तुझ्या विना (भाग-१)


मंडळी, फार पुर्वी `लव्ह के लिए…’ नामक एक मराठी प्रेमकथा ब्लॉग वर लिहीली होती, नंतर त्याचे नाट्य-रुपांतर सुध्दा केले. ती कथा ब्लॉगच्या बॅक-अपमध्ये कुठेतरी हरवुन गेली, पण ते नाट्य-रुपांतर जे ब्लॉगवर प्रसिध्द झाले नव्हते ते माझ्याकडे आहे.

एक वेगळा प्रयत्न, एक छान कथा आहे, तुम्हाला वाचायला आवडेल म्हणून प्रकाशित करत आहे.

प्रसंग १: केतनचे घर..

पडदा उघडतो. स्टेजवर एक ४५ च्या आसपासची स्त्री स्वयंपाक घरातुन हॉल मध्ये येते, घड्याळाकडे बघते. चेहर्‍यावर निराशेचे भाव. तिच्यापाठोपाठ स्टेजवर एक २५-३० च्या आसपासची तरुणी येते.

आई : छे बाई.. कित्ती हा उशीर? वेळ जाता जात नाहीये. कधी यायचा हा?
तरुणी : येईल अगं इतक्यात. आणि आपला सख्या गेलाय नं त्याला आणायला? मग कश्याला काळजी करतेस?
आई : काळजी नाही गं तायडे.. पण एक एक क्षण एक एक युगासारखा वाटतो आहे. आता नाही बाई अजुन वाट बघवत.
तरुणी : आठ वर्ष वाट पाहीलीस ना? मग अजुन थोडाच वेळ.. येतच असतील. फोन लावुन बघायचा का?

आई : बघु अजुन ५ मिनीट वाट नाही तर लावु फोन. पण तायडे, तुला परत सांगते.. आता येईल ना तो.. तर जरा लग्नाचा विषय काढ त्याचा. काय चाललं आहे त्याच्या मनात काहीही थांग लागु देत नाही. तुच बोल बाई त्याच्याशी.. मी विषय काढला तर तो उडवुन लावतो.. तुझं ऐकेल तो…
तायडी : हो आई.. कित्ती वेळा तें-तेच सांगणार आहेस? आणि शेवटी तुला माहीते त्याला इथली बायको नकोय.. त्याला अमेरीकेचीच मुलगी हवीय बायको म्हणुन.. ओरडलं की म्हणतो कसा, तुच लहानपणी गाणं म्हणायचीस ना.. “गोरी गोरी पान, फुलासारखी छान, दादा मला एक वहीनी आण..” मग अशी वहीनी इथं कुठं मिळणार.. तिकडुनच आणावी लागेल…
असो.. आता येतो आहे ना.. चांगला घेऊ त्याला कोपच्यात.. सगळं व्यवस्थीत होईल..
आई : कोपच्यात?
तायडी : कोपच्यात.. कोपर्‍यात हात करत..
आई : श्शी तायडे कसली तुझी ही भाषा? अगं मुलीच्या जातीला शोभतं का असलं? ती अनु बघ…
तायडी : बास्स.. बास्स.. बास्स.. परत आता तु अनुचं पुराण नको चालु करुस.. अनु अशी आहे.. अनु तश्शी आहे…. आत्ता एवढं कौतुक चाललं आहे.. बघु सुन म्हणुन आल्यावर किती दिवस हे प्रेम टिकतेय ते..

आई अस्वस्थपणे येरझार्‍या घालत असतात इतक्यात दारावरची बेल वाजते.

आई : “अगं बाई.. आले वाटतं अमेरीकाकर.

आई दार उघडायला जातात.

थोड्यावेळाने दारातुन एक पंचवीशीचा तरुण, केतन, सामानांच्या बॅगा घेउन आतमध्ये येतो. पाठोपाठ घरगडी भासणारा सखाराम बाकीच्या बॅगा घेउन आत येतो.

बेलचा आवाज ऐकुन काही वेळात दारात केतनला भेटायला उत्सुक असणार्‍या सगळ्यांचा गोतावळा जमा होतो.

आई : ”आलं गं माझं सोनं ते.. केतु.. कसा झाला प्रवास?

आई आणि तायडी दोघीही एकदमच –

आई : “आणि काय रे.. कित्ती वाळला आहेस? खात नव्हतास का अमेरीकेत?”
तायडी : “काय रे दादुटल्या.. अमेरीका मानवलेली दिसतेय.. चांगलाच सुटला आहेस की..”

दोघीही एकमेकींकडे बघतात.. तायडी स्वतःच वाक्य बदलत हळु वेगाने

तायडी : “काय रे दादुटल्या.. अमेरीका मानवली नाही वाट्टत.. कित्ती वाळला आहेस…!!!”

एव्हाना बाकीची मंडळी सुध्दा बाहेर येतात.

केतन : (बॅगा खाली ठेवुन आईच्या पाया पडतो) “काय गं आई? वाळला काय? उलट चिझ, बटर खाऊन खाऊन जाडच झालोय.. आणी काय गं वेब-कॅमवर काय वेगळा दिसायचो का?”

तायडी : “अरे वेड्या आईची वेडी माया अशीच असते. तु अगदी गलेलठ्ठ… गुबगुबीत होऊन आला असतास ना, तरीही ती तस्सेच म्हणली असती बघ.”
आई : का रे बाबा एव्हढा वेळ लागला..?
केतन : अगं हा सख्या.. मला सापडलाच नाही.. कित्ती वेळ थांबलो होतो मी.. शेवटी निघालो होतो टॅक्सी करुन तेव्हड्यात हा समोर दिसला.. म्हणलं विचारावं हाच सखाराम का? तर हो म्हणला.. आणि समोरच उभा होता बरं का माझ्या..
आई : काय रे सख्या? तु ओळखलं नाहीस ह्याला?
सखाराम : अवं आई.. मला वाटला ह्ये अमेरीकेवरुन येणार म्हंजी एखादा बर्म्युडा घातलेला ढगळं रंगीत कापडं घातल्येला कोन तरी असेल.. त्यामुळं ह्यांच्याकडं म्या आधी बघीतलाच नाय ना…

आई डोक्यावर हात मारुन घ्येतात..

आई : (केतनकडे वळुन) “बसं रे बाबा.. दमला असशीला ना प्रवास करुन?”
केतन: (आईला हाताला धरुन खाली बसवत) “नाही गं आई..दमायला काय होतंय? दोन-चार तासाचा तर प्रवास.. अगं मी बॅंगलोर वरुन आलो आहे आत्ता!! अमेरीकेवरुन कालच तर आलो होतो ना मी बॅगलोरला.

अगं आज तिथल्या आमच्या शाखेत एक KT सेशन होते.. मी येतंच होतो इकडे तर माझ्याच गळ्यात टाकलं ते कामं. आज दुपारी ते संपल, मग एक डुलकी काढुन इकडे आलो..”

एव्हाना सखाराम त्याच्या हातातल्या आणि केतनकडच्या बॅगा कोपर्‍यात ठेवुन येतो. केतनच्या डोक्यावरील टोपीकडे बघत –

सखाराम : (अग्निपथमधील अमिताभच्या आवाजातला डायलॉग) हवा बहोत तेज चलताय दिनकरराव, टोपी संभालो.. उड जायेगी…

केतन संभ्रमावस्थेत सखारामकडे बघत रहातो..

सखाराम : अवं म्हजी, टुपी काढुन ठेवा नव्ह..

केतन खांदे उडवतो आणि टोपी काढुन खुर्चीवर ठेवतो.

तायडी : “ए दाद्या, आता आला आहेस ना चार-दोन आठवड्यांसाठी? का जायचे आहे लगेच?”
केतन (खुर्चीवर आरामात बसत) : “नाही.. आहे आता.. पुढच्या आठवड्यात सुशांत दादाचे लग्न उरकले, धावपळ संपली की मग १-२ आठवडे मस्त आराम करणार, (आईचा हात हातात घेत) आईच्या हातचा स्वयंपाक हादडणार आहे..”..

आई केतनच्या चेहर्‍यावरुन हात फिरवुन डोक्यावर बोटं मोडत कौतुकाने त्याच्याकडे बघत..

आई : हो रे बाबा!!.. तु नाही.. निदान तुझ्या भावाने तरी नंबर लावला लग्नाचा.. तुझा रस्ता मोकळा झाला बघ.. आता तरी घे जरा मनावर….
केतन : ए काय ग आई…. झालं का तुझं चालु परत..??.
आई : (मिश्कील हसत) बरं.. केतु.. तु फ्रेश हो.. तुझ्या आवडीचा सगळ्ळा स्वयंपाक तय्यार आहे. मस्त गरमा गरम जेऊन घे आणि मग बसु गप्पा मारत काय…
केतन : हो आई.. पण आधी सुशांत दादाला भेटतो.. कुठे आहे कुठे तो? घरी आहे? का गेला आपल्या होणार्‍या बायकोबरोबर फिरायला…

एवढ्यात जिन्यावरुन सुशांत आणि केतनचे भाउ-बंधु धावत-पळत केतनला भेटायला येतात. सगळेजण केतनभोवती कोंडाळ करुन त्याची चौकशी करु लागतात.

सुशांत : अहो महत्वाचे पाहुणे येणार आणि आम्ही घरी नसणार असे कधी होईल का?

दोघं जणं एकमेकांना कडकडुन मिठी मारतात.

केतन (सुशांतच्या पाठीवर थाप मारत) : “काय नवरदेव? झाली का तय्यारी लग्नाची..?? आणि लग्नाची म्हणण्यापेक्षा आधी मनाची?”
सुशांत : “हो.. म्हणजे आता झालीच म्हणायची.. अरे वेळच नाही मिळाला ना तयारीला. लग्न ठरवतोय म्हणतोय आणि तोच आम्हालाही अमेरीकन गोऱ्याचे आग्रहाचे आमंत्रण आले आहे एक वर्षासाठी त्यामुळे मग गडबडीतच लग्न ठरवावे लागले..”
आतुन दोन चार लोकं शहनाईचा आवाज काढत (टॅटॅ टा ट टॅ ट टा.. ट टा ट टॅ ट..) म्हणत सुशांत आणि केतन भोवती दोन-चार चकरा मारतात आणि परत आत पळुन जातात.
केतन : कुठे वेस्ट कोस्टला जाणार म्हणलास ना?
सुशांत : हो.. सध्यातरी तोच प्लॅन आहे…
आई : केतन तु आलास.. घर बघ कसं भरल्या भरल्या सारखं वाटतंय.. आत्ता तुझे बाबा असते तर…

आई पदर डोळ्याला लावतात…

सखाराम : असु ध्या हो आई देवाने आपल्याला काय बी कमी पडू दिले नाही.. आज केतनदादा घरी आलेत. आऩ आपले छोटे मालकच नव्हं ते..

वातावरण थोडं भावनीक होतं..

केतन (सुशांतकडे बघुन डोळे मिचकावत): बरं ते जाऊ देत, यार फोटो तर दाखवं ना वहिनीचा, आणि मला कळत नाही, तुला फोटो ई-मेल करायला काय प्रॉब्लेम होता?

सुशांत : ‘अरे फोटोच काय घेऊन बसला आहेस, प्रत्यक्षात तिचीच ओळख करुन देतो ना.. इथेच आहे बघ ती.. मेंदी लावण्याचा कार्यक्रम चालु आहे वरती.. (असे म्हणुन सुशांत हाक मारतो)..’अनु.. एss अनु.. खाली ये जरा’

केतन : (चाचपुन) ‘अनु??’
सुशांत: ‘अरे म्हणजे.. अनुराधा रे.. तिच आहे… तिच आहे… जिचे पत्रिकेवर नाव होते.. घाबरु नको.. बदलली नाहीये..”
(पुन्हा जिन्याकडे बघत)” ..ए. अनु खाली ये ना..”

(मग केतनकडे वळुन) ”बरं..!! आमचं झालं !! .. तुमचं काय? कधी करताय लग्न??? मिळाली का नाही तुमच्या मनासारखी ब्लॉंड तुम्हाला?
सखाराम : आ तुझ्या मायला..
सुशांत : काय झालं रे सख्या…
सखाराम : न्हाय जी.. काय नाय..
सुशांत : काय नाय काय काय नाय?.. बोल काय झालं..
सखाराम : काय नाय ओ दादा… असंच.. काय केतनदादा अमेरीकेला जाऊन आला न्हव्हं.. असेल बा तिथें असलं फ्याड.. टकुली बायांशी लगीन करण्याचं..

सुशांत : टकुली बाय? अरे काय बोलतोय सख्या..
सखाराम : “आता तुम्हीच म्हणलात न्हवं का बाल्ड बाय.??… सुशांतदादा अवं थोडं फार मला पण येत्य की वंग्लीश.. बाल्ड मंजी टकुली न्हवं?”
सुशांत : ‘अरे बाल्ड नाही, ब्लॉंन्ड.. ब्लॉंन्ड!!! ब्लॉंन्ड म्हणजे किनई, अशी सोनेरी केसांची, निळ्या डोळ्यांची, गोरी-गोरी पान परीच हवी आहे आपल्या केतनला.. साहेबांना भारतीय नारी नको आहे ना बायको म्हणुन..!! त्यांना अमेरीकन ब्लॉंड्शीच लग्न करायचे आहे.. काय करणार?? इतकी चांगली स्थळ सांगुन आली होती.. पण साहेब बधतील तर काय?’

सखाराम :.. असं असं.. अवं काय त्या ब्लांड बायंच घ्येउन बसल्यात अवं आपल्या हिथ बाया काय कमी हायेत व्हयं.. अवं तुमी फक्त हो म्हणा.. अशी रांग लावु आपन हिथ..
केतन : रांग?
सखाराम : व्हय जी.. रांग…
केतन : इथं..
सखाराम : हा मंग.. हिथंच की…
केतन : आणि कोण लावनार रांग?
सखाराम : कोन म्हंजी.. म्याच की.. लयी म्हंजी लयी व्हलकी हाईत हिथं…
सुशांत : अरं मग चांगलं आहे ना.. आहे का कोणी तुझ्या पहाण्यात?
सखाराम : येक? अहो छप्पन्न हाईत.. म्हंजी बघा.. संगी.. मंगी.. पुष्पा.. ती पुष्पा तर लई हुशार हाय हा.. अवं हाठवी पास हाय.. पन तुक्या.. तिचा बाप.. साला दारु मंदी पैशी घालत्यो अन तिच्या शालेला नाय म्हणला पैका.. म्हणुन नाय तर धावी तर नक्कीच झाली असती…

सुशांत आणि केतन एकमेकांकडे बघतात..

सखाराम : तुम्ही हादी बोल्ला हस्तानं तर येक चांगला कट्टा व्हता म्हायतीत..
सुशांत आणि केतन : (एकदम) कट्टा…
सखाराम : अवं म्हंजी.. बदाम.. बदाम..
सुशांत आणि केतन : (पुन्हा एकदमच) बदाम?
सखाराम : अवं कसलं तुमी शिकलेलं येव्हढं येक अमेरीकेला जाऊन आलं,. दुसरं जानार.. आन ह्ये शब्द तुमास्नी म्हाईत न्हायं? अवं बदाम म्हंजी येक चांगली पोरगी व्हं.. कमळा नाव त्यीचं..
केतन : अस्स्.. अस्सं.. मग काय झालं तिचं…
सखाराम : ठरलं न्हवं लगीन तिचं…

केतन आणि सुशांत स्वतःच हासु दाबत, हातावर हात आपटत.. डॅम इट.. चांगली संधी गेली सख्या…न्हायतर कमळाशी जमलंच असतं बघ..

सखाराम : व्हय जी..पन तुम्ही म्हणत असाल तर पुष्पी ला घेऊन येऊ हिकडं..?
केतन : नको.. नको.. इतक्यात नको.. आधी सुशांतदाच्या लग्नाची गडबड संपु देत, मग बघु… जा तु.. बॅगा न्हेऊन ठेव आतमध्ये…
सखाराम : व्हयं जी.. ठ्येवत्यो.. (असं म्हणुन तिथेच घुटमळत उभा रहातो)

केतन आणि सुशांत बोलण्यासाठी एकमेकांकडे वळतात, पण सखाराम तेथेच थांबल्याचे लक्षात येताच पुन्हा मागे वळतात..

सुशांत : आता काय?
सखाराम : सुशांतदादा.. आता केतन दादा भी आले हाईत.. मंग..
सुशांत : हो.. मग?
सखाराम : म्हंजी.. आता ती लगीनाआधी कसलीशी पार्टी असतीय नव्हं का.. बैंच पार्टी..
केतन ; यु मीन.. बॅचलर पार्टी…
सखाराम : व्हयं.. व्हयं.. त्येच.. ती करणार असाल न्हव्हं.. तर म्या काय म्हंतो..
सुशांत : बोला.. काय म्हणताय..
सखाराम : म्हंजी.. हिथं बाई मानुसं असनारच. त्या पेक्षा आपनं सगलं पोरं हिथं गेलो तर? (असं म्हणुन खिश्यातुन एक चुरगळलेला पेपर काढतो आणि त्यातील एका जाहीरातीकडे बोट दाखवत सुशांतकडे देतो.)

सुशांत : तो पेपर सरळ करुन त्यातील जाहीरात अडखळत वाचु लागतो. “मदभर्‍या नजरबंदीने लावणी रसिकांना जायबंदी करुन टाकणारी, लावणी नृत्याची जास्वंदी.. लावणी नृत्याचा सदाबहार कार्यक्रम.. (परत पेपर सखारामकडे देतो…) बघु आपण नंतर हा.. ठरवु नंतर जा तु बॅगा घेउन..
सखाराम : अवं सुशांत दा असं काय करताय.. म्हाराष्ट्राचं लोकनृत्य हाय न्हवं त्ये.. अवं केतनदादा पण खुश होतील न्हवं..
सुशांत : (शक्य तेव्हढा कंट्रोल ठेवत, समजावणीच्या सुरात), बरोबर आहे तुझं.. आज नको.. आजच केतन आलाय ना, दमला असेल तो.. वेळ आहे लग्नाला आजुन.. ठरवु आपण.. जा तु आता बॅगा घेउन आत…

सखाराम दोन क्षण तेथेच घुटमळतो आणि शेवटी निराश होऊन बॅगा उचलायला जातो.

सखाराम (सगळ्या बॅगा एकदम उचलत) : जिसमै है दम तो फक्त बाजीराव सिंघम..

सखाराम बॅगा घेउन आत जातो… स्टेजवर फक्त केतन आणि सुशांतच उरतात.

केतन : आता माझी सटकली रे……..

केतन आणि सुशांत हसत हसत एकमेकांना टाळ्या देतात.

सुशांत : बरं ते जाऊ देत.. चेष्टा पुरे.. पण खरं सांग ना.. कुणी भेटली की नाही तुझ्या मनासारखी..
केतन (वैतागुन) : ‘काय रे..? कश्याला माझ्या लग्नाचा विषय काढताय? माझं ठरलं की मी सांगीनच ना तुम्हाला. आणि खरं सांगु का? ते ब्लॉंड, अमेरीकन वगैरे जाऊ देत, विसरुन जा ते सगळं’..
सुशांत (भुवया उडवत आणि कोपरखळ्या मारत) : “का रे बाबा? प्रेम-भंग वगैरे केला का कुठल्या अमेरीकन मुलीने तुझा? का कुठली भारतीय आवडली? का अचानक असा अध्यात्मीक साक्षात्कार होतात तसंलं काही झालं?”
केतन : (लाजत आणि इकडे-तिकडे बघत हळु आवाजात) : “.. म्हणजे.. अगदीच तसे काही नाही.. पण एक भारतीय आवडली खरी…”
सुशांत: (आश्चर्याने) “काय?? अरे काय बोलतोयेस काय? अरे कधी? कुठे? केंव्हा? आणि हे तु आत्ता सांगतो आहेस..??

(जोरात ओरडत) अरे ऐका ऐका..ss चमत्कार चमत्कार….’

केतन पटकन सुशांतच्या तोंडावर हात ठेवुन त्याचा आवाज बंद करतो.

केतन : “अरे गप्प ना..अजुन कश्यात काही नाही.. कश्याला गाव-जेवण घालतो आहेस? मला फक्त तिचं नाव आणि ती आपल्याच गावची- मुंबईची आहे.. एवढेच माहीती आहे..”,
सुशांत : (केतनच्या तावडीतुन सोडवुन घेत) “बरं.. कशी आहे ती.. ते तर सांग..” (खुर्चीवर बसत)

केतन : काय सांगु तुला कशी आहे ती??? ती बघ ती तिथे उभी आहे..

सुशांत केतनने दाखवलेल्या दिशेकडे पहात रहातो.. पण तेथे कोणीच दिसत नाही.

( केतनचा भास ….)

केतन : (वैतागुन) अरे असे काय करतो आहेस.. ते बघ ना तिकडे.. (परत आपल्या तंद्रीत जात) ते बघ तिकडे दुरवर.. ते हिरवे गार गवत कसं झुलतं आहे. इतके दिवस उन्हानं रापलेल पिवळधम्मक गवत पावसाच्या आगमनाने हिरव्याकंच शालुत लपेटलं गेलं आहे. ति फुलं दिसत आहेत तुला? पिवळ्या, गुलाबी रंगाची फुलं त्या गवताआडुन डोकावुन डोकावुन आपलं अस्तीत्व सिध्द करत आहे, वार्‍याच्या झोक्याबरोबर झाडांच्या फांद्या बेधुंद होऊन झुलत आहेत..

वातावरणात बदल होतो. वार्‍याचा झोत रंगमंचावरील वस्तु हलवु लागतात. प्रखर दिवे मंद होतात.

पांढरा सफेद चुडीदार घातलेली अनु स्वतःभोवती गिरक्या घेत रंगमंचावर अवतरते.
सुशांत अजुनही तिला शोधण्याचा प्रयत्न करतो आहे.. पण ती फक्त केतनलाच दिसते आहे.

केतन : त्या डोंगराच्या काठावर बघ दोन्ही हात पसरवुन ती डोळे मिटुन आकाशाकडे पाहात दुरवर उभी आहे..

पावसाला सुरुवात होते. पावसाचा, मेघगर्जनेचा आवाज येऊ लागतो.

केतन : (उठुन उभा रहातो) . ते पहातो आहेस? तिच्या चेहर्‍यावर जमा झालेले पावसाचे रुपेरी, टपोरे थेंब? मला इतका हेवा वाटतो आहे ना अरे त्या पावसाचा!.. तिच्या अंगाला बघ ना कसा घट्ट बिलगुन बसला आहे तो!

तिच्या चेहर्‍यावरील साठलेले पावसाचे थेंब सुध्दा तिच्या गालावरुन उतरायला तयार नाहीयेत., स्वतःच्या आगमनाने इतरांना अडकवुन ठेवणारा तो मेघराज, इथे मात्र तिच्या काळ्याभोर केसांमध्ये कसा अडकुन बसला आहे.

मोठमोठ्या झाडांना हेलावुन सोडणारा तो सोसाट्याचा वारा इथे मात्र तिच्या केसांमध्ये मंद मंद रुंजी घालत आहे.. पाहतो आहेस ना तु?

सुशांत डोकं खाजवत इकडे तिकडे पहात रहातो.
केतन : तिच्या पापण्यांची होणारी नाजुक हालचाल मनाला कावरं-बावरं करत करत आहे रे. तिच्या श्वाच्छोश्वासांचा आवाज ढगांच्या गडगडाटातही स्पष्ट ऐकु येतो आहे मला.

वार्‍याचा एक जोराचा झोका येतो. अनुचे केस विस्कटुन तिच्या चेहर्‍यावर येउन विसावतात. अनु ते केस बाजुला घेण्याचा कोणताही प्रयत्न करत नाही.

केतन : वाटतं, वाटतं.. तिच्या जवळ जावं, तिच्या चेहर्‍यावरुन ओघळणारे पाण्याचे थेंब ओंजळीत भरुन घ्यावेत..पावसाच्या शिडकाव्याने हवेत पसरलेल्या भिजलेल्या मातीच्या सुखंदापेक्षाही जास्त सुखद, जास्त मादक, मनावर आनंदाचे तरंग निर्माण करणारा तिच्या केसांमधला तो तजेलदार सुगंध श्वासामध्ये भरुन घ्यावा. तिच्या शरीराची उब, थंडगार पडलेल्या माझ्या शरीरावर ओढुन घ्यावी.

जणुकाही तिला आपल्या मिठीत घेतले आहे अश्या अविर्भावात केतन हाताची घट्ट मिठी मारुन डोळे मिटुन उभा रहातो.
पावसाचा वेग वाढलेला असतो. मेघगर्जना, वार्‍याचा, पावसाच्या थेंबांचा आवाज वाढत जातो.

केतन डोळे उघडतो तेंव्हा अनु त्याच्या समोर उभी असते. केतन दचकतो. बोलण्यासाठी तोंड उघडतो पण तोंडातुन शब्दच बाहेर पडत नाहीत.

अनु खुदकन हसते, त्याचा हात हातात धरते आणि त्याला घेउन रंगमंच्याच्या दुसर्‍या बाजुला जाउ लागते. केतन हिप्नॉटाईझ झाल्यासारखा तिच्या मागोमाग चालत जातो.

केतन : अरे.. मी वेडा झालोय, बेभान झालोय.. हे बघ.. हे बघ.. जमीनीवरील हिरवीगार गवताची पाती पावसाच्या आगमनाने जितके प्रफुल्लीत झाली नसतील तितकी तिच्या ओढणीच्या स्पर्शाने ती पाती कशी मोहरुन जात आहेत.. गुलाबी फुलं तिच्या गालावर पसरलेल्या लालीशी बरोबरी करण्याचा वेडा प्रयत्न करत आहेत. जमीनीवर साठलेल्या तांबुस-चॉकलेटी पाण्याला झालेला तिच्या पावलांचा स्पर्श त्याला बेभान करुन टाकत आहेत.

मी कुठे वहावत चाललो आहे? माझं मलाच ठाऊक नाही. पण मला सांग ना.. डोंगरावरुन सुरु झालेल्या पावसाच्या धारेला तरी कुठं माहीत असतं ते कुठे जाणार आहे ते.. ते नुसत वहावत जातं.. वसुंधरेच्या गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने.. बेफाम होत, हिंदकळत, ठेचाळत… माझंही तस्संच झालं आहे मित्रा…

ते बघ ते समोर धुक्यात हरवलेलं माझं गाव आहे… पावसांच्या सरीत भिजलेले रस्ते,, नखशिखांत नटलेले डोंगर…

अनु केतनला घेउन एखाद्या बसक्या आसनावर बसते. केतन त्याची मान अनुच्या खांद्यावर टेकवतो.

ह्रुदयाचा धडधडण्याचा आवाज ऐकु येतो. पहील्यांदा वेगाने आणि मग हळु हळु कमी कमी होत नेहमीच्या वेगाने धडधडण्याच्या…

केतन डोळे उघडुन अनुकडे बघतो. दोघेही एकमेकांकडे पाहत रहातात. केतन आपल्या हात अनुच्या गालावरुन फिरवतो. अनु आवेगाने त्याला घट्ट मिठी मारते.

काही क्षण तसेच शांततेत जातात.

अनु सावकाशपणे त्याच्या मिठीतुन बाजुला होते आणि रंगमंचावरुन निघुन जाते.

बर्‍याचवेळ शांतता.. रंगमंचावरील दिवे पुर्ववत होतात.

सुशांत : .तुमचं दिवा स्वप्न संपलं असेल तर.. जरा निट कळेल अश्या शब्दात सांगणार का?

केतन आपल्या स्वप्नातुन बाहेर येतो. थोडा सावरायला वेळ गेल्यावर. एक दीर्घ श्वास घेतो.

केतन : सांगतो.. सगळं सांगतो.. पण कुठे पचकु नकोस.. (थोड्यावेळ शांतता आणि मग..) इथं येईपर्यंत माझा निर्णय अगदी ठाम होता. मला माहीते इथं तुझ लग्न.. सगळा मस्त माहोल बनलेला, त्यात इतक्या वर्षांनी आईला प्रत्यक्ष भेटणार म्हणजे माझ्या लग्नाचा विचार निघणारच. आणि म्हणुनच मी स्वतःशीच माझं म्हणणं मांडायला लागणारे मुद्दे पक्के करुन आलो होतो. लग्न करीन तर एखाद्या अमेरीकन मुलीशीच..
तुला सांगतो दा.. इतक्या हॉट असतात ना तिथल्या मुली.. आणि वागायला एकदम बिंधास्त.. कुणाच्या बा ची भिती नाही. उगाचच फालतु गोष्टींवरुन लाजणं बुजणं नाही. मला एक आवडली पण होती..खुप गोड होती आणि तितकीच हॉट.. मी तिचा फोटो सुध्दा आणलाय दाखवायला..
पण काल ती भेटली आणि…

सुशांत : ती???
केतन : हम्म.. अरे कालच ओळख झाली माझी तिच्याशी.. काल मी अमेरीकेवरुन परतत होतो.. सॅन-फ्रांन्सीस्को ते शांघाय आणि शांघायवरुन बॅंगलोरला माझी कनेक्टींग फ्लाईट होती.. तर मी शांघाय एअरपोर्टवर आलो.. नेमकी माझी फ्लाईट दोन तास डिले होती तर काय झालं…

(केतनचे बोलणे वरुन जिन्यावरुन येणार्‍या कुणाच्या तरी आवाजाने खुंटते…)

आवाज : “काय रे सुशांत कश्याला मगाच-पासुन हाका मारतो आहेस..?”
सुशांत : (केतनला थांबवत) अगं वरुन काय बोलते आहेस.. खाली ये ना.. हे बघं कोण आलय…
आवाज : आले आले….

सुशांत आणि केतन मागे वळुन बघतात. केतनची नजर जागच्या जागी खिळली जाते.. त्याच्या समोर एक सुंदर तरुणी उभी असते. दोघांची नजरानजर होते. काही क्षण दोघंही स्तब्ध होतात. कुणाला काय बोलावे, काय करावे काहीच सुचत नाही.. काही क्षण शांततेत जातात.
थोड्यावेळाने केतन काही बोलणार एवढ्यात ….

सुशांत : “ये अनु.. अगं तुझी ओळखं करुन द्यायची होती.. हा… केतन.. अमेरीकेवरुन आजच आलाय.. आणि केतन, ही अनु.. (स्वतःच्या डोक्यावर हात मारत) आय मीन अनुराधा.. तुझी वहिनी. आणि.. (लाजत, मान खाली घालत आणि इकडे तिकडे डुलत) माझी होणारी बायको…“

अनु आपले मेंदी लावलेले हात अधांतरी हवेत धरुन केतनकडे पहात असते.

केतनची स्तब्ध नजर अनुने नुकत्याच हाताला लावलेल्या ओल्या मेहंदीवर खिळुन रहाते.. शुन्यात नजर असल्यासारखी……..

मागुन फ्लाईट टेक-ऑफचा आवाज येतो. पाठोपाठ अनाऊन्समेंट्स –
“वेलकम टु शांघाय एअरपोर्ट…पॅसैंजर्स आर रिक्वेस्टेड टु स्ट्रिक्टली फॉलो आवर चेंज्ड सेक्युरीटी पॉलीसीज. इफ़ यु निड अनी असीस्टंन्स, प्लिज टॉक टु आवर हेल्प-डेस्क.. थॅंक्यु..

वेलकम टु शांघाय एअरपोर्ट……. पुन्हा फ्लाईट्सचा आवाज……

दिव्यांचा प्रकाश मंद होत जातो स्टेजवर अंधार होत असतानाच विमानांचा टेक ऑफचा आणि पाठोपाठ अनांउन्समेंट्सचा आवाज येत रहातो.

 

[क्रमशः]

26 thoughts on “तुझ्या विना (भाग-१)

  1. सुशिल

    अरे, वाचलिये ही कथा आधी… बहुदा तुझ्या जुन्या ब्लॉगवर… मस्त… नाट्यरुपांतर पण झकासचं दिसतयं…

    Reply
  2. Rahul Utekar

    मस्तच नाट्य रुपांतर केलं आहे… पण एक कळकळीची विनंती आहे… अश्याच प्रकारे अ‍ॅलिबी हि कथा कुठे सापडते का ते पहा ना…प्लीज… प्लीज…

    Reply
  3. sonali

    कथा चांगलीच आठवतेय … नेहमी प्रमाणे मनात वेगळी जागा निर्माण करून गेलेली …
    पण नाट्यरूपांतर छानच जमलंय त्यामुळे कथा माहित असली तरीही पुढच्या भागाची वाट बघणारच नक्की सगळे .

    Reply
  4. arunaerande

    मला पण ही कथा वाच्लेय रूपांतरही चांगली आठवते आहे. नाटय रुपांन्तर्ही चांगले जमले आहे.
    म्हणजे बघा मी तुमचा ब्लोग किती लक्ष देऊन वाचते!

    Reply
  5. RAJIV PATIL

    Hmm…mast aahe natya rupantar…

    Katha vachali nahi pan aata direct natya rupantar vachatoy…bhari vatatay…
    @ Agodar Vachalelyana,
    Please puthachi story comment madhe ulagadu naka…mala complete vachayachi aahe.

    Reply
  6. priyanka

    Hey aniket..!! tuzi he story me vachliy ti pan khup chan hotich sry aahe ani hyat je changes kelet na te pan khup chan aahet khup maja aali vachtana

    Reply

Leave a reply to Rahul Utekar Cancel reply