आजा गुन्हा कर ले (भाग-२)


भाग १ पासुन पुढे..

“दिन्या अरे हे काय केलेस तु?”.. समोरचे ते भयानक दृश्य बघुन माझे डोळे अजुनही विस्फारलेले होते, तर संजुची नेहमीप्रमाणे दातखीळी बसली होती.

“जास्ती बोलु नका, चला आवरा पटापट, आपल्याला निघायला हवे..” दिन्या त्याचे सामान पटापट बॅगेत भरत म्हणाला.

आम्ही एकवार सगळी रुम परत एकदा तपासली. कुठे कुणाचे काही राहीले तर नाहीना याची खातरजमा केली. दिन्याने हळुच दार उघडले आणि तो व्हरांड्यात आला. व्हरांड्यात पिवळट्ट प्रकाशात एक मंद दिवा लागलेला होता. अर्थात तो दिवा असुनही नसल्यासारखाच होता. त्याचे असुन नसणे आमच्या पथ्यावरच पडणार होते. आम्ही हळुच दिन्याच्या मागोमाग बाहेर पडलो. रात्रीची वेळ होती. कड्यावर वसलेल्या त्या मॉटेलचे पत्रे मागुन दरी-डोंगरातुन येणाऱ्या वाऱ्याने थाड्थाड उडत होते.

“मी पोलीसांना फोन करतो..” संजु पहील्यांदाच काहीतरी बोलला..
“ए फट्टु.. डोके बिके फिरेल का तुझे.. चल.. बस गाडीत..” दिन्या दरडावुन बोलला.
“नाही, मी नाही येणार तुझ्याबरोबर. तु खुनी आहेस..तुझ्याबरोबर पकडले गेलो तर नाहक पोलीस आम्हाला सुध्दा आत टाकतील.. त्यापेक्षा आत्ताच पोलीसांना फोन करुन मी खरं खरं सांगुन टाकतो..” संजु म्हणाला.
“बरं संजु. जशी तुझी इच्छा.. तो बघ त्या मॉटेलच्या मागे एक पिसीओ आहे, जा फोन करुन ये..” दिन्या म्हणाला..

संजु झपझप चालत मॉटेलच्या मागे फोनबुथ शोधायला निघुन गेला. तो दिसेनासा होताच दिन्यासुध्दा त्याच्या मागोमाग धावला. जाताना दिन्याच्या चेहऱ्यावर ते भयानक हास्य मी पाहीले होते.

थोड्यावेळाने दिन्या परत आला.

“चल..” माझ्याकडे न बघताच दिन्या गाडीत बसला..
“संजु?”, उत्तर माहीती असुनही मी एक निरर्थक प्रश्न विचारला..
“तो आपल्या बरोबर नाही येणार.. त्याला मी दुसऱ्या गाडित बसवुन दिले आहे..” असं म्हणुन दिन्याने गाडी चालु केली.

काही क्षणातच आम्ही NH4 वर गोव्याच्या दिशेने सुसाट निघालो होतो.

“संजु आक्स्ड फॉर इट..” मी स्वतःशीच विचार करत होतो.. “कश्याला उगाच दिन्याच्या विरोधात जायचे? मुर्ख कुठला! झाली दिन्याच्या हातुन एक चुक.. काय त्यात एवढे? एक फडतुस व्होअरला तर टपकवले ना! एक दुःस्वप्न म्हणुन विसरुन जायचे..!”

“काय रे, कसला विचार करतो आहेस?” दिन्याच्या आवाजाने मी भानावर आलो.. दिन्याच्या चेहऱ्यावरचे टेंन्शन कुठल्या कुठे निघुन गेले होते.. तो नहमीप्रमाणे मस्त मुड मध्ये होता.. जसे काही, काही घडलेच नाही

“काही नाही रे.. मला आपलं असं वाट्त होते.. तो पिचपिच्या डोळ्याच्या म्हाताऱ्याने तुझं वर्णन पोलीसांना दिले तर? त्याच्याशिवाय आपल्याला कोणीच पाहीले नाहीये.. तो एक पुरावा राहीला बघ..”..

दिन्याने खाड्कन हॅन्ड्ब्रेक ओढुन गाडी ड्रिफ्ट केली..”यु आर राईट.. उगाच कश्याला पुरावे सोडा.. चल जाऊ परत..”, दिन्याने गाडी परत माघारी वळवली.

एक क्षण मी उगाचच दिन्याला सांगीतले असं वाटु लागलं.. तो बिच्चारा म्हातारा.. त्याचे काय होणार हे सांगायची आवश्यकताच नव्हती. जसं जसं मॉटेल जवळ यायला लागले तसं तसे माझे छातीचे ठोके वाढु लागले. लांबुनचे काळ्या-आकाश्याच्या पार्श्वभुमीवर ‘ड्राईव्ह-इन मॉटेलचे’ दिवे दिसु लागले. दिन्याने सावकाश गाडी कडेला उभी केली. मला गाडीत बसायला सांगुन दिन्या एकटाच आतमध्ये गेला. मला फार काळ वाट बघायला लागली नाही. आपले ‘काम’ उरकुन दिन्या काही वेळातच बाहेर आला. त्याने गाडी परत चालु केली आणि आम्ही गोव्याच्या दिशेने प्रयाण केले.

*********************************

“वॉस्को..वॉस्को..वॉस्को..वॉस्को..”
“पणजीम..पणजीम..पणजीम..पणजीम..पणजीम..”

बसचालक, खाजगी वाहतुकदार, टॅक्सीवाल्याच्या आवाजाने गोव्याचा स्टेशनपरीसर गजबजला होता. काळरात्र ओसरली होती आणि सुर्याची सोनेरी किरणे गोव्याच्या निळ्याश्यार समुद्राला चमकवुन टाकत होती. कालच्या रात्रीचे आमचे ते विद्रुप मुखवटे अंधारात विरुन गेले होते आणि आम्ही गोव्यात आलेल्या असंख्य पर्यटकांपैकीच एक होऊन गेलो होतो.

दिन्याने यावेळेस एक बऱ्यापैकी हॉटेलपाशी गाडी थांबवली..
“दिन्या.. अरे लय महाग वाटतेय हॉटेल.. परवडायचे नाय..” दिन्याला म्हणालो..
दिन्या परत एकदा तस्साच भयानक हसला आणि त्याने जाकीटाच्या खिश्यातुन पैश्याची पुडकी काढुन माझ्यासमोर फेकली..
“दिन्या.. इतके पैसे?? कुठुन आणले..” मी चाचरतच विचारले..
“काल त्या म्हाताऱ्याला टपकवला ना.. त्याच्या खोलीत कॅश-पेटीची किल्ली होती.. म्हणलं इझी-कॅश… कश्याला सोडा..उचलली..” दिन्या बेफीकीरीने म्हणाला.. “शिवाय ते बघ वर काय लिहीले आहे..” दिन्याने कॅसिनोच्या ग्लो-साईनकडे बोट दाखवले..

दिन्या खऱंच स्मार्ट आहे हं.. कसं काय सुचतं त्याला हे सगळं.. म्हणुनच तो भयानक असुनही माझं आणि त्याचं जमतं.

आमची रुम मस्त होती.. शिवाय ए/सी. कॉम्लेमेंट्री म्हणुन वाईनची बॉटल सुध्दा होती. तिथल्याच एका खुर्चीत मी स्वतःला लोटुन दिले.. दिन्याने तोपर्यंत टि.व्हि. लावला. अनपेक्षितपणे “ड्राईव्ह-इन” ची बातमी न्युज चॅनल्स वर दाखवली जात होती. इतक्या लवकर ही गोष्ट मिडीया पर्यंत पोहोचेल असं वाटलं नव्हतं

ब्लर व्हिजन करुन न्युज वर त्या नग्नावस्थेतील पोरीचे आणि रुममध्ये मान मोडुन पडलेल्ल्या म्हाताऱ्या मॅनेजरच प्रेत दाखवत होते.

“कुठल्यातरी एखाद्या विकृत, मनोरुग्ण माणसाचे हे काम आहे..” पोलीस न्युज-रिपोर्टरला माहीती देत होते.. “आम्हाला खोलीत आणि मॅनेजरच्या डेस्क पाशी एका माणसाचे ठसे सापडले आहेत. इतकेच नव्हे तर ह्या मॉटेलचे मॅनेजर मोठ्ठे आंबट-शौकीन होते. आपली इच्छा भागवण्यासाठी त्यांनी मॉटलमध्ये कित्तेक ठिकाणी बेमालुमपणे क्लोज-सर्कीट कॅमेरे बसवले होते. मॉटेलवर एका-रात्रीपुरत्या येणाऱ्या जोडप्यांची लाईव्ह क्लिपींग्ज ते मोठ्ठ्या चवीने बघत असतं. अर्थात त्यामुळे आम्हाला क्ल्यु मात्र मिळाला आहे. ह्या रुम मध्ये येणाऱ्या त्या खुन्याचे क्लिप्स आम्हाला मिळाले आहेत. साधारणपणे २५-२७ वयोवर्षाच्या, ५ft.9″ च्या एका गोऱ्या तरुणाचा आम्हाला शोध आहे. ”

“एकाच माणसाचे??” मला आश्रर्य वाटले.. “पण आम्ही तर तिघं होतो.. निदान खोलीत तरी आम्हा तिघांचे ठसे सापडायला हवे होते. म्हाताऱ्याला आम्ही दिन्याच्या मागे लपलो असल्याने दिसलो नसु पण कॅमेरात पण कुणीच कसे दिसले नाही.. आश्चर्य आहे. तस्सेच संजुच्या प्रेताचं काय? ते कसं कुणाला सापडले नाही? त्याबद्दल कोणीच कसं काही बोलत नाही.. दिन्याने काय केलं असेल नक्की त्याचं?”

“खुन्याबद्दल काही सुगावे आम्हाला हाती लागले आहेत.. पण त्याबद्दल अधीक आत्ताच सांगणं योग्य ठरणार नाही..” पोलीस बोलत होता..

“अबे छोड बे.. साला.. नाही सुगावा मिळाला म्हणुन मिडीया फाडुन खाईल या मामुला म्हणुन तो आपलं फेकतोय..आपल्यासारखे दिसणारे हजार सापडतील ह्या करोडो लोकांमध्ये आपल्याला ते शोधु पण शकणार नाय..” दिन्याने नेहमीचे बेफीकीरीचे विधान केले आणि त्याने चॅनेल बदलला.

काही वेळातच दारावर ‘टकटक’ झाली. दिन्या चित्याच्या चपळाईने उठला. तो दारापाशी गेला आणि त्याने ‘कि-होल’ मधुन बाहेर कोण आहे ते पाहीले. तो मागे वळला तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच भयानक हास्य होते. हळु आवाजात त्याने मला बाथरुमकडे जायला खुण केली.

बाहेरुन..”रुम सर्व्हिस..” एक मधाळ आवाज ऐकु आला.

मी धावत दारापाशी गेलो आणि की-होल मधुन डोकावुन बाहेर पाहीले.

गडद निळ्या रंगाचा बॉडी-फिट मीडी घातलेली, एका फिक्क्ट हिरव्या रंगाच्या रिबिनेचा आपल्या पाठीपर्यंत घनदाट मोकळे सोडलेल्या केसांचा पोनी बांधलेली एक तरुणी उभी होती.

दिन्याच्या मनामध्ये काय चालले आहे हे जाणवुन माझ्या अंगावर काटा आला.

“नको दिन्या.. आत्ता नको.. इथे भर वस्तीमध्ये..कालची घटना ताजी असतानाच अजुन एक..प्लिज नको..” मी काकुळतीला येऊन म्हणालो..

“रुम सर्व्हिस…” बाहेरुन परत तोच आवाज ऐकु आला..

“च्यायला.. ही पोरगी जात का नाहीये.. मरायचे आहे का हीला..” मी मनोमन विचार केला.
दिन्याने डोळे मोठ्ठे केले आणि मला बाथरुममध्ये जायची खुण केली.

केवळ नाईलाजास्तव, जड पावलांनी मी बाथरुममध्ये गेलो आणि दार आतमधुन लावुन घेतले.

बाहेरचे दार दिन्याने उघडले होते..

[क्रमशः]

भाग क्रमांक ३ पुढे वाचा..

6 thoughts on “आजा गुन्हा कर ले (भाग-२)

    1. अनिकेत Post author

      बघत असावा.. पण तो बेफिकीर होता ना.. त्याला ना जनाची पर्वा होती ना मनाची

      Reply
    1. अनिकेत Post author

      धन्यवाद विक्रांत, पुढचा (शेवटचा) भाग लवकरच

      Reply

Leave a comment