्याच बोलणं शेखरशी नाही झालं तर त्याला संशय येईल.. जर चुकून माकून तो घर शोधत इथे पोहोचला तर.. ”

“… तर तो इथून परत जिवंत जाणार नाही.. “, जिमी पुन्हा आपला सुरा पाजळत म्हणाला

“हे बघ, संदीप कुणी गल्लीतील शेंबडं पोरगं नाहीए कि कधीही उठून कुठेही निघून जाईल …. एका मोठ्या इन्शोरंन्स कंपनीचा सर्वेसर्वा आहे तो.. प्रत्येक वेळी तो कुठे आहे, कुठे जातोय, कधी परत येणार ह्याची माहिती किमान दहा लोकांना तरी असते.. तो काही तास जरी गायब झाला ना तरी त्याला शोधायला अख्खी यंत्रणा कामाला लागेल.. त्यामुळे ह्यापुढे कुठलीही गोष्ट करताना, प्रत्येक पाऊल उचलताना आपल्याला नीट विचार करून ती गोष्ट करणं अत्यंत महत्वाचं आहे.. ”

“बर साहेब.. मग काय करायचं म्हणताय?”, जिमी

करणने काही क्षण शांतपणे विचार केला आणि मग आपला कच्चा तयार झालेला प्लॅन सांगायला सुरुवात केली

 

[क्रमशः]

डबल-क्रॉस (भाग १३)


भाग १२ पासून पुढे >>

३१ ऑक्टोबरची संध्याकाळ आत्ता कुठे सुरू होत होती, पण कॅनबेरा कॅसिनो आधीच गर्दीने फुलून गेला होता. आधीच ऑक्टोबरफेस्ट निमित्ताने बिअर्सवर असलेला डिस्काउंट काय कमी कारण होते की आता त्यात हॅलोवीन पार्टीची भर पडली होती. चित्रविचित्र पोशाख घातलेले अनेकजण खाद्यपदार्थ आणि निरनिराळ्या ड्रिंक्सचा आस्वाद घेण्यात मग्न होते. कॅसिनोच्या मध्यावर असलेल्या गोलाकार स्टेज वर दोन फटाकड्या मुली ‘दिलबर..’ गाण्यावर पोलभोवती नाचत होत्या.

कॅसिनोच दार उघडून पायरेट्सचे कपडे घातलेले साधारण पंचविशीतले दोन तरुण आत आले. एकाने आपला एक डोळा झाकला होता आणि हातात एक प्लॅस्टिकची बंदूक धरली होती, तर दुसऱ्याने आपला चेहरा रंगवला होता आणि हातात एक ६” सुरा धरला होता. कॅसिनोमधील लोकांनी दार उघडून आलेल्या त्या व्यक्तींकडे क्षणभर बघितले आणि परत ते आपल्या गप्पांमध्ये मग्न झाले.

काही क्षण दारात थांबून त्या दोघांनी कॅसिनोच्या अंतरंगाचे निरीक्षण केले आणि मग त्यांनी आपला मोर्चा बार काऊंटरकडे वळवला. पाठीला लावलेल्या स्विगीच्या मोठ्या फुड transport bag त्यांनी खाली ठेवल्या आणि एका कोपऱ्यातील जागा पकडून त्यांनी ड्रिंक्सची ऑर्डर दिली.

एव्हाना ‘दिलबर..’ गाणं संपून आता जुन अक्स चित्रपटातलं ‘ये रात..’ गाणं सुरू झालं होत. काळया रंगाची टाईट फिट लेदर पँट, झिरझिरीत पांढरा शर्ट, त्यावर टाय घातलेली तरुणी त्या पोलभोवती अंगाला झटके देत ठुमकत होती.

“छ्या काय फालतू नाचतीय ही, सगळी उतरवून टाकली..”, हातातला पेगचा ग्लास काउंटरवर आपटत एक चाळीशीतला गृहस्थ पुटपुटला.

डोक्यावरची एलिडी ने चमकणारी शिंग त्याने नीट केली आणि शेजारी एक डोळा झाकलेल्या त्या तरुणाला म्हणाला, “काय नाचलीय रवीना ह्या गाण्यावर.. तुला सांगतो, त्या काळी राहुलच्या ७०एम एम स्क्रीनवर काय वाटायचं हे गाणं बघायला.. थंडगार एसी मध्येही घाम फुटायचा.. नाहीतर ह्या.. उसाच चिपाड नुसत्या..”

डोळा झाकलेल्या त्या व्यक्तीने, अर्थात रोशनने, नुसतीच मान डोलावली.

“आय एम अ बॅड बॅड डेव्हील”, आपल्या शिंगांकडे बोट दाखवत तो इसम परत म्हणाला
“आम्ही पायरेट्स, हा कॅसिनो लुटायला आलोय…”, हसत हसत शेजारी बसलेल्या दुसऱ्या तरुणाकडे, अर्थात जिमीकडे, बोट दाखवत रोशन म्हणाला
“येस, येस, आय कॅन सी दॅट. ही बंदूक पण खरी असेल ना?”
“अर्थात”, असं म्हणून रोशनने आपली बंदूक त्या माणसावर रोखली आणि खटका दाबला.. त्याबरोबर बंदुकीतून एक प्लास्टिकचा बाण निघाला आणि त्या माणसाच्या कपाळावर जाऊन चिकटला

“आणि हा चाकू?”, कमरेला लटकवलेल्या चाकूकडे बोट दाखवत त्या इसमाने विचारले
“तर तर.. हा पण खराच आहे”

रोशनने तो चाकू त्या इसमाच्या समोर धरला आणि बोटाने त्या चाकूचे पाते दाबले, तसे ते पाते आतमध्ये दाबले गेले.

“हो हो हो हो.. ब्रिलियंट ” ग्लासमधली स्कॉच तोंडाला लावत तो इसम म्हणाला

दोघेही हसण्यात मग्न झाले, तेंव्हा जिमी हळूच खुर्चीवरून उठला आणि कॅसिनोच्या अंतरंगात शिरला.

सहज फिरता फिरता जिमी परिस्थितीची पाहणी करत होता. डान्सफ्लोअर वर विखुरलेल्या ४-५ बाउंसरची त्याला काळजी नव्हती. हातातला सुरा खरा आहे कळताच निम्मे-अर्धे सो-कॉल्ड बाऊंसर्स पळून जातील ह्याची त्याला खात्री होती. त्याला चिंता होती ती सेफच्या दिशेने जात असलेल्या कॅरिडॉर मध्ये उभ्या असणाऱ्या सफारी सूट मधल्या त्या दोन टोणग्यांची. निर्विकार चेहऱ्याने ते त्या पॅसेजच्या सुरुवातीला उभे होते. सफारीसूटच्या कडेला असलेला किंचितसा फुगवटा नक्कीच त्यांच्याकडे एखादी रिव्हॉल्व्हर असल्याची खात्री देत होता.

जिमीने पुन्हा एकदा इतरत्र नजर फिरवली आणि तो पुन्हा रोशन शेजारी येऊन बसला. एवढ्या गोंगाटामध्ये त्या दोघांना एकमेकांशी बोलणे केवळ अशक्य होते.

जिमीने टेबलावरचा टिश्यू पेपर आणि पेन घेतले, डाव्या दिशेने एक बाण काढून त्याशेजारी दोन आकडा लिहिला आणि बंदुकीचे चित्र काढले व तो कागद रोशनकडे सरकवला.

रोशनने तो कागद बघून पॅसेंजच्या दिशेने वाकुन एक नजर टाकली आणि पुन्हा जिमीकडे बघुन मान डोलावली.

जिमीने पुन्हा कागदावर मध्यभागी गोल काढून डान्सबार दर्शवला आणि आजूबाजूला ४-५ माकडं फिरताना दाखवली. पुन्हा रोशनने मागे नजर फिरवली आणि कागदावर जोरात असणाऱ्या इमोजीचे चित्र काढले.

“लेट्स डु इट”, जिमीने कागदावर लिहून तो पुन्हा रोशनकडे सरकवला

रोशनने शेजारच्या इसमाकडे बघितले, त्याने आपला रिकामा झालेला ग्लास पुन्हा भरून घेतला होता.

हळूच जिमीकडे बघून रोशनने त्या इसमाकडे बोट दाखवले. जिमीने त्या इसमाला एकावर वरुन खालपर्यंत न्याहाळले. अगदीच साधा, निरुपद्रवी असा तो वाटत होता.

जिमीने मान हलवून आपली संमती दर्शवली.

रोशन पुन्हा त्या इसमाकडे वळला..

“सो, डेव्हील, लेट्स प्ले अ गेम?”
“गेम? व्हॉट गेम?”
“मी आणि माझा पार्टनर कॅसिनो लुटायला चाललोय.. येताय बरोबर?”
“ओह शुअर.. व्हाय नॉट”, हातातला ग्लास बॉटम्स-अप करत तो इसम म्हणाला
“ठीके, मग मी तिथे दाराशी जाऊन थांबतो, हि बंदुक घेऊन, जर कोणी पळायचा प्रयत्न केला तर मी आहेच !, आणि हा माझा मित्र, तुम्हाला बंदी बनवून घेऊन जाईल.. त्याच्याकडे पण एक खोटा खोटा चाकू आहे.. तो तुमच्या मानेला लावून ठेवेल फक्त.. तुम्हाला होस्टेज बनवून तो कसिनोमध्ये घुसेल………. पैसे घेईल………. आणि मग आपण पळून जाऊ. कसा वाटला प्लॅन?”

“फँटॅस्टिक..”, थोडावेळ विचार करुन तो इसम म्हणाला
“चलो देन…”, असं म्हणुन रोशन उठला, त्याने खिश्यातुन आपली ती खोटी बंदुक काढली आणि तो कसिनोच्या दाराच्या दिशेने गेला

जिमी त्या इसमाच्या जवळ आला आणि त्याला हाताला धरून तो त्या कॅसिनोच्या अंतरंगात जाणाऱ्या पॅसेजपाशी, जेथे ते दोन सेक्युरिटी गार्डस उभे होते, तेथे गेला. जाताना डिजेच्या शेजारी पडलेला एक माईक उचलला आणि तो त्या सेक्युरीटी गार्ड्सच्या जवळ जाऊन उभा राहीला.

एकवार त्याने कॅसिनोच्या दाराकडे नजर टाकली…
रोशनने आपली जागा पकडली होती.

जिमीने माईक चालू केला आणि तो म्हणाला, “लेडीज अँड जेंटलमन, युअर अटेन्शन प्लिज.. ”

सगळ्यांच्या नजारा जिमीकडे वळल्या. जिमीने डीजेला खूण करुन गाणी दोन मिनिटांसाठी बंद करायची विनंती केली.

“थँक्यू..”, गाणी बंद झाल्यावर जिमी म्हणाला.. “मी आणि माझा पार्टनर.. “, कॅसिनोच्या दरवाजापाशी उभ्या असलेल्या रोशनकडे बोट दाखवत जिमी पुढे म्हणाला, “.. आम्ही आता हा कॅसिनो लुटणार आहोत.. तुम्हाला आवडेल बघायला?”

“यो !!!”
“वुईईईई… ”
“येह .. गो फॉर इट..”

गर्दींतून कोण तरी ओरडले

“हा माणूस…”, त्या इसमाकडे बोट दाखवत जिमी म्हणाला… “ह्याला आम्ही बंधक बनवलंय.. बंधक, नाव काय तुझं?”
“पटेलभाई..” तो इसम उड्या मारत मारत त्या माईकसमोर म्हणाला

पटेल त्या कॅसिनोमधला नेहमीचा गिऱ्हाईक होता, अनेक जण त्याला ओळखायचे

पटेलने इतरांना हात वगैरे दाखवून थंब्स अप केले.

एव्हाना इतरांना हॅलोवीनचाच हा काहीतरी प्रकार चालू आहे असे वाटुन तेही आता लक्ष देऊन बघत होते.

जिमी त्यातील एका सेक्युरिटी गार्डकडे वळला आणि त्याला बोटाने खूण करुन जवळ बोलावले
“चल, आतमध्ये जा आणि जी काय कॅश आहे ती घेऊन ये आणि त्या बॅगांमध्ये भर…”, कोपऱ्यात ठेवलेल्या आपल्या त्या स्विगीच्या बॅगांकडे बोट दाखवत जिमी म्हणाला

तो गार्ड चेहऱ्यावर मख्ख भाव घेऊन तिथेच उभा राहिला

“जातोस का भोसकू ह्याला इथंच?”, जिमीच्या चेहऱ्यावरचे भाव आता बदलले होते
“जा, जा.. नाहीतर हा त्याचा हा खोटा चाकू मारेल मला… आणि तिकडे तो कोपऱ्यात बाणांची बंदूक घेऊन उभा आहे.. तो पण बाण मारेल तुला..”, पटेल अधिकच खिदळत म्हणाला.

जिमीने आपला सुरा हवेत उगारला.. जवळच उभ्या असलेल्या पटेलला त्या सुरीची लखलखत पात पहिल्यांदाच दिसलं, क्षणार्धात त्याच्या लक्षात आलं कि हा सुरा प्लास्टिकचा नसून खरा आहे, पण तो काही बोलण्याअगोदरच जिमीने तो सुरा पटेलच्या पोटात खुपसला होता..

पटेल अतीव वेदनेने जमिनीवर कोसळला

“वॉव पटेल भाय गुड वन..”
“अबे ये तो शारुख का बाप निकला ऍक्टिंग में .. ”

गर्दीतून मोजके टाळ्यांचा आवाजही आले

“पटेल भाय .. लागलं तर नाही ना?”, मुद्दाम हसत हसत जिमी म्हणाला
पटेल बोलायचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते

जिमी सावकाश पावलं टाकत त्या सेक्युरिटी गार्डजवळ गेला आणि आपल्या सुरीच पात क्षणार्धात त्या गार्डच्या गळ्यावरून फिरवलं. रक्ताची एक चिळकांडी उडाली आणि तो गार्ड गतप्राण झाला.

शेजारीच उभ्या असलेल्या गार्डच्या अंगावर ते गरम रक्त उडालं तसं त्याला परिस्थितीची जाणीव झाली, पण खिशातली बंदूक काढेपर्यंत उशीर झाला होता.. जिमीने आपला तो सूर एकदा मग दोनदा आणि मग तिसऱ्यांदा त्या गार्डच्या पोटात खुपसला…

अजूनही समोरची अर्धी लोक संभ्रमात होती, जे समोर चालू आहे ते खरं आहे का नाटक हेच त्यांना कळत नव्हतं. परंतु जिमीचे ते भयानक रूप आणि रक्ताने माखलेला चेहरा पाहून हे नाटक नसावे असाच तर्क अनेकांनी काढला होता.

जिमिनी पुन्हा माईक उचलला आणि तो म्हणाला, “धिस इज रिअल रॉबरी.. तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा.. जसा हा सुरा खोटा नाही तशी ती बंदूकही खोटी नाहीए….”, रोशनकडे बोट दाखवत जिमी म्हणाला

रोशनमात्र तिकडे भीतीने अर्धमेला झाला होता. त्याला समोर जे घडलंय ते सर्व अनपेक्षित होते. शिवाय आता जर कोणी त्याच्या अंगावर धावून आलंच तर करायचं काय? हाच मोठ्ठा प्रश्न त्याच्यासमोर होता. त्याच्याकडे असलेली बंदुक आणि तो चाकू.. दोन्ही नकली होते.

कसतरी करून, सगळा धीर एकटवुन तो हातात बंदुक धरुन उभा होता.

 

“इथला मॅनेजर कोण आहे?”, जिमीने थंड आवाजात माईकवर विचारलं
गर्दीतून एक पोट पुढं आलेला, चष्मीश माणूस घाबरत घाबरत पुढे आला

“सेफ ची किल्ली दे..”, जिमीने आपला हात पुढे केला..

तो मॅनेजर काही बोलणार इतक्यात जोर-जोरात कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात अलार्म वाजू लागला..

“भेंचोद … कुणी वाजवला अलार्म… ?”, इकडे तिकडे रागाने बघत जिमी ओरडला

“मला.. मला माहीत नाही….”, तो अधिकच घाबरत म्हणाला
“माहीत नाही? माहीत नाही म्हणजे काय?”.. जिमी ओरडला
“म्हणजे मी कालच जॉईन झालोय इथे.. सगळी माहिती व्हायचीय माझी करून…”

अलार्मचा आवाज ऐकून कॅसिनोमध्ये एकच गोंधळ उडाला

एव्हाना रोशन धावत धावत जिमीजवळ आला…

“सोड त्याला, चल पळ लवकर… ”
“पळ? वेडा आहेस का.. “, रोशनचा हात झटकत जिमी म्हणाला..
“सेफची किल्ली दे.. ”
“किल्ली नाहीए सेफ ला..”
“म्हणजे?”
“म्हणजे.. किल्ली नाहीए..”, मॅनेजर चाचरत म्हणाला, “फिंगर प्रिंट आहे त्याला.. ”
“कुणाची?”
“जगदाळेंची..”, खाली मरुन पडलेल्या एका सेक्युरिटी गार्डकडे बोट दाखवत मॅनेजर म्हणाला

जिमीने त्याला बाजूला ढकलले आणि तो त्या जगदाळेंच्या बॉडीकडे गेला आणि त्याला हाताला धरून ओढत ओढत तो त्या पॅसेजमधून सेफच्या दिशेने निघाला.
अलार्मच्या आवाजाने कॅसिनोमध्ये एकच गडबड उडाली होती, त्यात रोशन त्याची दाराच्या इथली जागा सोडून जिमीच्या इथे आला होता. त्याचा फायदा घेऊन लोकांनी कॅसिनोमधून बाहेर धूम ठोकायला सुरवात केली.

“जिमी.. सोड त्याला.. कुठल्याही क्षणी पोलीस येतील…”, रोशन म्हणाला
“मूर्ख.. नाव घेऊ नकोस माझं सांगितलं होतं ना तुला हजारदा..”, चवताळत जिमी म्हणाला… “….आणि तू जागा सोडून का आलास.. सगळी लोक बाहेर पळत आहेत बघ, टेक युअर पोझिशन, थांबव त्यांना…”

“थांबव? कसं? ह्या खोट्या बंदुकीने?”, वैतागून रोशन म्हणाला

पण जिमीच त्याच्याकडे लक्ष नव्हतं, तो जगदाळेंची बॉडी ओढत ओढत सेफ च्या दिशेने निघाला होता. जगदाळेंची शरीरयष्टी चांगलीच मजबूत होती, त्याला ओढत ओढत न्हेणे हाडकुळ्या जिमीला जड जात होते… शेवटी त्याने तो नाद सोडून दिला, खिशातला सुरा पुन्हा बाहेर काढला आणि जगदाळेंचा अंगठा कापला. तुटलेला तो अंगठा घेऊन जिमी धावत धावत सेफपाशी गेला आणि तिथल्या फिंगरप्रिंट स्कॅनर वर त्याने तो अंगठा लावला, पण तो दरवाजा काही उघडला नाही.

त्याने प्रश्नार्थक चेहऱ्याने रोशनकडे पहिले..

तो तुटका अंगठा बघून रोशनला शिसारी येत होती.

“पुस ना तो अंगठा नीट, रक्त लागलेय त्याला सगळं..”, घश्याशी आलेला आवंढा कसाबसा गिळत रोशन म्हणाला
“एस.. राईट राईट.. “, आपले विस्कटलेले केस नीट करत जिमी म्हणाला .. त्याने तो अंगठा आपल्या शर्टला पुसला आणि पुन्हा त्या फिंगरप्रिंट स्कॅनर वर त्याने तो अंगठा लावला, पण ह्या वेळेसही तो दरवाजा काही उघडला नाही.

“शिट्ट शिट्ट शिट्ट..”, चिडून जिमीने तो अंगठा फेकून दिला आणि पुन्हा तो तावातावाने जगदाळेंच्या बॉडीकडे निघाला

“जिमी काय करतोयस तू? चल पळ इथून.. “, रोशन त्याला ओढत म्हणाला
“भे x x x पासवर्ड अंगठा आहे, का अजुन कुठलं बोटं ? आणि कुठल्या हाताचं ? ते कुठे माहितेय..साल्याचे दोन्ही हात कापून आणतो.. ” झरझर पावलं टाकत जिमी पुढे निघाला

“जिमी, मूर्खपणा करु नकोस, अजुन तर आपण सेफपाशी पण पोहोचलो नाहीए, आतमध्ये लगेच कॅश आहे? का अजून नवीन काही निघालं तर काय करणार? आणि समजा सगळी कॅश आतमध्येच असली तरी ती बॅगेत भरून निघायला किमान १५-२० मिनिट जातील अजून. आधीच बाहेर तो कर्णकर्कश्श अलार्म वाजतोय पाच मिनिटांपासून, पोलीस काय चहा पित बसले असतील का अजून?”, रोशन

“पोलीस गेले भो x x त, मी हे पैसे घेणारच..”., जिमी
“जिमी आपल्याकडे हा सुरा सोडला तर बचावला दुसरं काही नाहीए, ऐक माझं, धिस इज नॉट द एन्ड ऑफ द वल्ड.. आपण परत हात मारु दुसरीकडे कुठेतरी.. चल.. ”

रोशन म्हणतोय ते जिमीला पटत होत, पण असं इथून हात हलवत जाणंही त्याच्या जीवावर आलं होतं.
शेवटी त्याला दुसरा पर्यायही नव्हता, “एस एस, साला माझा प्लॅनच चुकला, वाटला होता, हा सुरा बघुन हे भडवे गप गुमान कॅश आणून देतील.. चल पळुया इथून”, असं म्हणून जिमी दरवाज्याच्या दिशेने धावला, पाठोपाठ रोशनही बाहेर पडला

 

******

साधारण ५ किलोमीटरवर असलेल्या पोलीस स्टेशनमधला फोन खणखणत होता. कॅनबेरा कॅसिनोमध्ये घडत असलेल्या रॉबरीची माहीती द्यायला एकावर एक फोन येत होते.
इन्स्पेक्टर विक्रमने आपली गन तपासली आणि ते बाहेर थांबलेल्या जीप मध्ये बसले. क्षणार्धात पोलिसांची ती जीप धुरळा उडवत कॅनबेरा कॅसिनोच्या दिशेने निघाली.

विक्रम वॉकी-टॉकी वरुन परिस्थिचा आढावा घेत होते.

“हा, बोला हवालदार माने, काय खबर आहे? तुम्ही पोहोचलात का कॅसिनोपाशी?”
“येस्स सर, मी आणि दोन कॉन्स्टेबल, आम्ही तिघे आहोत इथे”
“काय परिस्थिती आहे? ते चोर अजून आहेत आतमध्ये?”
“नाही सर, ते पळाले!”
“कुठल्या दिशेने?”
“सर ते कावेरीच्या दिशेने गेलेत.. ”
“कावेरी .. हम एक मिनिटं .. ”

शेजारी बसलेल्या पि.एस.आय. शेळके तत्पर होते, त्यांनी लगेच त्या गावचा नकाशा उघडून ई. विक्रम समोर धरला आणि कावेरीवर बोट दाखवले

“हा.. एक काम करा, ती पुढे कुर्डुवाडी आहे, तिथे लगेच नाकाबंदी लावा..”, विक्रम ने शेळकेंना सूचना दिली
शेळकेंनी आपल्या वॉकी-टॉकी वरुन पुढच्या सूचना द्यायला सुरुवात केली

“माने, लुटीची काही माहिती कळाली? काय गेले का चोरीला?”
“बहुतेक नाही सर, त्यांना सेफच उघडता आली नाही, पण सर, ३ मर्डर झालेत?”
“काय????”, विक्रम जवळ जवळ ओरडतच म्हणाला.
“हो सर, दोन सेक्युरीटी गार्ड आणि एक पटेल नावाचा कस्टमर”

“माने.. मारेकऱ्यांचं वर्णन मिळालं?”, मिळालय सर, मोघम आहे पण, विशी-पंचविशीतला दोन तरुण होते, मोटारसायकल होती एक जुनी त्यावरून पळालेत..”
“सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करा कॅसिनोचं, आजूबाजूचं, फोटो मिळतोय का बघा.. ”
“एस सर..”

विक्रमने काही क्षण विचार केला आणि मग तो शेळकेंकडे वळला

“शेळके, त्या परिसरातले सगळे मोबाईल टॉवर्स ऑफ करा, लगेच.. ”
“येस्स सर.. पण सर का?”
“आजकाल ज्याच्या त्याच्या हातात मोबाईल आणि डेटा पॅक असतो, सगळेच रिपोर्टर बनतात, बातम्या पटापट पसरतात.. इंटरनेट बंद करून टाका तिथलं.. ”
“येस्स सर..”

१५ मिनिटांमध्ये विक्रमची जीप कॅसिनोपाशी पोहोचली. बाहेर प्रचंड गर्दी जमली होती
विक्रम जीपमधुन उतरला, बरोबर एक मोठ्ठा कर्णा घेतला आणि जमलेल्या गर्दीला उद्देशुन तो बोलू लागला..

“ही घटना घडली त्यावेळी तुमच्यापैकी आतमध्ये कोण कोण होते?”
४-५ तरुण तरुणींचा एक गट पुढे आला..

“मोबाईलमध्ये कोणी शुटिंग केलंय घटनेचं?”, विक्रम
एका तरुणाने आपल्या मोबाईलमधला व्हिडीओ चालु करून विक्रमला दिला

“गुड..” तो व्हिडीओ पाहून झाल्यावर विक्रम म्हणाला
“बाहेरच शूटिंग आहे कुणाकडे?”

दुसरा एक तरुण पुढं आला आणि त्याने आपला मोबाईल विक्रमकडे दिला
व्हिडीओमध्ये २ तरुण कसिनोमधुन बाहेर पडताना आणि नंतर बाईकवर बसुन पळुन जाताना दिसत होते

“व्हेरी गुड..” त्या तरुणाची पाठ थोपटत विक्रम पुढे म्हणाला.. “अजून आहे कुणाकडे शूटिंग..? मुख्यतः बाहेरच?”
अजून ३-४ जण पुढे आले..

विक्रमने सगळ्यांचे व्हिडीओ पाहून मोबाईल त्यांच्याकडे परत दिले

“अजून आहे कोणी?”

यावेळी कोणी पुढं आलं नाही

“पोरांनो, हे व्हिडीओ डिलीट करुन टाकायचे. लगेच?”
“काय सर, इतकी मस्त क्लिप आहे, मी तर माझ्या चॅनल वर व्हायरल करणारे.. ” त्यातला एक जण म्हणाला
“येस सर, क्लिप डिलीट वगैरे म्हणजे आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य…”

पण त्याच बोलणं अर्धवटच राहील, कारण वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच विक्रमची एक सणसणीत कानफाडीत त्या तरुणाला बसली होती

विक्रम कर्णा घेऊन पुढे बोलू लागला
“तुमचं स्वातंत्र्य वगैरे सगळं घरी आणि कॉलेजात.. इथे ३ मर्डर झालेत आणि हे लोक शक्य तितक्या लवकर पकडलं जाण महत्वाचं आहे.. तुमच्यापैकी कोणीही हे बाहेरच शूटिंग कुठे मीडिया, इंटरनेटवर शेअर केलंत तर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल सगळ्यात पाहिलं तुम्हाला आत करेन … तुमच्या गावात मला माझी बायको मिळाली, ह्या गावाचा जावई आहे मी.. कृपया सहकार्य करा.. ”

सर्वत्र शांतता होती

“तुम्हाला माहीत असेलच आजकाल पोलीस मिडिया सेलही तितकाच कार्यक्षम आहे, क्लिप कुणी कुठून पब्लिश केली हे शोधायला वेळ लागणार नाही.. नंतर सापडलात तर महागात जाईल”, असं म्हणून विक्रम कसिनोच्या आतमध्ये पहाणी करायला गेला

साधारण अर्धा-पाऊण तासानंतर विक्रम बाहेर आला तेंव्हा बहुतांश गर्दी पांगली होती

विक्रम आपल्या जिपपाशी गेला, शेळके अजूनही वॉकी-टॉकी वरुन बातम्या घेण्यात मग्न होते

“शेळके नाकाबंदी वरून काही खबर.. ?”
“नो सर, अजून तरी आपण दिलेल्या वर्णनाचं कोणी नाकाबंदीवर सापडलं नाही.. ”

विक्रमने घड्याळात नजर टाकली.. घटनेला नाही म्हणलं तरी किमान एक तास होऊन गेला होता

“कसं शक्य आहे..? बघू नकाशा”

शेळकेंनी तो नकाशा पुन्हा उघडून जीपच्या बॉनेटवर ठेवला..

“हा कॅसिनो.. “, नकाशावरील एका ठिकाणावर बोट ठेवत विक्रम म्हणाला.. “आणि माने म्हणाले तसं मारेकरी, ह्या दिशेने कावेरीच्या दिशेने गेले.. बरोबर?”
“बरोबर सर..”, शेळकेंनी दुजोरा दिला

“हि इथे कावेरी.. आणि हा पूल ओलांडून पुढे साधारण ५ कि.मी. वर कुर्डुवाडी.. जिथे आपण नाकाबंदी लावलीय.. बरोबर?”
“येस सर, करेक्ट..”

“पण मग हे लोक गेले कुठे?”, नकाशावरून त्या रस्त्यावरून हात फिरवत विक्रम म्हणाला.. “हा सरळ रस्ता आहे, कुठेही फाटा नाही वळायला..”
“बरोबर सर, कुर्डुवाडी स्टेशनवरुन आपली एक जीप पण मागवली होती, त्यांना पण इथं येईपर्यंत वाटेत कोणी दिसलं नाही.. ”

“चोरटे गेले तर ह्याच दिशेने.. आपण व्हिडिओमध्ये पण बघितलं आणि नाकाबंदीपाशी कोणी पकडलं पण नाही गेलं.. गेले कुठे मग?”

विक्रम कपाळावरुन हात फिरवत विचार करत होता.. आणि अचानक त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पेटला..

“एक मिनिट.. “, त्याने पुन्हा तो नकाशा उघडला.. “जेव्हढं मला आठवतंय.. ह्या रस्त्यावर, एक छोटासा फाटा आहे.. झाडींमध्ये दडलेला आहे, पटकन दिसत नाही तो, पण आहे.. ”
“कुठं जातो सर तो रस्ता?”, शेळकेंनी विचारल ..

“इफ आय एम नॉट मिस्टकन, हा रस्ता… “, नकाशावर एका ठिकाणी बोट ठेवत विक्रम म्हणाला.. “हा रस्ता जातो.. तो प्रसिद्ध लेखक शेखरच्या फार्म हाऊसकडे..”

 

[क्रमशः]