डबल-क्रॉस (भाग २६) 


भाग २५ पासून पुढे >>

सूर्यास्ताची वेळ होती. क्षितिजावर लालेलाल रंगांचा खेळ चालू होता. पण त्या रंगांचा तेजस्वी प्रकाश ‘शांतीनगर’ झोपडपट्टीच्या गलिच्छ रस्त्यावर पोहोचू शकत नव्हता. अंधार दाटत होता आणि त्यासोबतच घाणीचा वासही तीव्र होत होता.

रस्त्यावरून चालणं कठीण होत होतं. कुजलेल्या कचऱ्याचे ढीग, गटारांमधून वाहणारा काळा गाळ आणि उघड्यावर शौचालय – यांमुळे वातावरण दूषित आणि दुर्गंधीयुक्त होत होतं. झोपडपट्टीतील घरे जणू काही एकमेकांवर आदळत होती. जंगळात उगवलेल्या झाडांसारखी ही घरे एकमेकांमध्ये गुंतलेली होती. लाकडी आणि जस्त पत्र्यापासून बनवलेली ही घरे अत्यंत कच्ची आणि असुरक्षित दिसत होती.

घरासमोर लहान मुले धुळीत खेळत होती. त्यांच्या चेहऱ्यावर गरिबी आणि कुपोषणाची स्पष्ट छाया होती. काही स्त्रिया भांडी घासत होत्या तर काही पुरुष दारूच्या दुकानाच्या आसपास जमा झाले होते.

संध्याकाळचा प्रकाश हळूहळू मिटत होता आणि त्यासोबतच ‘शांतीनगर’ झोपडपट्टीची अंधारी बाजू अधिकच उघड होत होती. कदाचित कुणालाही अशा गलिच्छ आणि असुरक्षित ठिकाणी जायला आवडणार नाही. पण ‘शांतीनगर’ मध्ये राहणाऱ्यांसाठी हे घरच होतं.

कबीरला अस्वस्थ वाटत होते.

रितूचे ऑफीस असल्या घाणेरड्या भागात असेल असली त्याने स्वप्नातही कल्पना केली नसती. पत्ता शोधत शेवटी तो एका दुमजली पत्र्याच्याच घरापाशी पोहोचला. करकरणारा जिना चढून तो वरच्या मजल्यावर गेला.

दार हलके उघडेच होते.

करणने दार उघडले आणि आत पाऊल टाकले. खोली अत्यंत साधी होती. एका कोपऱ्यात जुने टेबल आणि खुर्ची होती आणि दुसऱ्या कोपऱ्यात काही पुस्तकांची रॅक होती. खोलीत मंद प्रकाश पसरलेला होता. रितू टेबलावर बसली होती आणि कागदपत्रांमध्ये व्यस्त होती. तिच्या आजूबाजूला काही पुस्तके आणि कागदपत्रे पसरलेली होती. भिंतीवर काही चित्रं आणि फोटो लावलेले होते. खोली साधी आणि स्वच्छ होती. फरशीवर गालिचा पसरलेला होता. 

करणला बघताच ती उठून उभी राहिली. तिने क्रॉप टॉप आणि लेगिंग घातले होते. डोळ्यावर काळा चष्मा होता. तिचे पोट सपाट होते, पण त्यावर जिममध्ये घाम गाळून कमावलेल्या खुणा दिसत होत्या. तिच्या चेहऱ्यावर थोडा मेकअप होता. तिने आपले काळे केस एका सुंदर पोनीटेलमध्ये बांधलेले होते.

कोर्टाच्या त्या पेहेरावापेक्षा करणला रितू आत्ता थोडी बेअरेबल वाटली.

“सापडलं वाटतं माझं ऑफीस..”, ऑफीस शब्दावर काहीसा जोर देत रितू म्हणाली..

“हेच माझं ऑफीस .. आणि आता हेच माझं घर.. आधी आम्ही तिघे खालची खोली पण वापरायचो.. पण आता मी एकटीच .. सो ही एक खोली बास आहे मला.. “, रितू
“तिघे? म्हणजे तुझे आई बाबा?”
“नाही नाही.. हे बघ.. ” असं म्हणून तिने फोटोची एक फ्रेम करणच्या हातात ठेवली..

फ्रेममधील तो फोटो बघून करण चाटच पडला.. जिमी, रोशन आणि रितू.. तिघांचा फोटो होता तो..

“जिमी आणि रोशन?”, करणचे आश्चर्य अजूनही ओसरत नव्हते..
“हो.. जिमी आणि रोशन!! आम्ही तिघे जिवलग मित्र होतो.. म्हणजे.. मी आणि जिमी मित्र होतो.. आणि मी आणि रोशन… यु नो.. “, रितू

“.. मी आणि रोशन लग्न करणार होतो करण .. ‘ही कसिनोची रॉबरी शेवटची’.. रोशन म्हणाला होता.. नंतर आम्ही जिमीला चुकवून मुंबईला पळून जाणार होतो.. एक नवीन आयुष्य सुरु करायला.. “

“पण म्हणजे.. तुला माहिती होते जिमी आणि रोशन दोघंही चोऱ्या माऱ्या करतात..?? “, करण
“म्हणजे काय? आणि ते दोघच नाही, मी सुद्धा त्यांना सामील होते… “, रितू
“पण मग हे वकील.. ?”
“ते आपलं साईड-प्रोफाईल .. आणि अश्या धंद्यात लॉ माहीती असणं .. त्यातल्या पळवाटा माहिती असणं चांगलंच ना!.. कितीदा मीच त्यांना सोडवलय पकडलं गेल्यावर.. “
“ओ माय गॉड .. धन्य आहेस तू!!”

“रोशन जिमीसारखा नव्हता करण .. त्याला हिंसा पसंद नव्हती.. पण जिमी.. जिमी अगदी उलटा.. रक्त पाहिल्याशिवाय काम झालंय असं वाटायचंच नाही त्याला.. “

“.. पण मग तू मला सोडवण्याचे कारण?”


“मला बदला हवाय करण .. रोशनचा बदला .. मला त्या माकडाला मारायचंय ज्याने रोशनला मारले.. “
“आय एम सॉरी रितू.. आय विश आय कूड हेल्प.. पण मला नक्की तेंव्हा तिथे काय झालं .. खरंच काहीच माहिती नाही.. मी तर तेंव्हा त्या पेट्रोल पंपवर होतो.. आणि जेंव्हा आलो तेंव्हा इट वॉज ऑल ओव्हर.. “

“तुला माहीती नाहीए काय झालं, पण मला माहितीए ना.. !!”, रितू आपला टेबलावरचा मोबाईल उचलत म्हणाली

रितुने मोबाईलमध्ये एक व्हिडीओ चालू केला आणि पहिला काही भाग पुढे करून तो मोबाईल तिने करणच्या हातात ठेवला.

मोबाईलच्या स्क्रीनवर शैला आणि करण स्वतः दिसत होते.. शेखरच्या फार्महाउस मध्ये.. आणि दोघांच्याही चेहऱ्यावर गोंधळली भाव होते. हा तोच क्षण होता जेंव्हा ते इशिताची बॉडी पुरुन पुन्हा फार्महाऊसवर आले होते, आणि आतमध्ये त्यांना समोर जिमी आणि रोशन दिसले होते.

“हे.. हे कसं??”, मोबाईलकडे बोट दाखवत करण म्हणाला..
“रोशनच्या शर्टच्या बटणला … एका बटणाच्या जागी नेहमी एक छोटा व्हिडीओ कॅमेरा लावलेला असायचा.. हे दोघे कुठूनही गुन्हा करुन आले कि ते फुटेज आम्ही तिघे.. किंवा जास्ती करून मी बघायचे.. जेणेकरून जर कधी पकडले गेलेच.. तर त्या वेळी तिथे नक्की काय काय घडले होते.. आणि त्यातून पळवाटा कश्या शोधता येतील ह्यासाठी मला हे व्हिडीओ खूप उपयोगी पडायचे.. “, रितू सांगत होती..

“ही पोरगी दिसते तितकी साधी नाही.. “, रितू बद्दल एक प्रशंसक विचार करणच्या मनात तरळून गेला..
“पोस्टमार्टम नंतर पोलिसांनी जिमी रोशनचे फोन तर काढून घेतले होते फॉरेन्सिकसाठी, पण त्यांचे कपडे परत केले.. त्यांना तरी काय माहीती .. खरी माहीती तर इथे दडलेली आहे.. “

“..”

रितुने तो व्हिडीओ आणखी पुढे केला..
आता त्या फार्महाउसवर फक्त तिघेच होते.. शैला, जिमी आणि रोशन..

करण त्या वेळी तिथे नसल्याने ह्या पुढे तिथे जे काय घडणार होते.. घडले होते.. ते करणसाठी नवीन होते..

करण मोबाईल घेऊन एका मळकट कॉटवर बसला..

“कमॉन बेबी.. फन टाइम..”, शर्टची बटणं काढत जिमी शैलाला म्हणत होता..
त्याने आपला सुरा आणि बंदूक रोशनकडे दिली आणि म्हणाला.. “येय हिचा काय भरोसा नाय बा .. मी कामात मग्न, अन ही माझीच एकदम गेम करायची.. एक काम कर.. हे तुझ्याकडेच ठेव.. हिच्यापासून लांब.. “

“ओके जिमी.. “, रोशन
“अन तुझं काय? थांबतोएस इथे मज्जा बघायला? का आत जातोस?”
“मी आतमध्ये आहे बेडरुम मध्ये.. तुमचं झालं कि सांग.. “, असं म्हणून जिमीचा तो सूरा, त्याची बंदूक आणि स्वतःची बंदूक घेऊन रोशन आतल्या बेडरूम मध्ये जायला निघाला आणि अचानक..

अचानक हॉलच्या एका बाजूची भिंत जणू बाजूला सरकली आणि त्यातून एक धिप्पाड माकडाच्या चेहऱ्याचा एक माणूस विजेच्या वेगाने बाहेर आला..

तो बाहेर आला तो अगदी रोशनपासून एखाद्या फुटावर..

“शेरा.. “.. करण स्वतःशीच म्हणाला खरा.. पण रितुने ते बरोबर ऐकले..
तिने पटकन मोबाईलमधील व्हिडीओ पॉज केला..

“काय म्हणालास तू? शेरा??”, रितू
“हो.. शेराचा!!”
“तू.. ओखतोस त्याला?”
“नाही.. पण शैलाकडून ह्यांच्याबद्दल ऐकलंय.. संदीपचा माणूस आहे हा..”
“संदीप? म्हणजे तो इन्शोरन्स वाला?”
“हो तोच.. आणि मोहीतनेही मला ह्यांच्याबद्दल सांगितले होते.. इनफॅक्ट त्या वेळी मोहीत त्या तळघरातच कुठेतरी लपलेला होता.. “
“मोहीत? मोहीत कोण?”

मग करणने रितूला मोहितबद्दल.. इशिताबद्दल सांगितले.. ते कसे तिथे आले.. ब्लॅकमेल.. इशिताचा मृत्यू.. जखमी मोहित आणि नंतर कसा तो फार्महाउस वरून एकदम गायब झाला ते एकदम उगवला एक हितचिंतक म्हणून जेंव्हा करण दवाखान्यात होता..
मोहीतचे आणि करणचे त्या रात्री करणच्या ऑफिसमध्ये झालेले संभाषण आणि त्याने त्या तळघरात अंधुकसे पाहिलेले आणि अनुभवलेले क्षण… हे सर्व विस्तृत सांगितले..

“हम्म..”, रितूने व्हिडीओ पुन्हा पुढे चालू केला

अनपेक्षितपणे तिथे प्रकटलेल्या शेराला बघून रोशन जागच्या जागीच थिजून गेला होता.

शेराने हाताचा एक जोरदार ठोसा रोशनला लगावला आणि तो कॅमेरा काही सेकंद हवेत राहून पुन्हा जमिनीवर आपटला गेला.

रोशन उठून उभा राहिला.

शेराने रोशनच्या मानगुटीला धरून त्याच्या पोटात एक लाथ मारली तसा रोशन विव्हळत जमिनीवर आडवा पडला.
एव्हाना जिमीने शेराच्या अंगावर धाव घेतली होती. दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. अंगावर पडलेल्या सापाला जसे फेकून द्यावे तसे शेराने जिमीला फेकून दिले आणि शेरा त्याच्यावर धावून गेला.
शेरा निश्चित शक्तिशाली होता पण जिमी चपळ होता, जिमी त्याला चकमा देऊन उभा राहिला.

संधी साधून रोशनने जमिनीवर पडलेली लाकडी खुर्ची उचलून शेरावर हल्ला केला. शेराला जबरदस्त मार बसला आणि तो मागे मागे सरकला. रोशनने पुन्हा हल्ला करण्यासाठी खुर्ची उचलली पण शेराने वेळीच सावरून त्याला धक्का दिला आणि रोशन भिंतीवर आदळला. तो वर जिमीने पुन्हा शेरावर हल्ला केला. दोघे जण हॉलमध्ये इकडे तिकडे धावत मारहाण करत होते. हाताला येईल ती वस्तू जिमी शेराला फेकून मारत होता. घरातील अनेक वस्तू ह्या मारहाणीत फोडल्या आणि तुटल्या जात होत्या.

जिमीने पुन्हा एकदा शेराकडे धाव घेतली, ह्या वेळी मात्र शेरा पूर्ण सावध होता.. तो बाजूला झाला तसा जिमीचा तोल गेला. हेलपाड्त जाणाऱ्या जिमीच्या शर्टला खेचून शेराने समोर उभे केले आणि सर्व शक्तीनिशी एक ठोसा जिमीच्या हनुवटीवर लगावला..

हा घाव मात्र जिमीच्या वर्मी बसला आणि तो जागच्या जागी कोसळला…

शेराने एकवार रोशनकडे पाहीले .. रोशन अजूनही आपले पोट गच्च दाबून भिंतीला खेटून उभा होता..

शेराने जमीनीवर पडलेला जिमीचा तो सुरा उचलला आणि तो जिमीकडे आला.

रोशनने आपली हार आधीच कबूल केली होती.. शेरासारख्या महाधिप्पाड माणसाचा प्रतिकार तो करु शकणं शक्यच नव्हतं. शेराने जिमीला जमिनीवर आडवे पाडले आणि तो सूरा तो जिमीच्या गळ्यावरून सावकाश फिरवला.

जिमीच्या चेहऱ्यावर क्रोध आणि वेदना यांचं मिश्रण होतं.

जिमीला वेदना होत होत्या आणि त्याने शेराला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला पण शेराची पकड घट्ट होती. हळूहळू जिमीचा श्वास कमी होत गेला आणि त्याचे डोळे मिटले.

जिमी मृत्यू पावलाय ह्याची खात्री पटल्यावर, लांब लांब ढांगा टाकत शेरा रोशनच्या जवळ आला.. त्याने हातातले पिस्तूल रोशनच्या हातात धरले.. आणि काही सेकंदात धाड.. आवाज आला..

करणने रितुकडे पहिले.. रितुने आपले डोळे मिटून घेतले होते.

शेराने एका हाताने रोशनला काही फूट वर उचलले आणि एका खुर्चीत फेकले.. त्यामुळे शर्टची एक किनार नेमकी त्या बटणावर… अर्थात त्या कॅमेरावर आली.. त्यामुळे पुढचे काही दिसेनासे झाले होते.. पण ऑडिओ मात्र चालूच होता..

पुढचे काही मिनिटं वस्तू इतरत्र फेकल्याचे आवाज येत होते.. मग काही क्षण शांतता आणि नंतर पुन्हा एकदा मोठा आवाज झाला आणि नंतर एखादा मिनिट कुणाला तरी मारण्याचा आवाज..

कदाचित ह्या वेळेस शेरा शैलाला मारपीट करत होता.. पण एकदाही शैलाचा ओरडण्याचा किंवा कहणण्याचा आवाज नाही आला..

थोडा वेळ शांततेत गेला आणि मग ते तळघराचे दार उघडल्याचा आणि मग बंद करण्याचा आवाज झाला. बहुदा शेरा आपले काम करून आल्यामार्गे निघून गेला होता.

 

“सो… तुला शेराचा बदला घ्यायचाय?”, मोबाईल रितुकडे परत देत करण म्हणाला..
“श्शsssss !! व्हिडीओ अजून संपला नाहीए.. कदाचीत तुझ्या कामाचं असू शकेल.. निट ऐक !!”, मोबाईल परत करणकडे देत रितू म्हणाली..

रितुने काही मिनिटं व्हिडीओ पुढे केला.

अजूनही कसलाच आवाज नव्हता.. कॅमेरा लेन्सवर शर्टच आच्छादन आल्याने दिसतही काही नव्हते. काही वेळ परत शांततेत गेला आणि मग अगदी हलकेच तळघराचे दार उघडल्याचा आवाज झाला…

करणने रितुकडे पाहीले..

कोणीतरी हलक्या पावलाने चालत होते.. आणि मग अगदी बारीक.. कुजबुजल्यासारखा एक आवाज आला..
पहिल्यांदा करणला काहीच कळाले नाही. त्याने व्हिडीओ थोडा मागे घेतला आणि मोबाईल अगदी कानाजवळ धरून तो ऐकू लागला..

“शैल.. आर यु ओके?”

करणने पुन्हा व्हिडीओ थोडा मागे घेतला

शैल.. आर यु ओके?”

पाठोपाठ शैलाच हलकेच कहणण्याचा आवाज आला..

“शैल.. स्टे स्ट्रॉंग .. सि यु सुन …”

काही वेळाने पुन्हा तो पावलांचा आवाज, तळघराचे दार उघडल्याचा, बंद झाल्याचा आवाज आणि नंतर पूर्ण शांतता..

“कुणाचा असेल तो आवाज? एनी गेस?”, रितुने प्रश्नार्थक मुद्रेने करणला विचारले
“काय माहीत.. आवाज इतका हळू आणि अस्पष्ट आहे कि काहीच सांगता येत नाहीए..”
“तो जो तळघरात लपून बसलेला तो..मोहित का जो कोण होता, तो असेल का?”
“नाही, त्याचा नाही वाटते आवाज”
“कश्यावरुन? तूच म्हणालास ना आवाज अस्पष्ट आहे.. शिवाय आपल्या माहितीत तोच एक आहे जो तिथे होता..”
“हो आवाज अस्पष्ट आहे.. पण चालण्याच्या आवाजावरून.. परवा आम्ही भेटलो होतो.. तेंव्हा पण त्याला नीट चालत येत नव्हते.. लंगडत चालत होता. त्याच्या पाठीला झालेल्या इजेमुळे. “

“..”

“ती व्यक्ती.. शैल म्हणाली.. मी नक्की ऐकले.. शैला नाही.. “, करण
“हो.. मी पण तेच ऐकलेय.. “

“..”

“तो इन्शोरंन्स वाला.. संदीप? तो असेल?”

संदीप वर शंका घेतली जाऊ शकत होती. त्याचे आणि शैलाचे प्रेमप्रकरण करणने ऐकले होते.. प्रेमाने कदाचित तो शैलाला शैल म्हणत असेलही.. हू नोज?

“सांगता नाही येत… पण तो तिथे का येईल?.. हा जो कोण तिथे येऊन गेला.. त्याला तिथे घडलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती होती.. तो कुठल्याच गोष्टीला रिऍक्ट झाला नाही.. तो शांतपणे आला. शैला सेफ आहे ना बघितले आणि निघून गेला.. जिमी-रोशन, आतल्या बेडरुममधील शेखरची डेड-बॉडी कशाशीच त्याला देणे घेणे नव्हते..”

“राईट.. पण तू बघ.. तुला कोणी आठवतंय का जो शैलाला शैल म्हणत असेल.. “

“एनीवेज मला त्याच्याशी फारसे काही देणे घेणे नाही.. मला त्या माकडाचा बदला घायचायं ज्याने माझ्या रोशनला मारले.. आणि मला त्यासाठी तुझी मदत हवीय.. कुठे मिळेल हा शेरा?, काय करतो? त्याचा विकनेस काय? त्याचे रुटीन काय? मला सगळ्याची माहिती हवी आहे.. “, झपाटल्यासारखी रितू बोलत होती.. आणि करण मात्र अजूनही त्या ‘शैल’ वरच अडकला होता..


मंडळी, मागच्या एका पोस्ट मध्ये मी “शॉप्पीझी” ह्या आमच्या छोट्याश्या बिझिनेस बद्दल बोललो होतो, त्याच्या वेबसाईटचा दुवा सुद्धा दिला होता.
ह्या वेळी आमच्या काही सुंदर हॅण्डमेड, हॅंडिक्राफ्ट्स प्रोडक्टस चे युट्युब शॉर्ट्स बनवले आहेत, त्याचा दुवा देतो आहे. नक्की बघा.
आवडले तर लाईक / शेअर / सबस्क्राइब करा..

एक छोटीशी झलक –

[क्रमशः]

5 thoughts on “डबल-क्रॉस (भाग २६) 

Leave a comment