Tag Archives: aniket

अवनी – १०


भाग ९ पासून पुढे >>

रामुकाका दोघांना घेऊन खोलीत गेले. शाल्मली आणि मोहीत गप्पा मारत बसले होते. त्या तिघांना आत येताना पहाताच दोघंही उठुन उभे राहीले.

रामुकाका खोलीच्या मध्यभागी उभे राहीले आणि बाकीच्या लोकांनी त्यांच्या भोवती कोंडाळे केले. रामुकाकांनी आपल्या कपाळाचा गंध शाल्मली सोडुन आकाश, मोहीत आणि जयंताला लावला आणि म्हणाले.. “उद्या आंघोळीला सुट्टी द्या, आपण इथुन जाईपर्यंत हा गंधच आपले रक्षण करणार आहे, तो पुसुन देऊ नका..”

तिघांनीही गुणी बाळासारख्या माना डोलावल्या.

“रामुकाका मी राहीले…”, शाल्मली निरागसपणे म्हणाली.

“तुला पण लावणार, पण आत्ता नाही, वेळ आली की नक्की लावीन..” असं म्हणुन रामुकाका आकाशकडे वळले आणि म्हणाले, “आकाश, तु इथे शाल्मली आणि मोहीतपाशीच थांब. मला आणि जयंताला बाहेर थोडं काम आहे, ते उरकुन येतो”

“काय, कसलं कामं?” हे विचारण्याच्या भानगडीत आकाश पडला नाही, योग्य वेळ येताच ते एक तर कळेलच किंवा रामुकाका स्वतःहुन सांगतील ह्याची त्याला खात्री होती.

रामुकाका खोलीच्या बाहेर पडले आणि कसलेही प्रश्न न विचारता जयंताही त्यांच्या मागोमाग बाहेर पडला.

 

रामुकाका बंगल्याचे कुंपण ओलांडुन झपझप चालत बाहेर पडले. वाटेत कुणीच कुणाशी बोलले नाही.

काही मिनीटं चालल्यावर रामुकाका एका पडक्या, जुनाट कौलारु झोपडीवजा घरापाशी येऊन थांबले, क्षणभर इकडे तिकडे बघुन मग त्यांनी डोळे मिटले आणि

’ ॐ श्री विष्णवे नमः ।’
’ ॐ श्री विष्णवे नमः ।’
’ ॐ श्री विष्णवे नमः ॥’

असा ३ वेळा जप केला व मग जयंताला म्हणाले, “जयंता, दाराचे हे कुलुप तोड..”

जयंताने कुलुप निरखुन बघीतले. कुलुप जरी मजबुत असले तरीही बरेच जुने असल्याने दरवाज्याची कडी खिळखीळी झाली होती. जयंताने अंगणातुन एक मोठ्ठा दगड आणला आणि दोन-तीन घावातच त्याने कडी तोडुन काढली.

करकर आवाज करत दरवाजा आतल्या बाजुने उघडला गेला.

रामुकाका आणि जयंता आतमध्ये आले. जयंताने लगेच घराच्या खिडक्या उघडल्या त्यामुळे अंधारात बुडालेले ते घर स्वच्छ सुर्यप्रकाशाने उजळुन निघाले.

“रामुकाका… कुणाचे घर आहे हे?”, अत्यंत हळु आवाजात जयंताने विचारले..
“नेत्रा!!”, रामुकाका म्हणाले… तसे जयंता दोन पावलं मागे सरकला.

रामुकाकांची वेधक नजर त्या खोलीत कश्याचा तरी शोध घेत होती. बराच वेळ शोधल्यावर ते एका कॉटपाशी येऊन थांबले आणि त्यांनी जयंताला खुण केली.

“जयंता, ती खालची पेटी ओढ बरं जरा बाहेर…”, रामुकाका एका लाकडी ट्रंककडे बोट दाखवत म्हणाले.

जयंता खाली वाकला आणि त्याने ती जड पेटी बाहेर ओढली. पेटी नुसती कडी घालुन बंद केली होती, त्याला कुलुप वगैरे काही लावलेले नव्हते ह्यावरुन त्या पेटीत काही मौल्यवान असेल असे वाटत नव्हते.

रामुकाकांनी वरवरची धुळ हाताने झटकली आणि कडी काढून ती पेटी उघडली.

वरतीच एका निरागस १२ एक वर्षाच्या मुलीचा आणि साधारण एका पस्तीशीतल्या स्त्रीचा फोटो होता. रामुकाकांनी तो फोटो निरखुन पाहीला आणि कडेला ठेवुन दिला.

त्या फोटोच्या खाली लहान मुलीचे फ्रॉक्स, गळ्यातले, कानातले साधे दागीने, बिट्याच्या बिया, मोडलेल्या ४-५ बाहुल्या असेच काही बाही सामान होते.

“हे….. हे सर्व नेत्राचे आहे का?”, जयंताने विचारले.
“हो.. नेत्राचेच आहे हे.. चल आपल्याला ही ट्रंक घेउन बंगल्यावर जायचे आहे..”, असं म्हणुन रामुकाकांनी ती पेटी बंद करुन टाकली.

जयंताने ती पेटी उचलुन खांद्यावर घेतली आणि दोघंजण पुन्हा बंगल्याच्या दिशेने चालु लागले.

 

दोघंजणं बंगल्यात परत आले तेंव्हा दुपारची जेवणाची वेळ टळुन गेली होती. शाल्मलीने सर्वांसाठी जमेल तेवढा, जमेल तसा थोडाफार स्वयंपाक बनवुन ठेवला होता. रामुकाका आणि जयंता येताच सर्वांनी प्रथम जेवुन घेतले.

जेवण झाल्यावर रामुकाका ती पेटी घेऊन दिवाणखान्यात आले जेथे सर्वजण त्यांची वाट बघत बसले होते. रामुकाकांनी ती पेटी सर्वांच्या मधोमध झाकण उघडुन ठेवली. सर्वजण आतील वस्तु निरखुन बघत होते.

“आजची रात्र.. आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. आजवर जे वार आपल्यावर झाले ते आज आपण पलटवुन लावणार आहोत.”, रामुकाका निर्धाराने म्हणाले.. “शमु बेटा, ह्या लढ्यात सर्वात जास्त सहभाग तुझाच असणार आहे. त्या अघोरी शक्तीने तुझ्या शरीराची निवड केली होती, तेंव्हा त्या लढ्यात आपण तुझाच वापर त्या शक्ती विरुध्द लढण्यासाठी करणार आहोत”, शाल्मलीकडे बघत रामुकाका म्हणाले.

शाल्मलीची अस्वस्थता तिच्या हालचालीतुन दिसुन येत होती.

“घाबरु नकोस बेटा, आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत… तुला काही होऊ देणार नाही..”, शाल्मलीच्या डोक्यावर हात ठेवत रामुकाका म्हणाले.. “फक्त एक लक्षात ठेव तु मनाने खंबीर रहा, कुणालाही स्वतःवर आधीक्य गाजवु देवु नकोस, स्वतःचे अस्तीत्व जागृत ठेव, आमच्या बोलण्याकडे लक्ष ठेव. अशी वेळ येईल जेंव्हा तुला तुझ्याशीच लढुन आम्ही सांगीतलेल्या काही गोष्टी कराव्या लागतील…” रामुकाका शाल्मलीला सुचना देत होते आणि शाल्मली प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन ऐकत होती.

“रामुकाका, नेत्राचा शेवट झाला म्हणजे आपण सुटलो असे समजायचे का?”, आकाशने विचारले.

“नाही…”, थोड्यावेळ विचार करुन रामुकाका म्हणाले..”नेत्रा खरं तर ह्या खेळातील एक प्यादं आहे, आपल्याला नेत्रापेक्षा जास्त शक्तीमान, जास्त भयानक विकृतीविरुध्द लढा द्यायचा आहे.. आज रात्री आपण ज्या गोष्टी करणार आहोत त्या आपल्याला आपल्याच शास्त्राने, आपल्याच संस्काराने शिकवलेल्या आहेत. पिढ्या-दर-पिढ्या आपण त्यावर डोळे झाकुन विश्वास ठेवला त्या गोष्टी आज आपल्याला आचरणात आणायच्या आहेत. तेंव्हा अशी आशा करुयात कि आपल्या धर्माने जे आपल्याला, आपल्या पुर्वजांना शिकवलं, ते सर्व सत्य आहे..”

“पण रामुकाका, जर ते बोगस ठरलं तर? आपण सामान्य माणसं आहोत, कोणी ज्ञानी, तपस्वी, साधु नाही की ह्या अनिष्ठ प्रवृत्तीविरुध्द यशस्वी होऊ”, जयंता म्हणाला.

“बरोबर आहे जयंता, अगदी बरोबर आहे. आपण सामान्य माणसंच आहोत. परंतु आपल्या सामान्यत्वाला सत्यतेची धार आहे. जशी आगीची एक छोटीशी ठिणगी दारुगोळ्याने भरलेल्या कारखान्याला सुध्दा उडवुन लावु शकते तसेच आपणही आहोत. आपण एक छोटीशी ठिणगीच आहोत, जी योग्य जागी पडली तर अपप्रवृत्तीला परतवुन लावु शकु…”, रामुकाका म्हणाले.

सुर्य मावळतीकडे झुकला तसे रामुकाका उठुन उभे राहीले. सगळ्यांनी एकमेकांकडे एकवार पाहीले आणि मग ती पेटी घेऊन आपल्या खोलीत परतले.

 

खोलीमध्ये आल्यावर रामुकाकांनी आपल्या सदर्‍याच्या खिश्यातुन विटेचा एक तुकडा काढला जो बहुदा त्यांनी नेत्राच्या घरातुन परतताना वाटेतुन उचलुन आणला होता.

रामुकाकांनी समोरासमोर अशी ४ मंडलं त्या विटेच्या तुकड्याच्या सहाह्याने आखली. मग ते थोडेसे दुर गेले आणि गवताच्या काड्यांच्या सहाय्याने पाचवे मंडल थोडेसे तयार केले.

“कोणतेही शुभ काम करताना आपण मंडल आखल्याशिवाय कामाला सुरुवात करत नाही. बरोबर?”, रामुकाकांनी विचारले.

सर्वांनी होकारार्थी माना हलवल्या.

“असं म्हणतात की मंडल हे ब्रम्हा, विष्णू, रुद्र, लक्ष्मी आणि अग्नी देवतांसाठी स्थान निर्माण करते. त्याच्या अस्तीत्वाने ह्या देवतांचा त्या जागी वास होतो असंच आपला धर्म आपल्याला सांगतो. जेंव्हा आपण आपलं काम सुरु करु तेंव्हा शाल्मली सोडुन आपण सर्वजणं ह्या मंडलामध्येच बसणार आहोत जेणेकरुन कुठलीही वाईट शक्ती आपल्याला हात लावु शकणार नाही.”, रामुकाका म्हणाले

“पण शाल्मली का नाही?”, आकाशने विचारले.

“जसं मी मगाशी म्हणालो, आपण शाल्मलीचाच उपयोग नेत्राचा शेवट करण्यासाठी करणार आहोत आणि त्यासाठी नेत्रा शाल्मलीच्या शरीरात प्रवेश करणं महत्वाचं आहे. शाल्मली जर मंडलाच्या आतमध्ये असेल तर नेत्रा तिच्या शरीरात प्रवेश करु शकणार नाही..”, रामुकाका म्हणाले..

मग शाल्मलीकडे वळुन ते म्हणाले, “योग्य वेळ येताच मी तुला त्या मंडलाच्या आतमध्ये प्रवेश करायला सांगेन. अर्थात तुला तुझ्याच शरीराकडुन विरोध होईल कारण तुझ्या शरीरावर त्या वेळी फक्त तुझाच नाही तर नेत्राचाही ताबा असेल. पण तु तुझी सर्व शक्ती पणाला लाव आणि ह्या मंडलामध्ये प्रवेश करं”

“रामुकाका, केवळ उत्सुकतेपोटी विचारतो, पण तसं केल्यानंतर काय होईल?”, जयंता

“जयंता, गरुड पुराण सांगते, मंडलशिवाय प्राण त्याग केला तर त्या आत्म्याला पुढील जन्मासाठी योनी प्राप्त होत नाही, त्याचां आत्मा हवेबरोबर इतरत्र भटकत रहातो. एकदा का नेत्रा ह्या मंडलात आली की जे काही करायचं आहे ते मी करीनच, पण जर आपला विजय झाला तर त्यावेळी नेत्राच्या आत्म्याला मुक्ती मिळणं आवश्यक आहे आणि हे मंडल, आणि ह्या भोजपत्रात लिहिलेले काही मंत्र तिला त्याकामी मदत करतील..”, रामुकाका म्हणाले.

रामुकाकंनी त्यानंतर करावयाच्या क्रिया आणि त्यामधील प्रत्येकाची भुमीका सगळ्यांना समजावुन सांगीतली. मोहीतला पुन्हा पुन्हा त्या मंडलाबाहेर काहीही झालं तरी यायच्ं नाही हे सांगुन झालं.

पोर्णीमेसाठी अवघ्या काही तासांची प्रतिक्षा असणारा चंद्र डोक्यावर आला तसे रामुकाकांनी सर्वांना हाताने खुण केली आणि सर्वजण आप-आपल्या आखलेल्या मंडलात जाऊन बसले, तर शाल्मली बेडवरच बसुन राहीली.

 

रामुकाकांनी हात जोडले आणि डोळे मिटुन ते म्हणाले…

“य्प्रज्ञानमुक्त चेतो धृतीश्च य्ज्जोन्तिरान्त्मृत प्रजासु |
यस्मात्र हृते किं चन कर्म क्रियते तन्मे मनः शिवासंकाल्प्नमास्तु: ||”

रामुकाकांचे बोलणे झाल्यावर इतरांनीही तो मंत्र पुटपुटला.

मग रामुकाका म्हणाले, “ह्याचा अर्थ जो ज्ञानी आहे, जो धैर्यरूप आहे, जो मानवजातीच्या हृदयात राहून सर्व इंद्रियांना शक्ती प्रदान करतो, जो स्थूल शरीराच्या मृत्यू नंतरही अमर रहतो. ज्याच्याशिवाय कोणतेही कर्म करणे कठीण आहे असे माझे मन, माझा आत्म्याचे भगवंताच्या कृपेने कल्याण होवो.”

स्थिरपाण्यामध्ये एखादा दगड मारावा आणि तो छोट्टास्सा दगड त्या घनगंभीर पाण्याच्या पृष्ठभागावर असंख्य लहरी उमटवुन जातात. पाण्यावर उमटलेल्या लहरी, समुद्रात निर्माण होणार्‍या लाटा ह्या मनुष्याच्या नजरेस दिसणार्‍या भौतीक गोष्टी असतात, पण त्या निर्माण करणार्‍या अदृष्य शक्ती फक्त जाणवतात, त्या दिसत नाहीत, तसंच काहीसं तेथे घडलं. शांत असलेल्या त्या वातावरणात अचानक खळबळ उडाली. वार्‍याचा एक तुफानी झोत खोलीतल्या वस्तु हलवुन गेला.

सर्वजण ह्या अनपेक्षीत घटनेने दचकुन गेले आणि मग त्यांची नजर शाल्मलीकडे गेली.

आपण आपली मान अवघडल्यावर जशी मान गोलाकार फिरवतो, तसाच काहीसा प्रकार डोळे मिटलेल्या शाल्मलीच्या बाबतीत होत होता. ती स्वतःशीच असंबध्दपणे तोंडातल्या तोंडात ’हम्म… हम्म..’ असा सुर काढत होती.

रामुकाकांनी सर्वांना हातानेच शांत रहायची खूण केली.

“का रं म्हातार्‍या, गोड बोलुन तुला कळेना झालंय का? आज तुजा मुडदा पाडल्याबिगर म्या शांत नाय बसनार..”, असं म्हणुन शाल्मली उठुन उभी राहीली. खरं तर त्याला उभी राहीली म्हणणं चुकीच ठरेल कारण तिची पावलं जमीनीपासुन काही इंच वरच होती, तिचे हात पाय कडक झाले होते, विस्कटलेले केस तिचा चेहरा जणु काही झाकुनच टाकत होते.

शाल्मली रामुकाकांच्या दिशेने येत होती.

सर्वचजण हातापायाची बोटं घट्ट करुन आता काय होणार ह्याचीच प्रतिक्षा करत होते.

शाल्मली मंडलापर्यंत आली आणि अचानक कश्याचा तरी चटका बसावा तशीच जागेवर थिजुन उभी राहीली. मग तिने इतरांकडे आणि त्यांच्या भोवती आखलेल्या मंडलांकडे पाहीले आणि म्हणाली.. “अरं बाबा.. तु तर साधु झाला की रं.. अरं पण ह्या पोरीचं काय करशीलं रं, ती पुर्णपणे माझीया ताब्यात हाय नं.. मारु हिला मारु??”

“नाही नेत्रा.. तु तसं करणार नाहीस… तुला तुझ्या मालकानं तसं करण्याची परवानगी दिलेली नाही…”, रामुकाका म्हणाले..

“माझा मालकं?? कोन माझा मालक?”, नेत्रा म्हणाली..

“तोच.. जो तळघरात लपुन बसला आह्रे.. जो तुझ्याकडुन सर्वकाही करवुन घेत आहे… त्र्यिंबकलाल…”, रामुकाका म्हणाले

“त्यो.. लंगडा?? त्यो माझा मालकं???” असं म्हणुन नेत्रा छद्मी हसली.. “त्यो कसला माझा मालंक?”

“नाही? तो तुझा मालक नाही? बरं राहीलं तु म्हणतीस ते खरं! पण काय गं? तो इतका आवडायचा का गं तुला की त्याने तुला मारुन टाकला तरी पण तु त्याच्या सर्वशक्तीमान होण्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावते आहेस???”, रामुकाका म्हणाले

“ए म्हातार्‍या, काय बोलत्योयेस तु, मला काय कळेना…”, नेत्रा म्हणाली.

रामुकाकांनी आकाशला एक सांकेतीक खुण केली आणि परत ते नेत्राशी बोलु लागले…”हम्म.. म्हणजे तुला काहीच आठवत नाहीये तर… बर हे बघ, हे बघुन तुला काही आठवते आहे का?”, असं म्हणुन रामुकाकांनी त्या पेटीतुन तो फोटो बाहेर काढुन नेत्राच्या समोर धरला

तो फोटो पाहुन शाल्मलीच्या चेहर्‍यावर आश्चर्याचे, गोंधळलेले भाव उमटले..

रामुकाकांनी केलेल्या सांकेतीक खुणेचा अर्थ आकाशने ओळखला होता आणि त्याने मनातुनच शाल्मलीला साद घालायला सुरुवात केली होती.. “शमु.. ऐकते आहेस ना तु.. शमु… तुला माहीती आहे ना आता काय करायचं आहे? आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत शमु.. फक्त इतक करं.. मग बघ त्या नेत्राला कसं पळवुन लावतो आपण.. फक्त एवढंच कर शमु.. आय लव्ह यु शमु….”

रामुकाकांनी नेत्राला बोलण्यात इतके गुंतवुन ठेवले होते ते मंडल ओलांडताना झालेला अतीतिव्र, जळका स्पर्शाने नेत्रा भानावर आली, पण एव्हाने ती मंडलाच्या आतमध्ये येउन अडकली होती. शाल्मलीने तिला त्या मंडलाच्या आत आणुन ठेवले होते.

बाहेर पडता येत नाही म्हणल्यावर नेत्रा सैरभर झाली आणि संतापाने बेभाव होऊन तिने शाल्मलीच्या दोन तिन मुस्काटात ठेवुन दिल्या. त्याचा प्रहार इतका जोरात होता की त्या बोटांचे वळ शाल्मलीच्या नाजुक त्वचेवर उमटले.

आकाश संतापुन उभा राहीला, परंतु रामुकाकांनी त्याला शांत बसायची खुण केली.

“आता कसं छान झालं.. आता तु माझं म्हणणं शांतपणे ऐकुन घे..”, रामुकाका म्हणाले.

नेत्रा संतापाने बेभान झाली होती, तिला त्या मंडलाबाहेर पडायची इच्छा असुनही पडता येत नव्हते आणि त्यामुळे ती अजुनच बेचैन होत होती.

“हा फोटो तुझा आणि तुझ्या आईचा ना?”, रामुकाका म्हणाले..

“व्हयं…”, रागाच्या स्वरात नेत्रा म्हणाली..

“आणि हा गोड फ्रॉक.. तुझाचं ना?”.. रामुकाका

नेत्रा कुतुहलाने त्या फ्रॉककडे बघत होती. एका छोट्यामुलीचे आपल्याच आवडत्या ड्रेसकडे बघताना असतात तसे भाव शाल्मलीच्या चेहर्‍यावर तरळुन गेले.

“आणि ह्या बिट्याच्या बिया… बहुदा तु आणि तुझ्या आईचा दुपारचा आवडीचा खेळ असणार नाही का???”, रामुकाका त्या बिया हातात धरत म्हणाले

“ह्ये कुठं मिळालं तुला सगळं? माझ्या घरी गेला व्हतासं?”, नेत्रा

“हम्म.. चला म्हणजे ते तरी आठवतं आहे तुला तर..”, रामुकाका हसत म्हणाले आणि मग त्यांनी त्या सर्व वस्तु त्या पेटीत ठेवुन दिल्या आणि पेटीचे झाकणं बंद करुन टाकले व मग पुढे म्हणाले.. “बरं मध्ये आध्ये काय झालं, मला त्याच्याशी काही घेणं नाही. मला सांग त्र्यिंबकलाल भेटल्यानंतर काय झालं?”

“म्या नाय सांगनार, मला इथुन जाऊ द्ये..”, नेत्रा संतापुन म्हणाली.

“तुला सांगावंच लागेल नेत्रा..!!”, असं म्हणुन रामुकाकांनी शेजारीच ठेवलेली एक लांब काठी उचलली आणि त्या मंडलाच्या गवताची पान हळुवारपणे आणि सावधानतेने काही कण आत सरकवली जेणेकरुन त्य मंडलाच्या कक्ष्या छोट्या होतील..

“म्हातार्‍या बर्‍या बोलानं जाऊ द्ये मला..”, इकडे तिकडे बघत नेत्रा म्हणाली.

“कोणाला शोधते आहेस, त्र्यिंबकलाल ला? तो नाही येणार वाचवायला तुला. अरे ज्याने तुला मारले, तो कश्याला तुला वाचवेल. तो फक्त तुला वापरतो आहे, त्याच्या स्वार्थासाठी. तो अजुनही अशक्तच आहे. स्वतःची सर्व शक्ती त्याने आजपर्यंत तुला जिवंत ठेवण्यासाठी वापरली आहे जेणेकरुन त्याच्यासाठी तु जिवावर खेळशील आणि त्याला ह्या कोंदणातुन बाहेर काढशील..”, रामुकाका म्हणाले

“काय बोल्तो आहेस तु, मला काहीबी कलत नाय..”, गोंधळलेली नेत्रा म्हणाली.

“बरं ठिक आहे, तसंही तु जे काही सांगणार तेच जगाला माहीत होते आणि तेच मला पण आधी माहीत होते, त्यामुळे तुझ्याकडुन मला नविन तर काही कळणार नाहीच. पण तुला सांगण्यासाठी माझ्याकडे खुप काही आहे..ऐक तर मग.. “, असं म्हणुन रामुकाका बोलु लागले..

 

“सर्वप्रथम मला सांग नेत्रा, तुझा मृत्यु कसा काय झाला?”, रामुकाकांनी विचारले

“म्या उडी टाकली इहिरीमंदी, आत्मात्या केली म्या..”, नेत्रा म्हणाली.. “माजं जगणं नामुन्कीन झालं होतं, ह्ये सारं गाव मला छी थु करत होत्ये. स्वतः तोंड लपुन काळं करतील, म्या पकडलो गेलो तर मला हसु लागले म्हनुन जीव दिला म्या..”

“असं तुला वाटतं नेत्रा, कारण तुला तसं वाटावं असंच तुझ्या मालकान, अर्थात त्र्यिंबकलालने करणी केली आहे. मी सांगतो तुझा म्रुत्यु कसा झाला. निट आठव ती रात्र जेंव्हा तु पंतांकडे जायला निघाली होतीस. जर तुला तुझ्या कृत्याची शिक्षा देण्यात आली होती, तर तुझ्याबरोबर गुंतलेल्या इतरांचे सुध्दा उखळ उघडे करण्याच्या इराद्याने तु पंतांकडे जाणार होतीस. त्या रात्री चार काळ्या आक्रुत्या त्र्यिंबकलालच्या सांगण्यावरुन तुझ्यावर झेपावल्या. मनुष्याच्या रुपातील क्रुर पशुच ते जणु. त्यांनी तुझ्या शरीराच्या चिंधड्या उडवल्या आणि त्यानंतर तुला त्या विहीरीत ढकलुन दिले….”, रामुकाका

“नाही, खोटं आहे हे…”,नेत्रा

“आठवं तुझा अंगठ्याएवढा आत्मा तुझ्या देहातुन बाहेर पडुन मोक्ष प्राप्तीसाठी निघाला होता.. आठव नेत्रा तो बिकट प्रवास.. कित्येक दर्‍या खोरं पार करुन तु वैतरणा नदीपर्यंत पोहोचली होतीस. आठवं ती नदी.. रक्ता-मासाच्या चिखलानी भरलेली, अतृप्त, पापी आत्मे त्या दलदलीत अडकुन पडले होते, तुला त्या चिखलात ओढण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच वेळी कुठल्याश्या शक्तीने तुला माघारी बोलावले.

ह्या बंगल्यात, तळघरात तुला आणण्यात आले. थकलेल्या, दमलेल्या तुला कुणीतरी शक्ती प्रदान केली, स्वतःच्या इंद्रीयांची शक्ती तुला देऊ केली. का? कारण त्याच्यासाठी मुक्तीचे, सर्व शक्तीमान होण्याचे मार्ग खुले करशील. तुझ्या खांद्यावर पाय देऊन तो इथुन बाहेर पडेल.

प्रत्येक पोर्णीमेला बळी घेऊन तु त्याला शक्ती देऊ केलीस. कित्येक पोर्णीमा बळींशिवायच गेल्या, तर काही पोर्णींमेला तुमच्या नशीबाने सावज हाती पडले. गेली अनेक वर्ष हाच खेळ चालु होता. तुमच्या नशीबाने म्हणा, किंवा आमच्या दुर्दैवाने म्हणा आम्ही इथे पोर्णीमेच्या वेळेस अडकलो नाही तर हि पोर्णीमासुध्दा तुमच्या हातातुन गेलीच होती..”, रामुकाका बोलत होते..

“पण का? त्र्यिंबकलाल असं का करेल? त्याचं तर माझ्यावर प्रेम होतं… आणि माजं बी..”, नेत्रा म्हणाली…

“पंत जितके मृदु, प्रेमळ होते, तितकेच कठोर, शिघ्र कोपी सुध्दा होते. त्र्यिंबकलालचा सहभाग सिध्द झाल्यावर पंतांनी त्याल शाप दिला होता..त्यांनी त्याची मुक्ती बंद केली होती जेणेकरुन अनेक वर्ष तो इथंच तळघरात सडत पडेल.. अर्थात ही गोष्ट कुणालाच ठाऊक नाही.

पंतांनी अनेक वर्ष कष्ट करुन अभ्यास करुन सिध्दी प्राप्त करुन घेतली होती चांगल्या कामांसाठी. परंतु छोट्या त्र्यिंबकलालने लहानपणापासुनच चोरुन त्यांची पुस्तक, त्यांच्या टिपण्या वाचुन सिध्दी आत्मसात करायला सुरुवात केली आणि त्याचा उपयोग तो स्वतःच्या स्वार्थासाठी करु लागला. तु त्याच्यावर भुललीस ते त्याच्या रुपगुणामुळे नाही तर त्याने केलेल्या जादु-टोण्यामुळेच….”, रामुकाका

“त्ये मला काय माहीत नाय, मी माझा बदला पुर्ण करणार, इथं येणार्‍या प्रत्येकाला मरावचं लागेल..”, नेत्रा पुन्हा संतापुन म्हणाली

“कसला बदला नेत्रा, तुझं शरीर मातीत मिसळुन अनेक तपं उलटुन गेली. आता तुझं जे काही अस्तीत्व आहे ते फक्त एका तेजस्वी पुंजक्याच्या रुपाने. आत्माच्या रुपाने. आणि कुठल्या शरीराचा तु गर्व करत आहेस? प्राणाशिवाय शरीर हे निस्तेज असते. कुणालाही त्याबद्दल क्षणभरातच घृणा वाटु लागते. प्राणाशिवाय असलेल्या शरीराला दुर्गंधी येते आणि असे शरीर काही दिवसांतच मातीमोल होऊन जाते.

प्रेत अर्थात प्र+इत म्हणजेच जो शरीरातुन निघुन गेला तो आत्मा, आणि आत्मा सोडुन गेल्यावर जे राहीले ते प्रेत. मग अश्या फुटकळं शरीराचा गर्व कश्याला? ज्यांनी तुझ्यावर अत्याचार केले त्यांना त्यांची शिक्षा मिळालेली असेलच.”, रामुकाका

शाल्मलीच्या चेहर्‍यावर गोंधळाचे भाव स्पष्ट दिसुन येत होते…

“पण म्या ह्यावर विश्वास कसा ठेवावा?”, नेत्रा

“त्याची काळजी तु करु नकोस. मी तुला ह्या सर्व घटनांची आठवण करुन देतो..”, असं म्हणुन पंतांनी स्वतःकडील ती भोजपत्र उघडली आणि काही मंत्र उच्चारायला सुरुवात केली

रामुकाकांच्या प्रत्येक वाक्याबरोबर शाल्मलीच्या चेहर्‍यावरील भाव बदलत होते. आश्चर्याचे, वेदनेचे, दुःखाचे, संतापाचे भाव तिच्या चेहर्‍यावर तरळुन जात होते.

रामुकाकांचे मंत्र म्हणुन झाल्यावर शाल्मलीने डोळे उघडले. तिच्या चेहर्‍यावर घर्मबिंदु जमा झाले होते, तिचा श्वाच्छोत्स्वास जोरजोरात चालु होता.

“नेत्रा, तुला तुझा बदला घ्यायचा आहे ना, मग ही शेवटची संधी तुला उपलब्ध आहे. तुला फसवणारा, तुला इतके तपं मोक्ष-प्राप्तीपासुन वंचीत ठेवणारा तो अजुनही तळघरात लपुन बसला आहे. जा सुड उगव त्याच्यावर..”, रामुकाका म्हणाले

शाल्मलीने होकारार्थी मान डोलावली.

रामुकाकांनी एकवार आकाश आणि जयंताकडे पाहीले. दोघांनीही होकारार्थी माना डोलावल्या.

रामुकाकांनी पुन्हा एकदा शेजारी पडलेली ती काठी उचलली आणि त्या मंडलाची पुर्वेकडील काडी बाजुला सरकवली त्याबरोबर वातावरणात पुन्हा एकदा थोडीफार हालचाल झाली आणि काही क्षणातच शाल्मली कोसळुन खाली पडली.

दोन क्षण रामुकाका थांबले आणि मग ते आपल्या मंडलाबाहेर आले, त्यांनी शाल्मलीला उठुन बसवले आणि आपल्या कपाळाचे कुंकु तिच्या कपाळावर सुध्दा लावले. आकाश सुध्दा आपले मंडल सोडुन बाहेर आला आणि त्याने शाल्मलीला पाणी प्यायला दिले. थोडी हुशारी येताच शाल्मली उठुन बसली.

“शाल्मली तु इथेच मोहीतबरोबर थांब, आकाश, जयंता चला खाली, उर्वरीत कार्यक्रम आपल्याला संपवायचा आहे..” असं म्हणुन रामुकाका तळघराच्या दिशेने चालु लागले.

 

तळघराचे दार उघडुन तिघंही जणं जेंव्हा आतमध्ये आले तेंव्हा पुन्हा एकदा मनावर तोच दबाव, शरीराला हाडं गोठवुन टाकणारी थंडीचा प्रत्यय तिघांना आला. हातामध्ये बॅटर्‍या घेउन तिघंही जणं पायर्‍या उतरवुन त्या खोलीकडे आले.

खोलीच्या दारातच नेत्रा पडलेली त्यांना दिसली. तिघांनीही आळीपाळीने एकमेकांकडे पाहीले. रामुकाकांनी आपल्या बरोबर आणलेल्या भांड्यातले थोडे पाणी ओंजळीत घेतले आणि भोजपत्रातील काही ओळी म्हणुन ते थेंब त्यांनी नेत्राच्या कलेवलावर शिंपडले व म्हणाले..”आम्ही भगंवंताकडे प्रार्थना करतो की तुला ह्यावेळेस मुक्ती मिळो…”

“तिला मुक्ती मिळेल तेंव्हा मिळेल रे, तुमंच काय?”, खोलीच्या कोपर्‍यातुन आवाज आला.

तिघांनी प्रकाशझोत आवाजाच्या दिशेने टाकले.

कोपर्‍यात त्र्यिंबकलाल उभा होता.

“व्वा लंगड्या, नेत्राकडुन शक्ती काढुन घेतल्यावर उभा राहीला लागलास की गड्या तु…”, रामुकाका म्हणाले.

त्र्यिंबकलालचा जबडा वासला गेला आणि आतुन दिसणारे दोन भयंकर अणकुचीदार दात बाहेर आले.

तो त्या तिघांच्या दिशेने येऊ लागला.

एका झेपेच्या अंतरावर आल्यावर तो अचानक थांबला. त्याची नजर तिघांच्या कपाळावर स्थिरावली होती.

तिघांच्याही चेहर्‍यावर एक छद्मी हास्य पसरले, तसे त्र्यिंबकलालने अत्यंत भेसुर आवाजात एक आरोळी ठोकली. तळघरातल्या त्या अंधारलेल्या भिंतीवर आपटत कित्तेक वेळ तो आवाज घुमत राहीला.

रामुकाकांनी भोजपत्र उघडुन त्यात दिलेले मंत्र म्हणायला सुरुवात केली. ते तिघंही एक कडवं म्हणुन झाल्यावर दोन पावलं पुढे जात, तसा त्र्यिंबकलाल एक पाउल मागे सरके.

काही पावलं आणि काही पद्य म्हणुन झाल्यावर रामुकाका थांबले. त्यांनी खिश्यातुन गवताची काडी काढली आणि पाण्यात बुडवुन त्याच्या सहाय्याने जमीनीवर अग्नेय दिशेकडुन पुर्व दिशेकडे जाणारी एक रेघ ओढली, व मग पुढे म्हणाले…”तुझ्या शेवटाची घटका येऊन ठेपली आहे त्र्यिंबकलाल. ही रेषा तुझा मार्ग. तु ठरवायचेस कुठे जायचे. पुर्व दिशा तुला मुक्ती प्राप्त करुन देईल, तर अग्नेय दिशा.. अर्थात अग्नीची दिशा तुला भस्म करुन टाकेल. ह्या दोन टोकांशिवाय तु कुठेही जाऊ शकत नाहिस त्र्यिंबक…”

“म्हातार्‍या, तु मला नै सांगायचेस मी काय करायचे, मी माझ्या मर्जीचा मालक हाय.. तुम्हाला जिता सोडनार नाय मी”, असं म्हणुन त्याने एक झेप रामुकाकंच्या दिशेने घेतली.

रामुकाका क्षणार्धात बाजुला झाले आणि पाण्याने भिजवलेली ती काडी त्यांनी त्र्यिंबकलालच्या अंगावर फेकली. अंगावर एखादे तप्त लोखंडी सळई पडावी तसा त्र्यिंबकलाल किंचाळुन उभा राहीला.

“ठिक तर, जर तु तुझा मार्ग निवडणार नसशील, तर आम्हालाच तुला तुझ्या मार्गावर न्हेऊन ठेवले पाहीजे..” असं म्हणुन रामुकाकांनी आकाश आणि जयंताला खुण केली व म्हणाले .. “द्वादशाक्षर मंत्र….”

तिघंही जणं एकसुरात तो मंत्र म्हणु लागले..

“ॐ भूर्भुवः स्वः तत्पुरुषाय विद्महे स्वर्ण पक्षाय धीमहि तन्नो गरुड़ प्रचोदयात”

हळु हळु तो आवाज त्र्यिंबकलालला असह्य होऊ लागला. कानावर हात ठेवुन तो जोर जोरात किंचाळु लागला.

द्वादशाक्षर मंत्राची सात आठ आवर्तन झाल्यावर रामुकाका दोघांना उद्देशुन म्हणाले…

“आता आपण काही मुद्रिका दर्शन करणार आहोत. मी जसे सांगतो आणी करतो तसेच करा”, असे म्हणून रामुकाकांनी आपल्या दोन्ही हातांचे अंगठ्यांनी त्या त्या हाताच्या अन्गुलिका, मधले बोट आणि करंगळीला खालच्या दिशेने वाकवले. मग दोन्ही हात एकमेकाना जोडले आणि म्हणाले, “हि नरसिंह मुद्रा ..”

त्यानंतर त्यांनी हातांचे अंगठे सरळ हवेत करून ते एकमेकांमध्ये अडकवले. मग दोन्ही हात छातीपासून दूर धरून त्यांनी आसमंताला अभिवादन केले आणि मग त्यांनी जप सुरु केला…

“ओम अं वासुदेवाय नमः |
ओम आं बलाय नमः |
ओम हुं विष्णवे नमः |
ओम श्री नरसिंहाय नमः |”

आकाश आणि जयंता त्यांच्या सुरात सुर मिळवुन त्या मंत्राचा जप करु लागले.

त्र्यिंबकलालने कानावर घट्ट हात धरले होते, पण तो आवाज त्याचा हात चिरुन त्याच्या मेंदुपर्यंत घुसला होता.

“बंद करा ही भोंदु गिरी.. मी तुम्हाला इथुन जावुन देतो.. निघुन जा इथुन..”, त्र्यिंबकलाल म्हणाला..

“हि भोंदु गिरी त्र्यिंबक? आणि तु केलेस ते काय? आपल्या साधनेचा उपयोग गैरप्रकारे करुन काय साध्य केलेस तु? पंतांनी ठरवले ते बरोबरच होते, तुला मुक्ती मिळताच कामा नये. कारण मुळ दोष तुझ्या आत्म्याचाच आहे. पुन्हा मनुष्य योनीत जन्मला असतास तर पुन्हा कुणाचेतरी वाईटच चिंतले असतेस. नाही आता तुला मुक्ती नाही…” असं म्हणुन रामुकाकांनी भोजपत्राच्या शेवटच्या पानावर लिहीलेल्या सर्व ओळु वाचुन् काढल्या आणि भांड्यातले ते सर्व पाणी त्र्यिंबकलालच्या अंगावर फेकले.

अंगावर अ‍ॅसीड पडावे तसा त्र्यिंबकलाल तडफडु लागला आणि क्षणार्धात त्याच्या शरीरातुन आगीचे लोळ निघाले. काही क्षण तो थयथयाट करत खोलीभर पळत राहीला आणि मग एका कोपर्‍यात जाऊन कोसळला.

रामुकाका, आकाश आणि जयंता जवळ गेले तेंव्हा तेथे एक राखेचा डोंगर शिल्लक राहीला होता.

 

“मुलांनो उठा, तुमच्यासाठी बाहेर एक गंमत आहे…”, दिवाणखान्यातच झोपलेल्या सर्वांना उठवत रामुकाका म्हणाले..

रामुकाका कसली गंमत दाखवत आहेत हे पहाण्यासाठी सर्वजण उठुन बाहेर दारापाशी आले आणि रामुकाका बोट दाखवत होते त्यादिशेने पाहु लागले.

समोरच्या झाडावर पक्ष्यांचा एक थवा किलबिलाट करण्यात मग्न होता..

“आजपर्यंत आपण इथे एकही पक्षी, एकही प्राण्याचे अस्तीत्व पाहीले नव्हते आणि आज अचानक इतके पक्षी इथे.. ह्यावरुनच आपण समजु शकतो इथले अमानवी, अघोरी शक्तींचे अस्तीत्व संपलेले आहे.. नाहि का??”, रामुकाका म्हणाले.

बाहेरचे ते सुंदर दृश्य पहाण्यात सर्वजण मग्न होऊन गेले होते.

“बरं चला, तुम्ही आवरुन घ्या. मी नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची व्यवस्था करतो. तुम्ही मला इथं स्वयंपाकाच्या कामासाठी आणले होतेत आणि खरं तर माझी त्या कामात तुम्हाला काहीच मदत झाली नाही. तेंव्हा इथुन जाण्यापुर्वी एकदा तरी माझ्या हातचा साग्रसंगीत स्वयंपाक होऊन जाउ देतच..”, रामुकाका हसत म्हणाले.

“रामुकाका..”, रामुकाकांचा हात हातात घेत शाल्मली म्हणाली..”केवळ तुम्ही होतात म्हणुन ह्या प्रकरणातुन आम्ही सहीसलामत सुटलो…”

“नाही बेटा, मी नाही, आभार मानायचेच तर पंतांचे माना. त्यांनीच आपल्याला ह्या प्रकरणातुन बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला”, असं म्हणुन रामुकाका उठले आणि स्वयंपाकघरात कामासाठी गेले.

सर्वजण आवरण्यात मग्न होते तर मोहीत चेंडुशी खेळत होता. १५-२० मिनीटं झाली असतील, रामुकाका टेबलावर गरमागरम पोह्याच्या डिशेस मांडतच होते तेवढ्यात मोहीत धावत धावत आला आणि म्हणाला….”आई.. आई.. तिकडे.. तिकडे…”

“काय झालं मोहीत.. काय तिकडे???”, शाल्मली घाबरुन म्हणाली…

“तिकडे.. टकलू ताई नाहीये अगं…”, असं म्हणुन खट्याळपणे हासत मोहीत शाल्मलीला बिलगला.

बाकीचे सर्वजणही पोह्यांचा आस्वाद घेत त्या हासण्यात सामील झाले…………………

 

[समाप्त]